श्रीकांत शिंदे : दहा वर्षांच्या राजकारणात बनले 'पॉवर सेंटर', तरी 'कल्याण' आव्हानात्मक का बनलंय?

फोटो स्रोत, Dr Shrikant Eknath Shinde/x
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
श्रीकांत शिंदे हेच कल्याणमधून शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच, भाजप श्रीकांत शिंदेंच्या मागे खंबीरपणे उभी राहील आणि ते मागच्या वेळपेक्षा जास्त मताने जिंकून येतील, असंही म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत श्रीकांत शिंदेंचं नाव नसल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. कारण मुख्यमंत्र्यांच्या मुलाचंच पहिल्या यादीत नाव नसल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
त्यात कल्याणमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशा छुप्या संघर्षाच्याही बातम्या अधून-मधून येत होत्या. त्यामुळे पहिल्या यादीत श्रीकांत शिंदेंचं नाव नसल्यानं चर्चांनाही उधाण आलं होतं.
आता कल्याणमधून श्रीकांत शिंदेच लढतील, हे निश्चित झालं आहे.
या लेखातून आपण श्रीकांत शिंदेंच्या राजकीय कारकीर्दीवर आणि कल्याणमधील राजकारणावर नजर टाकूया.
2014 साली कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार म्हणून श्रीकांत शिंदे संसदेत पोहोचले. त्यानंतर 2019 सालीही त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला. आता पुन्हा एकदा याच मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले होते, हा ‘खराखुरा डॉक्टर’ आहे
श्रीकांत शिंदे हे पेशाने डॉक्टर आहेत. 2011 साली नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेजमधून त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं.
त्यानंतर त्यांनी एमएससाठी (मास्टर इन सर्जरी) डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. श्रीकांत शिंदे यांचं एमएस पूर्ण होण्याआधी ते राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
कल्याण लोकसभा मतदारसंघ वर्षानुवर्ष शिवसेनेचा गड मानला जात जातो. 2009 साली कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरूध्द शिवसेना ही जोरदार लढत झाली.
या लढतीत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे हरले आणि आनंद परांजपे खासदार झाले. पण 2014च्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी मुलगा श्रीकांत शिंदे यांना निवडणुकीत उतरवलं.

फोटो स्रोत, DrShrikantEknathShinde/Facebook
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत असलेले श्रीकांत शिंदे हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असतील याची चर्चा सुरू झाली.
तेव्हा आनंद परांजपे यांनी खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेत शिंदेशाही आणि घराणेशाही सुरू झाल्याचा आरोप केला होता.
2014 साली श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा तत्कालीन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची उमेदवारी जाहीर करताना हा 'खराखुरा डॉक्टर' आहे असं उध्दव ठाकरे म्हणाले होते. (असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे निलेश राणेंवर टीका केली होती.)
2014 च्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे जवळपास अडीच लाखांच्या मताधिक्क्याने निवडून आले.

फोटो स्रोत, DrShrikantEknathShinde/Facebook
2015 साली श्रीकांत शिंदे यांनी ऑर्थोपेडीक्समधून एमएस पूर्ण केलं. मग ते राजकारणात रूळू लागले. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या युवासेनेत ते काम करू लागले.
2019 साली श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी देण्यात आली. 2019 ला श्रीकांत शिंदेंनी जवळपास साडेतीन लाखांचं मताधिक्क्य मिळवलं.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “मी राजकारणात अपघाताने आलोय. मला राजकारणात रस नव्हता. 2014 ला आमच्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे मला उमेदवारी देण्यात आली होती. मी डॉक्टर आहे. राजकारणाच्या माध्यमातून मी रूग्णसेवेसाठी फाऊंडेशनचं काम करतो.”
गेल्या दहा वर्षांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
श्रीकांत शिंदे हे खासदार झाल्यानंतर उच्चशिक्षित, शांत आणि तरूण व्यक्तिमत्व कल्याण लोकसभेतील मतदारांना मिळालं असं कौतुक झालं.
सुरुवातीची काही वर्षे एकनाथ शिंदे आणि दिल्लीत शिवसेनेच्या जुन्या खासदारांच्या छत्रछायेखाली श्रीकांत शिंदे काम करताना दिसत होते. आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवानेते म्हणूनही त्यांचं काम सुरू होतं. युवासेनेच्या कोअर कमिटीत नसल्यामुळे शिवसेना भवनच्या बैठकांना फारसे कधी दिसले नाहीत. 2014 ते 2019 याकाळात ते फार माध्यमांमध्येही दिसले नाहीत. मतदारसंघ ते लोकसभेचं अधिवेशन इतकाच त्यांचा वावर राहिला.
मात्र, नंतर श्रीकांत शिंदे दिल्लीच्या तरूण खासदारांच्या गटात सहभागी होऊ लागले. हळूहळू दिल्लीत त्यांनी पकड मजबूत करायला सुरूवात केली.
कल्याणच्या नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या पत्री पुलाचं काम श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीत पाठपुरावा करून केलं. त्याचबरोबर ठाणे-दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका उभी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. ही मार्गिका सुरू झाल्यामुळे लोकल ट्रेन्स आणि एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होण्यास मदत झाली. ही त्यांची कामं अधोरेखित झाली.
लोकसभेतील आकडेवारीनुसार, 2014 ते 2019 लोकसभेतील श्रीकांत शिंदे यांची 80 टक्के उपस्थिती होती. त्यांनी मतदारसंघाशी निगडित 293 प्रश्न उपस्थित केले आहेत.

