अभाविपचा कार्यकर्ता, मुख्तार अन्सारीचा विरोधक, भाजपा आमदार आणि आता मोदींना टक्कर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विक्रांत दुबे
- Role, बीबीसी हिंदीसाठी
उत्तर प्रदेशच्या राजकारणात सर्व पक्षांची मुशाफिरी करत निवडणुका जिंकलेले राजकारणी अशी अजय राय यांची ओळख आहे.
अजय राय सध्या उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसचे अध्यक्ष तर आहेतच, त्याचबरोबर वाराणसी लोकसभा मतदारसंघातील ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील कॉंग्रेस उमेदवारदेखील आहेत.
या दोन्ही भूमिकांमध्ये ते किती यशस्वी होतात हे निवडणुकांच्या निकालांमधून स्पष्ट होणार आहे.
मात्र इतकं नक्की आहे की कॉंग्रेसनं त्यांना उत्तर प्रदेशातील पक्षाचं अध्यक्षपद देऊन त्यांचं राजकीय वजन खूपच वाढवलं आहे.
राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'नंतर विरोधी पक्षांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या विरोधात 'INDIA' नावाचं व्यासपीठ तयार केल्यानंतर अजय राय यांना उत्तर प्रदेशात कॉंग्रेस पक्षाची जबाबदारी देण्यात आली होती.
मात्र, उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात काँग्रेसने अजय राय यांना अध्यक्षपद का दिलं हा प्रश्न उत्तर प्रदेशच्या राजकारणातील अनेकजण विचारतात?
वरिष्ठ पत्रकार ज्ञानेंद्र शुक्ला याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मते, उत्तर प्रदेशच्या राजकारणात गमावलेलं स्थान मिळवण्यासाठी काँग्रेस सातत्याने प्रयोग करत आली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यात काँग्रेसचं स्थान बळकट करू शकणाऱ्या आणि लढवय्या चेहऱ्याची उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी आवश्यकता होती.
पंतप्रधान मोदींच्या विरोधात
शुक्ला सांगतात, ''अजय राय यांचं वेगळं स्थान आहे, त्यांचं एक वेगळं राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. उत्तर प्रदेशात त्यांची ओळख एक ताकदवान आणि आक्रमक राजकारण्याची आहे. राहुल गांधी यांच्या सध्याच्या आक्रमक कार्यशैलीमध्ये ते अगदी अचूक ठरतात. अशा परिस्थितीत व्यूहरचना आखणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना वाटलं की असा चेहरा त्यांच्यासाठी अतिशय योग्य ठरेल.''
ज्ञानेंद्र शुक्ला यांच्या मते, ''अजय राय यांच्या विरुद्ध 16 खटले नोंदवण्यात आले आहेत आणि ते हिंदुत्वाच्या राजकारणाच्या मुशीत तयार झालेले आहेत या गोष्टीची देखील काँग्रेसने परवा केली नाही. अजय राय यांची पार्श्वभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपाची आहे.''

फोटो स्रोत, ANI
ते म्हणतात, ''अजय राय यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात दोनदा निवडणूक लढवण्याचं धैर्य दाखवलं आहे. त्यामुळंच सध्याच्या परिस्थितीत उत्तर प्रदेशात पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण कॉंग्रेसला अजय राय यांच्यात दिसले.''
काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकत्र आहेत. काँग्रेसच्या वाट्याला 17 मतदारसंघ आले आहेत. काही विश्लेषकांच्या मते उत्तर प्रदेशातील काँग्रेसची सध्याची राजकीय ताकद पाहता काँग्रेसला खूपच जास्त जागा मिळाल्या आहेत.
अशा परिस्थितीत कॉंग्रेसला 17 जागा मिळवण्यात यश कसं काय आलं? हा प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे.
काँग्रेस-समाजवादी पार्टीची आघाडी
काही राजकीय विश्लेषक याचं श्रेय उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांना देतात. अर्थात जागा वाटपाबाबत कोणाची काय भूमिका होती हे सांगणं कठीण आहे.
वरिष्ठ पत्रकार ज्ञानेंद्र शुक्ला म्हणतात की, ''काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर अनेक प्रसंगी अजय राय यांनी अखिलेश यादववर टीका केली आहे. अखिलेश यादव यांच्या विरोधात ते विधानं करत होते, त्यावेळेस काँग्रेसच्या गोटालादेखील ती बाब आवडत होती. कारण मध्य प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये तणाव निर्माण झाला होता.''
ज्ञानेंद्र शुक्ला यांच्या मते, हे काँग्रेचं जुनं दबावतंत्राचं राजकारण आहे. राज्यस्तरीय नेत्यांना ते आक्रमक भूमिका घ्यायला लावतात आणि गरज पडल्यास मवाळ देखील व्हायला लावतात. इथंही तेच झालं आहे.

