सद्दाम हुसैन : 1 लाख इराकी सैनिक कुवेतमध्ये घुसले, 7 तासात ताबा मिळवला; नंतर मात्र...

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

2 ऑगस्ट 1990 ची पहाट...इराकी सैन्य कुवेतमध्ये घुसलं. जवळपास एक लाखाच्या घरात असलेल्या सैन्यासोबत रणगाडे, हेलिकॉप्टर आणि ट्रक असं बरंचसं साहित्य होतं.

त्याकाळात इराकचं सैन्य हे जगातील चौथ्या क्रमांकाचं मोठं सैन्य होतं.

एका तासाच्या आत हे सैन्य कुवेत शहरात पोहोचलं. दुपारपर्यंत इराकी रणगाड्यांनी कुवेतचा राजवाडा दसमान पॅलेसला वेढा दिला.

तोपर्यंत कुवेतचे आमीर सौदी अरेबियात पळून गेले होते. त्यांनी आपल्या सावत्र भावाला, शेख फहाद अल अहमद अल सबा याला कुवेतमध्येच ठेवलं होतं. इराकी सैन्याने शेखला पाहताच गोळ्या झाडल्या आणि त्याला ठार केलं.

घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या एका इराकी सैनिकाने सांगितल्याप्रमाणे शेखचा मृतदेह रस्त्यावर ठेऊन त्याच्यावर रणगाडा चालवण्यात आला.

सद्दाम हुसैनने कुवेतवर हल्ला करण्यापूर्वी बाथ क्रांतीच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या मागण्यांची यादी कुवेतसमोर ठेवली होती.

या मागण्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती स्थिर करणे, आखाती युद्धादरम्यान इराणने कुवेतकडून घेतलेलं कर्ज माफ करणे आणि इराकच्या पुनर्बांधणीसाठी मार्शल प्लॅनप्रमाणेच अरब प्लॅन तयार करणे आदी गोष्टींचा समावेश होता.

सद्दाम हुसेनने इराकी टीव्हीवर थेट धमकी देत म्हटलं होतं की, "जर कुवेती लोकांनी आमचं ऐकलं नाही तर गोष्टी सुरळीत करण्यासाठी आणि आमचे अधिकार पुन्हा मिळवण्यासाठी आम्हाला आवश्यक ती पावलं उचलावी लागतील. आणि आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नसेल."

सद्दाम हुसेनचं मन वळविण्याचे सर्व प्रयत्न वाया

सौदीचे राजदूत आणि शाह फहदचे जवळचे सल्लागार डॉ. गाझी अल्गोसैबी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "खरं तर आखाती युद्धादरम्यान सौदी अरेबिया आणि कुवेत या दोन्ही देशांनी इराणला दिलेलं कर्ज परत मिळेल याची आशाच सोडून दिली होती."

"पण जर आपण कर्ज माफ केल्याचं जाहीरपणे सांगितलं तर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो असं या दोन्ही देशांना वाटलं."

"शाह फहद यांनी सद्दामला कर्ज माफ केल्याचं सांगितलं. पण आपण सौदी अरेबियाच्या या मदतीवर खूश नाहीये असं सद्दामने भासवलं. त्याचवेळी शाह फहदला अंदाज आला की, आता कुवेतचं काही खरं नाही."

तसंही कुवेतसमोर मागण्या ठेवण्यापूर्वीच हल्ला करायचं सद्दामने मनोमन ठरवलं होतं.

21 जुलैपर्यंत इराकच्या 30 हजार सैनिकांनी कुवेतच्या दिशेने कूच केली होती.

25 जुलैला दुपारच्या एक वाजता सद्दामने बगदादमधील अमेरिकेचे राजदूत एप्रिल गिलेस्पी यांना बोलावून घेतलं. सद्दामने कुवेतमध्ये सुरू केलेल्या मोहिमेवर त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे हे त्याला जाणून घ्यायचं होतं.

