You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फबिंग : फोन वापरण्याच्या 'या' सवयीमुळे तयार होतोय नात्यांमध्ये दुरावा, जाणून घ्या कारणे आणि उपाय
- Author, यास्मिन रुफो
- Role, बीबीसी न्यूज
आपल्या नातेसंबंधांसाठी फोन चांगले नसतात हे आपल्याला माहीत आहे. तरीही आपण दिवसभरात अनेक वेळा फोन हातात घेण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही.
यालाच 'फबिंग' म्हणतात, म्हणजेच फोनमध्ये गुंग होऊन किंवा गुंतून समोरच्या व्यक्तीकडे नकळत दुर्लक्ष करणं. आणि हळूहळू हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग होऊन जातं.
'टीका करण्यापेक्षा विचार करा'
यामुळे नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, कारण जोडीदाराला आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत असं वाटू शकतं. पालकांनी सतत फोन वापरला तर लहान मुलांशी असलेलं नातं कमकुवत होतं आणि मोठ्या मुलांचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो.
एका मानसशास्त्रज्ञांच्या मते, स्वतःवर नियंत्रण नाही म्हणून स्वतःला दोष देण्यापेक्षा आपण फोन कधी आणि का वापरतो? याबाबत जाणीवपूर्वक विचार करणं अधिक प्रभावी ठरतं.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. कॅटलिन रेगेर म्हणतात की, जेव्हा आपण कोणासोबत असू, तेव्हा नकळत फोन उचलण्याची सवय थांबवण्यासाठी एक सोपी पद्धत वापरता येऊ शकते.
फोन हातात घेताना समोरच्या व्यक्तीला तुम्ही तो का घेत आहात हे आवर्जून सांगा. काम झालं की फोन लगेच बाजूला ठेवा आणि पुन्हा त्या व्यक्तीकडे लक्ष द्या.
हे वाचताना किंवा ऐकताना खूपच सोपं वाटतं. पण डॉ. रेगेर यांच्या मते हा छोटासा बदल आपल्या सवयी बदलायला मोठी मदत करतो. कारण आपण बहुतेक वेळा कोणताही विचार न करता लगेच मेसेज तपासतो, नोटिफिकेशन पाहतो किंवा 'क्षणात काहीतरी पाहतो' असं म्हणत फोन उचलतो.
महत्त्वाचं असेल तर स्पष्टपणे सांगणं. जर एखादा मेसेज आला आणि तो पाहणं गरजेचं असेल, तर ज्यांच्यासोबत तुम्ही आहात त्यांना अवश्य सांगा की, 'मी फक्त या मेसेजचं उत्तर देतो, मग पुन्हा तुमच्याकडे माझं लक्ष असेल.'
'मला ट्रेनची वेळ पाहायची आहे' किंवा 'मी माझ्या आईला उत्तर देत आहे' असं स्पष्ट सांगितल्याने तुमची फोन तपासण्याची सवय आपोआप थांबते. आणि समोरच्या व्यक्तीलाही वाटतं की, तुम्ही त्यांना अजूनही महत्त्व देत आहात.
"असं केल्याने समोरच्या व्यक्तीला आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय असं वाटत नाही," असं डॉ. रेगेर सांगतात.
"आणि यामुळे तुम्हीही सावध राहता, कारण तुम्ही विनाकारण अॅप्स उघडणं किंवा स्क्रोलिंग करत बसणं कमी करता."
असं केल्याने तुमचं नातं सुधारण्यासही मदत होऊ शकते.
'...तर समोरचाही तसंच प्रत्युत्तर देईन'
युनिव्हर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टनमधील मानसशास्त्राचे सहायक प्राध्यापक डॉ. क्लेअर हार्ट यांनी एका अभ्यासाचे नेतृत्व केलं. यात त्यांनी 196 लोकांशी त्यांच्या नात्यांबद्दल आणि फोन वापराबद्दल बोलून माहिती गोळा केली.
या अभ्यासात असं दिसून आलं की, जसं जसं लोकांना 'फबिंग' म्हणजेच दुर्लक्ष केलं जातंय असं वाटतं, तसं त्यांचं नातं बिघडत जाऊ लागतं.
"प्रत्येकजण एकसारखीच प्रतिक्रिया देत नाही," असं डॉ. हार्ट सांगतात.
"हे व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असतं. परंतु, एकदा एखाद्याला दुर्लक्षित केलं जातंय असं वाटलं की तेही प्रत्युत्तर म्हणून तसंच वागू लागतात."
"तेही मग आपला फोन उचलतात, आणि तिथूनच हे धोकादायक चक्र सुरू होतं. दोघांनाही वाटतं की, स्क्रीनवरील गोष्ट त्यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे."
ज्यावेळी तुम्हाला फबिंग केलं जातं, तेव्हा तुमच्यातला संपर्क तुटतो. आणि एकदा का तुम्ही एकत्र घालवलेला क्षण सोडून स्क्रीनकडे वळलात, तर पुन्हा आधीसारखं जुळायला वेळ लागू शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)