इम्रान खान आणि शाहबाज शरीफ यांच्यात वरचढ कोण ठरणार?

शाहबाज शरीफ, इम्रान खान, पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शाहबाज शरीफ

24 मे 2021, ठिकाण इस्लामाबाद.. याच दिवशी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांच्या घरी पाकिस्तानातील सर्व विरोधी पक्षनेत्यांना रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.

इम्रान खान सरकार कसं उलथवून टाकता येईल? याची खलबतं या रात्री सुरू होती. याचवेळी शाहबाज शरीफ यांनी विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं.

विरोधकांच्या या युतीमध्ये शहबाज शरीफ यांच्या पीएमएल (एन), पक्षासह पीपीपी आणि जमियत उलेमा-ए-इस्लामसह 10 हून अधिक पक्ष सामील झाले होते.

पण त्याआधीच विरोधकांची पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) नावाची चळवळ सुरू झाली होती. पण या रात्रीनंतर या चळवळीने जोर पकडायला सुरुवात केली.

सरतेशेवटी मागील वर्षी एप्रिल महिन्यात पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटला यश मिळालं. यानंतर पीडीएमचे सर्वोच्च नेते शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

त्यानंतर सुरू असलेल्या सत्तासंघर्षात अखेर मंगळवारी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेने देशातील सत्ताधारी पीडीएमला (पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट) आणखीन एक यश मिळालं.

पीडीएममधील अनेक मोठे नेते इम्रान खान यांच्या विरोधात होते. यात शाहबाज शरीफ, मरियम नवाज, आसिफ अली झरदारी, बिलावल भुट्टो झरदारी, मौलाना फजलुर्रहमान आदी नावं होती. पण या विरोधाचा चेहरा म्हणून शाहबाज शरीफ पुढे आले. यामागे दोन कारणं होती. एक म्हणजे ते स्वतः पंतप्रधान आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांचे बंधू नवाझ शरीफ देशाबाहेर आहेत.

इम्रान खान यांना नेस्तनाबूत करणं हा पीडीएमचा एकमेव अजेंडा होता. त्यामुळे आता इम्रान खान तुरुंगात गेल्यानंतर शाहबाज शरीफ आणि पीडीएमच्या प्रचाराचा मुद्दा नेमका काय असणार हा देखील प्रश्न आहेच. शिवाय इम्रान खान यांच्या तुलनेत शाहबाज शरीफ तुल्यबळ ठरतील का?

या सगळ्यामागे लष्कराचा सहभाग आहे का?

पाकिस्तानचं राजकारण हे लष्कर व्यवस्थापित, लष्कर नियंत्रित असल्याचं म्हटलं जातं. आणि याची सुरुवात जनरल झिया-उल-हक यांच्या हुकूमशाही काळापासूनच सुरू झाल्याचं म्हटलं जातं. पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराचा सहभाग असतो याविषयी संपूर्ण जगाला माहिती आहे.

पाकिस्तानी लष्कर स्वत:च्या इच्छेने सरकार बनवतं आणि जर लष्करप्रमुखांना त्यांच्या कार्यकाळात मुदतवाढ मिळाली नाही तर सरकार खाली खेचण्यासाठी प्रयत्न केले जातात. असे अनेक आरोप पाकिस्तानी लष्करावर केले जातात.

इम्रान खान, पाकिस्तान, शाहबाझ शरीफ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इम्रान खान
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पाकिस्तानातील राजकीय परिस्थितीकडे चार व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचा सल्ला बीबीसी उर्दूचे वरिष्ठ पत्रकार सकलेन इमाम देतात.

ते सांगतात, "पहिली गोष्ट म्हणजे राजकारणी स्वतः किती खंबीर आहे, दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानात विरोधी पक्षाची स्थिती काय आहे म्हणजे त्यांना प्रशासन चालवायचं आहे की उपद्रव वाढवायचा आहे, तिसरी गोष्ट म्हणजे प्रादेशिक राजकारणाची परिस्थिती काय आहे म्हणजेच चीन, भारत किंवा अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती कशी आहे. आणि सर्वात मोठा आणि चौथा घटक म्हणजे अमेरिकेला काय हवंय."

