You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित डोभाल यांच्या 'इतिहासाचा बदला घ्यायचाय' या विधानाचा अर्थ काय? ते नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी 'इतिहासाचा प्रतिशोध किंवा बदला घ्यायचा आहे' असं म्हटलं होतं. सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्यावरून चर्चेला उधाण आलं आहे.
अजित डोभाल म्हणाले की, "इतिहास आपल्याला आव्हान देतो. प्रत्येक तरुणामध्ये पुढे जाण्याची जिद्द आणि ऊर्जा असली पाहिजे. 'प्रतिशोध' हा शब्द चांगला वाटत नसला, तरी त्यात मोठी ताकद असते. आपल्याला आपल्या इतिहासाचा बदला घ्यायचा आहे."
यानंतर विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. पण भाजपचे नेते आणि काही लोक अजित डोभाल यांच्या समर्थनात उभे राहिलेले दिसले.
जम्मू–काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी अजित डोभाल यांच्या वक्तव्याला दुर्दैवी म्हटलं आहे.
मेहबुबा मुफ्ती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं की, "देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या इतक्या मोठ्या पदावरचा अधिकारी जर द्वेष आणि सांप्रदायिक विचारांमध्ये सहभागी होत असेल, तर ते खूप दुर्दैवी आहे. त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे मुसलमानांविरोधातील हिंसाचार सामान्य असल्यासारखं दिसून येतं."
एकेकाळी एनडीएच्या (नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स) सहकारी राहिलेल्या मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, "शेकडो वर्षांपूर्वीच्या घटनांचा बदला घेण्याचं आवाहन आजच्या 21व्या शतकात करणं चुकीचं आहे. अशा वक्तव्यांमुळे गरीब आणि अशिक्षित तरुणांना भडकवलं जातं आणि आधीच अडचणीत असलेल्या अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य केलं जातं."
'मंदिरं लुटली गेली, आम्ही फक्त पाहत राहिलो'
शनिवारी (10 जानेवारी) 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग–2026' या कार्यक्रमात अजित डोभाल यांनी तरुणांना सांगितलं की, "तुम्ही भाग्यवान आहात कारण तुम्ही स्वतंत्र भारतात जन्माला आला आहात. भारत नेहमीच तुम्हाला वाटतो इतका स्वतंत्र नव्हता. आपल्या पूर्वजांनी या स्वातंत्र्यासाठी खूप त्याग केले आहेत, त्यांना अपमान सहन करावा लागला आणि असहाय काळ अनुभवावा लागला आहे.
"खूप लोकांना फाशी देण्यात आली. भगतसिंगांना फाशीचा सामना करावा लागला, सुभाषचंद्र बोस यांना आयुष्यभर संघर्ष करावा लागला, महात्मा गांधींना सत्याग्रह करावा लागला आणि अनेक लोकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली."
त्यांनी पुढे सांगितलं, "आपली गावे जाळली गेली, आपली संस्कृती नष्ट झाली, आपली मंदिरं लुटली गेली. आपण असहायपणे फक्त पाहत राहिलो. हा इतिहास आपल्याला आव्हान देतो. 'प्रतिशोध' हा शब्द चांगला नाही, पण त्यात मोठी ताकद आहे."
"आपल्याला आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे. आपल्या हक्कांवर, विचारांवर आणि श्रद्धांवर आधारित एक महान भारत पुन्हा उभा करायचा आहे."
'इतिहासाने आपल्याला धडा शिकवला आहे'
डोभाल म्हणाले, "आपली एक प्रगत संस्कृती होती. आपण कधीही कुणाचं मंदिर नष्ट केलं नाही, कुठे जाऊन लुटालूट केली नाही आणि बाहेरच्या लोकांवर हल्ले केले नाहीत. तेव्हा सर्व जग फार मागे होतं.
पण आपण आपल्या सुरक्षिततेकडे लक्ष दिलं नाही आणि कोणते धोके आहेत, हे समजू शकलो नाही. आपण त्याकडे दुर्लक्ष केलं. इतिहासाने आपल्याला एक धडा शिकवला आहे. तो धडा आपण शिकलो का, आणि पुढच्या पिढ्यांना तो आठवेल का? जर तो विसरला गेला, तर देशासाठी ती सर्वात मोठी शोकांतिका ठरेल."
यावेळी डोभाल यांनी एक उदाहरण सांगितलं. ते म्हणाले,"सेंट पीटर्सबर्गमध्ये एक फार वृद्ध रबाय (ज्यूइश धर्मगुरू) राहायचा. तो तिथल्या बिशपचा चांगला मित्र होता. एकदा बिशप रबायच्या घरी गेला. रबायचं वय 80 ते 85 वर्षे होतं. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते आणि तो काहीतरी विचार करत होता. बिशपने विचारलं, काय विचार करत होता? रबाय म्हणाला, ज्यूंचं काय होईल?, याचा मी विचार करत होतो."
बिशपने पुन्हा विचारलं, "तुम्ही मागील 2000 वर्षांपासून संघर्ष करत आहात, यातना सहन करत आहात, तुम्हाला याचं दुःख होत नाही का? यावर रबायने उत्तर दिलं, माझ्या मनात असा विचार आला की, या हजारो वर्षांच्या संघर्षाच्या परंपरेने ही आग जिवंत ठेवली आहे. येणाऱ्या पिढ्यांनी विसरू नये की, आपल्याला पुन्हा शक्तिशाली व्हायचं आहे आणि स्वतःचं संरक्षण करायचं आहे."
