स्टॅनफर्ड प्रिझन : विद्यार्थ्यांना कैद करून, त्यांच्याच सहकाऱ्यांकडून अत्याचार करायला लावणारा प्रयोग

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

1971 सालच्या ऑगस्ट महिन्यातली एका रविवारची निवांत सकाळ होती. कॅलिफोर्नियातल्या पाऊलो अल्टो शहरात एक पोलिसांची व्हॅन फिरायला लागली आणि गावातून काही कॉलेजच्या पोरांना उचललं. त्यांच्यावर सशस्त्र दरोडा घातल्याचा आरोप होता.

संशयितांना त्यांच्या घरातून अटक केली गेली, त्यांच्या हातात बेड्या घातल्या, त्यांची झडती घेतली गेली, त्यांना त्यांचे अधिकार काय असतील, हे सांगितलं गेलं आणि पोलिसाच्या गाडीत कोंबून नेलं.

प्रत्येक मुलाच्या घराबाहेर गर्दी जमा झाली होती, लोक चौकशी करायला लागले की काय झालं?

पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत निघून गेल्या.

अटक झालेल्या तरुणांना कळतच नव्हतं की त्यांनी गुन्हा काय केलाय. त्यांचा गुन्हा एवढाच होता की त्यांनी पेपरमध्ये प्रकाशित झालेलया ‘एका प्रयोगात सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते हवेत’ या जाहिरातीला प्रतिसाद दिला होता.

सत्ता भ्रष्ट होते आणि संपूर्ण सत्ता संपूर्णपणे भ्रष्ट होते’ अशा अर्थाची एक इंग्लिश म्हण आहे. रोजच्या आयुष्यातही आपण कमी वेळा हे अनुभवत नाही. सरकारी ऑफिसात अधिकारी पटकन सही करेल पण शिपाई फाईल अडवून धरेल, एखादी कजाग सासू उगाचच नोकरी करणाऱ्या सुनेला सुट्टी मिळाली की घरातल्या गोधड्या धुवायला सांगेल, इतकंच काय प्राथमिक शाळेत एखादं कार्ट मॉनिटर आहे म्हणून इतर शाळासोबत्यांवर उगाचच आवाज करेल.

आता सत्ता मिळाली की हे व्हायचंच, असं आपल्याला वाटतं. आपण भारतीय तात्विक माणसं. सगळं तत्वज्ञान कोळून प्यायलो असल्याने सत्ता भ्रष्ट का होते, हे नव्याने आपण शोधायला जात नाही.

परदेशी माणसांचं तसं नसतं. त्यांना सगळं प्रयोगाने सिद्ध करून पहायचं असतं आणि त्यातूनच जन्माला आला सत्तरच्या दशकातला सर्वात कुप्रसिद्ध 'स्टॅनफर्ड प्रिझन एक्सपेरिमेंट'.

एक तर स्टॅनफर्ड म्हणजे ‘बाबो, लई भारी’ अशी युनिव्हर्सिटी. तिथल्या अभ्यासक मंडळींना हुक्की आली की चला, सत्तेचा माज करणारी माणसं मुळातंच स्वभावाने तशी असतात की काही कारणांमुळे तशी बनतात हे शोधून काढू.

‘बसल्या जागी पैसा कमवू, नंतर पार्टी करू’ मंडळाचे सदस्य असलेल्या काही विद्यार्थ्यांनी या प्रयोगात सहभागी व्हायचं कबूल केलं.

दोन आठवड्यांचा हा प्रयोग सहा दिवसात गुंडाळावा लागला कारण यातले काही लोक हिंसक झाले, काहींनी उपोषण केलं तर काहींचं नर्व्हस ब्रेकडाऊन झालं. मानसशास्त्राच्या इतिहासात आजही या प्रयोगाकडे बऱ्या नजरेने पाहिलं जातं नाही.

