नवालनी यांचा मृत्यू झाल्यास परिणाम भोगावे लागतील; अमेरिकेचा रशियाला इशारा

फोटो स्रोत, Getty Images
विरोधी पक्षनेते अलेक्सी नवालनी यांचा तुरुंगात मृत्यू झाला तर परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा अमेरिकेने रशियाला दिला आहे.
ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि युरोपीय संघ यांनीही नवालनी यांच्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.
नवालनी यांच्या डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांना पाठदुखीचा गंभीर त्रास आहे. त्यांच्या पायाला लागलं आहे. या दोन्हीसाठी वैदयकीय उपचार मिळाले नाहीत तर काही दिवसात त्यांचा मृत्यू होऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
लक्ष वेधून घेण्याचा नवालनी यांचा प्रयत्न आहे, असं ब्रिटनमधील रशियाचे राजदूत म्हणाले. त्यांना तुरुंगात मरू दिलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलं.
44वर्षीय नवालनी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सगळ्यात मोठे विरोधक आहेत. फेब्रुवारीत भ्रष्टाचाराच्या एका जुन्या प्रकरणी त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. मॉस्कोपासून 100 किलोमीटर अंतरावर पूर्वेकडील पोक्रोव शहरातील तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलं आहे.
राजकीय वैमनस्यातून हा आरोप करण्यात आला असल्याचं नवालनी यांचं म्हणणं आहे.
स्वत:च्या वैद्यकीय पथकाला तब्येतीची पाहणी करू न दिल्याच्या विरोधात त्यांनी 31 मार्चला उपोषण सुरू केलं. त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं की, अलीकडेच त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचं परीक्षण करण्यात आलं. त्यानुसार त्यांची किडनी खराब होऊ शकते तसंच त्यांना केव्हाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
रशियातील तुरुंगात नवालनी यांच्यावर योग्य उपचार न झाल्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांनी आवाज उठवला.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सलिवन यांनी सीएनएनशी बोलताना सांगितलं की, जर नवालनी यांचा मृत्यू झाला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून रशियाला जबाबदार धरलं जाईल.
नवालनी यांच्यावर होणारे उपचार हे चुकीचे आणि समाधानकारक नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे.
जॅक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, नवालनी यांची तातडीने तुरुंगातून सुटका करण्यात यावी. त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील अपराध्यांना शिक्षा देण्यात यावी. नवालनी यांच्यावर क्रेमलिन यांच्याकडून हल्ले हे केवळ मानवाधिकारांचं नाही तर रशियावासीयांचा देखील अपमान आहे.
अमेरिकेचा दबाव सुरुवातीपासूनच
रासायनिक हत्यारांचे एजंट नोवोचिक यांच्या माध्यमातून नवालनी यांना घातक असं विष देण्यात आलं, तेव्हापासून अमेरिकेने या मुद्यावर रशियाला धारेवर धरलं आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आदेशानुसार नवालनी यांना विष देण्यात आलं हा नवालनी यांचा दावा क्रेमलिनने फेटाळला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या मते नवालनी यांना विष देण्यामागे मॉस्कोचीच भूमिका आहे. या घटनेमुळे बायडन प्रशासनाने रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडलं.
याविरोधात रशियानेही कार्यवाही केली आहे.

फोटो स्रोत, Reuters
जोसेप बोरेल यांनी सांगितलं की, नवालनी प्रकरणासंदर्भात युरोपीय संघ चिंतेत आहे. नवालनी यांची प्रकृती तपासण्यासाठी जाण्याची परवानगी त्यांनी रशियाच्या अधिकाऱ्यांकडे मागितली आहे.
ते ट्वीटमध्ये लिहितात, "नवालनी यांची बिघडणारी तब्येत हा काळजीचा मुद्दा आहे. नवालनी यांना जे विश्वासार्ह वाटतात त्या डॉक्टरांकडून त्यांची तब्येत तपासण्यात यावी. नवालनी यांच्या प्रकृतीसंदर्भात ते जबाबदार आहेत. नवालनी यांची तातडीने तुरुंगातून अटींविना सुटका करण्यात यावी अशी मागणी युरोपीय महासंघ करत आहे".
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
युरोपीय कौन्सिल प्रेसनेही यासंदर्भाट ट्वीट केलं आहे, "नवालनी यांना जे डॉक्टर विश्वासार्ह वाटतात त्यांच्याकडून त्यांच्या तब्येतीची पाहणी करून घेण्यात यावी असं आवाहन युरोपीय काऊंसिलने रशियाच्या अधिकाऱ्यांना केलं आहे".
ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. नवालनी यांना वैद्यकीय सुविधा तातडीने पुरवण्यात याव्यात. राजकीय तुरुंगवासातातून त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी.
नवालनी यांना 20 वर्षांची मुलगी आहे. डेरिया नवेलनिया असं तिचं नाव आहे. ती सध्या अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथे शिकते आहे. तिने ट्वीटरवर लिहिलं की, एका डॉक्टरांना माझ्या बाबांना पाहण्याची परवानगी देण्यात यावी.
वृत्तसंस्था एपीनुसार, नवालनी यांची पत्नी युलिया यांनी म्हटलं की, उपोषण सुरू केल्यापासून नवालनी यांचं वजन नऊ किलोने घटलं आहे.
रशियात नवालनी यांचे समर्थक बुधवारी (21 एप्रिल) देशव्यापी आंदोलन करणार आहेत. वेगवान कार्यवाही करणं आवश्यक आहे अन्यथा खूप उशीर झालेला असेल असं त्यांनी सांगितलं.
शुक्रवारी चार डॉक्टरांनी तुरुंग अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सांगितलं की, नवालनी यांना पाहण्याची परवानगी देण्यात यावी. कारण त्यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे.
विषप्रयोगानंतर नवालनी यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर अलेक्झांडर पोलुपान यांनी सांगितलं की त्यांच्या रक्ताचे नमुने हेच दर्शवतात की त्यांच्यावर तातडीने उपचार व्हायला हवेत. अन्यथा येत्या काही दिवसात त्यांचा मृत्यू होईल.
नवालनी यांचे वैयक्तिक डॉक्टर एनेस्तासिया वेसिलीवा यांना तुरुंगाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, मी आणि अन्य तीन डॉक्टरांनी तुरुंगात जायला द्या यासाठी आर्जवं केली मात्र आम्हाला आत सोडण्यात आलं नाही.
सत्तरहून अधिक लेखक, कलाकार, यांनी एकत्र येत नवालनी यांना समाधानकारक वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी राष्ट्रपती पुतिन यांना स्वाक्षरीचं पत्र देण्यात आलं. हे पत्र द इकॉनॉमिस्ट आणि फ्रान्सच्या ला मोंड यांनी प्रकाशित केलं. या पत्रावर हॉलीवूड अभिनेता जूड लॉ, रॉल्फ फिनेस आणि बेनेडिक्ट कंबरबैच, हॅरी पॉटरच्या लेखिका जे.के.राऊलिंग आणि दिग्दर्शक केन बर्न्स यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.
रविवारी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत रशियाचे ब्रिटनमधील राजदूत आंद्रेई केलिन यांनी सांगितलं की, "नवालनी यांच्या जीवाला धोका नाहीये.
त्यांना तुरुंगात मरू दिलं जाणार नाही हे नक्कीच. नवालनी एका गुंडासारखं वागतात. व्यवस्थेने तयार केलेल्या नियमांचं उल्लंघन करतात. लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा नवालनी यांचा प्रयत्न असतो".
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