या तीन ते चार गोष्टींच्या आधारे ठरतं की, लष्कर राजकारणात नेमकी काय भूमिका घेणार. विश्लेषक म्हणतात त्याप्रमाणे, लष्करानेच पीडीएमला सत्तेवर आणलं. कारण इम्रान खानची प्रतिमा आता मोठी होऊ लागलीय असं जनरल बाजवा यांना वाटू लागलं होतं.

2021 पासून इम्रान खान यांच्या विरोधात मोहीम उघडण्यात आली होती. त्यावेळी लष्कराने अमेरिकेला आपल्या देशातून ड्रोन उडवण्याची, ऑपरेशन्स चालवण्याची परवानगी द्यायला सुरुवात केली होती. पण इम्रान खान यांनी त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेला ही सूट दिली नव्हती.

इम्रान खान यांच्या कार्यकाळात पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध फारसे चांगले नव्हते. इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी जवळपास दीड वर्ष अमेरिकेला भेट दिली नव्हती, ना अमेरिकेने त्यांना भेटीचं आमंत्रण दिलं होतं.

इम्रान खान हे पाकिस्तान मधील मोठे आणि प्रसिद्ध राजकारणी आहेत यात शंका नाही. क्रिकेट मध्ये कारकीर्द गाजवल्यानंतर त्यांनी राजकारणातही आपलं कौशल्य सिद्ध केलं. झुल्फिकार अली भुट्टो, बेनझीर भुट्टो यांच्यानंतर ते तिसरे राजकारणी आहेत ज्यांनी लष्कराशी सामना करण्याचं धैर्य दाखवलंय.

शाहबाज शरीफ यांची ताकद

आपण जर इम्रान खान आणि शाहबाज शरीफ यांची तुलना करायला गेलो तर शरीफ देखील पक्के राजकारणी आहेत असं म्हणता येईल. शाहबाज हे 13 वर्ष पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते आणि त्यांना मॅन ऑफ डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं.

शिवाय ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत. शाहबाज शरीफ यांचा जन्म पाकिस्तानातील प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबात झालाय.

त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 'इत्तेफाक ग्रुप' यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या ग्रुपची स्थापना त्यांच्या वडिलांनी मोहम्मद शरीफ यांनी केली होती.

इम्रान खान, पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शाहबाझ शरीफ

'डॉन' वृत्तपत्रानुसार, 'इत्तेफाक ग्रुप' हा पाकिस्तानातील सर्वात मोठा व्यापारी समूह आहे. यात स्टील, साखर, कापड उद्योग यासारख्या व्यवसायांचा समावेश आहे. शाहबाज शरीफ या समूहाचे सह-मालक आहेत.

सुरुवातीच्या काळात शाहबाज शरीफ त्यांचे मोठे भाऊ नवाझ शरीफ यांना त्यांच्या कामात मदत करायचे. नंतर भावाच्याच मदतीने त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं.

शाहबाज शरीफ लाहोर आणि पंजाबमधील चित्र बदलण्यात यशस्वी ठरले. पंजाब प्रांतात मेट्रो बस आणि ऑरेंज ट्रेन आणण्याचं श्रेय त्यांनाच दिलं जातं. मात्र या विकासकामांचा फारसा आर्थिक फायदा झाला नसल्याचंही बोललं जातं. शिवाय त्यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप झालेत.

सकलेन इमाम सांगतात की, इम्रान खान तुरुंगात गेल्यामुळे शाहबाज शरीफ आणि पीडीएम सरकारला मिळणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफची चळवळ थोडी धीमी होईल. पण यामुळे इम्रान खान यांची लोकप्रियता काही कमी होणार नाही.

ते सांगतात, "सरकार, लष्कर, रेंजर्स, निवडणूक आयोग, नोकरशाही, जिल्हा प्रशासन हे सर्व शाहबाज शरीफ आणि पीडीएमच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हेराफेरी होणं शक्य आहे."