पण याची चर्चा प्रचंड झाली, आजही होते. याच धर्तीवर लहानमोठे प्रयोग जगभर झाले. त्यातला एक बीबीसी या संस्थेनेही केला होता. आता पुन्हा या प्रयोगावर, त्यात सहभागी झालेल्या लोकांच्या मानसिकतेवर पिक्चर येतोय. त्यानिमित्ताने याची पुन्हा चर्चा सुरू झालीये.

काय होता हा प्रयोग? आणि त्यात नेमकं असं काय घडलं की कॉलेजमध्ये शिकणारी, सर्वसामान्य उत्साही मुलं एकमेकांच्या जीवावर उठली?

वरवर पाहता अगदी साधा प्रयोग होता. विद्यार्थ्यांचा एक गट घ्यायचा. मग त्यांना दोन लहान गटात विभागायचं. एक खोटं खोटं जेल उभारायचं. हे जेल म्हणजे एक तळघर होतं, ज्या खोट्या कोठड्या बनवल्या होत्या.

अर्धे विद्यार्थी इथे तुरुंगाचे गार्ड म्हणून राहतील तर अर्धे कैदी म्हणून असं ठरलं.

या प्रयोगाचे मुख्य संशोधनकर्ते असणारे मानसशास्त्रज्ञ फिलिप झिम्बार्डो यांनी बीबीसीच्या अॅलिस्टर लाईटहेड यांच्याशी बोलताना म्हटलं होतं, “पहिल्या दिवशी तो खोटा तुरुंग होता पण दुसऱ्या दिवशी तिथले कैदी, गार्ड आणि इतर स्टाफच्या मनात तो खरा तुरुंग बनला.”

स्टॅनफर्ड प्रीझन एक्सपेरिमेंटची एक अधिकृत साईटही आहे. त्यावर म्हटलंय...

“तुम्ही चांगल्या लोकांना वाईट जागेत कोंबता तेव्हा काय होतं? त्या चांगल्या लोकांची माणुसकी वाईटपणावर विजय मिळवते की तिथला वाईटपणा चांगल्या माणसांना राक्षस बनवतो?”

याच प्रश्नांची उत्तरं हा प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञांना शोधायची होती.

पुढे काय आणि कसं घडलं?

जेव्हा या तरुणांना रितसर अटक झाली, तेव्हा त्यांना खऱ्या पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. त्यांच्या बोटांचे ठसे घेतले गेले, अटकेची नोंद केली गेली. मग त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना कोठडीत डांबण्यात आलं.

या सगळ्यांना सांगितलं गेलं होतं की ते ‘तुरुंगातल्या जीवनाचा माणसाच्या मनावर कसा परिणाम होतो’ याचा अभ्यास करणाऱ्या एका प्रयोगात ते सहभागी होणार आहेत, पण त्याची सुरुवातच अशी होईल याची त्यांना यत्किंचितही कल्पना नव्हती.

‘कार्यकर्ते हवेत’ या जाहिरातीला खूप प्रतिसाद मिळाला. त्याला कारणही तसंच होतं – या प्रयोगातल्या शास्त्रज्ञांनी दिवसाला 15 डॉलरचा भत्ता देण्याचं कबूल केलं होतं. प्रयोगाचा कालावधी 2 आठवड्यांचा होता. त्यामुळे काही न करता पैसे मिळणार, असं अनेक तरुणांना वाटलं. ही त्यांची पहिली चूक होती.

प्रयोगकर्त्यांनी चांगली तरुण मुलं निवडली – अशी मुलं जी शारिरीक आणि मानसिकदृष्ट सशक्त असतील. गुन्हेगारी, ड्रग्सचं सेवन, मानसिक आजार अशी पार्श्वभूमी असलेल्या सगळ्यांना वगळलं गेलं. शेवटी 24 तरुण मुलं शिल्लक राहिली.

ही मुलं सर्वसामान्य होती, चांगल्या स्वभावाची होती. त्यांच्या वागण्यात हिंसकता नव्हती. कोणत्याही सिच्युएशनमध्ये त्यांचा प्रतिसाद नॉर्मल असेल याची चाचणी घेतली गेली होती.

