अजान सुरू झाली आणि तो पटकन बोलला, ‘आपल्या लोकांना हे चालत नाही. हेच काँग्रेसला समजत नाही’

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, शेगाव

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेनं महाराष्ट्रातील 14 दिवसांचा टप्पा पूर्ण केला आहे.

रविवारी रात्री (20 नोव्हेंबर) विदर्भातल्या बुलडाणा जिल्ह्यातून या यात्रेनं मध्य प्रदेशात प्रवेश केला आहे.

पण, राहुल यांच्या या यात्रेला विदर्भात कसा प्रतिसाद मिळाला? राहुल यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्याबाबत विदर्भातील जनतेला काय वाटतं? आणि भारत जोडो यात्रेचा काय परिणाम होऊ शकतो? हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं शेगाव गाठलं.

17 नोव्हेंबरच्या संध्याकाळी आम्ही शेगावला पोहचलो. मुक्कामाची सोय व्हावी याकरता शेगावमधील संत गजानन महाराजांच्या भक्त निवासात जाऊन चर्चा केली. पण, तिथं सगळ्या खोल्या बूक असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं.

काँग्रेसनं किती खोल्या बूक केल्या, असं विचारल्यावर मात्र तिथल्या कर्मचाऱ्यांनी याबाबत भाष्य करणं टाळलं.

त्यानंतर मग आम्ही एका खासगी गेस्ट हाऊसमध्ये आमची राहायची सोय केली. इथं सामान ठेवल्यानंतर आम्ही बाहेर पडलो, तर शेगावात सगळीकडे काँग्रेस नेत्यांचे बॅनर्स लागल्याचे दिसून आले. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठीचे हे बॅनर्स होते.

आजूबाजूचा परिसर बघून झाल्यानंतर आमच्याकडे काही वेळ शिल्लक असल्यानं आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात गेलो आणि दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो.

इथंच माझी भेट जवळा येथील एका ग्रामस्थाशी झाली. ते माझ्या मागे उभे होते.

कुणीतरी व्हीआयपी येऊन गेला म्हणून एवढा मोठा गाड्यांचा ताफा रस्त्यात दिसत होता, कदाचित पालकमंत्री असावेत, असं ते म्हणाले. आम्ही मंदिरात येण्याआधी गाड्यांचा मोठा ताफा मंदिर परिसरातून गेला होता. त्याविषयी ते बोलत होते.

मग मी त्यांना राहुल गांधींच्या यात्रेविषयी विचारलं तर ते म्हणाले, स्वत: जवळचा पैसा संपला की मोठी माणसं घराबाहेर पडतात.

जवळा गावात एक हेलिपॅड तयार करण्यात आलं असून राहुल गांधींच्या सभेसाठी (18 नोव्हेंबरची सभा) शरद पवार आणि सोनिया गांधी येणार असल्याचं ते म्हणाले.

तिथून बाहेर पडल्यानंतर मी लगेच काही स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी संपर्क साधला. तर याबाबत अद्याप काही स्पष्टता नसल्याचं त्यांनी सांगितलं.

तर दुसरा एक कार्यकर्ता म्हणाला, अशी चर्चा केली तरच गर्दी जमते.

रात्री 8च्या सुमारास पत्रकारांसाठीचा पास घेण्यासाठी मी स्थानिक काँग्रेस नेत्यांना फोन केला. तर त्यांनी सभास्थळी या म्हणून सांगितलं.

मी तिथं पोहचलो तर गेटवरील सिक्युरिटी ऑफिसरनं आत प्रवेश करता येणार नाही, असं सांगितलं. आतमध्ये काँग्रेसचे नेते सभेच्या नियोजनाची तयारी करत असल्याचं सांगितलं.

इथंच बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांशी हाय हॅलो करता आलं. पत्रकारांच्या पाससाठी त्यांना विचारणा केली, तर वेगवेगळी उत्तरं मिळत होती.

