You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शीतल म्हात्रे व्हायरल व्हीडिओ : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गेंना अटक
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1) शीतल म्हात्रे व्हायरल व्हीडिओ प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गेंना अटक
आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हीडिओ प्रकरणी दहिसर पोलिसांनी ठाकरे गटाचे सोशल मीडिया प्रमुख साईनाथ दुर्गे यांना दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
सोमवारी (13 मार्च) संध्याकाळच्या सुमारास त्यांना मुंबई विमानतळावरुन पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, नंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या ऑफिशिअल सोशल अकाउंटवरून व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यामध्ये साईनाथ दुर्गे यांचा सहभाग आहे असा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, साईनाथ दुर्गे यांना आज (14 मार्च) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. शीतल म्हात्रे यांचा व्हीडिओ व्हायरल करण्यामध्ये साईनाथ दुर्गे यांच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र म्हणून साईनाथ दुर्गे यांची ओळख आहे. साईनाथ दुर्गे हे युवासेनेचे नेते असून बीएमसीच्या शिक्षण समितीचे माजी सदस्यही आहेत.
दरम्यान, व्हायरल होणारा व्हिडीओ हा मॉर्फ केला असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे.
एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
2) जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी 18 लाख कर्मचारी जाणार संपावर, राज्य सरकारचा ‘हा’ इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. मंगळवारपासून (14 मार्च) बेमुदत संपावर जाण्याची घोषणा कर्मचाऱ्यांनी केली आहे.
जुन्या पेन्शन योजनेसह इतर काही मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला संपाचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर सोमवारी (13 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा समन्वय समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली.
जुनी पेन्शन योजना लागू करा, अशी मागणी करत महाराष्ट्र शासनाचे जवळपास 18 लाख कर्मचारी सोमवार मध्यरात्रीपासून संपावर जात आहेत. राज्य सरकार जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत संप करू असा पवित्रा कर्मचारी संघटनांनी घेतला आहे.
या संपात शासकीय रुग्णालये, शाळा, कॉलेज, नगरपालिका, जिल्हा परिषद, म्हाडा, तहसीलदार कार्यालये येथे कार्यरत असलेले सरकारी कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या या घोषणेनंतर राज्य सरकारने संपात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला असल्याचं लोकसत्ताने आपल्या बातमीत म्हटलं आहे.
3) शेतकऱ्यांचा ‘लाँग मार्च’ आज मुंबईत धडकणार
किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेला शेतकऱ्यांचा ‘लाँग मार्च’ नाशिकवरुन आज (14 मार्च) मुंबईत धडकणार आहे. विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हा ‘लाँग मार्च’ काढण्यात येत आहे.
शेतमालाचे पडलेले भाव हक्काच्या वन जमिनी, दिवसा वीज या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या किसान सभेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. दरम्यान, काल अनेक ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला.
आज दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी आमंत्रण दिल्याचं ‘दिव्य मराठी’च्या बातमीत म्हटलं आहे.
या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
4) राहुल गांधींच्या ब्रिटनमधील त्या वक्तव्यांवरून संसदेत गोंधळ
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटन दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांमध्ये भारतात लोकशाहीवर हल्ला होत असल्याचा आरोप केला होता. त्यावरून सोमवारी (13 मार्च) संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला.
या वक्तव्यांप्रकरणी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली .
दुसरीकडे काँग्रेसकडून सत्ताधारी पक्षाने चढवलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात आलं.
जे लोक भारतीय लोकशाहीला चिरडत आहेत, तेच तिला वाचवण्याच्या बाता करत असल्याचा घणाघात काँग्रेसने केला.
विरोधकांनी अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याचीही मागणी केली.
लोकमतने ही बातमी दिली आहे.
5) नितीन गडकरींकडून योगी आदित्यनाथांची श्रीकृष्णासोबत तुलना
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना श्रीकृष्णासोबत केली.
सोमवारी (13 मार्च) एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रित करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल योगी आदित्यनाथ यांची प्रशंसा केली.
आपल्या पत्नीसोबत झालेल्या संवादाचा दाखला देत त्यांनी म्हटलं, की माझ्या पत्नीने मला भगवद्गीतेचा दाखला दिला. गीतेत श्रीकृष्णाने म्हटलेलं की जेव्हा अन्याय होईल तेव्हा ते अवतार घेतील आणि अन्याय दूर करतील.
हे सांगून गडकरींनी पुढे म्हटलं की, जसं कृष्णाने सज्जनांच्या सुरक्षेसाठी काम केलं, तसंच योगीजी लोकांच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. समाजासाठी घातक ठरू शकणाऱ्या लोकांसाठी त्यांनी कठोर उपाययोजना केल्या आहेत.
एनडीटीव्ही हिंदीने ही बातमी दिलीये.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)