यशवंतराव चव्हाण यांना जवाहरलाल नेहरुंनी संरक्षण मंत्री होण्याची विनंती का केली?

फोटो स्रोत, TED WEST / GETTY
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आज (11 मार्च ) यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन आहे. त्या निमित्ताने ही बातमी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
यशवंतराव चव्हाण यांची आठवण काढल्यानंतर, 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला' या वाक्प्रचाराचा नेहमी उल्लेख केला जातो.
चीनच्या युद्धानंतर संरक्षणमंत्रिपदाचा कार्यभार यशवंतराव चव्हाण यांनी सांभाळला होता. त्यांनी भारताचा संरक्षण विभाग मजबूत करण्यासाठी काही आमूलाग्र बदल केले होते. याबद्दल थोडी माहिती आणि त्याचा इतिहास येथे जाणून घेणार आहोत.
हे वाक्य पहिल्यांदा कधी प्रचारात आलं?
1962 साली चीनने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली. 20 ऑक्टोबर 1962 पासून चीनने आक्रमण सुरू केले. त्यानंतर हे युद्ध एक महिना चाललं आणि 21 नोव्हेंबर 1962 रोजी चीनने एकतर्फी युद्धविराम जाहीर केल्यानंतर ते थंडावलं.
या काळात 1 नोव्हेंबर रोजी तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांनी राजीनामा दिला होता. 1 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संरक्षण मंत्रालयाचं कामकाज पाहिलं.

फोटो स्रोत, J. WILDS
पं. नेहरु यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना हे पद सांभाळण्यासाठी दिल्लीला बोलावलं. यशवंतराव चव्हाण यांनी हे पद पुढची 4 वर्षं सांभाळलं. तेव्हापासून हा वाक्प्रचार रुढ झाला. चव्हाण याच्या कालावधीतच भारत आणि पाकिस्तान यांचं 1965चं युद्ध झालं.
पं. नेहरु यांनी दाखवलेला विश्वास यशवंतरावांनी सार्थ ठरवला आणि पं. नेहरु, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळामध्ये त्यांना संरक्षणमंत्रालयाचा पदभार सांभाळता आला.
त्यानंतर यशवंतरावांच्या कर्तृत्वाची कमान चढतीच राहिली. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अर्थ, गृह, परराष्ट्र, संरक्षण अशा महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चारही मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली.
नियुक्तीसाठी पंतप्रधानांचा फोन आल्यावर काय झालं?
यशवंतरावांची संरक्षणमंत्री पदासाठी निवड करत असल्याचं सांगून त्यांचं मत विचारण्यासाठी पं. नेहरूंनी त्यांना फोन केला.
त्यावेळेस घडलेल्या एका विनोदी प्रसंगाचे वर्णन अनिल पाटील यांनी 'लोकनेते यशवंतराव चव्हाण' या पुस्तकात केले आहे.
ते लिहितात, 'यशवंतराव मुंबईत सचिवालयात दैनंदिन कामकाज पहात असताना त्यांना दिल्लीवरून पंतप्रधान पंडित नेहरूंचा फोन आला. चिटणीसांनी घाईघाईने तो निरोप यशवंतरावांना दिला.
यशवंतरावांनी फोन उचलताच त्यांच्या कानावर शब्द पडले, "मी जवाहरलाल बोलते आहे. जवळपास कोणी बसलेले नाही ना ?" "कोणी नाही" असा यशवंतरावांकडून निर्वाळा मिळताच जवाहरलाल बोलले. "सरंक्षण खात्याची जबाबदारी, मी तुमच्यावर सोपवू इच्छितो. तुम्ही दिल्लीला आलं पाहिजे असं मला वाटतं. येणार ना तुम्ही? आणि त्याची फारशी चर्चा न करता हो किंवा नाही एवढंच उत्तर मला हवं आहे. "

फोटो स्रोत, Getty Images
थोडा वेळ विचार करून यशवंतराव म्हणाले, "मला एका व्यक्तीला विचारावं लागेल.
"काहीशा रागानेच नेहरू म्हणाले, "अशी कोणती व्यक्ती आहे, की जिला विचारल्याशिवाय काम अडणार आहे?"
यावर यशवंतराव बोलले, "मुंबई सोडून दिल्लीला जाण्याची परवानगी मला किमान माझ्या पत्नीकडून अगोदर घ्यावयास हवी."
यशवंतरावांच्या या उत्तरावर मनमुराद हसून नेहरू बोलले, "हो जरुर ! सौ. चव्हाणांशी तुम्ही जरुर बोला आणि दोन दिवसांत तुमचा निर्णय मला कळवा."
