वर्धाः महात्मा गांधी विद्यापीठात 'सहिष्णुते'साठी विद्यार्थ्यांवर उपोषणाची वेळ

महात्मा गांधीं विद्यापीठाला सहिष्णुतेचं वावडं?

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC

    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेलं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा हे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना काळे टी-शर्ट घालून निषेध नोंदवला आणि त्यासंदर्भातील फेसबुक पोस्ट शेअर केली म्हणून विद्यार्थ्यावर निलंबनाची वेळ आली आहे. त्यानंतर विद्यार्थी हे उपोषणाला बसले असून विद्यापीठात असहिष्णुतेचे वातावरण असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.

या निलंबनाच्या विरोधात विद्यार्थी विवेक मिश्रा विद्यापीठाबाहेर आमरण उपोषणाला बसला आहे. प्रकृती खालावल्याने त्याला वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसीयूत दाखल करण्यात आले. रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर विवेकने पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे.

प्रकरण काय?

गेल्या काही दिवसांपासून कुलगुरू भीमराय मेत्री यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उभं केलं जातंय. कुलपतींची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा काही विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

त्यामुळे कुलगुरूंच्या हस्ते 26 जानेवारीच्या झेंडावंदनाला विद्यार्थ्यांनी विरोध केला. या दरम्यान रजनीश आंबेडकर आणि राजेश यादव यांनी 'व्ही.सी. गो बॅक' असे लिहिलेला टी शर्ट घालून झेंडावंदनाला विरोध दर्शवला. या वेळी चांगलाच गदारोळ झाला.

ही संपूर्ण घटना विवेक मिश्रा या विद्यार्थ्याने फेसबुकवर शेअर केली. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने विवेक मिश्रा यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. 27 जानेवारीला दुपारी 3 वाजता मिश्रा यांना निलंबनाची नोटीस मिळाली. त्याच दिवशी तर सायंकाळी सहा वाजता त्यांना विद्यापीठातून बाहेर काढल्याचा केल्याचा आदेश मिळाला.

मिश्रा यांना मिळालेल्या नोटीसमध्ये विद्यापीठ परिसरातील हॉस्टेल तत्काळ खाली करावे तसेच विद्यापीठ परिसरात येण्यास कायमची बंदी घालण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आहे.

मिश्राला बाहेर काढण्यासाठी काही सुरक्षारक्षक हॉस्टेलवर गेले असताना त्यांना काही विद्यार्थ्यांनी विरोध केला. यावेळी सुरक्षारक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष झाला.

निलंबनाला विरोध करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी सुरक्ष रक्षकाला मारहाण केल्याचा आरोप विद्यापीठाने केला आहे. तसेच शिक्षकाला धक्काबुक्की केल्याबद्दल जतिन चौधरी, निरंजन ओबेरॉय या विद्यार्थ्यांनाही निलंबित करण्यात आले.

दुसरीकडे सुरक्षारक्षकांनी आम्हाला बळजबरी करुन मारहाण केल्याचा आरोप विवेक मिश्राने केला आहे. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेल्या विवेक मिश्राने महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठात 2021 मध्ये प्रवेश घेतला. तो नाट्य आणि कला पदवीचं शिक्षण घेत आहेत.

आपल्यावर झालेल्या कारवाई संदर्भात बीबीसी मराठी सोबत बोलताना विवेक मिश्रा सांगतो की "माझ्यावर केलेल्या कारवाईनंतर माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्या विरोधात शांततापूर्वक आमरण उपोषण सुरू केलंय. आमरण उपोषणाला आज 11 दिवस झाले. कारण नसताना केलेलं निलंबन परत घेण्यात यावे अशी आमची मागणी आहे."

"त्याचबरोबर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, पण याकडे दुर्लक्ष करण्यात येतंय. उपोषणाला 11 दिवस झाले पण आम्हाला कुणी भेटायला आले नाही. पेपरसुद्धा देऊ दिले नाहीत," विवेक सांगतो.

उपोषण करणारा मुलगा

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC

कधी काळी विद्यार्थी आदोंलनासाठी नावारूपास येणारे हिंदी विश्व हिंदी विद्यापीठ अलीकडे हिंदू कट्टरतावादाकडे वाटचाल करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथिलाही विद्यापीठात विरोध केला जातोय.

“सध्या विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल सारखे संघटना विद्यापीठ प्रशासन चालवत आहे. त्यामुळं प्रश्न विचारणाऱ्या वैचारिक, अभ्यासू विद्यार्थ्यांचे शोषण विद्यापीठाकडून केले जात आहे. आमच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारून विद्यापीठातून बाहेर काढले जात असल्याचं' विवेक मिश्रा म्हणाला.