मग ही 24 मुलं दोन गटात विभागली गेली. अर्धे तुरुंगरक्षक बनले, अर्धे कैदी. या दोन्ही गटांमधल्या मुलांमध्ये वरकरणी पाहाता काही फरक नव्हता.

स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या सायकोलॉजी विभागाच्या बेसमेंटमध्ये खोटा तुरुंग उभारून प्रयोग सुरू झाला.

ज्या मुलांना अटक झाली, त्यांना खऱ्याखुऱ्या पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या हाताचे ठसेही खऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये घेतले गेले.

तिथून त्यांना स्टॅनफर्ड जेलमध्ये आणलं गेलं, अर्थातच डोळ्यावर पट्टी बांधून.

त्यांना जेव्हा या खोट्या तुरुंगात आणलं तेव्हा सगळ्यांचे कपडे उतरवले गेले आणि पुन्हा झडती घेण्यात आली. त्यांच्या अंगावर जंतूनाशक स्प्रे मारले गेले. कैद्यांना मुद्दाम अपमानास्पद वागणूक देण्याचा हा प्रयत्न होता.

त्यांना जेलचे कपडे देऊन वॉर्डनने त्यांना सांगितलं की त्यांचा गुन्हा किती गंभीर आहे आणि त्यांना त्याची शिक्षा म्हणून याच तुरुंगात राहायचं आहे.

जेलमध्ये त्यांना जो युनिफॉर्म घालायचा होता त्याच्या आत कैद्यांना अंतवस्त्र घालण्याची परवानगी नव्हती. त्यांना रबरी स्लिपर आणि डोक्यावर घालायची घट्टी काळी टोपी देण्यात आली.

फिलिप झिम्बार्डो यांनी स्टॅनफर्ड प्रीझन एक्सपेरिमेंटच्या साईटवर लिहिलं आहे की, “जेव्हा त्या मुलांनी तुरुंगाचा युनिफॉर्म घातला, त्यानंतर त्यातले काही जण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने चालायला लागले, बोलायला लागले, वावरायला लागले. जणूकाही ते स्वतःचं अस्तित्व विसरून गेलेत आणि आता कैदी बनलेत.”

इतकंच नाही, सगळ्या कैद्यांच्या पायात बेड्या घालण्यात आल्या. बहुतांश तुरुंगामध्ये काही भयानक गुन्ह्यांचे अपराधी वगळता कैद्यांच्या पायात बेड्या नसतात, पण इथे या प्रयोगात कैद्यांवर मुद्दाम दडपशाही करायची होती, ज्यामुळे ते कसे वागतील, त्यांच्या वागण्यात काय बदल होईल, हे समजेल म्हणून त्यांना असं वागवलं जात होतं.

झोपेतही त्यांच्या पायातल्या बेड्या काढल्या जात नव्हत्या. झोपेत एखादा कैदी वळला की लगेच ती बेडी त्याच्या दुसऱ्या पायावर आदळायची. कैदी जागा व्हायचा आणि त्याला लगेचच जाणीव व्हायची की तो जेलमध्ये आहे. त्याच्या स्वप्नातही तो इथून निसटू शकत नाही.

कैद्यांना त्यांच्या नावाने नाही तर आयडी क्रमांकाने हाक मारली जायची. कैद्यांनीही एकमेकांशी बोलताना नावं घ्यायची नाहीत तर नंबरनेच हाक मारायची असा दंडक होता.

कैद्याची स्वओळख पुसून फक्त कैदी ही ओळख शिल्लक ठेवण्याचा हा प्रयत्न होता.

तुरुंगरक्षक कोण होते?

कैद्यांना कसं वागवलं गेलं, त्यांचे कपडे कसे होते, हे आपण पाहिलं. मात्र, तुरुंगातल्या गार्ड्सना खास ट्रेनिंग दिलं होतं का? तर नाही. या गार्ड्सना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एका ठराविक मर्यादेत राहून कसंही वागायची परवानगी होती.