याआधी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या राजदूत एप्रिल गिलेस्पी आणि सद्दामचा व्हॉइस ऑफ अमेरिकेच्या प्रसारणाच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. त्यावेळी गिलेस्पी यांनी सद्दामच्या इराकची तुलना चाचेस्कूच्या रोमानियाशी केली होती.

पुढे या प्रकरणात गिलेस्पीने सद्दामची माफी मागताना म्हटलं होतं की, अमेरिकेचा इराकी सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा कोणताही मानस नाहीये.

बैठकीत सद्दामने सांगितलं की, जर कुवेतसोबत सामंजस्य होत नसेल तर साहजिकच इराक मृत्यू स्वीकारणार नाहीये.

त्याच्या या वाक्याने बैठक संपली.

सद्दामविषयीचा अंदाज चुकला

सद्दामचं चरित्र लिहिणारे कॉन कॉफलिन त्यांच्या 'सद्दाम द सिक्रेट लाइफ' या पुस्तकात लिहितात, "सद्दाम फक्त पोकळ धमक्या देतोय, तो काही कुवेतवर हल्ला करणार नाही, असा विचार करून गिलेस्पी त्या बैठकीतून बाहेर पडल्या."

"पाच दिवसांनंतर राष्ट्राध्यक्ष बुश यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी गिलेस्पी वॉशिंग्टनला गेल्या. पुढच्या काही दिवसांतच बगदाद मध्ये पार पडलेल्या बैठकीचा तपशील प्रकाशित झाला. अरब प्रकरणांचा अनुभव असणाऱ्या 48 वर्षीय गिलेस्पी त्या बैठकीत बाळबोध वागल्याचा आरोप करण्यात आला. शिवाय सद्दामच्या कुवेत मोहिमेला त्यांनी संमती दिल्याचंही म्हटलं गेलं."

पण गिलेस्पीनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले. 1990 च्या दशकात न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं होतं की, "इरकाला कुवेतचा ताबा घ्यायचा आहे हे मलाच काय इतर कोणालाही वाटलं नव्हतं."

या बाबतीत कुवेती, सौदी आणि पाश्चात्य जगाचा अंदाज पूर्णपणे चुकला. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होस्ने मुबारक यांनी वॉशिंग्टन आणि लंडनला आश्वस्त केलं होतं की, सद्दामचा कुवेतवर आक्रमण करण्याचा कोणतंही हेतू नसून अरब मुत्सद्दीपणाने हे संकट सोडवतील.

इराकी सैन्यांनी कुवेतचा ताबा घेतला

2 ऑगस्ट 1990 च्या मध्यरात्री दोन वाजता एक लाख इराकी सैनिकांनी 300 रणगाड्यांसह कुवेतची सीमा ओलांडली.

कुवेतची 16 हजार सैनिकांची फौज इराणच्या सैन्यासमोर टिकली नाही. कुवेतची सीमा ओलांडताना इराणी सैन्याला किंचितही विरोध झाला नाही.

कुवेत शहर ताब्यात घेताना इराकी सैन्याला कुवेती सैन्याकडून थोडाफार विरोध झाला. पण तोही अगदीच किरकोळ होता. कुवेती सैनिकांची लवकरच पिछेहाट झाली.

एव्हाना कुवेतची युद्धक विमाने हवेत झेपावली होती. पण इराकी सैन्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने नव्हे, तर त्यांना सौदी अरेबियात शरण मिळावी यासाठी. कुवेतचं नौदलही ‘जैसे थे’ परिस्थितीत सुरू असलेला तमाशा बघत होतं. कुवेतचा अमीर आणि त्याच्या सर्व मंत्र्यांनी सौदी अरेबियात शरण घेतली होती. आणि एवढाच काय तो धक्का सद्दामला बसला होता.

कुवेत शहरात घुसल्याबरोबर रिपब्लिकन गार्डच्या एका तुकडीने दसमान राजवाड्याचा ताबा घेऊन राजघराण्यातील प्रत्येक व्यक्तीला कैद करण्याचे आदेश देण्यात आले होते.