फोटो स्रोत, DrShrikantEknathShinde/Facebook
2019 साली निवडून आल्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्या वागण्यात, बोलण्यात फरक जाणवू लागल्याचं काही स्थानिक नेते सांगतात. स्थानिक आमदार, नेत्यांबरोबर त्यांचे खटके उडत होते.
ठाणे जिल्ह्यावर एकनाथ शिंदेचं वर्चस्व असल्यामुळे श्रीकांत शिंदे जुन्या नेत्यांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करायचे, असाही आरोप काही माजी आमदारांनी केला.
एका शिवसैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, “माजी शिवसेना आमदार सुभाष भोईर आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये बिघडलेल्या संबंधांमुळे त्यांचं विधानसभेचं तिकीट कापण्यात आलं. मातोश्रीवरून देण्यात आलेला एबी फॉर्म परत घेण्यात आला. त्या जागी मनसेचे उमेदवार राजू पाटील यांना मदत करण्यात आली.”
2019 नंतर कोरोना काळात श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून रूग्णांना केलेल्या मदतीसाठी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचं विशेष कौतुक करण्यात आलं.
महाविकास आघाडीच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने बराच निधी हा कल्याण लोकसभा मतदारसंघात देण्यात आला.
एकनाथ शिंदेंनंतर दुसरं ‘पॉवर सेंटर’
2022 साली एकनाथ शिंदे यांनी यांनी बंड केलं आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांचं राजकारण बदललं.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर श्रीकांत शिंदे हे दुसरं ‘पॉवर सेंटर’ बनलं. पडद्यामागून सगळी सूत्र हलवण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे पार पाडू लागले. शेकडो कोटी रूपयांचा निधी कल्याण लोकसभा मतदारसंघात देण्यात आला.
कल्याण मतदारसंघातील राजकारणापुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणात श्रीकांत शिंदे सक्रीय दिसू लागले. मंत्रालयातील महत्वाच्या कामांमध्ये त्यांचा हस्तक्षेप दिसू लागला. मुख्यमंत्र्यांना वेळ देता येत नसलेली अनेक महत्वाची कामे श्रीकांत शिंदे हाताळत होते.

फोटो स्रोत, DrShrikantEknathShinde/Facebook
कार्यालयीन कामाबरोबरच आदित्य ठाकरेंच्या युवासेनेला सुरूंग लावण्यात श्रीकांत शिंदे यशस्वी झाले. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नव्या शिवसेनेत युवासेना उभी केली. आदित्य ठाकरे यांच्यावर सतत हल्लाबोल करत असलेले श्रीकांत शिंदे माध्यमांमध्ये झळकू लागले.
बॉलिवूड, बड्या उद्योगपतींचे सोहळे, बैठका यात श्रीकांत शिंदेंची उपस्थिती अधोरेखित होत होती. ‘पॉवर सेंटर’ बनलेल्या श्रीकांत शिंदे यांच्या वागण्यातला फरक अनेक महायुतीतील नेत्यांनाही नाराज करत होता.
कल्याणमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना हा छुपा संघर्ष?
कल्याण लोकसभा मतदारसंघाने गेली अनेक वर्ष हिंदुत्ववादी पक्षाला निवडून दिले आहे. भाजपचे रामभाऊ म्हाळगी, जगन्नाथ पाटील, राम कापसे हे नेते आजवर इथून निवडून आले आहेत. 1984 साली काँग्रेसचे शांताराम घोलप हे एकदाच निवडून आले. त्यानंतर 1996 पासून हा मतदारसंघ शिवेसेनेचा बालेकिल्ला बनला.
2014 ते 2024 अशी दहा वर्षे श्रीकांत शिंदे या मतदारसंघातील खासदार आहेत. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातले मनसेचे राजू पाटील, भाजपचे रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे बालाजी किणीकर, भाजपचे गणपत गायकवाड आणि भाजपचे उत्तमचंद ऐलानी हे आमदार आहेत.
यात भाजपच्या आमदारांची संख्या जास्त आहे. भाजप कार्यकर्ते आणि आमदारांकडून श्रीकांत शिंदे यांच्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसतात. लोकसभेची जागा जरी शिवसेनेची असली तरी ती भाजपच्या मदतीने निवडून येत असल्याचं काही नेत्यांकडून बोललं गेलं.

