You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संचार साथी अॅप : जुना मोबाईल फोन विकत घेण्यात काय धोके असतात? सायबर गुन्ह्यांबाबतच्या 5 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं
- Author, विजयानंद अरुमुगम
- Role, बीबीसी तामिळ
भारत सरकारच्या दूरसंचार विभागानं (डीओटी) इशारा दिला आहे की, "मोबाईल फोनच्या आयएमईआय नंबरशी छेडछाड केल्यास, दूरसंचार कायद्यांअंतर्गत, 3 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते."
दूरसंचार विभागानं लोकांनादेखील सल्ला दिला आहे की, त्यांच्या मोबाईल फोनचा आयएमईआय नंबर योग्य आहे की नाही हे विशेष ॲपचा वापर करून तपासून घ्यावं.
"जुने मोबाईल फोन खरेदी करताना आणि विकताना जर तुम्ही काळजी घेतली नाही, तर तुम्हाला कायदेशीर अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं," असं सायबर तज्ज्ञ म्हणतात.
24 नोव्हेंबरला भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयानं एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. त्यात मोबाईल फोनच्या आयएमईआय नंबरशी छेडछाड केल्यास आणि दूरसंचार उपकरणांचा गैरवापर केल्यास होणाऱ्या परिणामांबद्दल इशारा देण्यात आला आहे.
1. IMEI नंबरचा गैरवापर कसा टाळावा?
दूरसंचार विभागानं म्हटलं आहे की आयएमईआय नंबरचा गैरवापर ही भारतातील मोबाईल फोनच्या वापरातील वाढीमधली एक गंभीर समस्या बनली आहे.
दूरसंचार विभागानं हे गैरवापर टाळण्यासाठी काही गोष्टींची यादी दिली आहे. त्यानुसार-
- IMEI नंबर बदलण्यात आलेले मोबाईल फोन किंवा उपकरणं वापरणं तुम्ही टाळलं पाहिजे.
- बदललेले IMEI नंबर असलेले मॉडेम आणि सिम कार्ड वापरू नयेत.
- बनावट कागदपत्र, खोटी ओळख दाखवून किंवा फसवणूक करून सिम कार्ड खरेदी करू नयेत.
- जे लोक सिम कार्डचा गैरवापर करू शकतात अशा लोकांना सिम कार्ड देणं किंवा त्यांच्याकडून ती विकत घेणं हा फौजदारी गुन्हा आहे.
- वेबसाईटचा वापर करून कॉलिंग लाईन ओळख बदलणं हा दंडनीय गुन्हा आहे.
दूरसंचार विभागानं असाही इशारा दिला आहे की "जर कोणी सिम कार्डचा गैरवापर केला, तर त्या सिम कार्डच्या मूळ युजरवर कायदेशीर कारवाई केली जाईल."
"सायबर क्राइममध्ये वाढ होत असल्यामुळे, दूरसंचार विभागानं हा इशारा दिला आहे," असं बीएसएनएल कर्मचारी संघटनेचे (चेन्नई सर्कल) राज्य सचिव श्रीधर सुब्रमण्यम यांनी म्हटलं.
"पूर्वी, आधार कार्डच्या आधारे सिम कार्ड्सदिले जात होते. आता आधार क्रमांकासह हाताच्या ठशांची नोंद केल्यानंतरच सिम कार्ड दिले जातात. मात्र तरीही सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होते आहे," असं त्यांनी नमूद केलं.
कार्तिकेयन वकील आणि सायबर तंत्रज्ञान तज्ज्ञ आहेत. ते म्हणतात की, सर्व सायबर गुन्ह्यांची सुरूवात सिम कार्डपासून होते.
त्यांनी पुढे सांगितलं की, "गुन्हेगार त्यांची ओळख लपवून बनावट किंवा गैरमार्गांनी सिम कार्ड मिळवतात. कोणत्याही मोबाईल फोनसाठी एक विशिष्ट किंवा एकमेव आयएमईआय (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी) नंबर असतो. ज्याप्रमाणे हाताचे ठसे असतात, तसंच आयएमईआय नंबरच्या बाबतीत असतं."
"मात्र जेव्हा या नंबरमध्ये छेडछाड केली जाते, तेव्हा त्याचे उत्पादनाचे तपशील बदलतात."