कॉन कॉफलिन लिहितात, "राजघराण्यातील एकमेव सदस्य असलेल्या शेख फहदने सौदी अरेबियाला पळून न जाण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा इराकी सैन्य राजवाड्यात पोहोचलं तेव्हा शेख फहद पिस्तूल घेऊन राजवाड्याच्या छतावर उभे होते. त्यांच्या सोबत काही कुवेती सैनिकही होते. पण एका इराकी सैनिकाने त्यांच्यावर गोळी झाडली.”

ब्रिटीश विमानातील लोकांना बंदी बनवलं

सात तासांच्या आत इराकी सैन्याने पूर्ण कुवेतवर ताबा मिळवला होता. कुवेतमधले जवळपास तीन लाख नागरिक देश सोडून पळून गेले होते. त्याचवेळी सद्दामला अचानक ब्रिटीश एअरवेजचं एक विमान ताब्यात घेण्याची संधी मिळाली.

कुवेतवर आक्रमण झालं आहे, याची माहिती नसलेलं ब्रिटीश एअरवेजचं हे विमान लंडनहून दिल्लीला चाललं होतं. इंधन भरण्यासाठी हे विमान कुवेतमधल्या विमानतळावर उतरलं.

पाश्चिमात्य गुप्तचर संस्थांना इराकच्या कुवेतवरील आक्रमणाचा अंदाज होता, मात्र एखाद्या नागरी विमानाला तशी सूचना देण्याची आवश्यकता त्यांना वाटली नाही.

या विमानानं कुवेतमध्ये लँड केल्यानंतर सर्व विमान कर्मचारी आणि प्रवाशांना बंदी बनविण्यात आलं होतं. त्यांना बगदादला नेण्यात आलं, जेणेकरून महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला झालाच तर या बंदी बनवलेल्या प्रवाशांचा सुरक्षा कवचासारखा वापर करता येईल.

हल्ल्याच्या काही तासांनंतरच राष्ट्रपती जॉर्ज बुश यांनी इराकवर आर्थिक निर्बंध लादले होते. विमानवाहक नौका ‘इंडिपेन्डस’ला हिंदी महासागरात पर्शियन आखातात येण्याचे आदेश दिले गेले.

इराकचा सगळा पैसा अमेरिकेने जप्त केला

अमेरिकन बँकांमध्ये इराकचा जो सगळा पैसा होता, तो जप्त करण्यात आला.

याच काळात ब्रिटनच्या तत्कालिन पंतप्रधान मार्गारेट थॅचर या अमेरिका दौऱ्यावर होत्या. त्यांनी कुवेतवर इराकने केलेल्या हल्ल्याची तुलना हिटलरने चेकोस्लोव्हाकियावर केलेल्या हल्ल्याशीच केली.

एरव्ही परस्परविरोधी भूमिका घेणाऱ्या अमेरिका आणि सोव्हिएत संघानेही संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून इराकने कुवेतवर केलेल्या हल्ल्याची निंदा केली होती.

संयुक्त राष्ट्र आणि अरब लीगनेही इराकने उचलेल्या पावलाचा निषेध केला होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने इराकवर पूर्ण आर्थिक आणि व्यापारी निर्बंध लादले होते.

तुर्की आणि सौदी अरबमधून जाणाऱ्या इराकची तेलाची पाइपलाइन तोडण्यात आलेली. सौदी सीमेवरील इराकी सैनिकांची वाढती संख्या पाहून सौदी अरबने अमेरिकेकडून मदतीची मागणी केली होती.

कुवेतमधून इराक बाहेर काढण्याची आपली बांधिलकी जपण्यासाठई पुढच्या सहा महिन्यांत जवळपास 60 हजार सैनिकांना एअरलिफ्ट करून सौदी अरेबियात पोहचवण्यात आलं.

7 ऑगस्टला राष्ट्रपती बुश यांनी देशाच्या नावे टीव्हीवरून प्रसारित केलेल्या संदेशात म्हटलं होतं की, ते 82 वी हवाई तुकडी सौदी अरबमध्ये पाठवत आहेत.

