एक रक्तचाचणी अन् 50 पेक्षा जास्त कॅन्सर शोधण्यात यश; कॅन्सरवर लवकरात लवकर मात करता येणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फर्गस वॉल्श
- Role, मेडिकल एडिटर
जगभरात मानवी हितासाठी अनेक ठिकाणी विविध प्रकारचे संशोधन सुरू असतात. बहुतांशवेळा या संशोधनाचा आपल्याला मोठा फायदा होता. अशाच प्रकारच्या एका संशोधनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रक्त चाचणीच्या एका संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होऊ शकते.
ही नवीन रक्तचाचणी अनेक प्रकारचे कॅन्सर (कर्करोग) लवकर ओळखू शकते. या चाचणीमुळे कॅन्सरवर वेळेत उपचार करून त्यातून बरं होण्याची शक्यता वाढू शकते. सध्या याची चाचणी सुरू आहे.
नव्यानं झालेल्या या अभ्यासानुसार, एका रक्तचाचणीत 50 पेक्षा जास्त प्रकारच्या कॅन्सरची माहिती मिळून लवकर निदान होऊ शकतं.
या चाचण्या उत्तर अमेरिकेत सुरू आहेत. त्यात असं आढळून आलं की, या रक्तचाचणीतून अनेक प्रकारचे कॅन्सर ओळखता येतात. विशेष म्हणजे यापैकी तीन-चतुर्थांश कॅन्सरसाठी सध्या कोणत्याही तपासण्या (स्क्रीनिंग प्रोग्राम) नाहीत.
अर्ध्याहून अधिक कॅन्सर प्राथमिक टप्प्यातच आढळून आले, तर त्यावर सहज उपचार करता येतात आणि उपचारानंतर हे कॅन्सर बरे करणं शक्य असतं.
अमेरिकन औषध कंपनी ग्रेलने बनवलेली 'गॅलेरी' चाचणी कॅन्सरच्या पेशींचा डीएनए रक्तात आढळल्यास ओळखू शकते. सध्या तपासणीसाठी एनएचएसमध्ये ही चाचणी केली जात आहे.
या चाचणीत अमेरिका आणि कॅनडामधील 25 हजार प्रौढांचा 1 वर्षभर अभ्यास करण्यात आला. त्यातील प्रत्येक 100 पैकी एका व्यक्तीला चाचणीत सकारात्मक परिणाम दिसून आला. त्यापैकी 62 टक्के लोकांना नंतर कॅन्सर असल्याची पुष्टी झाली.
प्राथमिक अवस्थेतच कॅन्सर समजल्यानं उपचार शक्य
डॉ. निमा नबाविझाडेह हे ऑरेगॉन हेल्थ आणि सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये रेडिएशन मेडिसिनचे सह-प्राध्यापक आणि मुख्य संशोधक आहेत. त्यांनी या डेटानुसार ही चाचणी कॅन्सर तपासणीचा दृष्टिकोन 'मुळातून बदलू शकते', असं म्हटलं आहे.
ते म्हणाले, "ही चाचणी अनेक प्रकारचे कॅन्सर लवकर ओळखायला मदत करू शकते. त्यामुळे त्यावर उपचार यशस्वी होण्याची किंवा बरं होण्याची शक्यता सर्वात जास्त असते."
ज्यांची चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह) आली, त्यापैकी 99 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांमध्ये खरंच कॅन्सर नव्हता, असं चाचणीत दिसून आलं.
जेव्हा ही चाचणी स्तन, पोट आणि गर्भाशय तपासण्यासोबत केली गेली, तेव्हा एकूण ओळखल्या जाणाऱ्या कॅन्सरची संख्या सात पटीने वाढली.

फोटो स्रोत, Getty Images
महत्त्वाचं म्हणजे, ओळखल्या गेलेल्या म्हणजेच आढळून आलेल्या कॅन्सरपैकी तीन-चतुर्थांश कॅन्सर अशा प्रकारचे होते, ज्यासाठी सध्या कोणतीही तपासणी उपलब्ध नाही. उदाहरणार्थ, अंडाशय, यकृत, पोट, मूत्राशय आणि स्वादुपिंडाचा कॅन्सर.
या रक्त चाचणीने 10 पैकी 9 प्रकरणांमध्ये कॅन्सर कुठून सुरू झाला हे अचूकपणे ओळखलं.
ही रक्तचाचणी भविष्यात कॅन्सर लवकर ओळखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, हे या प्रभावी निकालाने दाखवून दिले.
पण या संशोधनात सहभागी नसलेले शास्त्रज्ञ म्हणतात की, या रक्तचाचणीमुळे कॅन्सरमुळे होणारे मृत्यू कमी होऊ शकतात की नाही हे दाखवण्यासाठी आणखी पुरावे लागतील.
लंडनमधील द इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चमधील ट्रान्सलेशनल कॅन्सर जेनेटिक्सच्या प्राध्यापिका क्लेअर टर्नबुल म्हणाल्या, "गॅलेरी चाचणीत कॅन्सर लवकर ओळखला जातो का आणि त्याचा मृत्यू कमी होण्यासाठी फायदा होतो का हे समजण्यासाठी, रँडमाइज्ड अभ्यासातील डेटा आणि मृत्यूदरावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे."
चाचणीच्या निकालावर सर्वकाही अवलंबून
मुख्य निकाल शनिवारी (18 ऑक्टोबर) बर्लिनमध्ये होणाऱ्या युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कॉलॉजीच्या संमेलनात जाहीर केले जातील. परंतु, संपूर्ण माहिती अद्याप कोणत्याही वैज्ञानिक जर्नलमध्ये (पीअर रिव्ह्यूड जर्नल) प्रकाशित झालेली नाही.
अनेक गोष्टी इंग्लंडमधील 1 लाख 40 हजार एनएचएस रुग्णांवर होणाऱ्या 3 वर्षांच्या चाचणीच्या निकालांवर अवलंबून असतील. हे निकाल पुढील वर्षी प्रकाशित केले जाणार आहेत.
एनएचएसने आधीच सांगितलं आहे की, जर चाचणीचे निकाल यशस्वी झाले, तर आणखी 10 लाख लोकांवर चाचणी केली जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
ग्रेल येथील बायोफार्माचे अध्यक्ष सर हरपाल कुमार यांनी या निकालांना 'अत्यंत प्रभावी' असं म्हटलं आहे.
बीबीसी रेडिओ 4च्या टुडे प्रोग्राममध्ये त्यांनी सांगितलं, "ज्यांचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो, त्यापैकी बहुतेकांचा कॅन्सर आम्हाला खूप उशिराने आढळून येतो किंवा समजतो."
"अनेक कॅन्सर 'खूप प्रगत अवस्थेत' आढळतात. त्यांचं उद्दिष्ट असं आहे की, कॅन्सर लवकर ओळखला जाईल. अशावेळी उपचार जास्त प्रभावी पद्धतीने होऊ शकतात आणि त्यातून बरे होण्याची शक्यता जास्त असते," अशी माहिती त्यांनी दिली.
पण यूकेतील कॅन्सर रिसर्चमधील नासेर तुराबी यांनी सावध करत म्हटलं, "काही कॅन्सर जे खरंच त्रास देणार नाहीत, ते ओळखू नये म्हणून आणखी अभ्यास म्हणजेच संशोधन करणं गरजेचं आहे."
"यूके नॅशनल स्क्रीनिंग कमिटी हे बघेल की, पुरावे काय सांगतात आणि ही चाचणी एनएचएसमध्ये वापरावी की नाही हे ठरवेल," असंही त्यांनी नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