गार्ड्सनी स्वतःच नियम बनवले जे कैद्यांनी पाळायचे होते. सगळ्या गार्ड्सचे एकसारखे खाकी रंगाचे युनिफॉर्म होते. त्यांच्या हातात काठ्या असायच्या आणि डोळ्यांवर काळे गॉगल असायचे.

खऱ्या तुरुंगात गार्ड्स गॉगल घालत नाहीत, पण इथे त्यांना मुद्दाम गॉगल घालायला सांगितले गेले कारण कैद्यांना त्यांच्या डोळ्यातले भाव कळू नयेत.

कैद्यांना आधी कल्पना दिली होती की त्यांना या जेलमध्ये थोडा त्रास होणार, त्यांना प्रायव्हसी मिळणार नाही, जेवायला पुरेसं मिळणार नाही. त्यांनी करारावर सहीही केली होती. पण त्यापुढे जाऊन काय होणार, याची प्रयोगकर्त्यांनाही कल्पना नव्हती.

नऊ कैदी आणि नऊ गार्ड घेऊन हा प्रयोग सुरू झाला. एक गार्ड आठ तासाची शिफ्ट करायचा.

पहिल्या दिवशी काहीच घडलं नाही. असंच चालत राहिलं तर प्रयोग गुंडाळावा लागेल, असं प्रयोगकर्त्यांना वाटलं.

पण त्यांना फार काळ वाट पाहावी लागली नाही.

“पहिल्या दिवशी काहीच झालं नाही. मला नाही म्हटलं तरी जरा कंटाळाच आला होता, मग मी ठरवलं की मी एका अत्यंत क्रूर गार्डसारखं वागेन,” तुरुंगरक्षकांपैकी एक असलेल्या डेव्ह एशलमॅन यांनी बीबीसीच्या अॅलिस्टर लाईटहेड यांना सांगितलं.

गार्ड्सची हुकूमशाही

पहिल्याच रात्री 2.30 वाजता झोपलेल्या कैद्यांना निष्ठूरपणे उठवण्यात आलं. गार्ड मोठ्या मोठ्याने शिट्या वाजवत होते.

अर्ध्या रात्री उठवून त्यांची मोजणी झाली. हे पुढेही सतत होणार होतं. गार्डची हुकूमशाही प्रस्थापित करण्याचा हा एक मार्ग होता.

दिवसातली कोणतीच वेळ कैद्यांची स्वतःची राहिली नव्हती. हळूहळू कैदी आणि गार्ड्स यांच्यात एकमेकांबद्दल तिरस्काराची भावना तयार होत होती.

पहिलं बंड

पहिला दिवस शांततेत गेला, पण दुसऱ्याच दिवशी कैद्यांनी बंड केलं. रात्रीची मोजणी, कैद्यांचा युनिफॉर्म, ओळख पुसून टाकण्याचे प्रयत्न, यांमुळे कदाचित कैद्यांनी बंड केलं असावं. संशोधकांची धांदल उडली.

कैद्यांनी त्यांच्या घट्ट काळ्या टोप्या काढून टाकल्या, त्यांच्या युनिफॉर्मवर चिकटवलेले नंबर्स फाडले आणि त्यांच्या कोठडीतले पलंग दाराला लावून गार्ड्सला कोठडीत येण्यापासून मज्जाव केला.

कैदी गार्ड्सला अद्वातद्वा बोलायला लागले, शिव्या घालायला लागले. गार्ड वैतागले, चिडले. दुसऱ्या शिफ्टचे गार्ड आले, तेव्हा त्यांनी आधीच्या शिफ्टच्या गार्ड्सला शिव्या घातल्या की तुम्ही इतके निवांत कसे राहिलात की हे कैदी डोक्यावर बसले. सगळ्यांचीच चिडचिड व्हायला लागली.