ही ऑपरेशन ‘डेझर्ट स्टॉर्म’ची सुरूवात होती आणि व्हिएतनाम युद्धानंतर परदेशी भूमिकेवर तैनात करण्यात आलेली ही अमेरिकन सैनिकांची सर्वांत मोठी तुकडी होती.

सद्दाम हुसैनला अराफत आणि मित्तरां यांचं समर्थन

या दरम्यान सद्दाम हुसैनने आपला चुलत भाऊ अल् हसन अल् माजिद याला कुवेतचा गर्व्हनर म्हणून नियुक्त केलं होते. हा तोच माजिद होता ज्याने 1988 साली हलाब्जा में गॅस सोडून हजारो कुर्दांची हत्या केली होती.

एकीकडे सद्दामच्या या आक्रमणाला जगभरातून विरोध होत होता, तर दुसरीकडे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांनी त्याचं समर्थन केलं होतं. त्यांपैकी एक पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत होते. अराफत यांच्या या कृतीचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. कारण एकेकाळी सद्दाम यांनी अराफत यांना नेस्तनाबूत करण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली होती.

सप्टेंबर महिन्यात सद्दामला अजून एका व्यक्तिकडून समर्थन मिळालं. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा मित्तरां यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत दिलेल्या भाषणात म्हटलं होतं की, कुवेतमधली इराकी भूमीच्या दाव्यांना ते वैध मानतात.

काही महिन्यांपूर्वीच सद्दाम हुसैननने कुवेतमध्ये काम करत असलेल्या फ्रान्सच्या 327 मजुरांची सुटका करून फ्रान्सची सहानुभूती मिळवली होती.

या मजुरांच्या सुटकेचं टायमिंगही अचूक होतं. ज्यादिवशी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जेम्स बेकर इराकविरुद्ध रणनीती बनविण्याची चर्चा करण्यासाठी पॅरिसमध्ये आले होते, तेव्हाच या मजूरांची सुटका करण्यात आली.

सद्दामने घेतली ब्रिटीश बंधकांची भेट

अमेरिकेनंतर इराकला जर कोणी तीव्र विरोध केला असेल, तर तो ब्रिटनने. याच दरम्यान सद्दाम हुसैनने इराकमध्ये बंदी बनविण्यात आलेल्या ब्रिटीश लोकांची भेट घेण्याचा निर्णय घेतला.

कॉन कफलिन लिहितात, “सद्दामने त्यांची भेट घेतल्यावर स्पष्ट केलं की, शांततेसाठी इराकमध्ये या बंधकांचं असणं गरजेचं आहे. हे लोक जोपर्यंत इराकमध्ये असतील, तोपर्यंत मित्र राष्ट्रं इराकवर बॉम्ब हल्ले करणार नाहीत असं त्यांना वाटत होतं.”

“सद्दामने घेतलेली ही भेट जगभरात टेलिव्हिजनवरून लाइव्ह दाखविण्यात आली होती. सद्दामने स्टुअर्ट लॉकवूड नावाच्या सात वर्षांच्या ब्रिटीश मुलाला विचारलं की, आज स्टुअर्टला त्याचं दूध मिळालं का?”

यावेळी त्या मुलाच्या चेहऱ्यावर जे भाव होते, त्यातून तिथे असलेल्या इतरांच्या मनातील भीती पण जाणवत होती.

सद्दामचं मन वळवण्यासाठी प्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अली आणि जर्मनीचे माजी पंतप्रधान विली ब्राँड आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान एडवर्ड हीथ हेसुद्धा बगदादला पोहोचले. मात्र, त्यांच्या आवाहनाचा सद्दामवर कोणताही परिणाम झाला नाही.

कुवेतमध्ये नवीन ओळखपत्रं

कुवेतमधल्या तीन लाख लोकांनी इराकी आक्रमणानंतर देश सोडला.