फोटो स्रोत, ANI
ज्ञानेंद्र शुक्ला पुढं सांगतात, ''काँग्रेसच्या नेतृत्वाने अजय राय यांनी केलेल्या आक्रमक विधानांची दखल घेतली. अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केल्यानंतर अजय राय यांनी दिल्लीत बोलावून समजवण्यात आलं.''
पूर्वांचल मध्ये आक्रमक नेत्याची प्रतिमा असणाऱ्या अजय राय यांना काँग्रेसने मागच्या वेळेप्रमाणेच नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील आपला उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे.
मागील काही महिन्यात अजय राय यांचं राजकीय वजन वाढलं आहे, मात्र पंतप्रधान मोदींच्या विरोधात वाराणसीत मतं मिळवणं सोपं काम नाही.
मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर
मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये अजय राय पंतप्रधान मोदींच्या विरोधात दुसऱ्या क्रमांकाची मतेदेखील मिळवू शकले नव्हते. 2014 च्या लोकसभा निवडणुकांचा विचार केल्यास वाराणसी मतदारसंघात अजय राय तिसऱ्या क्रमांकावर होते.
तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. त्यांना 5 लाख 81 हजारांपेक्षा अधिक मतं मिळाली होती. तर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांना 2 लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती. त्यातुलनेत अजय राय यांना जवळपास 75 हजार मतं मिळाली होती.

फोटो स्रोत, VIKRANT DUBEY
2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजय राय यांच्या मतांमध्ये वाढ झाली, मात्र ते तिसऱ्या क्रमांकावरच राहिले होते. त्यावेळेस त्यांना 1 लाख 52 हजार 548 मतं मिळाली होती. तर नरेंद्र मोदींना जवळपास 6 लाख 75 हजार मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर समाजवादी पार्टीच्या उमेदवार शालिनी यादव होत्या. त्यांना 1 लाख 95 हजार मतं मिळाली होती.
2019 मधील लोकसभा निवडणुकीतील मतांच्या आधारे विचार केल्यास अजय राय यांना त्यांच्या समुदायाची म्हणजे भूमिहार मते चांगली मते मिळतात.
याच गोष्टीमुळे 2009 मध्ये कोलअसला विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला होता.
कॉंग्रेस पक्षात नाराजीचा सूर
आधीच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या मतांचे समीकरण लक्षात घेतल्यास 2024 मध्ये परिस्थिती थोडी बदलू शकते. यावेळेस उत्तर प्रदेशात कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही पक्षांना मागील वेळेस मिळालेल्या मतांच्या टक्केवारीची बेरीज केल्यास ते प्रमाण 32.8 टक्के इतकं होतं.
त्याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकट्यालाच 63.6 टक्के मतं मिळाली आहेत. मात्र यामध्येदेखील एक खोच आहे. मागील वेळेस समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांनी आघाडी करत निवडणूक लढवली होती. मात्र यावेळेस या आघाडीमध्ये बसपा सामिल झालेली नाही.

फोटो स्रोत, ANI
कॉंग्रेससमोर असणारी आणखी एक अडचण म्हणजे, अजय राय यांची उत्तर प्रदेशच्या अध्यक्षपदी निवड केल्यानंतर कॉंग्रेस पक्षातील जुने दिग्गज नाराज झाले आहेत.
वाराणसीतून खासदार राहिलेले राजेश मिश्रा यांनी बरोबर निवडणुकीच्या तोंडावरच कॉंग्रेस पक्षाला रामराम करत भाजपाची वाट धरली आहे.
राजेश मिश्रा यांचं म्हणणं आहे की, ''या निवडणुकीत जिंकणं-हरणं दूर राहिलं. अजय राय यांची अनामत रक्कमदेखील जप्त होईल. मुळात त्यांना इथून लढायचं नव्हतं. सर्वांनाच ही गोष्ट माहीत आहे की अजय राय यांना गाझीपूर किंवा बलिया इथून तिकिट हवं होतं. मात्र काँग्रेस पक्षाकडे वाराणसीतून निवडणूक लढवण्यासाठी नेताच नाही.''
'काशीचा सुपुत्र आहे, काशी माझ्याच मागं उभी राहणार'
वाराणसी येथील दैनिक जागरणचे संपादक आणि वरिष्ठ पत्रकार भारतीय बसंत कुमार यांचं म्हणणं आहे की ''अजय राय पूर्ण तयारीनिशी निवडणूक लढवतील आणि या मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाचा प्रभाव दाखवून देतील. मात्र वाराणसीतून पंतप्रधान मोदीच निवडून येतील याबाबत अजिबात शंका नाही. अर्थात मतांमधील फरकावर चर्चा केली जाऊ शकते.''
अजय राय यांना मिळणाऱ्या मतांच्या संख्येत कदाचित वाढ होऊ शकते. कारण ते आक्रमक आणि लढवय्ये व्यक्ती आहेत. शिवाय यावेळी कॉंग्रेसची समाजवादी पार्टीबरोबर आघाडीदेखील आहे.
वाराणसीतील राजकीय परिस्थितीचा गांभीर्याने अभ्यास करणारे डॉ. सत्यदेव सिंह म्हणतात की भाजपा आणि विशेषकरून मोदी यांची भाजपा आता सर्वसामान्य राजकीय पक्ष राहिलेला नाही. डॉ. सिंह डीएवी डिग्री कॉलेजचे माजी मुख्याध्यापक आहेत.