यानंतर अजित डोभाल म्हणाले, "हा भाव होता, ही एक खूप ताकदवान भावना आहे. आपल्याला या भावनेतून प्रेरणा घ्यायला हवी. अनेक गोष्टी आपल्यावर परिणाम करतात आणि आपल्याला वाटतं की आपल्यावर अन्याय झाला किंवा वाईट वागणूक मिळाली आहे.
"आपली गावं जाळली, आपल्या मातृशक्तीचा अपमान झाला. त्यामुळे आपण स्वतःला अधिक मजबूत बनवणार आहोत. आर्थिक, संरक्षण आणि तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात पुढे जाणं आवश्यक आहे."
सध्याच्या सरकारबाबत डोभाल म्हणाले की, "मनोबल टिकवण्यासाठी नेतृत्व खूप महत्त्वाचं आहे. आज आपण खूप भाग्यवान आहोत की, आपल्या देशात असं नेतृत्व आहे. एक असा नेता आहे, ज्याने 10 वर्षांत देशाला खूप पुढे नेलं आहे."
'डोभाल यांच्या वक्तव्यावरून वाद'
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी एक्सवर लिहिलं की, देशाचं संरक्षण करणं हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचं कर्तव्य आहे. पण ते त्याऐवजी तरुणांना इतिहासाचा बदला घेण्यासाठी चिथावणी देत आहेत.
पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यांमागील दहशतवादी कुठे आहेत?, याचं उत्तर अजित डोभाल यांना सर्वात आधी द्यावं लागेल. दिल्लीत स्फोट कोणी घडवून आणला? पुलवामा, पहलगाम आणि इतर हल्ल्यांमध्ये गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाला तुम्ही जबाबदार आहात. तुम्हाला राजीनामा देऊन घरी बसावं लागेल."
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका तवलीन सिंह यांनी लिहिलं की,"राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या भाषणाने मला गोंधळात टाकलं. त्यांनी आपली संस्कृती नष्ट करणाऱ्यांचा बदला घेण्याविषयी भाष्य केलं आहे. मग आपण सर्वात आधी कोणावर हल्ला केला पाहिजे- अफगाणिस्तान, उझबेकिस्तान की तुर्कीये?"
द हिंदूच्या डिप्लोमॅटिक अफेअर्सच्या संपादक सुहासिनी हैदर म्हणाल्या, "राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भारत आपल्या वसाहतवादाचा बदला घेणार आहेत, असे संकेत देत आहेत का? ब्रिटनकडून, उझबेकिस्तानकडून की ज्या देशातून वसाहतवाद्यांनी आक्रमण केलं त्यांचा?"
दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजचे प्राध्यापक आणि काँग्रेसचे नेते डॉ. रतन लाल यांनी एक्सवर लिहिलं, "जर ही बातमी खरी असेल, तर सर्वात आधी डोभाल यांनी आपल्या मुलाला पुढे पाठवलं पाहिजे. बातमी संपली."
'अनेकांचा डोभाल यांना पाठिंबाही'
एकीकडे अजित डोभाल यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला. तर दुसरीकडे काहींनी त्याचं समर्थनही केलं आहे.
भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. निखिल आनंद म्हणाले की, "कृपया आश्चर्यचकित होऊ नका. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी जे काही सांगितलं, ते योग्य आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी आहे.
ते देशाच्या सुरक्षा आणि भारताच्या ऐक्याविरुद्ध बोलणाऱ्यांना संदेश देत आहेत. इतिहासावर आधारित निर्णय नेहमी योग्य आणि प्रामाणिक असावेत. लोकांनी घाबरू नये, उलट त्यांनी ऐतिहासिक सत्य ऐकण्यासाठी संयम बाळगला पाहिजे."
संरक्षण विश्लेषक नितीन गोखले यांनी एक्सवर लिहिलं, "ट्वीट्स, शॉर्ट्स किंवा रील्स पाहून आपलं मत बनवू नका. संपूर्ण भाषण ऐका आणि मगच तुमचं मत तयार करा, नाहीतर गैरसमज होण्याचा धोका असतो, असं अनेक अनुभवी पत्रकार आणि टीकाकारांसोबत घडलं आहे."
"त्यांच्या मते, नेतृत्व म्हणजे पद किंवा ताकद नसून, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि त्यांना पूर्ण आत्मविश्वासाने अंमलात आणणं होय."
प्रोफेसर शिरीष काशीकर यांनी लिहिलं की, "राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचं हे भाषण खूप प्रेरणादायी आहे. त्यांनी राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच आजच्या भारतीय तरुणांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे ते आपलं आयुष्य देशासाठी उपयोगी बनवू शकतात."
आंध्र प्रदेशचे मंत्री सत्यकुमार यादव यांनी एक्सवर लिहिलं की, "विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल म्हणाले की युद्ध हे रक्तपातासाठी नसून, एखाद्या देशाची इच्छाशक्ती तोडण्यासाठी किंवा भंग करण्यासाठी लढले जातात."
ते म्हणाले की, "राष्ट्रीय मनोबल हीच देशाची खरी ताकद आहे. मोदी सरकारच्या ठाम नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत भारताची इच्छाशक्ती, सामर्थ्य आणि जागतिक ओळख वेगाने वाढली आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.