इकॉनॉमिस्टने आपल्या 22 डिसेंबर, 1990 च्या अंकात म्हटलं होतं की, सद्दामच्या गुप्तहेरांनी राजमहालाच्या रिकाम्या तळघराचं रुपांतर विरोधकांना त्रास देण्यासाठीच्या चेंबरमध्ये करण्यात आलं. अनेक रस्त्यांची नावं बदलण्यात आली आणि नागरिकांना नवीन ओळखपत्रं तसंच लायसन्स प्लेट घेण्यासाठी सांगण्यात आलं.

‘बगदाद आणि कुवेतमध्ये वेळेची जी तफावत होती, ती दूर करण्यात आली. एक आदेश काढून कुवेतमधील लोकांना दाढी राखण्यास मनाई करण्यात आली. ज्यांनी याचा विरोध केला त्यांची दाढी अक्षरशः उपटून काढली.’

कुवेत मोहिमेच्या दरम्यान सद्दाम हुसेनची मानसिक अवस्था कशी होती याबद्दल त्याचे एक जनरल वाफिक अल् समुराई यांनी सांगितलं होतं.

ते सांगतात, “सद्दामने आम्हाला आदेश दिला होता की, अमेरिकन सैनिकांना पकडून इराकच्या रणगाड्यांच्या शेजारी उभं करण्यात यावं. त्यांचा वापर मानवी सुरक्षा कवच म्हणून होऊ शकतो.”

“हजारो अमेरिकन सैनिकांना असं पकडून वापरता येईल हा सद्दाम यांचा गैरसमज होता. मला आणि दुसऱ्या जनरल्सना त्यांच्या या तर्काचं आश्चर्य वाटलं. त्यांची कीवही आली.”

अटलांटिक पत्रिकेच्या मे 2002 च्या अंकात दिलेल्या मुलाखतीत समराई यांनी म्हटलं होतं, “मी जेव्हा सद्दाम यांना ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला की, आपण आता विनाशाच्या दिशेने चाललो आहोत. तेव्हा त्यांनी मलाच विचारलं की, हे वास्तव आहे की तुमचा वैयक्तिक विचार?”

“समोर असलेल्या वस्तुस्थितीच्या आधारे मी आपलं हे मत तयार केल्याचं त्यांना मी सांगितलं. सद्दाम यांनी मला म्हटलं की, तुम्ही आता माझं मत ऐका. इराण या लढाईत हस्तक्षेप करणार नाही. आपले सैनिक तुमच्या अंदाजापेक्षा जास्त काळ लढू शकतात. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी ते बंकरही खोदू शकतात.”

“ते दीर्घकाळ लढतील आणि दोन्ही बाजूंनी अनेक जण जखमी होतील. आपण हे नुकसान सहन करू शकतो, पण अमेरिका नाही. मोठ्या संख्येनं सैनिक जखमी होणं, बळी पडणं अमेरिका स्वीकारू शकत नाही.”

अटलांटिक पत्रिकेच्या मे 2002 च्या अंकात दिलेल्या मुलाखतीत समराई यांनी म्हटलं होतं, “मी जेव्हा सद्दाम यांना ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला की, आपण आता विनाशाच्या दिशेने चाललो आहोत. तेव्हा त्यांनी मलाच विचारलं की, हे वास्तव आहे की तुमचा वैयक्तिक विचार?”

“समोर असलेल्या वस्तुस्थितीच्या आधारे मी आपलं हे मत तयार केल्याचं त्यांना मी सांगितलं. सद्दाम यांनी मला म्हटलं की, तुम्ही आता माझं मत ऐका. इराण या लढाईत हस्तक्षेप करणार नाही. आपले सैनिक तुमच्या अंदाजापेक्षा जास्त काळ लढू शकतात. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी ते बंकरही खोदू शकतात.”

“ते दीर्घकाळ लढतील आणि दोन्ही बाजूंनी अनेक जण जखमी होतील. आपण हे नुकसान सहन करू शकतो, पण अमेरिका नाही. मोठ्या संख्येनं सैनिक जखमी होणं, बळी पडणं अमेरिका स्वीकारू शकत नाही.”