दोन दिवसांनंतर यशवंतरावांनी आपण दिल्लीला येण्यास तयार असल्याचे नेहरुंना कळविले.'
यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द
चीनच्या युद्धानंतर भारतीय सैन्यदलाची स्थिती मजबूत करणं आवश्यक होतं. त्यासाठी संरक्षण विषयांना अधिक निधी देण्याची गरज होती.
सुरुवातीला त्यांना मंत्रिमंडळात स्वतःचं स्थान भक्कम करावं लागलं. मेनन यांच्या राजीनाम्यानंतर संरक्षणमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली. त्यावेळेस केंद्रीय मंत्रिमंडळात या पदासाठी अनेकजण उत्सुक होते. त्यावेळच्या मंत्रिमंडळातील कुरबुरींबद्दल के. जी. जोगळेकर यांनी यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्व या पुस्तकात लेख लिहिला आहे.
त्यावेळच्या मंत्रिमंडळात टीटी कृष्णम्माचारी आणि बिजू पटनाईक हे या पदासाठी उत्सुक होते. मात्र नेहरूंनी यशवंतरावांना हे पद दिलं. त्यानंतर काही काळ आपणच संरक्षणमंत्री असल्यासारखं वर्तन बिजू पटनाईक करत होते. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्याला शोभेचे मंत्री होण्याची इच्छा नाही असं पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.
दररोज सकाळी बैठक
संरक्षण विभागाचा कायापालट करण्याचे काम हातात घेतल्यावर यशवंतरावांनी काही नवे निर्णय घेतले. दररोज सकाळी ते तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख, संरक्षण सचिव आणि संरक्षण उत्पादन विभागाच्या प्रमुखांची बैठक घेत. यामध्ये ते स्वतः या सर्वांकडून माहिती घेत त्यांचं ऐकून घेत. या बैठका एकतर्फी संवादाच्या नसत.
अमेरिका आणि इंग्लंडच्या मदतीवर विसंबून न राहाता त्यांनी सोव्हिएत यूनियन म्हणजे सध्याच्या रशियाकडे जाणं पसंत केलं. केवळ मिग विमानेच नाही तर रणगाडे, हेलिकॉप्टर, जमिनीवरून हवेत मारा करणारी शस्त्रास्त्रं रशियाबरोबर उत्पादित करण्याचं त्यांनी निश्चित केलं. चीन युद्धानंतर रशियानं भारताला 100 कोटी रुपयांपर्यंतचे सहकार्य केलं.
संरक्षण विभागाचं बजेट वाढलं
यशवंतरावांच्या या कार्याबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते मधू लिमये यांनी लिहून ठेवले आहे. ते म्हणतात, "यशवंतराव संरक्षणमंत्री असल्यापासून मी त्यांना जवळून पाहात आहे. कृष्ण मेनन यांच्या बोचर्या व्यक्तिमत्त्वामुळे सैन्यामध्ये गटबाजीचा चंचुप्रवेश होऊ लागला होता. यशवंतरावांच्या सौम्य व मृदू व्यक्तिमत्त्वामुळे सैन्यातील वातावरण निवळण्यास निश्चित मदत झाली."
यशवंतरावांमुळे संरक्षण विभागाच्या अनेक वर्षं दुर्लक्षित प्रश्नांवर लक्ष देणं सरकारला भाग पडलं असंही लिमये यांनी म्हटलं आहे. ते लिहितात, "संरक्षण मंत्रिपदाच्या कारकीर्दीत यशवंतरावांनी सैन्य प्रबळ करण्याचे दुसरं कार्य केलं. चिनी आक्रमणामुळे भारतीय सैन्याची जी वाताहात झाली त्यामुळे संरक्षणाच्या आतापर्यंत दुर्लक्षिलेल्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देणं केंद्र सरकारला भाग पडलं.
मोरारजीभाईंचे नवीन अंदाजपत्रक करवाढीमुळे आऩि अनिवार्य नव्या करयोजनेमुळे ज्याप्रमाणे वादग्रस्त बनलं त्याचप्रमाणे संरक्षण खात्याच्या मागण्यात झालेल्या प्रचंड वाढीमुळेही ते गाजले. 1961-62 सालच्या अंदाजपत्रकात संरक्षण खात्याचा खर्च रु. 311 कोटी होता. म्हणजेच तो एकून सरकारी प्राप्तीच्या 28 टक्के इतका होता.
