नायजेरियात सशस्त्र बंडखोरांकडून 200 नागरिकांची हत्या

फोटो स्रोत, Getty Images
नायजेरियाच्या झाम्फरा प्रांतात सशस्त्र बंडखोरांनी दोनशेहून अधिक नागरिकांची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.
सोमवारी (3 जानेवारी) बंडखोरांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात शंभरहून अधिक बंडखोरांचा मृत्यू झाला होता. जंगलात लपलेल्या बंडखोरांना बाहेर काढण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून बंडखोरांनी ही कत्तल केली आहे.
बंदूकधारी बंडखोरांनी घरं जाळली आणि लोकांना मारलं. गावकऱ्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितल्याप्रमाणे बंडखोरांनी दिसेल त्याला ठार केलं.
नायजेरियातील हिंसक घटनाक्रमातील हा आणखी एक भीषण टप्पा आहे. नायजेरिया सरकार आणि स्थानिक बंडखोर यांच्यात सातत्याने संघर्ष सुरू आहे.
शुक्रवारी (7 जानेवारी) हाती आलेल्या बातम्यांनुसार बंडखोरांनी शंभराहून अधिक लोकांना मारल्याचं स्पष्ट झालं होतं. 300 बंदुकधारी बंडखोर मोटारबाईकवरून मंगळवारी आणि गुरुवारीही (6 जानेवारी) गावांमध्ये आले होते.
इदी मुसा या एका गावातील नागरिकाने सांगितलं की, बंडखोरांनी 2000 गायीगुरंही पळवून नेली आहेत.
सरकारने केलेल्या हल्ल्यातून वाचण्यासाठी सशस्त्र बंडखोरांनी जंगलात आश्रय घेतल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
शनिवारी (8 जानेवारी) नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, सशस्त्र बंडखोरांविरुद्धची लढाई थांबणार नाही.
"हे सरकार कोणत्याही परिस्थितीत सशस्त्र बंडखोरांविरुद्ध हार मानणार नाही. आम्ही त्यांना शोधून काढू. बंडखोरांनी निरपराध लोकांवर केलेला हल्ला म्हणजे जाहीर हत्या करणाऱ्या टोळीने भ्याडपणातून केलेलं कृत्य आहे. आपल्या लष्कराने त्यांना घेरलं आहे," असं नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं.
बुधवारी (5 जानेवारी) नायजेरियाच्या सरकारने या बंडखोरांना अधिकृतपणे 'कट्टरतावादी' असं संबोधलं. यामुळे लष्कर बंडखोरांविरुद्ध कठोर कारवाई करू शकेल.
नायजेरियाच्या लष्कराने या आठवड्यात 537 सशस्त्र बंडखोरांना मारल्याचं सांगितलं. गेल्या वर्षभरात 374 लोकांना अटक करण्यात आल्याचंही लष्कराने सांगितलं.
हजारो जणांचा समावेश असलेल्या लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सशस्त्र बंडखोर मोठ्या प्रदेशाचा ताबा घेतात, जनावरं चोरतात आणि खंडणीसाठी लोकांना ओलीस धरतात. त्यांना विरोध करणाऱ्या लोकांना ते ठार मारतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