तिथं दीड तास वाट बघून मी जेवण करण्यासाठी तिथून बाहेर पडलो. रात्री 11च्या सुमारास माझा मीडियाचा पास काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं मला आणून दिला. कारण या पासशिवाय मला काहीही रिपोर्टिंग करणं शक्य नव्हतं. त्यामुळे माझा एवढा आटापिटा सुरू होता.

18 नोव्हेंबरला दुपारी राहुल गांधी यांची शेगावमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. ही महाराष्ट्रातील त्यांची दुसरी सभा असल्यानं यावेळी ते काय बोलतात हे महत्त्वाचं होतं.

मी 18 नोव्हेंबरच्या सकाळी 9 वाजता सभास्थळी गेलो, तर तिथं जवळपास 70 हजार खुर्च्या टाकण्यात आल्याचं तिथल्या एका कामगारानंं सांगितलं.

सभास्थळी काँग्रेस नेत्यांसाठी तीन मोठी व्यासपीठं तयार करण्यात आली होती. अनेक मोठमोठ्या स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या.

काही जण लाईटिंग आणि साऊंड सिस्टीमचं काम करताना दिसून आले. जवळपास 5 लाख लोकांची गर्दी जमवण्याचं टार्गेट असल्याचं काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं.

यासाठी काँग्रेस नेते गावागावांमध्ये जाऊन कॉर्नर सभा घेत होते. या यात्रेत सहभागी होण्यासाठी लोकांना आवाहन करत होते.

18 तारखेच्या सकाळी राहुल गांधी अकोल्यातून बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश करणार होते. त्यांच्या प्रवेशाच्या ठिकाणी जाण्याचं मी ठरवलं, तोच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) कार्यकर्ते मुंबईहून राहुल यांचा निषेध करण्यासाठी शेगावला येत असल्याची बातमी कळाली.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान हिंगोलीत एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, “अंदमान जेलमध्ये असताना सावरकरांनी ब्रिटिशांना एक पत्र लिहून त्यांची माफी मागितली आणि तुरुंगातून सोडण्याची मागणी केली. सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घेत असत. ते काँग्रेसच्या विरोधात काम करत असत."

राहुल यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात मुंबई, नागपूर, सांगली, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली.

याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीही प्रतिक्रिया देत राहुल यांच्या विधानाचा समाचार घेतला.

तर मनसेनं थेट राहुल यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार केला होता. यासाठी मनसेचे कार्यकर्ते मुंबईहून बुलडाण्याला निघाले होते.

सकाळी 11 च्या सुमारास राहुल यांनी जवळा परिसरात थांबून ब्रेक घेतला आणि ते 4 वाजता शेगावकडे निघतील, असं सांगण्यात आलं.

दरम्यान, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेविषयी विदर्भातील तरुणांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी काही तरुणांशी चर्चा केली.

यापैकी एक होता शेख इक्बाल शेख मुक्तार. तो लोणी काळे इथून राहुल यांच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी आला होता.

भारत जोडो यात्रेत का सहभागी व्हावं वाटलं, असं विचारल्यावर तो म्हणाला, “मी सुशिक्षित बेरोजगार आहे. माझी बीए. बीकॉम झालं आहे. तसंच एमएसुद्धा चालू आहे. राहुल गांधी यांची सभा असो की इतर कुणाची, तिथं बेरोजगाराची मुद्दा मांडावा असं मला वाटतं.”

इक्बाल यांचे गावातील मित्र पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. पण, भरती नेमकी कधी होईल, याबद्दल त्यांना चिंता आहे.

इथंच आमची भेट अकोला जिल्ह्यातल्या उरळ इथून आलेल्या गोपाळ पोहरे या तरुणाशी झाली. पीक विमा आणि पावसामुळे झालेलं आर्थिक नुकसान हे मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं गोपाळ सांगत होता.

पण, राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे यात्रेचा मुख्य मुद्देश (ही यात्रा राजकारणासाठी नाही, असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे) बाजूल पडतोय का, असं विचारल्यावर तो म्हणाला,

“राहुल गांधी सावकरांविषयी जे बोलले ते माझ्या मते राजकारणाचा विषय आहे. मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. राजकारण व्हायला नाही पाहिजे, पण दुर्दैवानं ते होत आहे. यात्रेत विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारांचे जे प्रश्न आहेत, स्थानिकांचे जे प्रश्न आहेत ते इथं गाजले पाहिजे होते. पण, आता याला राजकीय वळण लागलंय.”