पुढील वर्षात 1962-63 च्या वित्तीय वर्षात हा खर्च रु. 376 कोटीपर्यंत वाढला. पण संरक्षण खर्चात झालेल्या वाढीपेक्षा सरकारी उत्पन्न अधिक प्रमाणात वाढल्यामुळे टक्केवारीचे प्रमाण 24.9 इतके खाली आलं.
पण 1963-64 च्या अंदाजपत्रकात संरक्षण खात्याचा खर्च रु. 867 कोटीपर्यंत वाढला. म्हणजेच सरकारी उत्पन्नाचा एकूण 41 टक्के भाग संरक्षण खात्यावर खर्च होऊ लागला."
'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय व्यक्तिमत्व' या पुस्तकात मधू लिमये यांनी आपले विचार सविस्तरपणे मांडले आहेत.
आपल्या कामावर विश्वास
चीनच्या युद्धात भारताच्या वाट्याला नामुष्की आली असली तरी पुढच्या दोनच वर्षांमध्ये सैन्याला सावरण्याचं काम आपण केलं हे ठामपणे सांगण्याची ताकद यशवंतराव चव्हाणांमध्ये होती.
एकदा राममनोहर लोहिया आणि यशवंतराव चव्हाण यांची संसदेत भारत-चीन युद्धावरून खडाजंगी झाली.
भारतीय सैन्याचा तुम्ही एवढा गौरव करत आहात, तर आपल्या सैन्याने युद्धात पळ का काढला? किती चिनी सैनिकांना आपण पकडले? असे एकामागोमाग एक प्रश्न त्यांनी विचारले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
त्यावर यशवंतरावांनी तोल न ढळू देता शांत राहाणं पसंत केलं होतं. 1965च्या संरक्षण खात्यावरील चर्चेत मात्र त्यांनी आपण केलेल्या बदलांबाबत स्पष्ट भूमिका मांडली.
चीनबरोबरच्या लढाईत जरी भारताला नामुष्की पत्करावी लागली असली तरी पुढल्या दोन वर्षांत सैन्याची शिक्षण, नैतिक बळ आणि आधुनिक हत्यारे या दृष्टीने परिस्थिती खूपच सुधारली होती. १९६५ च्या संरक्षण खात्यावरील चर्चेच्या वेळी यशवंतरावांनी ''गेल्या दोन वर्षांत आम्ही गाजावाजा न करता चांगली तयारी केली आहे" असं आत्मविश्वासानं सांगितलं.
1962 च्या युद्धाचं रुपांतर पराभवातून विजयात करणं आणि सैन्यदलाचं मनोबल राखण्यात यशवंतरावांचा वाटा महत्त्वाचा होता असं मत माजी सनदी अधिकारी आर. डी प्रधान यांनी आपल्या पुस्तकात मांडलं आहे.
पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
यशवंतराव चव्हाणांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील आणि संरक्षण मंत्रालयातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1965 सालचे भारत-पाकिस्तान युद्ध.
टी. व्ही. उन्नीकृष्णन यांनी 'चव्हाण अँड द ट्रबल्ड डिकेड' नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. हे पुस्तक यशवंतराव चव्हाणांच्या संरक्षण आणि गृह मंत्रालयाच्या कारभाराची सविस्तर माहिती देतं.
उन्नीकृष्णन यांनी स्वतः चव्हाण यांच्या मुलाखती घेऊन हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी पुढील माहिती दिली आहे. या माहितीचं शब्दांकन सुधीर गाडगीळ यांनी केलं आहे.
23 एप्रिल 1965 मध्ये पाकिस्तानने कच्छमध्ये पॅटन रणगाडे आणि तोफा घुसवल्या. त्यामुळे भारताला काही ठाणी सोडून द्यावी लागली होती. पाकिस्तानच्या या घुसखोरीवर पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
लोकसभेत बोलताना पंतप्रधान शास्त्री म्हणाले होते, 'पाकिस्तानने आपली सदसदविवेकबुद्धी गहाण टाकून आपल्या आक्रमक कारवाया अशाच चालू ठेवल्या, तर आमचे सैन्य जरूर आमच्या देशाचे संरक्षण करील. युद्धनीती, मनुष्यबळाचा उपयोग आणि आवश्यक ती युद्धसामग्री यांचा वापर आम्ही आम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने करू.'
शास्त्रींच्या घोषणेमुळे अर्थातच आयुबखानांचे पित्त खवळलं. त्यांच्या 1 मे 1965 च्या भाषणात ते गरजले 'भारताच्या या अशा रणनीतीची परिणती भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सर्वंकष युद्धात होईल ही गोष्ट भारताच्या डोक्यात शिरते आहे का?'
