कुरुप प्राणी आपल्याला सुंदर का वाटतात? आपण त्यांच्यावर प्रेम करतो, कारण-

अमेरिकेत कॅलिफॉर्निया राज्यातल्या पेटाल्युमा शहरात गेल्या महिन्यात एक अजब स्पर्धा झाली.

वेडंवाकडं तोंड, फेंदरं-बसकं नाक, एकावर एक वाकडे तिकडे दात, बटबटीत डोळे आणि ताठरलेल्या मिशा असं सर्वांत वाईट मिश्रण असलेले प्राणी बघायचे आणि त्यातून जगातला सर्वांत कुरूप कुत्रा कोण ते ठरवायचं.

हे सगळं कौतुकाने बरं का! वर्ल्ड अग्लिएस्ट डॉग काँटेस्ट दर वर्षी तितक्याच उत्साहाने होते. जगभराल्या प्राणीप्रेमी मंडळींना या अशा कुरूप श्वानांविषयी विलक्षण प्रेम.

इंटरनेटवरही अशा प्रकारे विचित्र आणि कुरूप म्हणून खपतील असे फोटो फारच प्रेमाने पाहिले आणि शेअर केले जातात. व्हायरल होतात.

अशा कुरूप प्राण्यांवर माणसाचा जीव कसा काय जडतो? असे चित्रविचित्र दिसणारे कुत्रे किंवा इतर पाळीव प्राणी कशामुळे क्युट दिसू लागतात? आणि लोकांना या अग्ली अॅनिमल्सचं वेड कशाने लागतं?

या आवडीमागे किंवा प्रेमामागे उत्क्रांतीवाद असू शकतो.

ऑस्ट्रियन प्राणीशास्त्र अभ्यासक कोनराड लॉरेंझ यांच्या मते, मोठे डोळे, भव्य कपाळ, गोबरे गाल, मऊमऊ अंग या लहान बाळांच्या शरीर वैशिष्ट्यांविषयी आकर्षण हे उत्क्रांती बरोबर आलेलं आहे.

म्हणजे आपली जमात टिकवायची असेल तर आपल्या तान्हुल्यांना जपण्याचं काम मोठ्यांनी करणं उत्क्रांतित अपेक्षित असतानाच या प्रेमाची उपज होत असावी.

लॉरेंझ यांनी 1943 मध्ये या बालसुलभ शरीरवैशिष्ट्यांना ‘बेबी स्किमा’ असं नाव दिलं.

मोठ्या नाकाचा ब्लॉबफिश, पग, आयआय आणि बुलडॉग असे प्राणी दिसायला विचित्र असतात पण त्यांच्यात ‘बेबी स्किमा’ इफेक्टची वैशिष्ट्यं दिसतात. मानवातल्या उत्क्रांतीतून आलेल्या बाळांबद्दलच्या वात्सल्यभावनेतूनच ही आवड आली असावी.

क्यूटनेसची संकल्पना लहानपणापासूनच रुजते

रोममधील इस्टिट्युटो सुपेरिओर दी सॅनिटा इथे संशोधक म्हणून काम करणाऱ्या मार्था बोर्गी यांनी बेबी स्किमा आणि त्याचा मानव-प्राणी यांच्या नात्याशी असलेला संबंध यांचा अभ्यास केला आहे.

त्या म्हणतात, "बेबी स्किमाची वैशिष्ट्यं दिसली की व्यक्ती आपसूकच त्याकडे आकर्षित होते, त्याला जपण्याची आणि काळजी घेण्याची वृत्ती आपोआप विकसित होते."

मानव प्राण्यांमध्ये त्यांची लहान बाळ उदरभरण, संरक्षण यासाठी सर्वस्वी देखभाल करणाऱ्यांवर म्हणजे पालकांवर अवलंबून असतात. त्यामुळे अर्थातच संतती जगण्याची शक्यता वाढवायची असेल तर त्यांच्याबद्दल हाच दृष्टिकोन किंवा वृत्ती वाढीस लागणं आवश्यक आहे.

2014 मध्ये बोर्गी आणि इतर काही संशोधकांनी असं शोधून काढलं की, आपण ज्याला 'क्यूट' किंवा मराठीत गोड म्हणतो ती दिसण्याची संकल्पना खूप लहान वयातच माणसांमध्ये निर्माण झालेली असते.