वर्षभरापूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दोन ते तीनवेळा कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा केला. त्यावेळी या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
भाजप कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी करत असल्याचं चित्र दिसत होतं. भाजपचे नेते आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांचं एकनाथ शिंदेंशी चांगले संबंध असले, तरी श्रीकांत शिंदेंशी मतभेद असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.
भाजपच्या एका पदाधिकाऱ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली करण्याची भाजपची मागणी होती. पण बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. यामागे श्रीकांत शिंदे असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. यावरून दोन्ही पक्षात संघर्ष पेटला.

फोटो स्रोत, DrShrikantEknathShinde/Facebook
भाजप पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत जोपर्यंत बदली होत नाही, तोपर्यंत लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मदत न करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर रविंद्र चव्हाण हे एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमांना गैरहजर दिसू लागले.
या प्रकरणानंतर श्रीकांत शिंदे यांनी एका अधिकाऱ्याच्या बदलीच्या शुल्लक कारणावरून अशी विधानं आणि ठराव होणं योग्य नाही असं म्हटलं.
श्रीकांत शिंदे म्हणाले, “सगळ्यांनी युतीसाठी काम केलं पाहिजे. 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील यासाठी काम केले पाहिजे. यामध्ये स्वार्थ ठेवायला नको. मलाही कुठला स्वार्थ नाही.
“मला जर उद्या सांगितलं की, कल्याण लोकसभेचा राजीनामा द्या, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. मी पक्ष आणि युतीचं काम करायला तयार आहे. पक्षनेतृत्वाने असो वा भाजपने सांगितलं की, कल्याणमध्ये चांगला उमेदवार मिळतोय, तर त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही जसं काम कराल, तसंच मी काम करेन. आमचा उद्देश एकच आहे की, 2024 पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत, इतका शुद्ध हेतू आमचा आहे. यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही"

फोटो स्रोत, DrShrikantEknathShinde/Facebook
दुसरीकडे, कल्याण लोकसभा मतदारसंघात जर भाजप उमेदवाराची चाचपणी करत असेल, तर ते योग्य आहे. कारण कल्याणचे खासदार हे भाजपच्याच मदतीने निवडून येत आहेत, असं मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं होतं.
काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले.
मुंब्रा येथील वाय जंक्शन पूलाच्या उद्धाटनावेळी श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मुख्यमंत्र्यांसमोर शाब्दिक वाद झाला.
तुम्ही खासदार नव्हतात तेव्हा, म्हणजे माझ्या काळात हा प्रकल्प आला, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यावर श्रीकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं की, आम्ही आल्यावर हा प्रकल्प झाला आणि त्याला आम्ही पैसे दिले.
त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
यानंतर जितेंद्र आव्हाडांनी श्रीकांत शिंदे धमकी देत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “आता तो मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. त्याच्याशी सांभाळून बोललं पाहिजे. यंत्रणा त्यांच्याकडे आहे. आताच आम्हाला धमकी मिळाली, किती दिवस जेलमध्ये बसाल कळणार नाही. मग घाबरलं पाहिजे ना..”
या काही निवडक प्रसंगांवरून एक निश्चित की, कल्याणमधील यंदाची निवडणूक श्रीकांत शिंदेंसाठी आव्हानात्मक असेल.
कारण कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहापैकी चार आमदारांनी श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात बोलल्याचं समोर आलं. एकूणच श्रीकांत शिंदे यांच्या राजकारणातील 2024 ची लोकसभा निवडणूक अधिक आव्हानात्मक असेल.