चव्हाणांनी आयुबखानांच्या या आक्षेपाला सणसणीत उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, 'जर कोण्या देशाने भारताविरुद्ध युद्ध पुकारलं तर भारताला ते आव्हान स्वीकारावंच लागेल आणि त्याला प्रत्युत्तरही द्यावं लागेल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
सर्वंकष युद्धाच्या आयुबखानांनी दिलेल्या धमकीबाबत ते म्हणाले, 'शब्दांनी काही कुणाची हाडं मोडत नाहीत. असल्या शाब्दिक वल्गनांना आम्ही भीका घालत नाही!'
त्या वर्षभरात भारतात सैनिक घुसवण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडण्याचं काम पंतप्रधान शास्त्री आणि यशवंतराव चव्हाण यांनी केलं.
हे युद्ध आणि चव्हाण यांची कारकिर्द याबद्दल उन्नीकृष्णन लिहितात, "1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाने चव्हाणांना एक कीर्तिवलय दिलं. सैनिक आणि जनता चव्हाणांच्याकडे एक समर्थ नेता म्हणून पाहू लागली. यशवंतरावांचे युद्ध-नेतृत्व हा त्यांचा अभिमानाचा विषय झाला."
यशवंतराव का दुर्लक्षित राहिले असावेत?
भारतीय संरक्षण दलासाठी प्रचंड मेहनत आणि महत्त्वाचे निर्णय घेऊनही यशवंतराव चव्हाण यांना म्हणावे तितके श्रेय मिळाले नाही किंबहुना त्यांच्या एकूणच केंद्रीय कारकिर्दीला योग्य श्रेय मिळाले नाही असं म्हटलं जातं. मधु लिमये यांनी अत्यंत थोडक्या शब्दांमध्ये याचं कारण दिलं आहे.

फोटो स्रोत, MADHUKAR BHAVE
ते म्हणतात, 'यशवंतरावांच्या राजकीय अपयशाची आणखीही काही कारणं आहेत. एक म्हणजे यशवंतरावांच्या स्वभावातील उणिवांमुळे दिल्लीच्या आपल्या प्रदीर्घ वास्तव्यात त्यांनी भारताच्या विभिन्न प्रांतांत मित्र व अनुयायी निर्माण केले नाहीत. त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रापुरतंच मर्यादित राहिलं. त्याला राष्ट्रीय अधिष्ठान प्राप्त होऊ शकलं नाही.'
महाराष्ट्र आणि संरक्षणमंत्रीपदाचं नातं
महाराष्ट्रातून आतापर्यंत यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शरद पवार यांनी संरक्षण मंत्रिपदावर काम केलं आहे. या तिघांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे.
मराठी बोलणारे चौथे मुख्यमंत्री म्हणजे मनोहर पर्रिकर. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्रिपद सोडून संरक्षण मंत्रालय सांभाळलं आणि नंतर संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्रिपद हाती घेतलं. याशिवाय प्रमोद महाजन यांनी काही दिवसांसाठी या मंत्रालयाचा पदभार स्वीकारलेला होता.

फोटो स्रोत, Getty Images
एखाद्या राज्याचं मुख्यमंत्रिपद आणि संरक्षणमंत्रीपद सांभाळणाऱ्या इतर नेत्यांमध्ये पी. व्ही. नरसिंहराव, बन्सीलाल आणि मुलायमसिंह यादव यांचा समावेश होतो.
नरसिंह राव यांनी संरक्षण मंत्रिपदाची पहिल्यांदा जबाबदारी सांभाळली तेव्हा ते महाराष्ट्रातूनच लोकसभेत निवडून गेले होते. तेव्हा ते रामटेक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकसभेत करत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखती मध्यंतरी चर्चेत होत्या. यातील एका मुलाखतीत पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांना महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर आणि चीन सीमेवरील तणावाच्या स्थितीवरून हिमालयाच्या मदतीला सह्याद्री पुन्हा एकदा धावून जाणार का, असा प्रश्न विचारला.
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपामध्ये नेत्यांच्या पिढ्या आहेत. त्यातल्या नव्या पिढीच्या नेत्यांपैकी एक मी आहे. कधीना कधी पक्षाने जबाबदारी सोपवली तर केंद्रीय पातळीवर मी काम करेन, मात्र आजतरी मी पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहात नाही, असं उत्तर दिलं.
भविष्यात देवेंद्र फडणवीस यांनी खरंच संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संरक्षणमंत्री अशी दोन्ही पदे सांभाळणाऱ्या नेत्यांच्या यादीत त्यांचाही समावेश होईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