मूल वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्याला गोड वाटणारे प्राणी किंवा माणसं ओळखायला लागतं. म्हणजे मोठे टपोरे डोळे, बसकं नाक, गोल गरगरीत चेहरा अशी वैशिष्ट्य या क्यूटनेसशी जोडली जातात.

लहान मुलांना कोणते प्राणी क्यूट वाटतात आणि कोणते नाही?

"बालसुलभ चेहरेपट्टी असणाऱ्या कुत्र्या-मांजरांकडे आकर्षित होण्याची सुरुवात अगदी लहान वयातच कशी होते, हे आम्ही आमच्या अभ्यासातून दाखवून दिलं", बोर्गी सांगतात.

या संशोधकांनी वयवर्षं तीन ते सहा दरम्यानच्या बालकांच्या डोळ्यांची हालचाल टिपून त्याचा अभ्यास केला. कुत्रा, मांजर आणि मनुष्य यांचे डिजिटली मॉडिफाय केलेले फोटो या मुलांना दाखवले तर त्याकडे या बालकांचं अधिक लक्ष गेलं.

डिजिटली मॉडिफाय करताना या प्राण्यांमध्ये बालसुलभ चेहरेपट्टी किंवा ठेवण असे बदल केलेले होते.

या बालकांना कुठला प्राणी क्यूट वाटतो आणि कुठला क्यूट वाटत नाही याचं एक ते पाचप्रमाणे रेटिंग द्यायलाही सांगितलं. तेव्हा या छोट्या मुलांनी बरोबर मोठे डोळे, रुंद कपाळ आणि नकट्या नाकाच्या चेहऱ्यांनाच झुकतं माप देत सर्वांत क्यूट म्हणून पाच रँकिंग दिलं, तर बालसुलभ नसलेल्या चेहरेपट्टीला कमी क्यूट असल्याचं म्हटलं.

क्यूटनेसची व्याख्या लहान मुलांसाठी ठरतेच मुळी बेबी स्किमाच्या वैशिष्ट्यांवरून हे आम्ही दाखवून दिलं, असं बोर्गी म्हणतात.

कुरुप प्राण्यांची वेगळी शरीरवैशिष्ट्यं

अग्ली अॅनिमल्स किंवा कुरूप दिसणारे प्राणी नेहमी इतर काही वैशिष्ट्यांचे असतात.

बऱ्याचदा ते ज्या टोकाच्या पर्यावरणीय परिसंस्थेत राहात असतात की त्यांच्या शरीररचनेत निसर्गतःच काही बदल होतात ते सकृतदर्शनी किळसवाणे वाटू शकतात -म्हणजे रडक्या जाडसर चेहऱ्याचा मासा ज्याला ब्लॉबफिश म्हणून ओळखलं जातं किंवा आफ्रिकेतला नेकेड मोल रॅट - म्हणजे दोन दात पुढे असलेला पांढरा फटक, सुरकुतलेल्या कातडीचा उंदरासारखा पण मोठा सरपटणारा प्राणी.

या प्राण्यांच्या जैवशास्त्रीय अभ्यास अधिक सखोलपणे करण्यावर शास्त्रज्ञांचा भर आहे. कारण या अभ्यासातून माणसाला होणारे कॅन्सर, हृदयविकार किंवा मज्जासंस्था पोखरणारे आजार यांच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडू शकतो.

काही कुरूप दिसणाऱ्या प्राण्यांनी जंगलात राहण्यासाठी त्यांच्या शरीररचनेत ठेवणीत सुयोग्य बदल केले. त्यामुळे ते ज्या परिसंस्थेचा भाग आहेत त्यालाही फायदा झाला आहे. पण अशा कुरूप प्राण्यांकडे बहुधा दुर्लक्ष होतं. त्याऐवजी पारंपरिक दृष्टिकोनातून 'क्यूट' दिसणाऱ्या आणि गुबगुबीत प्राण्यांकडेच माणूस आकर्षित झालेला दिसतो. यातून अशा आकर्षक नसलेल्या प्राण्यांची जमाती संशोधकांच्या नजरेतूनही दुर्लक्षितच राहू शकतात.