मग त्यांनी ठरवलं की स्टँडबायवर असलेल्या गार्ड्सला बोलावायचं. रात्रीच्या शिफ्टचे गार्ड्सही थांबले. गार्ड्सची संख्या वाढली. त्यांनी ठरवलं की कैद्यांना जशास तसं उत्तर द्यायचं.

त्यांनी कैद्यांवर फायर एक्स्टिग्युशरचा मारा करायला सुरुवात केली. हा प्रयोग करताना खरीखुरी आग लागली, तर कोणाचा जीव जाऊ नये, म्हणून विद्यापीठ प्रशासनाने तिथे आग विझवण्याची यंत्रणा तयार ठेवली होती.

पण त्याचा गार्ड्सने शस्त्र म्हणून वापर केला.

गार्ड्स जबरदस्तीने तुरुंगातल्या कोठड्यांमध्ये घुसले. कैद्यांचे कपडे उतरवले, त्यांचे पलंग काढून घेतले आणि या बंडाचे जे नेते होते त्यांना अंधार कोठडीत (तिथेच असणारी स्टोअर रूम) बंद केलं. यानंतर गार्ड्सनी इतर कैद्यांना धमकवायला आणि त्रास द्यायला सुरुवात केली.

लक्षात घ्या, यापैकी कोणीच खरं कैदी किंवा गार्ड नव्हतं. स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या परिसरात राहाणारी साधी तरुण मुलं होती ही. एरवी एकमेकांना भेटली असती तर एकमेकांबरोबर बास्केटबॉल खेळतील, हास्यविनोद करतील असा गट होता हा.

पण 48 तासात त्यांची व्यक्तिमत्वं पूर्णपणे बदलली होती.

फोडा आणि झोडा

गार्ड्सनी बंड तेवढ्यापुरतं मोडून काढलं, पण ते पुन्हा होणार नाही, याची खात्री कुणालाच नव्हती. शिवाय, पुन्हा बंड झालं, तर एकावेळी 9 गार्ड तर ड्युटीवर नसणार.

हे पहिलंच बंड होतं म्हणून आधीच्या शिफ्टचे थांबले, दुसऱ्या शिफ्टचे आलेले होते आणि जे स्टँडबाय होते त्यांनाही बोलावून घेतलं होतं. एकावेळी तीन गार्ड आणि नऊ कैदी, मग या कैद्यांना कसं कंट्रोल करायचं असा प्रश्न उभा राहिला.

एका गार्डला कल्पना सुचली. त्यांच्याविरोधात शारिरीक बळाचा प्रयोग करायचा नाही, तर मानसिक ट्रीक वापरायच्या. कैद्यांमधल्याच काहींना स्पेशल ट्रीटमेंट किंवा खास कोठडीत ठेवण्याची व्यवस्था करायची.

‘फोडा आणि झोडा’ ही निती वापरायची.

स्टॅनफर्डच्या तळघरात तीन तीन कोठड्या बनवल्या होत्या. त्यातली एक कोठडी त्यांनी ‘विशेष’ कोठडी घोषित केली. म्हणजे या कोठडीत त्या कैद्यांना ठेवलं ज्यांनी बंडात सहभाग घेतला नव्हता.

त्यांना त्यांचे कपडे परत देण्यात आले, त्यांचे पलंग परत देण्यात आले. त्यांना अंघोळ करण्याची आणि ब्रश करण्याची परवानगी देण्यात आली. त्यांना चांगलं जेवणही देण्यात आलं. जणू काही त्यांच्या वागणुकीचं बक्षीस आहे.

प्रयोग सुरू होऊन तीनच दिवस झाले होते.

काही कैद्यांना विशेष कोठडीत हलवून अर्धाच दिवस झाला असेल नसेल, त्यांनी परत या कैद्यांना आधीच्या कोठडीत पाठवलं आणि तिथल्या कैद्यांना विशेष कोठडीच्या सवलती देण्यात आल्या.