राहुल गांधी यांनी बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न याच मुद्द्यांवर अधिक भर द्यावा, ते आम्हाला अधिक पटत आहेत, असंही तो म्हणाला.

एव्हाना दुपारचा एक वाजला होता. काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून आम्ही शेगाव शहरात परतलो होतो. तोच एका चौकात पोलीस काही जणांची धरपकड करून त्यांना गाडीत बसवत असल्याचं दिसलं.

तिथं जाऊन पाहिलं तर हे मनसेचे कार्यकर्ते होते आणि ते राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. यात काही महिला कार्यकर्त्याही होत्या.

वाशिमहून आलेल्या या कार्यकर्त्या सांगत होत्या, “सावरकरांविषयी राहुल गांधी जे काही बोलले, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलो आहोत."

पण, राहुल काय म्हणाले, असं विचारल्यावर ते नाही सांगता येणार असं त्या म्हणाल्या.

दुपारी चारच्या सुमारास सभास्थळी काँग्रेसचे नेते उपस्थित राहायला सुरुवात झाली होती. यावेळी राहुल गांधी गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनाशाठी निघाले होते.

मी सभास्थळी पोहचलो तर मोठ्या संख्येनं लोक येत असल्याचं दिसून आलं. स्थानिक काँग्रेस नेत्यांची भाषणं सुरू झाली. पाच वाजता राहुल गांधी सभास्थळी पोहोचले तेव्हा लोकांनी एकच जल्लोष केला. सगळ्यांनी हात वरून राहुल यांना दाद दिली. अनेक जण हातात मोबाईल पकडून राहुल यांचा फोटो काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आले.

सभास्थळी आणि बाहेरही लोकांनी मोठी गर्दी केल्याचं आतमध्ये प्रवेश करणारे लोक सांगत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं भाषण सुरू असतानाच अजान ऐकू आल्यानं त्यांनी भाषण थांबवलं. याबाबत त्यांनी स्वत: तशी माहिती दिली. त्यानंतर मात्र मागच्या बाजूस बसलेली काही माणसं सभास्थळाहून बाहेर पडायला लागली.

ते पाहून माझ्याजवळ उभ्या असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं म्हटलं, "आपल्या लोकांना हे असं चालत नाही. हेच तर काँग्रेसला समजत नाही."

संध्याकाळी 6 वाजता राहुल यांनी भाषणास सुरुवात केली. यात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. आतापर्यंत मांडलेले बेरोजगारी, महागाई, शेतकरी प्रश्न मांडले. या भाषणात राहुल यांनी सावरकरांविषयीच्या वक्तव्यावर काहीही भाष्य केलं नाही.

सावरकरांऐवजी त्यांनी देशातील आणि महाराष्ट्रातील इतर महापुरुषांची नावं घेतली. पण, राहुल यांनी सावरकरांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण का टाळलं असावं, तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याआधीच पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिल्यामुळे राहुल बोलले नसावेत असा सूर सभास्थळी ऐकू येत होता.

भाषण संपल्यानंतर राहुल मुक्कामाच्या ठिकाणी निघून गेले.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 नोव्हेंबरला सकाळी 4 वाजता चहा घेण्यासाठी मी शेगावमधील एका स्टॉलवर गेलो.

राहुल गांधींची सभा कशी झाली, असं विचारल्यावर दुकानदार म्हणाले, खूप गर्दी होती. जेवढी आत तेवढीच बाहेर. आम्हाला आत यायला जागाच मिळाली नाही.

पण, या सभेचा काँग्रेसला फायदा होईल का, या प्रश्नावर ते म्हणाले, “नुसते राम मंदिर केले म्हणून जमते का? लोक कावलेत (कंटाळलेत) मोदीला. महागाई बघा ना किती झाली. पेट्रोल-डिझेल सगळं वाढलं. त्यामुळे काँग्रेसला 100 टक्के मतं मिळतील.”

