चीनने कंडोम महाग केले, लोकांनी चेष्टा केली, तर तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त; लोकसंख्या वाढवण्याचा नवा फॉर्म्युला काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ऑस्मंड चिया आणि यान चेन
- Role, बीबीसी न्यूज चायनीज
घसरत्या जन्मदरामुळे चिंतेत असलेल्या चीनने आता लोकसंख्या वाढवण्यासाठी काही कठोर आणि काही दिलासादायक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. यामध्ये गर्भनिरोधक साधनांवर (कंडोम) कर लावणे आणि बालसंगोपन (चाइल्डकेअर) अधिक परवडणारे करणे यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.
चीनमधील लोक 1 जानेवारीपासून गर्भनिरोधकांवर 13 टक्के विक्री कर भरणार आहेत, तर बालसंगोपन सेवांना या करातून सूट दिली जाईल. जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला हा देश आपला जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षाच्या शेवटी जाहीर करण्यात आलेल्या कर प्रणालीतील बदलामुळे 1994 पासून लागू असलेल्या अनेक सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. 1994 मध्ये चीन आपले कित्येक दशके जुने 'एक मूल' धोरण कडकपणे राबवत होता.
या बदलांतर्गत लग्नाशी संबंधित सेवा आणि वृद्धांची काळजी घेणाऱ्या सेवांना व्हॅल्यू ॲडेड टॅक्समधून सूट देण्यात आली आहे. पालकांना मिळणारी सुटी वाढवणे आणि रोख रक्कम देणे अशा व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग आहे.
वाढती वृद्ध लोकसंख्या आणि सुस्तावलेली अर्थव्यवस्था यामुळे त्रस्त असलेले चीन सरकार तरुणांना लग्नासाठी आणि जोडप्यांना मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहे.
अधिकृत आकडेवारी दर्शवते की, चीनची लोकसंख्या सलग 3 वर्षे कमी झाली आहे. 2024 मध्ये केवळ 9.54 दशलक्ष बाळांचा जन्म झाला. 10 वर्षांपूर्वी जेव्हा चीनने मुलांच्या संख्येवरील नियम शिथिल करण्यास सुरुवात केली, त्यावेळच्या जन्माच्या संख्येच्या तुलनेत हा आकडा जवळपास अर्धा आहे.
तरीही, कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या आणि उपकरणांवरील करामुळे अनपेक्षित गर्भधारणा आणि एचआयव्हीच्या दराबाबत चिंता व्यक्त होत आहे. तसेच या निर्णयाची थट्टाही केली जात आहे. काही लोकांच्या मते, केवळ कंडोम महाग केल्याने लोक मुले जन्माला घालण्यास तयार होणार नाहीत.
एका दुकानदाराने किंमत वाढण्यापूर्वी साठा करून ठेवण्याचे आवाहन केल्यावर, एका सोशल मीडिया युजरने विनोद केला : "मी आताच आयुष्यभर पुरतील इतके कंडोम खरेदी करून ठेवतो." दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले, "लोकांना कंडोमची किंमत आणि मूल वाढवण्याचा खर्च यातील फरक चांगलाच समजतो."
बीजिंगमधील युवा लोकसंख्या संशोधन संस्थेच्या 2024 च्या अहवालानुसार, चीन हा मूल वाढवण्यासाठी जगातील सर्वात महागड्या देशांपैकी एक आहे. अत्यंत स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरणामुळे शाळेची फी आणि नोकरी सांभाळून मुलांचे संगोपन करण्याचे महिलांसमोरील आव्हान यामुळे हा खर्च वाढत असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आर्थिक मंदी आणि मालमत्ता संकटामुळे लोकांची बचत कमी झाली आहे. त्यामुळे कुटुंबे आणि विशेषतः तरुण पिढी भविष्याबद्दल साशंक आहे.
"1 मूल आहे आणि मला आता दुसरे नको आहे," असे पूर्व हेनान प्रांतात राहणारे 36 वर्षीय डॅनियल लुओ सांगतात.
"हे मेट्रोच्या भाड्यासारखे आहे. जेव्हा भाडे 1 किंवा 2 युआनने वाढते, तेव्हा प्रवास करणारे लोक आपल्या सवयी बदलत नाहीत. तुम्हाला मेट्रोने जावेच लागते, बरोबर ना?" कंडोमच्या दरवाढीबद्दल त्यांना फारशी चिंता वाटत नाही.
"कंडोमच्या एका पाकिटावर 5, 10 किंवा जास्तीत जास्त 20 युआन वाढतील. म्हणजे वर्षाकाठी हे काही 100 युआन होतील, ते पूर्णपणे परवडण्यासारखे आहे."
पण इतरांसाठी खर्च ही समस्या असू शकते आणि हीच चिंता चीनच्या मध्यभागातील शीआन शहरात राहणाऱ्या रोझी झाओ यांना वाटते.