आता सगळेच कैदी गोंधळले होते. बंडाचं नेतृत्व ज्यांनी केलं होतं त्यांना आधी वाटलं की ज्यांना विशेष कोठडीच्या सवलती मिळाल्या ते गार्ड्सचे खबरे आहेत. पण नंतर पुन्हा त्यांच्या सवलती काढून घेतल्या आणि दुसऱ्या कैद्यांना मिळाल्या.

त्यामुळे सगळ्यांचाच एकमेकांवरचा विश्वास उडाला. सगळे एकमेकांकडे संशयाने पहायला लागले. कोणी कोणाशी बोलेना.

बंडामुळे आणखी एक काय झालं तर गार्ड्स एकत्र झाले. ‘आपण आणि ते’ हा भेद तयार झाला. सगळे गार्ड्स कैद्यांवर जास्त नियंत्रण मिळवायला पाहू लागले, जास्त आक्रमक झाले.

कैद्यांना संडास-बाथरूम वापरण्यासाठी पण गार्डची परवानगी घ्यावी लागायची. मनात आलं तर गार्ड परवानदी नाकारायचेही. तिकडे जाताना गार्ड त्यांच्या चेहऱ्यावर काळं कापड टाकून न्यायचे.

रात्री जायचं असेल तर त्यांना परवानगी नसायची. कोठडीत ठेवलेल्या एका बादलीतच आपले विधी उरकावे लागायचे. बरं या बादल्या साफही करू दिल्या नाहीत. कोठड्यांमध्ये घाणेरडा वास यायला लागला. तिथल्या आयुष्याची क्वालिटी आणखी खराब झाली.

तिसऱ्या दिवशी या प्रयोगात सहभागी झालेल्या एका मुलाचं नर्व्हस ब्रेकडाऊन झालं. तो रडायला, किंचाळायला लागला. गार्ड त्याला टोमणे मारायला लागले. शेवटी त्या मुलाला प्रयोगातून लवकर सोडून द्यावं लागलं.

चौथ्या दिवशी आणखी एका मुलाला हे वातावरण असह्य झालं. तो सतत रडायला लागला. त्याला शांत करण्यासाठी धर्मगुरूला बोलावण्यात आलं पण त्याने धर्मगुरूला भेटायला नकार दिला. त्याने डॉक्टर बोलावण्याची मागणी केली. शेवटी त्यालाही सोडून देण्यात आलं.

पाचव्या दिवशी त्या मुलांच्या घरच्यांना भेटायला बोलावलं होतं. तुरुंगात जसे नातेवाईकांना भेटण्यासाठी एक विशिष्ट वेळ असते तसं. पण प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञांना भीती होती तुरुंगाची वाईट अवस्था पाहिली तर आईवडील आपल्या मुलांना घेऊन जातील.

यासाठी कोठड्या स्वच्छ केल्या गेल्या. सगळ्या कैद्यांना अंघोळ, नखं कापणं, ब्रश करण्याच्या परवानग्या दिल्या. नवीन युनिफॉर्म दिले. भरपूर जेवायला दिलं.

जेव्हा या मुलांच्या घरचे आले तेव्हाही त्यांना लगेच भेटू दिलं नाही. बराच वेळ वाट पहायला लावली.

काही आईवडिलांना दिसलं की मुलांची परिस्थिती नीट नाही. ते कृश झालेत किंवा त्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसतोय. त्यांनी तिथे म्हटलं की आता ते वकिलांना घेऊन येतील.

त्याच दिवशी मानसशास्त्रज्ञ फिलिप झिम्बार्डो यांचे काही सहाध्यापक प्रयोग कसा चालला आहे ते पाहायला आले. त्यांना कैद्यांची अवस्था पाहून धक्काच बसला. त्यांनी झिम्बार्डोंवर आरोप केला की ते तटस्थपणे हा प्रयोग करत नाहीयेत आणि त्यांनाच आता यातून विकृत आनंद मिळतोय.

काहींनी या प्रयोगाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह लावलं. आपल्या सहाध्यापकांकडूनच टोले बसल्यानंतर झिम्बार्डो भानावर आले.

