टायटॅनिकच्या गाजलेल्या पोझमधलं जहाजाचं रेलिंग सध्या कशा स्थितीत आहे?

फोटो स्रोत, Alamy
- Author, रेबेका मोरेल आणि एलिसन फ्रांसिस
- Role, बीबीसी न्यूज सायन्स
टायटॅनिक चित्रपटात जॅक ( लियोनार्दो डी क्रॅप्रिओ) आणि रोझ (केट विन्स्लेट) यांनी चित्रपटात जहाजाच्या एका टोकाला असलेल्या रेलिंगवर एक विशेष पोझ दिली. ही पोझ एवढी प्रसिद्ध झाली की, आजही अनेकदा एखाद्या खास ठिकाणी कुणीतरी या पोझमध्ये फोटो काढताना आपल्याला दिसतो.
चित्रपटातील दृश्याप्रमाणेच ही पोझ आणि त्यातील जहाजाचं ते रेलिंगची सगळ्यांना लक्षात राहतं.
पण टायटॅनिक जहाज जेव्हा बुडालं त्यानंतर जहाजाच्या या भागाचं म्हणजे रेलिंगचं काय झालं? असा प्रश्न निर्माण होतो.
तर सध्या पाण्याखाली असलेल्या जहाजाचं हे रेलिंग नामषेश होण्याच्या मार्गावर आहे.
अटलांटिक समुद्राच्या तळाशी असलेल्या या जहाजाचा एक फोटो सध्या चर्चेत आहे. जहाजाच्या त्याच प्रसिद्ध रेलिंगचा हा फोटो आहे.
एका नवीन शोध मोहिमेत जहाजाच्या रेलिंगच्या अवशेषांमध्ये कशा प्रकारचे बदल होत आहेत, हे समोर आणलं जात आहे.
या संशोधनानुसार या रेलिंगचा एक मोठा भाग पूर्णपणे गंजून नष्ट झाला आहे. एका खासगी कंपनीच्या रोबोटीक व्हेईकल्सच्या मदतीनं सध्या ही शोधमोहीम राबवली जात आहे.
यावर्षी एका रोबोटने रेलिंगची काही छायाचित्रं घेतली. त्या छायाचित्रांवरून 100 वर्षांनंतर या जहाजाच्या अवशेषांत कशाप्रकारचे बदल होत आहेत, हे स्पष्ट होत आहे.
एप्रिल 1912 मध्ये एका हिमनगाला धडकून हे जहाज बुडालं होलं. या अपघातात 1500 जणांचा मृत्यू झाला होता.


आरएमएस टायटॅनिक कंपनीच्या संचालक टोमासिना रे यांच्या मते, "टायटॅनिकचा हा समोरचा भाग प्रचंड प्रसिद्ध आणि लोकप्रियदेखिल आहे. एखादं जहाज समुद्रात मोठ्या खडकाला धडकून किंवा वादळात नष्ट होण्याचा किंवा बुडण्याचा विचार केला जातो तेव्हा सर्वात आधी डोळ्यासमोर येतात ती टायटॅनिक चित्रपटाची दृश्यं. पण आता हे अवशेष पूर्वीसारखे दिसत नाहीत."
अवशेषांमध्ये काय बदल झाले?
टॉमासीना रे याच्या मते, दिवसेंदिवस या जहाजांच्या अवशेषांचं नुकसान होत असून हा, आपल्यासाठी इशारा आहे. टायटॅनिकचं अस्तित्व तिथं कधीपर्यंत राहील, असं लोक विचारत असतात. पण हे आम्ही सांगू शकत नाही. एका कालावधीनंतर कोणत्याही धातूची झीज होऊन तो नष्ट होतो.
जहाजाच्या या रेलिंगचा जवळपास 4.5 मीटर लांबींचा भाग गेल्या दोन वर्षांत कोसळल्याचं, टीमचं म्हणणं आहे.
डीप सी मॅपिंग कंपनी मिझालिन आणि लघुपट निर्माते अटलांटिक प्रोडक्शनं 2022 मध्ये एक मोहीम सुरू केली होती.

फोटो स्रोत, RMS TITANIC INC
ही छायाचित्रे आणि डिजिटल स्कॅन हा त्याच मोहिमेचा भाग आहेत. आधीच्या फोटोंमध्ये दाखवल्याप्रमाणे हे रेलिंग आणि ठिक अवस्थेत होतं. पण आता त्याचा भाग कोसळायला सुरुवात झाली आहे.
आणखी काय आले समोर?
जवळपास 3800 मीटर खोल तळाशी असलेल्या जहाजाच्या अवशेषांबरोबरच इतर भागावरही सूक्ष्मजीवांचा परिणाम होत आहे. त्यामुळं हा भाग नष्ट होत चालला आहे. तसंच बऱ्याच भाग गंजून त्याचा थर निर्माण झाला आहे.
या सर्वामुळं टायटॅनिकचा बराचसा भाग कोसळत असल्याचं मागील काही शोधमोहिमांमधून समोर येत आहे. यापूर्वी 2019 मध्ये व्हिक्टर वेस्कोवो यांनी एका शोधमोहीम राबवली होती. तेव्हाही समुद्राच्या तळाशी यंत्र सोडण्यात आलं होतं.
त्यावेळी जहाजात अधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या खोल्या (क्वार्टर्स) पूर्णपणे: नष्ट होऊन खाली ढासळत असल्याचं समोर आलं होतं.

