कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ स्फोट; 103 जणांचा मृत्यू

इराण स्फोट

फोटो स्रोत, IRNA

इराणच्या रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सचे जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ झालेल्या स्फोटातील मृतांचा आकडा 103 वर पोहोचला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

कासिम सुलेमानी यांच्या हत्येच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या वेळी सुरू असलेल्या कार्यक्रमात हे स्फोट झाले.

सरकारी मीडियाच्या माहतीनुसार, या कार्यक्रमात दोन 'भयावह स्फोट झाल्याचे आवाज' ऐकू आले.

इराण

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA

इराणमध्ये आपत्कालीन सेवांची निगराणी करणाऱ्या संघटनेनं म्हटलं की, या स्फोटांमध्ये 103 जण मारले गेले असून अनेक जण जखमी झाले आहेत.

करमन रेड क्रिसेंट सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या मते, घटनास्थळापासून आतापर्यंत 50 जणांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे.

करमन मेडिकल इमर्जेन्सी सेंटरचे प्रमुख शहाब सालेही यांनी दोन बॉम्ब स्फोट झाल्याची माहिती दिली.

करमनचे महापौर सईद शेरबाफ म्हणाले की, दोन्ही स्फोट 10 मिनिटांच्या अंतरानं झाले होते.

इराणची वृत्तसंस्था तस्नीमच्या माहितीनुसार, बॉम्ब दोन बॅगांमध्ये ठेवण्यात आले होते आणि स्फोट लांबून करण्यात आले.

अधिकाऱ्यांनी लगेचच त्याठिकाणी उपस्थित लोकांना लवकरात लवकर कार्यक्रमाच्या ठिकाणाहून जाण्यास सांगितलं होतं.

इराण स्फोट

फोटो स्रोत, UGC

सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या काही व्हिडिओमध्ये रस्त्यावर मृतदेह पडलेले दिसत आहेत.

जनरल सुलेमानी यांची 2020 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्याच हत्या करण्यात आली होती.

इरिब यांच्या मते, साहब अल-झमान मशिदीजवळ शेकडो लोक जनरल सुलेमानी यांच्या हत्येच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी जात होते.

इराणचे सुप्रीम लीडर अयोतुल्लाह अली खामेनई यांच्यानंतर सुलेमानी यांना देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हटलं जात होतं.

कोण होते कासिम सुलेमानी?

इराणच्या कर्मन प्रांतात 11 मार्च 1957 रोजी कासिम सुलेमानी यांचा जन्म झाला होता. 80 च्या दशकात इराण इराकमध्ये युद्ध झालं होतं. या युद्धावेळी इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड्स कॉर्प्स' या सेनेनी महत्त्वपूर्ण बजावली होती. 1980 मध्ये ते या सेनेत सामील झाले.

1980 ते 1988 या काळात झालेल्या इराण-इराक युद्धावेळी सुलेमानी यांनी साराल्लाहच्या 41 व्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं. इराणची पूर्वेची सीमा सांभाळण्याची जबाबदारी या तुकडीकडे होती.

इराकविरोधात झालेल्या अनेक कारवायांमध्ये जनरल सुलेमानी यांचा सहभाग होता.

क़ासिम सुलेमानी

फोटो स्रोत, Iranian Supreme Leaders Office via EPA

रॉयटर्सने ऑपरेशन डॉन 8, कर्बाला 4 आणि कर्बाला 5 या ऑपरेशनमध्ये त्यांचा सहभाग होता. इतकंच नाही तर लेबनॉन, सीरिया आणि अफगाणिस्तानध्ये इराणने केलेल्या कारवाया या सुलेमानी मार्फत झाल्याचं बीबीसी मॉनिटरिंगने 'न्यूयॉर्कर'च्या हवाल्याने म्हटलं आहे.

मार्च 2019 मध्ये सुलेमानी यांना इराणने 'ऑर्डर ऑफ जोल्फाकार' हा सर्वोच्च वीर पुरस्कार दिला होता. 1979 नंतर हा पुरस्कार मिळालेले ते पहिले इराणी व्यक्ती होते. इराणचे शाह अयातुल्लाह खोमेनी हे सुलेमानी यांना 'लिव्हिंग मार्टिर' म्हणजे 'जीवंत हुतात्मा' असं म्हणत.

जानेवारीत अमेरिकी हल्ल्यात ठार

कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं जानेवारी 2020 मध्ये इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ल्यात ठार केलं. सुलेमानी हे इराणच्या कुड्स सेनेचे प्रमुख होते.

कुड्स सेना ही इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सची एक शाखा आहे. या सेनेच्या माध्यमातून इराणबाहेरील कारवाया केल्या जातात.

याच हल्ल्यात कताइब हिजबुल्लाहचा कमांडर अबू महदी अल मुहांदिस हा देखील ठार झाल्याचं अमेरिकेने सांगितलं होतं.

IRGC

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, IRGC

"परदेशात राहणाऱ्या अमेरिकन सैनिकांच्या सुरक्षेसाठी कासिम सुलेमानी यांना ठार मारण्याचं पाऊल उचललं गेलं. अमेरिकेच्या अध्यक्षांनीच तसा आदेश दिला होता. सुलेमानी यांना अमेरिकेनं दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं," अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण खात्यानं दिली होती.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)