कर्तिकेयन म्हणतात की जेव्हा सायबर गुन्हे करणारे लोक पकडले जातात, तेव्हा त्यांच्याकडे असलेला मोबाईल फोन आणि त्याचे मूळ उत्पादन तपशील यात फरक असतो.
ते म्हणतात, "ते दोन्ही सारखे नसतात. यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की त्यांना सोडलं जातं."
2. जुने मोबाईल फोन विकत घेण्यासंदर्भात काय अडचणी आहेत?
"ज्या व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड आहे, त्यानं वापरलेल्या मोबाईल फोनचा आयएमईआय नंबर त्याच्याशी जोडला (टॅग) जाईल. म्हणजेच ज्या व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड आहे, त्याचं नाव त्या आयएमईआय नंबरशी जोडलं जाईल," असं कार्तिकेयन म्हणतात.
ते पुढे सांगतात, "मोबाईल फोन विकत घेतल्यानंतर, तो तुम्ही शक्य तितका वापरला पाहिजे. तो फोन दुसऱ्या कोणाला विकण्याचं तुम्ही टाळलं पाहिजे. अगदी तो फोन विकण्यात आला, तरी ज्या मूळ ग्राहकानं तो विकत घेतलेला असतो, त्याच्या नावावरच तो फोन राहतो."
"त्यामुळे त्या फोनचा वापर करून करण्यात आलेल्या कोणत्याही गुन्ह्याबाबत त्याच्या मूळ मालकावरच कारवाई केली जाईल."
जेव्हा आपण जुनी कार किंवा मोटरसायकल विकतो, तेव्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे त्या वाहनाच्या मालकीचं नाव बदलण्याची सुविधा असते.
याचाच संदर्भ देत कार्तिकेयन म्हणाले की, "मोबाईल फोन विकताना मात्र अशी कोणतीही कागदपत्रं बदलली जात नाहीत. त्यामुळे जर मोबाईल फोनसाठीदेखील जर विशेष नोंदणी व्यवस्था असती, तर कोणतीही कायदेशीर समस्या निर्माण झाली नसती."
त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, "वापरलेल्या किंवा जुन्या मोबाईल फोनला बाजारात कमी किंमत मिळते. त्यामुळे निव्वळ काही हजार रुपयांसाठी कायदेशीर अडचणींना का सामोरं जायचं?"
3. आयएमईआय नंबरची सत्यता कशी तपासायची?
आपण वापरत असलेल्या मोबाईल फोनचा आयएमईआय नंबर योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी दूरसंचार विभागानं एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
त्यानुसार, दूरसंचार विभागानं प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, 'मोबाईल फोनच्या आयएमईआय नंबरचे तपशील 'संचार साथी वेबसाईट'वर जाऊन तपासता येतात.'
दूरसंचार विभागानं 'संचार साथी' नावाचं एक मोबाईल ॲप ॲपल आणि अँड्राईड मोबाईलसाठी विकसित केलं आहे.
कार्तिकेयन म्हणाले, "तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या मोबाईल नंबरची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईल फोनच्या आयएमईआय नंबरची नोंदणी करा."
"नोंदणी केल्यावर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगची तारीख आणि मॉडेल याची माहिती मिळू शकते. तसंच विशिष्ट मोबाईल फोन संबंधित सिम कार्डशी सुसंगत आहे की नाही हेदेखील तुम्ही जाणून घेऊ शकता."
त्यांनी पुढे सांगितलं की, "सध्या दोन सिम कार्डच्या सुविधेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अशावेळी दोन्ही सिम कार्डच्या नंबरची नोंदणी संचार साथीच्या वेबसाईटवर करता येऊ शकते आणि ते व्हेरिफाय केले जाऊ शकतात."
"आयएमईआय नंबरची नोंदणी करताना, तो सरकारी कागदपत्रांमधील उत्पादन क्रमांकाशी जुळतो की नाही हे तपासून घेतलं पाहिजे."
"जर मोबाईल फोनचा आयएमईआय नंबर त्याच्या मूळ तपशीलांशी जुळत नसेल, तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. ते टाळण्यासाठी, तुम्ही जिथून मोबाईल फोन विकत घेतला, त्याच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पाहिजे," असं कार्तिकेयन म्हणतात.
"मात्र, मोबाईल फोनच्या मूळ युजरला तेव्हाच अडचण येण्याची शक्यता असते, जेव्हा संबंधित मोबाईल नंबर वापरून गुन्हे केले जातात," असं श्रीधर सुब्रमण्यम म्हणतात. ते बीएसएनएल कर्मचारी संघटनेचे (चेन्नई सर्कल) राज्य सचिव आहेत.