"सत्तेवर येण्यासाठी लष्कराशी युती करावी लागेल आणि नोकरशाहीच्या माध्यमातून राज्य करावं लागेल हे शाहबाज शरीफ आणि त्यांच्या सहकारी राजकीय पक्षांना माहिती आहे. त्यांना ब्रिटिशांच्या वसाहतींसारखं राज्य करावं लागेल. म्हणजे लोकांना आपण किती आवडतोय याच्याशी ब्रिटिश सरकारला काहीच देणंघेणं नव्हतं. त्यांना फक्त राज्य करायचं होतं."

पाकिस्तानमध्ये या वर्षाच्या अखेरीस सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. सकलेन इमाम यांना वाटतं की, इम्रान खान यांची पीटीआय सत्तेत येऊ नये यासाठी रचलेला हा डाव आहे. कारण निवडणुका झाल्या तर इम्रान खान सत्तेवर येण्याची मोठी शक्यता आहे.

पीटीआय विरुद्ध पीएमएल(एन)

पाकिस्तानातील बहुतांश विश्लेषकांना वाटतं की, इम्रान खान यांच्या लोकप्रियतेत सध्या तरी कोणतीही कमतरता आलेली नाही. इस्लामाबादमधील ज्येष्ठ पत्रकार शहजादा जुल्फिकार म्हणतात की, आता इम्रान खान यांचा पक्ष (पीटीआय) फोडण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात.

ते सांगतात, "इम्रान खान यांची लोकप्रियता आहे तशीच राहील पण जर त्यांचा पक्ष फुटला तर मात्र लोकप्रियता कमी होऊ शकते. उदाहरण म्हणून बघायचं झाल्यास, इम्रान खान यांच्यावर सहा महिन्यांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी आणली जाऊ शकते. आणि याच काळात निवडणूक जाहीर होऊ शकते. सध्या पीटीआय आणि पीएमएल (एन) यांच्यात थेट लढत आहे.

इम्रान खान, पाकिस्तान

फोटो स्रोत, SHAHZAIB AKBER/EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK

फोटो कॅप्शन, इम्रान खान यांचे समर्थक

शहजादा झुल्फिकार यांच्या मते, शाहबाज शरीफ यांना या संपूर्ण घटनाक्रमाचा फायदा मिळेलच असं नाही. कारण इम्रान खान यांनी यापूर्वी नवाझ शरीफ, मरियम नवाझ आणि शाहबाज शरीफ यांच्यासोबत देखील असंच केलं होतं. त्यामुळे इम्रान खान यांच्यासोबत देखील तेच घडलं असं काही लोकांना वाटतं.

तेच दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर 2017 मध्ये निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. तेव्हापासून ते लंडनमध्ये राहत आहेत. ते मायदेशी परतणार असल्याच्या अटकळी वारंवार बांधल्या जातात मात्र अजूनही ते मायदेशी परतलेले नाहीत.

नवाझ शरीफ मायदेशी येतील का ? त्यावेळी शाहबाज शरीफ माघार घेऊन मरियम नवाझ यांच्यासाठी जागा सोडतील का? या प्रश्नावर शहजाद जुल्फिकार म्हणतात की, आता इम्रान खान यांच्या पक्षाची अवस्था काय होणार यावर गोष्टी अवलंबून आहेत. नाहीतर मग नवाझ शरीफ यांना आपल्या मुलीसह पाकिस्तानात येऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावंच लागेल.

"मरियम नवाझ यांच्यात जनाधार गोळा करण्याची कला आहे. त्यांनी आजवर मोठमोठ्या सभा घेतल्या आहेत. नवाझ शरीफ परत आले तरच पीटीआयशी सामना करता येईल. कारण शाहबाज शरीफ हे अंतरिम कालावधीसाठी आले आहेत."

पण या सगळ्या घडामोडीत पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट होत असल्याचं दिसतंय.

पाकिस्तानचा परकीय चलन साठा आता 4.2 अब्ज डॉलरवर घसरला असून महागाई 35 टक्क्यांवर पोहोचली आहे.

शिवाय आर्थिक मदत मिळावी म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि सरकारमध्ये काहीच तोडगा निघालेला नाही. जर पाकिस्तानात अशीच राजकीय आणि आर्थिक अस्थिरता राहिली तर परिस्थिती आणखीनच बिकट होऊ शकते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)