'किमान आधी नोटीस तरी द्यावी ना'

एका नोटीसवर विद्यार्थ्याला थेट बाहेरचा रस्ता दाखवणे हे नियमबाह्य आहे. आधी 'कारणे दाखवा' नोटीस, त्याच म्हणणं ऐकून घेण्यासाठी 15 दिवसांचा वेळ द्यावा लागतो. त्यानंतर उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली गेली पाहिजे, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

चौकशीत पुढे आलेल्या अहवालाच्या आधारे कारवाई केली गेली पाहिजे असं विद्यार्थी म्हणत आहेत.

मात्र या प्रकरणात 'कारणे दाखवा' नोटीस आणि निलंबनाची कारवाई अवघ्या काही तासात करण्यात आली आहे, त्यावरुन हे प्रकरण पेटलं आहे.

विद्यार्थ्यांना किमान आपले म्हणणे मांडायची संधी तरी द्यायला हवी होती असं विद्यापीठातील प्रशासकीय अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी मराठीला सांगितले आहे.

विवेक मिश्रा यांच्यासह जतिन चौधरी, निरंजन ओबेरॉय या विद्यार्थ्यांना विद्यापीठात पुन्हा प्रवेश मिळणार नाही, तसेच त्यांना विद्यापीठ परिसरात त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

बोर्ड

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC

"26 जानेवारीच्या प्रकरणाशी आमचा थेट संबंध नाही. आमचा विरोध विवेकच्या निलंबनाला होता. एका विद्यार्थ्याला बाहेर काढण्यासाठी 30 सुरक्षारक्षक तैनात केले जातात ही हिटलरशाही आहे. म्हणून आमच्यावरही कारवाई झाली. मी कुणाला मारहाण केली नाही. तिथे सुरू असलेल्या गोंधळात मी एका शिक्षकावर अंगावर पडलो,” असे जतिन चौधरी सांगतो.

"त्या शिक्षकानेच माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मुळात कुठल्याही विद्यार्थ्याला बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उपस्थित असायला पाहिजे. ज्या शिक्षकावर मी आदळलो तो तिथे काय करत होता? हे न सुटणारं कोडं आहे," असे जतिन चौधरी म्हणाले.

दुसरीकडे फक्त फेसबुकवर पोस्ट शेअर केल्याने निलंबन केल्याच्या आरोप विद्यापीठाने फेटाळला आहे. विवेक मिश्रासारखे विद्यार्थी विद्यापीठाचं वातावरण दूषित करत असल्याचं विद्यापीठ प्रशासनाचं म्हणणं आहे.

विद्यार्थी संघटना

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC

"विवेक हा 'वेगळ्या' विचाधारेने प्रेरित आहे. त्याच्या हॉस्टेलच्या खोलीत लाठ्या, रॉकेल, आणि झेंडे सापडले आहेत. त्यामुळं त्यांच्यावर झालेली कारवाई फक्त फेसबुक पोस्ट शेयर केल्याने झाल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचं", कुलसचिव सांगतात.

कुलसचिव डॉ. धरवेश कठेरिया म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून विवेकसारखे विद्यार्थी विद्यापीठाचं वातावरण दूषित करण्याचं काम करत आहे. विद्यापीठात अशांतता, अराजकता आणि भीतीचं वातावरण या विद्यार्थ्यांमार्फत पसरवले जात आहेत. ज्या विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई झाली.

"ते अवैधरित्या विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षा रक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दगड मारल्याने एक सुरक्षा रक्षक जखमी झाला," असं कुलसचिव डॉ. धरवेश कठेरिया सांगतात.

कुलगुरूंना विरोध कशामुळे?

एका महिलेचं शोषण केल्याचा आरोप असलेल्या यापूर्वीचे कुलगुरू रजनीश शुक्ल यांनी ऑगस्ट 2023 मध्ये कुलगुरूपदाचा राजीनामा दिला.

अशावेळी पदभार सांभाळण्यासाठी विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकाची निवड करण्याय यावी असा नियम आहे. या अंतर्गत विद्यापिठातील वरिष्ठ प्राध्यापक एल. करुण्यकारा यांची नियुक्ती झाली.

मात्र दोन महिन्यातच कुलगुरूचा पदभार सांभाळण्यासाठी आयआयएम नागपूरचे माजी संचालक भीमराय मेत्री यांची नियुक्ती मंत्रालयीन स्तरावर करण्यात आली.

कुलसचिव

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC

फोटो कॅप्शन, कुलसचिव धरवेश कठेरिया

एल. करुण्यकारा यांना डावलून मेत्री यांची नियुक्ती अवैध असल्याचा आरोप रजनीश आंबेडकर आणि राजेश यादव यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार सुद्धा केला आहे.

त्यानंतर विद्यापीठामध्ये निदर्शनं झाली.