गार्ड्स कैद्यांचं शोषण करत होते हे तर खरंच होतं. त्यांनी नंतर एका लेखात म्हटलं की, “मी स्वतःही वाहवत गेलो आणि स्वतःला तुरुंगाचा पर्यवेक्षक समजायला लागलो. मलाही ती मुलं फक्त मुलं न वाटतं कैदी वाटत होती तर गार्ड्स माझ्या जवळचे झाले होते. त्या प्रयोगातला मीही एक भाग ठरलो होतो.”

सहाव्या दिवशी झिम्बार्डो यांनी सगळे गार्ड, कैदी, इतर स्टाफ तसंच या प्रयोगात त्यांची मदत करणारे त्यांचे विद्यार्थी सगळ्यांना बोलावलं आणि आपण प्रयोग संपवतोय असं सांगितलं.

सगळ्या सहभागी झालेल्या तरुण मुलांना कबूल केल्याप्रमाणे दोन आठवड्यांचे पैसे देण्यात आले.

मग झिम्बार्डो यांनी आधी कैद्यांशी सविस्तर चर्चा केली, त्यांच्या अनुभवाबदद्ल, स्वतःची ओळख हरवण्याबद्दल, दडपणाला बळी पडण्याबद्दल, शोषणाबद्दल त्यांना काय वाटलं, त्यांच्या मनात काय भावना आल्या याबद्द्ल जाणून घेतलं.

नंतर त्यांनी गार्ड्सशी त्यांच्या वागणुकीबद्दल चर्चा केली. शेवटी सगळ्यांना एकत्रित बसवून चर्चा केली. त्यातून जे निष्कर्ष समोर आले त्यावर आधारित शोधनिबंध लिहिला.

प्रखर टीका

झिम्बार्डो यांच्या या प्रयोगावर प्रखर टीकाही झाली. अनेक मान्यवरांनी या प्रयोगाला अनैतिक म्हटलं तर अनेकांनी म्हटलं की यातून जी माहिती समोर यायला हवी ती आलेली नाही. या प्रयोगाला काही अधिष्ठान नवह्तं असंही अनेक मानसशास्त्रज्ञांचं मत होतं.

लाईव्ह सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या लेखानुसार, “स्टॅनफर्ड प्रीझन एक्सपेरिमेंटमध्ये सुरुवातीपासूनच अनेक चुका होत्या. मुळात त्यात सहभागी झालेल्या तरुणांना नक्की काय होणार याची कल्पना देण्यात आली नव्हती. मुख्य म्हणजे या प्रयोगाच्या मुख्य संशोधकांनाच यात काय होणार हे माहिती नव्हतं.”

यात आणखी एक मुद्दा मांडला गेला की यात जी तरुण मुलं गार्ड बनली होती ती आपोआपच हिंसक आणि दडपशाहीकडे वळली नाहीत, तर त्यांना झिम्बार्डोंनी तसं करायला ‘प्रोत्साहन’ दिलं.

डेव्ह एशलमॅन गार्ड बनले होते. ते म्हणतात, “मी क्रूर वागत होतो आणि मला सारखं वाटत होतं की आता तरी हे येतील आणि मला थांबवतील आणि म्हणतील, आता बस... हा फक्त एक प्रयोग आहे. पण असं एकदाही झालं नाही.”

तिसरं म्हणजे यात ज्या कैद्याचं नर्व्हस ब्रेकडाऊन झाल्याचा उल्लेख होता, त्याने नंतर मान्य केलं की तो खोटं खोटं नाटक करत होता कारण त्याला लवकर निघून वार्षिक परिक्षेसाठी अभ्यास करायचा होता.

त्या मुलाने नंतर म्हटलं, “मला वाटलं जेलमध्ये नुसतं बसून राहायचं आहे आणि मला अभ्यास करता येईल, पण तसं झालं नाही त्यामुळे मला तिथून निघावं लागलं.”