'अग्ली-क्यूट' ही नवीन फॅशन?

विचित्र पण क्यूट दिसणाऱ्या प्राण्यांविषयी प्रेम वाटण्याला काही सांस्कृतिक संदर्भसुद्धा आहेत.

रोवेना पॅकर या लंडनच्या रॉयल व्हेटेरनरी कॉलेजमध्ये माणसाला साथ देणाऱ्या पाळीव प्राण्यांचा अभ्यास करतात आणि याच विषयीच्या व्याख्यात्या आहेत.

त्या म्हणतात, "अग्ली-क्यूट ही सध्या फॅशनेबल गोष्ट झाली आहे. सोशल मीडियामुळे याला अधिक चालना मिळाली आहे."

सेलेब्रिटीज त्यांच्या पाळीव प्राण्यांचे फोटो सतत टाकत असतात. त्यात पग्ज किंवा फ्रेंच बुलडॉगसारखे प्राणी अशा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समुळे अधिक लोकप्रिय झाले आहेत, असं त्यांचं मत आहे.

पण या ट्रेंडचे काही गंभीर परिणामही आता दिसू लागले आहेत. ब्रॅकीसेफॅलिक डॉग्ज किंवा ज्याला आपण बसक्या / थापुटक्या चेहऱ्याचे किंवा छोटं डोकं, नकटं नाक असलेले बुटके प्राणी म्हणू शकतो, असे श्वान शक्यतो पाळू नयेत, असा सल्ला पशुवैद्यक तज्ज्ञ देऊ लागले आहेत.

पग आणि फ्रेंड बुलडॉग ही या कुत्र्यांची उदाहरणं. या दोन जातींच्या कुत्र्यांमध्ये वारंवार होणारा त्वचा संसर्ग, डोळ्यांचे आजार आणि श्वसनाला होणारा त्रास हे अनुभवायला येत आहे.

आरोग्याच्या दृष्टीने पग ही श्वानाची जात पाळण्यासाठी सुयोग्य नसल्याचा सांगणारा एक अभ्यास 2022 मध्ये प्रसिद्ध झाला आहे. ब्रिटनमधे पग्ज इतर श्वान जातींच्या तुलनेत आजारी पडायचं प्रमाण दुप्पट असल्याचं हा अभ्यास सांगतो.

"हल्ली आणखी एक ट्रेंड पाळीव प्राणीप्रेमींमध्ये दिसतो. आपला कुत्रा हा अगदी छोटुसा, खिशात मावेल एवढा आणि त्वचेची एकावर एक आवरणं असलेला गुबगुबीत प्राणी असावा अशी अनेकांची इच्छा असते."

...म्हणून पग्ज पाळताना विचार करा

उन्हाळ्याच्या दिवसांत हीटस्ट्रोक किंवा उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता पग्जमध्ये अधिक असते, कारण ते आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवू शकत नाहीत.

पॅकर सांगतात, "तुम्ही लांडग्यांचं शरीर पाहा. त्यांचं नाक निमुळतं आणि लांब असतं. उष्णता या नाकपुड्यांमधून शरीरात जाते त्यावेळी ते प्रभावीपणे शरीराचं तापमान नियंत्रित ठेवू शकतात. त्यांना आपल्यासारखा घाम फारसा येत नाही. त्यामागेही हेच कारण आहे."

पग्जचं नाक बसकं असतं आणि अगदी छोट्या नाकपुड्या असतात. त्यामुळे उष्णतेच्या दिवसांत या कुत्र्यांना त्यांच्या अरुंद श्वसनमार्गामुळे भराभर श्वास घेणं त्यांचं शरीर थंड ठेवणं अवघड जातं. याचा परिणाम म्हणजे अनेक वेळा पग्ज घशात काही अडकल्यासारखे गुरगुरतात किंवा घोरतात.

अनेक लोकांना त्यांचा हा आवाजही 'क्यूट' वाटतो आणि पग्जचं हे एक वैशिष्ट्य म्हणून नावाजलंही जातं. पण प्रत्यक्षात त्या कुत्र्याच्या श्वसनमार्गात अडथळे आल्याचं हे लक्षण असतं, असं पॅकर सांगतात.