फोटो स्रोत, VIKRANT DUBEY
''प्रत्येक निवडणुकीत, स्थानिक मुद्द्यांपासून ते राष्ट्रीय पातळीवरील मुद्यांपासून ते लक्ष केंद्रित करतात. नरेंद्र मोदी यांना फक्त निवडणूक जिंकायची नाही तर त्यांना मताधिक्यदेखील वाढवायचं आहे. विश्वनाथ कॉरिडॉर, अयोध्या यासह ज्ञानवापी हादेखील मोठा मुद्दा आहे.''
त्यामुळं वाराणसीत मोदी समर्थकांनी 'मोदी निर्विरोध' चे होर्डिंग देखील लावले आहेत.
अजय राय निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळं मोदी समर्थकांचं हे स्वप्न काही पूर्ण होणार नाही. अजय राय यांनी मागील 30 वर्षात 10 पेक्षा अधिक निवडणुका लढवल्या आहेत.
अजय राय यांना वाराणसी मतदारसंघातून निवडणुकीला उभं करणं याला काँग्रेसचा नाईलाज आहे. कारण मोदींच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी अजय राय यांच्यापेक्षा अधिक योग्य उमेदवारच कॉंग्रेसकडं नाही.
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजय राय यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, ''मी याच वाराणसीत जन्मलो आहे. गंगामातेच्या मांडीवरच माझा जन्म झाला आहे. मी गंगा मातेतच विलीन होईल. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये सर्व जबाबदाऱ्या विभागून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकण्याची जबाबदारी फक्त माझ्यावरच नाही तर सर्वांवरच आहे. सर्वच लोक आपापली जबाबदारी पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहेत.''
भावाच्या खूनानंतर सुरू झाला राजकीय प्रवास
नव्वदच्या दशकात उत्तर प्रदेशातील पूर्वांचल, गॅंगवॉरसाठी कुप्रसिद्ध होतं. याचा केंद्रबिंदू वाराणसीत होता.
गोरखपूर मधील हरिशंकर तिवारी आणि वीरेंद्र प्रताप शाही, गाजीपूर वाराणसीत नव्याने तयार होत असलेली मुख्तार अन्सारी आणि बृजेश सिंह गॅंग ही सर्व त्यातील प्रमुख पात्रं होती.
अवधेश राय हा अजय राय यांचा मोठा भाऊ होता. बृजेश सिंह आणि कृष्णानंद यांच्याबरोबर तो असायचा. ही सर्व मंडळी मुख्तार अन्सारीच्या विरोधात होती.
1991 मध्ये वाराणसीच्या चेतगंज भागात दिवसाढवळ्या अवधेश रायचा खून करण्यात आला. हा खून मुख्तार अन्सारी गॅंगने केल्याचा आरोप होता.

फोटो स्रोत, VIKRANT DUBEY
32 वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर जून 2023 मध्ये मुख्तार अन्सारीला या प्रकरणात जन्मठेपीची शिक्षा झाली होती. (काही दिवसांपूर्वीच मुख्तार अन्सारीचं तुरुंगात निधन झालं.) अन्सारी आणि राय यांच्यातील या प्रदीर्घ लढाईमुळे देखील अजय राय सतत चर्चेत होते.
मात्र मोठ्या भावाच्या खूनानंतर लहान भाऊ अजय राय यांच्यावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांबरोबरच मोठ्या भावाच्या शत्रुत्वाचं ओझंदेखील आलं. त्यावेळेस गॅंगवॉर शिखरावर पोचलं होतं. अशा परिस्थितीत अजय राय यांनी राजकीय संरक्षण मिळवण्यासाठी एबीव्हीपीच्या माध्यमातून भाजपामध्ये प्रवेश केला.
याचदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वाराणसीपासून ते लखनौपर्यत त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 16 केस नोंदवण्यात आल्या.
2015 मध्ये अखिलेश यादव यांच्या सरकारच्या कार्यकाळात गंगा नदीत मूर्ती विसर्जनास बंदी घालण्याच्या आदेशाच्या विरोधात प्रदर्शनं करताना अजय राय यांच्यावर रासुका (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) लावून त्यांना तुरुंगात पाठविण्यात आलं. अनेक महिने ते तुरुंगात होते.
नऊ वेळा जिंकलेल्या आमदाराला हरवलं
अजय राय यांचा राजकीय प्रवासाची औपचारिक आणि भरभक्कम सुरूवात 1996 मध्ये झाली.
तेव्हा पहिल्यांदा त्यांनी कोलअसला मतदारसंघातून भाजपाकडून विधानसभेची निवडणूक लढवली. नऊ वेळा आमदार म्हणून जिंकून आलेल्या कॉमरेड ऊदल यांना हरवण्यात अजय राय यांना यश आलं.
महत्त्वाची बाब म्हणजे कोलअसला मतदारसंघ ऊदल यांचा बालेकिल्ला असल्याचं म्हटलं जायचं. मात्र त्याच कोलअसला मतदारसंघात अजय राय यांनी उदल यांना पराभवाची धूळ चारली.