फोटो स्रोत, RMS Titanic Inc
आरएमएस टायटॅनिक कंपनीद्वारे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ही मोहीम राबवण्यात आली.
यादरम्यान, रिमोटद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या दोन रोबोटिक वाहनांद्वारे या जहाजाच्या अवशेषांची तब्बल 20 लाखांपेक्षा अधिक छायाचित्रे आणि 24 तासांचे एचडी व्हीडिहओ घेण्यात आले. त्यामध्ये जहाजाच्या रेलिंगचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसत आहे.
कंपनी आता या फुटेजचं सूक्ष्म निरिक्षण करत आहे. जहाजाच्या संपूर्ण अवशेषांचे थ्रीडी स्कॅन केले जाईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर आणखी छायचित्रे समोर येतील.
ढिगाऱ्यात आढळली पुरातन मौल्यवान मूर्ती
या मोहिमेदरम्यान संशोधन करणाऱ्या टीमला एक मूर्तीही सापडली. मोहिमेदरम्यान त्यांना ही शोधायची होती. अखेर प्रचंड प्रयत्नांनंतर त्यांना ही मूर्ती मिळाली.
कांस्य धातूची ही मूर्ती 1986 साली आढळून आली होती. तिचं पहिलं छायाचित्र रॉबर्ट बालार्ड यांनी घेतलं होतं. या मूर्तीला 'डायना ऑफ व्हर्सेल्स' असं संबोधले गेलं. एक वर्षापूर्वी टायटॅनिकच्या ढिगाऱ्यात ती आढळून आली. त्याआधी खरंतर ती कुठे आहे हे माहिती नव्हतं. 60 सेंमी लांबीची ही मूर्ती नंतर आढळली नव्हती.
पण यावेळी ढिगाऱ्यात पाठमोरी पडलेली ही मूर्ती दिसून येत आहे.
"ही मूर्ती शोधणं म्हणजे एखाद्या मोठ्या ढिगाऱ्यात सूई शोधण्याइतंक अवघड काम होतं. यावर्षी ती पुन्हा शोधणं हे एक महत्त्वाचं काम होतं," असं टायटॅनिकचे संशोधक आणि व्हिटने टायटॅनिक पॉडकास्टचे प्रेझेंटर जेम्स पेन्का यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, "टायटॅनिकमध्ये प्रथमश्रेणी लाऊंज ही सर्वात सुंदर आणि मोठी खोली होती. या खोलीचे मुख्य आकर्षण डायना ऑफ व्हर्सेल्स होती. मात्र, दुर्दैवाने टायटॅनिक दोन तुकडे होऊन बुडाले, तेव्हा हे लाऊंजही दोन भागांत विभागले गेले. डायनाची मूर्तीही तुटली आणि या ढिगाऱ्यात नाहीशी झाली.

फोटो स्रोत, RMS TITANIC INC
आरएमएस टायटॅनिककडे टायटॅनिक संवर्धन करण्याचे अधिकार आहेत. जहाजाच्या अवशेषांपर्यंत पोहचण्याची आणि तेथील सामान बाहेर काढण्याची परवानगी असलेली ही एकमेव कंपनी आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीने जहाजाच्या अवशेषांच्या ढिगाऱ्यातून हजारो तुकडे बाहेर काढले आहेत. यातील काही भागांना जगभरात प्रदर्शितही करण्यात आलं आहे.
पुढी आणखी काही वर्षांत पुन्हा समुद्राच्या तळाशी जाऊन काही वस्तू बाहेर काढण्याचा कंपनीचा मानस आहे.
ही मूर्ती यापैकीच एक आहे. मात्र, काही लोकांच्या मते जहाजाचा ढिगारा एखाद्या स्मशानभूमीप्रमाणे आहे. तो तिथे तसाच सोडून दिला जावा.
जेम्स पेन्का म्हणतात, "ही अत्यंत देखणी अशी मूर्ती असून ती तिची स्तुती व्हावी या उद्देशाने बनविण्यात आली होती. मात्र 112 वर्षांपासून ती समुद्राच्या तळाशी आहे. डायनाला परत आणलंच गेलं पाहिजे. म्हणजे लोकांना ती बघायला मिळेल."
यामुळं इतिहास, वस्तूचे मूल्य, सागरी संशोधन, आणि मूर्तिकला याविषयी लोकांमध्ये आकर्षण निर्माण होईल, असं पेन्का यांना वाटतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