छोटे, विदूषकासारखे आणि आळशी पग्ज

एवढ्या सगळ्या आरोग्याच्या अडचणी असूनही पग हा लोकप्रिय पाळीव प्राणी आहे. ब्रिटनच्या नॅशनल डॉग रजिस्टरमध्ये 2005 ते 2017 दरम्यान पग्जची नोंदणी पाचपटींपेक्षा अधिक वाढल्याचं दिसतं.

अमेरिकन केनेल क्लबने पग या जमातीला एकूण 280 जातींपैकी 35 व्या क्रमांकाची लोकप्रिय पाळीव जमात म्हणून मान्यता दिली आहे. गेल्या वर्षी या लोकप्रियतेच्या यादीत ब्रॅकीसेफॅलिक डॉग्जचीच प्रजात असलेला फ्रेंड बुलडॉग पहिल्यांदाच प्रथम स्थानी आला होता.

ब्रॅकीसेफॅलिक डॉग्सच्या आरोग्य समस्या मान्य करणं हेच मुळात अनेकांना जड जातं. याचं कारण आहे मानसिकता, असं पॅकर यांचं मत आहे.

"पग्ज खूप छोटेसे, विदूषकासारखे आणि खरं तर आळशी असतात. त्यांचा कुठल्या इतर जातीबरोबर संकर झाला तर ते असे गोड काउच पोटॅटो उरणार नाहीत, असं लोकांना वाटतं. पण या दृष्टिकोनामुळेच आपण या प्रजातीला शारीरिक व्याधींच्या खाईत लोटत आहोत."

अन्य जातींशी संकर गरजेचा

फ्लॅट फेस किंवा बसक्या चेहऱ्याच्या कुत्र्यांचा इतर जातींशी संकर ही अत्यावश्यक गोष्ट असल्याचं त्या सांगतात.

"विचित्र शरीरयष्टी याव्यतिरिक्त त्यांच्या जनुकीय वैविध्यही अगदी कमी असतं. त्यामुळे क्रॉसब्रिडिंग झालंच पाहिजे."

जनुकीय वैविध्य हे या प्राण्यांच्या प्रजातींसाठी आवश्यक आहे. कारण त्याशिवाय त्यांच्यात उपजलेले धोकादायक आजार फैलावत जातील आणि त्यात त्यांचा जीवही जाईल. कदाचित जमातच धोक्यात येईल.

2016 मध्ये इंग्लिश बुलडॉग या जातीच्या 102 श्वानांचा अभ्यास करून विश्लेषण करण्यात आलं. त्यामध्ये त्यांच्या मातृक आणि पितृक जनुकांमध्ये फारसा फरक नसल्याचं लक्षात आलं. तसंच रोगप्रतिकार शक्ती नियंत्रित करणाऱ्या जीन्स असणारे जिनोमसुद्धा वैविध्यपूर्ण नव्हते. याचा अर्थ या कुत्र्यांची प्रतिकार क्षमता खूपच मर्यादित होती.

पॅकर सांगतात, "बुलडॉग म्हणजे हल्ली त्यांच्या आद्य स्वरूपाचं व्यंगरूप झालेले प्राणी वाटतात.

"हल्ली आणखी एक ट्रेंड पाळीव प्राणीप्रेमींमध्ये दिसतो. आपला कुत्रा हा अगदी छोटुसा, खिशात मावेल एवढा आणि त्वचेची एकावर एक घडी असलेला गुबगुबीत प्राणी असावा अशी अनेकांची इच्छा असते. पण याचा अर्थ त्यांचा मणक्यांचा विचित्र आकाराचा होणार आहे. ही विकृती पाठीच्या मणक्यात येऊन पुढे अनेक मज्जासंस्थांशी निगडित विकार उद्भवू शकतात.”

त्यामुळे तुम्हाला बटबटीत मोठाले डोळे, सुरकुत्यांचा किंवा घड्या पडलेला चेहरा असे विचित्र रूप क्यूट वाटत असले तरी आपलं या अग्ली-क्यूट प्राण्यांविषयीचं आकर्षण आणि प्रेम थोडं तपासून पाहायला हवं हे नक्की.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)