इथल्या गेस्ट हाऊसमध्ये, लॉजमध्ये फक्त 300 ते 600 रुपये दररोजचा चार्ज असतो. पण, आता राहुल गांधींच्या सभेमुळे इथले लॉजवाले लूट करत आहेत. 2500 रुपये दिवसाला घेत आहेत, असंही ते पुढे म्हणाले.

19 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजता राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शेगावहून भेंडवळच्या दिशेनं निघाली. मध्येच लागणाऱ्या गावांमध्ये राहुल यांना पाहण्यासाठी लोक गर्दी करताना दिसून येत होते. महिला घराच्या गच्चीवर बसून राहुल यांची वाट पाहत होत्या.

जलंब गावात राहुल यांचं लेझीम, ढोल आणि पारंपरिक वाद्य वाजवून स्वागत करण्यात आलं. मीडिया व्हॅन शेजारून जाणारी काही माणसं म्हणत होती, “आमचे नुसते फोटो काढू नका. ते दाखवासुद्धा. मीडिया विकला गेला आहे. आमचं काहीच दाखवत नाही.”

मीडिया व्हॅनमध्ये बसलेले पत्रकार मात्र सकाळी 6 वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत विनापाणी आणि काही न खाता राहुल यांची यात्रा कव्हर करत होते.

काही जण पाणी मिळेल का हो? अशी विचारणा मीडिया व्हॅनच्या चालकास करत होते.

काँग्रेसचे नेते विरोधी बाकावर असताना ज्या पत्रकारांचे सल्ले घेतात किंवा ज्यांच्याशी चर्चा करतात, सत्तेत असले की त्यांचे फोनही घेत नाहीत, असं मीडिया व्हॅनमधील एक ज्येष्ठ पत्रकार सांगत होते.

व्हॅनमध्ये बसलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या मात्र हा मुद्दा आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहचवू, असं सांगत होत्या.

सकाळी 10 वाजता राहुल गांधी यांनी ब्रेक घेतला. त्यांची यात्रा दुपारी 4 वाजता पुन्हा सुरू होणार होती. मध्ये वेळ असल्यानं शेजारीच असलेल्या माटरगाव बुद्रूक या गावात आम्ही गेलो. एका हॉटेलवर चहा ऑर्डर केला आणि चर्चा सुरू झाली.

तितक्यात एक जण पुढे येऊन म्हणाला, “राहुल गांधी आले, त्यामुळे काही होवो ना होवो आमच्या भागातले रस्ते चांगले झाले. टोंगळ्या इतकाले गड्डे होते नाहीतर रस्त्यात.”

संध्याकाळी राहुल यांची भस्तान या गावात कॉर्नर सभा पार पडली.

दरम्यान, राहुल गांधी यांनी पाचच्या सुमारास ज्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन टी ब्रेक घेतला त्या शेतकऱ्याशी आम्ही चर्चा केली.

पीक विमा हा आमचा मोठा प्रश्न आहे. कापसाच्या विम्याचे पैसे नेहमीच भरतो, पण विमा कधीच भेटत नाही, हे मी राहुल गांधींना सांगितल्याचं ते शेतकरी म्हणाले.

“सकाळी 8 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही दोघं नवरा-बायको शेतातच काम करत असतो. कॅशमध्ये ट्रॅक्टर घेतलं आहे. कर्जाचा विषय ठेवला नाही. शेती बांधावर उभं राहून करता येत नाही. त्यासाठी शेणानं हात भरवावे लागतात. आपण आपले कष्ट करत राहायचं. फायदा-नुकसान होतच राहणार, आपण मात्र कष्ट करत राहायचं,” असं ते शेतकरी सांगत होते.

त्यानंतर त्यांनी त्यांच्या गाडीला किक मारली आणि ते दोघेही नवरा-बायको गावातल्या घराकडे निघून गेले. मीही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यावेळी एकच प्रश्न माझ्या मनात सारखा येत होता. तो म्हणजे, राहुल गांधींच्या भेटीनंतर या शेतकरी जोडप्याच्या आयुष्यात नेमकं काय बदलेल?

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)