चौथं म्हणजे सुरुवातीला जरी स्टॅनफर्ड प्रीझन एक्सपेरिमेंटचं कौतुक झालं असलं तरी 2000 नंतर मनोवैज्ञानिकांनी ही संकल्पना नाकारली की माणूस जे काही वागतो ते फक्त त्याच्या अवतीभोवती असलेल्या वातावरणामुळे. नंतरच्या संशोधकांचं म्हणणं होतं की माणसाच्या स्वयंप्रेरणाही त्याच्या वागण्यासाठी मुख्य प्रेरक असतात.

झिम्बार्डो यांनी प्रयोगातून जी निरिक्षणं समोर आली, ती नीट मांडली नाही असं आताच्या संशोधकांचं म्हणणं आहे.

पण स्वतः झिम्बार्डो मात्र हे मान्य करत नाहीत.

ते बीबीसीशी बोलताना म्हणाले होते, “हा प्रयोग करणं बरोबरच होतं. फक्त तो दुसऱ्या दिवसानंतर चालू ठेवायला नको होता. ते तेव्हाच संपवायला हवा होता.”

डेव्ह एशलमॅन म्हणतात, “मला कळलं की एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मी किती वाईट वागू शकतो. आता मला त्याची लाज वाटते. इराकमधल्या अबू घारिब तुरुंगातले फोटो जेव्हा बाहेर आले तेव्हा मला ते फारच ओळखीचे वाटले. असंच काहीसं आम्ही करायचा प्रयत्न केला होता. मला लक्षात आलं की त्या कैद्यांवर अत्याचार करणारे अमेरिकन सैनिक साधेच लोक होते, फक्त त्या विशिष्ट परिस्थितीत तसे वागले.”

अबू घारिबची घटना म्हणजे जेव्हा अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं आणि तिथल्या सैनिकांना बंदी बनवलं, तेव्हा अबू घारिब तुरुंगात ठेवलं होतं.

या तुरुंगात अमेरिकन सैनिकांनी इराकी कैद्यांवर अन्वनित अत्याचार केले आणि त्याचे फोटो नंतर जगभरात गेले. मानवी हक्कांची पायमल्ली झाली, युद्धकैद्याच्या अधिकारांचा भंग केला म्हणून जगभरात अमेरिकेची नाचक्की झाली.

पण नव्या संशोधकांच्या पिढीला हे पटलं नाही की वाईट वागणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला फक्त त्याच्या परिस्थितीचं कारण करून सोडून द्यायचं. त्यांचं म्हणणं होतं की वाईट वागणारा प्रत्येक व्यक्ती स्थिर मनाने आणि शांत डोक्याने निर्णय घेत असतो, त्याचे परिणाम त्याने भोगले पाहिजेत.

कैदी बनलेले रॅमसे नावाचे गृहस्थ म्हणतात की हा प्रयोग व्हायलाच नको होता.

“याला कोणताच शास्त्रीय आधार नव्हता आणि तो अनैतिक होता. या प्रयोगाची चांगली गोष्ट कोणती म्हणाल, तर एकच की तो वेळेआधी संपला.”

“या प्रयोगाचे मुख्य संशोधक झिम्बोर्डो यांना 40 वर्षं फुकट आदर आणि सन्मान दिला. त्यांच्या प्रयोगाचा आधार घेऊन 40 वर्षं मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांना चुकीच्या गोष्टी शिकवल्या.”

झिम्बार्डो मात्र हा आरोप खोडून काढतात. त्यांच्या मते, त्यांचं काम मानसशास्त्र या शाखेत ‘फार महत्त्वाचं’ आहे. अबू घारिबमध्ये कैद्यांवर अत्याचार का झाले, हे समजण्यासाठी त्यांच्या संशोधनाचा फार उपयोग झालं असं त्यांना वाटतं.

“लोक फक्त स्वतःच्या स्वयंप्रेरणेने निर्णय घेत नाहीत. बाहेरचे अनेक घटक त्यांना कसंही वागायला भाग पाडू शकतात हे याने सिद्ध होतं.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)