4. जर तुमचा मोबाईल फोन हरवला तर काय करायचं?
जर तुमचा मोबाईल फोन हरवला किंवा चोरीला गेला, तर त्याचा आयएमईआय नंबर निष्क्रिय किंवा बंद करण्याची सुविधा, संचार साथीची वेबसाईट आणि ॲप या दोन्हीवर आहे.
जर मोबाईल फोन हरवला किंवा चोरीला गेला, तर तुम्ही त्याची माहिती नोंदवू शकता. संचार साथीच्या वेबसाईटवर देखील म्हटलं आहे की, यासंदर्भात तात्काळ कारवाई केली जाईल.
उदाहरणार्थ- संचार साथीच्या वेबसाईटवर म्हटलं आहे की यासंदर्भात आलेल्या तक्रारींवरून 41.78 लाख मोबाईल फोन ब्लॉक करण्यात आले आहेत.
संचार साथीच्या वेबसाईटवर असंही म्हटलं आहे की, मोबाईल कोणाच्या नावावर आहे? यासंदर्भातील माहिती घेण्यासाठी 2.84 कोटी विचारणा आल्या होत्या. त्यापैकी 2.48 कोटी विचारणांचं निराकरण करण्यात आलं आहे.
या वेबसाईटवर असंही म्हटलं आहे की, मोबाईल वापरून फसवणूक करण्यात आल्याबद्दल नोंदवण्यात आलेल्या 40.01 लाख तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे.
हरवलेला मोबाईल सापडला तर तो अनब्लॉक करण्याचा पर्यायदेखील संचार साथीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
"जर मोबाईल फोनवरील आयएमईआय नंबर चुकीचा आढळला, तर ज्या व्यक्तीकडे तो मोबाईल आहे, त्याला गुन्हेगार मानलं जाईल," असं सायबर तज्ज्ञ कार्तिकेयन म्हणतात.
"जर तुमचा मोबाईल फोन हरवला आणि तुम्हाला त्याचा आयएमईआय नंबर माहित नसेल, तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जा आणि त्यांना तुमचा मोबाईल नंबर सांगा. ते तुमचा आयएमईआय नंबर शोधून तुम्हाला सांगतील," असं त्यांनी सांगितलं.
5. दोषी आढळल्यावर काय शिक्षा होते?
भारत सरकारनं, नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी आणि दूरसंचार उपकरणं ओळखण्यासाठी, आयएमईआय नंबरच्या गैरवापराविरुद्धचे कायदे मजबूत केले आहेत, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या एका प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
दूरसंचार विभागानं संबंधित कायदेशीर तरतुदींची यादी केली आहे. त्यानुसार-
- मोबाईल फोनच्या आयएमईआय नंबरशी छेडछाड केल्यास, भारतीय दूरसंचार कायदा 2023 मध्ये कठोर दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.
- दूरसंचार कायदा 2023 च्या कलम 42(3) (सी) नुसार आयएमईआय नंबरशी छेडछाड करण्यास मनाई आहे.
- कलम 42 (3) (ई) नुसार फसवणूक करून, खोटी ओळख दाखवून आणि बनवेगिरी करून सिम कार्ड सिम कार्ड मिळवण्यास मनाई आहे.
- कलम 42(3)(एफ) नुसार, अनधिकृतपणे मोबाईल फोन, मॉडेम, सिम बॉक्सचा (एकाचवेळी अनेक सिम कार्डचा वापर करणे) वापर करणं किंवा छेडछाड केलेल्या आयएमईआय नंबरचा वापर करणं हा गुन्हा आहे.
- दूरसंचार कायद्यात म्हटलं आहे की याचं उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 50 लाख रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
- कलम 42(7) नुसार, हा अटकपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरतो.
- कलम 42(6) मध्ये अशा गुन्ह्यांना चिथावणी देणाऱ्यांना आणि प्रोत्साहन देणाऱ्यांना समान शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.
"गुन्हा करण्यास आणि गुन्ह्याला प्रोत्साहन देण्यासाठी समान शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा 50 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो," असं कार्तिकेयन म्हणतात.
ते पुढे सांगतात, "काही गंभीर स्वरूपाच्या सायबर गुन्ह्यांमध्ये, दोन्ही शिक्षा दिल्या जातात."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)