You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराकमध्ये लग्न समारंभात लागलेल्या आगीत किमान 100 जण ठार, वधू वरही गंभीररित्या भाजले
- Author, मत्ते बुबालो
- Role, बीबीसी न्यूज
इराकमध्ये एका लग्नाच्या पार्टीत लागलेल्या आगीत किमान 100 लोकांचा मृत्यू झाला असून 150 जण जखमी झाले आहेत.
सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसारमंगळवारी संध्याकाळी उशिरा इराकच्या उत्तर निनवाह प्रांतातील अल-हमदानिया जिल्ह्यात ही आग लागली.
मृतांमध्ये वधू आणि वराचा समावेश आहे की नाही, हे सुरुवातीला स्पष्ट नव्हतं. मात्र त्यांचा आता मृत्यू झाला आहे, असं निनेवेह आरोग्य संचालनालयाचे अधिकारी म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना म्हणाले अहमद दुबारदानी की किमान 50 जणांची प्रकृती अजूनही नाजूक आहे, कारण बहुतेक लोक भाजले होते.
जखमींपैकी बहुतांशी लोक हे तरुण महिला आणि पुरुष असून कुणालाच सध्या डिस्चार्ज मिळालेला नाही, असंही आरोग्य विभागाचे अहमद दुबारदानी म्हणालेत.
या घटनेतून थोडक्यात बचावलेल्या 17 वर्षांच्या रानिया वाद हिने सांगितलं की वर आणि वधू एकमेकांसोबत डान्स करत असतानाच फटाके अगदी छतापर्यंत गेले आणि अचानक आगीचा भडका उडाला. पूर्ण हॉललाच आग लागली.”
रानिया हिचाही हात या आगीत भाजला. “आम्हाला काहीच दिसत नव्हतं. आगीमुळे, धुरामुळे जीव गुदमरत होता,” असं ती म्हणाली.
34 वर्षीय इमाद योहानाही तिथे उपस्थित होते. ते सांगतात, “आम्हाला आगीचे लोळ हॉलमधूनन बाहेर येताना दिसत होते. जे बाहेर निघू शकले, ते निघाले, जे नाही ते आतच अडकले. जे बाहेर पडू शकले, त्यांनाही गंभीर दुखापत झाली होती.”
दरम्यान या परिसरातल्या सर्व हॉस्पिटल्समध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. आणि त्यांच्या मदतीसाठी स्थानिक लोक रक्तदानासाठी रांगा लावताना दिसत आहेत.
आग कशामुळे लागली?
इराकची वृत्त संस्था 'निना'ने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अग्निशमन दल आग विझवताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या छायाचित्रांमध्ये कार्यक्रमाच्या हॉलचे जळालेले अवशेष दिसत आहेत.
इमारतीतील ज्वलनशील घटकांमुळं आग पसरली असावी, असं इराकच्या नागरी संरक्षण संचालनालयानं सांगितलं आहे, नीना या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली.
"अत्यंत ज्वलनशील, कमी किमतीच्या बांधकाम साहित्याचा वापर केल्यामुळं आग परसली. हॉलचा काही भाग आग लागल्यावर काही मिनिटातच कोसळला," असं संचालनालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या साईटवर चित्रित केलेल्या व्हीडिओमध्ये अग्निशमन दलाचे जवान बचावलेल्या लोकांना वाचवण्यासाठी इमारतीच्या ढिगाऱ्यावर चढताना दिसत आहेत.
घटनास्थळी उपस्थित व्यक्तींनी सांगितले की, स्थानिक वेळेनुसार रात्री 10:45 च्या सुमारास इमारतीला आग लागली तेव्हा तेथे शेकडो लोक आनंदोत्सव साजरा करत होते.
आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु फटाके पेटवल्यानंतर आग लागल्याचं प्राथमिक अहवालात सांगण्यात आलं आहे.
अधिकृत निवेदनानुसार इराकच्या अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी पाठवले होते.
इराकच्या पंतप्रधानांनी या दुर्दैवी घटनेतील पीडितांना तातडीने मदत देण्याचे आदेश दिल्याचं असं त्यांच्या कार्यालयानं एक्स ( पूर्वी ट्विटर) वर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)