फोटो स्रोत, ANI
या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे फक्त 488 मतांनी अजय राय यांचा विजय झाला होता. मात्र या विजयामुळे अजय राय कोलअसलाचे हिरो बनले.
1996 ते 2007 पर्यत याच मतदारसंघातून अजय राय भाजपाचे आमदार म्हणून तीनवेळा निवडून आले. 2003 मध्ये भाजपा आणि बसपा यांच्या आघाडी सरकारमध्ये ते सहकार राज्यमंत्री देखील होते.
तिकीट न मिळाल्यानं भाजपा सोडली
2007 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर अजय राय यांची महत्त्वाकांक्षा खूपच वाढली. त्यांनी दिल्लीच्या दिशेने मोर्चा वळवला. यात चुकीचं काहीच नव्हतं. कारण वाराणसीतून लागोपाठ तीनवेळा भाजपाचे खासदार म्हणून निवडून आलेल्या शंकर प्रसाद जायसवाल यांचा 2004 च्या निवडणुकीत पराभव झाला होता.
वाराणसीतून तेव्हा कॉंग्रेसचे राजेश मिश्रा निवडून आले होते.
साहजिकच 2009 मध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी भाजपकडून अजय राय प्रबळ दावेदार बनले.

फोटो स्रोत, VIKRANT DUBEY
मात्र पक्षाने मुरली मनोहर जोशी सारख्या वरिष्ठ आणि दिग्गज नेत्याला तिकीट दिलं. भाजपाच्या या निर्णयाचा विरोध करत अजय राय यांनी समाजवादी पार्टीशी हातमिळवणी केली आणि निवडणुकीच्या मैदानात उतरले.
त्याचवेळी या निवडणुकीत बीएसपीच्या मुख्तार अन्सारी यांनीदेखील उडी घेतली. या तिघांच्या उमेदवारीमुळे वाराणसीतील निवडणूक त्रिकोणी झाली. अर्थात यात मुरली मनोहर जोशी यांचा विजय झाला. मात्र मुख्तार अन्सारीनं त्यांना चुरशीची लढत दिली. अजय राय तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
पक्ष सोडल्यामुळं 2009 मध्ये अजय राय यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकले देखील. यानंतर 2012 मध्ये त्यांनी काँग्रेसची वाट धरली आणि विधानसभेची निवडणूक जिंकली.
त्यावेळेस कोलअसला विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन त्याचं नाव पिंडरा झालं होतं. मात्र लागोपाठ पाच वेळा विधानसभा निवडूक जिंकण्याचा हा प्रवास 2014 मध्ये थांबला.
सुरू झालं पराभवाचं चक्र
अजय राय यांनी 2014 मध्ये मोदींच्या विरोधात कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांना मोठ्या पराभवाला तोंड द्यावं लागलं.
इतकंच नाही तर नऊ वेळा आमदार झालेल्या उदल यांच्याकडून हिसकावलेल्या पिंडरा विधानसभा मतदारसंघातूनदेखील 2017 मध्ये अजय राय यांचा पराभव झाला.

फोटो स्रोत, VIKRANT DUBEY
मग 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा मोदींच्या विरोधात वाराणसी मतदारसंघातून उभे राहिले. याही वेळी त्यांचा पराभव झाला.
2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या पिंडरा मतदारसंघातून मतदारांनी अजय राय यांना नाकारलं. त्या निवडणुकीत भाजपाचे अवधेश सिंह लागोपाठ दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.
आता यंदाच्या, 2024च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवताना अजय राय यांची व्यूहरचना काय असणार आणि ते कॉंग्रेसबरोबरच स्वत:ची मतं कशी वाढवणार याकडं सर्वाचंच लक्ष असणार आहे.