हवाई हल्ल्यांमुळे इराकमध्ये मोठं नुकसान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश यांनी 16 जानेवारी 1991ला इराकवर हवाई हल्ला करण्याचा आदेश दिला होता. संपूर्ण इराकमध्ये यामुळे मोठं नुकसान झालं. चार आठवड्यांच्या आत इराकमधली चार आण्विक संयंत्रं नष्ट केली गेली.

इराकमधील रस्ते, पूल, विद्युतकेंद्रं, तेलांचे साठे यांसारखी सामरिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणं नेस्तनाबूत झाली.

इराकच्या 100 लढाऊ विमानांनी थेट इराणमध्ये आश्रय घेतला. इराकच्या हवाई दलासाठी हा सर्वांत मोठा मानसिक धक्का होता. सद्दामच्या विरोधात बंडाचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात होतं. सद्दामने अमेरिकेचे हवाई हल्ले अडवता आले नाहीत म्हणून वायुसेनेच्या अधिकाऱ्यांना मृत्यूदंड सुनावला होता. त्यानंतर हे बंड केलं गेलं.

58 हजार इराकी सैनिक युद्धकैदी

जेव्हा सोव्हिएत नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे विशेष दूत येवगनी प्राइमाकोव्ह बगदादमध्ये सद्दामला भेटायला आले, तेव्हा त्यांचे वजन सुमारे 15 किलोने कमी झाल्याचे पाहून ते थक्क झाले.

18 फेब्रुवारी रोजी इराकचे परराष्ट्र मंत्री तारिक अझीझ यांनी मॉस्कोला जाऊन इराकला कुवेतमधून बिनशर्त माघार घेण्याचा सोव्हिएत युनियनचा प्रस्ताव स्वीकारला. पण तोपर्यंत जागतिक नेत्यांमध्ये सद्दामची विश्वासार्हता एवढी कमी झाली होती की, नुसते आश्वासन देऊन काम होत नव्हते.

इराकवर जमिनीवर हल्ला होण्याच्या भीतीने सद्दाम हुसेनने कुवेतमधील सर्व तेल विहिरींना आग लावण्याचे आदेश दिले.

अखेरीस राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी लष्करी कमांडर जनरल नॉर्मन श्वार्झकोफ यांना आदेश दिले की, इराकी सैन्याने 24 फेब्रुवारीपर्यंत कुवेत सोडले नाही, तर त्यांना जबरदस्तीने काढून टाकावे.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर 48 तासांच्या आत इराकी सैन्याने पराभव स्वीकारला. सहा आठवड्यांच्या सततच्या बॉम्बस्फोटानंतर इराकी सैनिक लढण्याच्या मनस्थितीत नव्हते.

हल्ल्याच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 20 हजार इराकी सैनिकांना कैद करण्यात आले होते आणि 370 इराकी रणगाडे नष्ट झाले होते.

अखेरीस सद्दाम हुसेनला 1 ऑगस्ट 1990 रोजी आपल्या सैनिकांना त्यांच्या जागेवर परत जाण्याचे आदेश द्यावे लागले.

26 फेब्रुवारी रोजी कुवेतमध्ये एकही इराकी सैनिक शिल्लक नव्हता. त्याला एकतर युद्धकैदी बनवण्यात आले होते किंवा तो इराकमध्ये परतला होता.

या युद्धात इराकच्या युद्धकैद्यांची संख्या 58 हजारांवर गेली होती आणि सुमारे दीड लाख इराकी सैनिक एकतर जखमी किंवा ठार झाले होते.

इराकी लष्करी अधिकार्‍यांनी एकच विनंती केली होती की, त्यांना हेलिकॉप्टरने उड्डाण करण्याची परवानगी द्यावी. कारण अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यांनी इराकचे सर्व रस्ते आणि पूल नष्ट केले होते. अमेरिकन जनरल श्वार्झकोफ यांनी त्यांची विनंती मान्य केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)