त्यांच्या मते, गर्भनिरोधक ही एक गरज आहे आणि ती महाग केल्यामुळे विद्यार्थी किंवा आर्थिक परिस्थिती बेताची असलेले लोक "जोखीम" घेऊ शकतात. हा या धोरणाचा "सर्वात धोकादायक संभाव्य परिणाम" असू शकतो, असे त्या म्हणाल्या.
या कर सुधारणेच्या उद्देशावर तज्ज्ञांची मते वेगवेगळी आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसनचे लोकसंख्याशास्त्रज्ञ यी फुकियान म्हणतात की, कंडोमवरील करवाढीचा जन्मदरावर परिणाम होईल असे मानणे ही खूप दूरदूरची शक्यता आहे.
त्यांच्या मते, चीनला गृहनिर्माण क्षेत्रातील मंदी आणि वाढत्या राष्ट्रीय कर्जाचा सामना करण्यासाठी "जिथे शक्य असेल तिथून" कर गोळा करायचा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जवळपास 1 ट्रिलियन डॉलर्स (सुमारे 90 लाख कोटी रुपये) असलेला चीनचा VAT महसूल गेल्या वर्षीच्या एकूण कर संकलनात सुमारे 40 टक्के होता. 'सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल उचित'च्या हेन्रिएटा लेविन म्हणाल्या की, कंडोमवर कर लावण्याचे पाऊल 'सांकेतिक' असून ते चीनचा अत्यंत कमी झालेला जननदर सुधारण्याच्या बीजिंगच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, यातील बरीच धोरणे आणि अनुदानांची अंमलबजावणी कर्जबाजारी प्रांतीय सरकारांना करावी लागेल आणि त्यांच्याकडे यासाठी पुरेसे स्त्रोत आहेत का हे स्पष्ट नाही.
लेविन यांच्या मते, जर लोकांना असे वाटले की, सरकार त्यांच्या अत्यंत वैयक्तिक निवडीमध्ये 'खूप हस्तक्षेप' करत आहे, तर चीनचे हे प्रयत्न अंगलट येऊ शकतात.
नुकत्याच आलेल्या बातम्यांनुसार, काही प्रांतांतील महिलांना स्थानिक अधिकाऱ्यांचे फोन आले होते, ज्यात त्यांच्या मासिक पाळीबद्दल आणि मुले जन्माला घालण्याच्या नियोजनाबद्दल विचारणा करण्यात आली होती.
युनान प्रांताच्या आरोग्य विभागाने सांगितले की, गरोदर मातांची ओळख पटवण्यासाठी हा डेटा आवश्यक होता. पण यामुळे सरकारची प्रतिमा सुधारलेली नाही, असे लेविन म्हणाल्या.
"कम्युनिस्ट पक्ष स्वतःला महत्त्वाच्या वाटणाऱ्या प्रत्येक निर्णयामध्ये हस्तक्षेप केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे तो एका अर्थाने स्वतःचाच शत्रू बनतो."
तज्ज्ञ आणि स्वतः महिलांचे म्हणणे आहे की, देशाचे पुरुषप्रधान नेतृत्व सामाजिक बदल समजून घेण्यात अपयशी ठरत आहे. हे केवळ चीनपुरते मर्यादित नाही. पाश्चात्य देश आणि अगदी या क्षेत्रातील दक्षिण कोरिया आणि जपानसारखे देशही वृद्धत्वाकडे झुकत असताना जन्मदर वाढवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
संशोधनानुसार, याचे एक कारण म्हणजे बालसंगोपनाचा भार, जो प्रामुख्याने महिलांवर पडतो. परंतु लग्नाचे प्रमाण आणि अगदी डेटिंगमधील रस कमी होणे असे इतर बदलही होत आहेत.
डॅनियल लुओ म्हणतात की, चीनचे उपाय खऱ्या समस्येला बगल देत आहेत. आजचे तरुण ज्या प्रकारे एकमेकांशी वागतात त्यात खऱ्या मानवी संबंधांचा अभाव आहे.
ते चीनमधील सेक्स टॉइजच्या वाढत्या विक्रीकडे लक्ष वेधतात जे त्यांच्या मते "लोक स्वतःमध्येच समाधान मानत असल्याचे" लक्षण आहे, कारण "दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधणे आता एक ओझे बनले आहे."
ऑनलाइन राहणे सोपे आणि अधिक सोयीचे वाटते, कारण "सामाजिक दडपण वास्तव आहे," असे ते म्हणतात.
आजचे तरुण 20 वर्षांपूर्वीच्या लोकांपेक्षा समाजाच्या अधिक तणावाखाली आहेत. भौतिकदृष्ट्या ते सुखी असले तरी त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा खूप जास्त आहेत. प्रत्येक जण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकून गेलाय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











