अमूल - नंदिनी वाद काय आहे? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय वाटतं?

दूध

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, इम्रान कुरेशी, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अमूल विरुद्ध नंदिनी. दुधाच्या या दोन ब्रँड्सवरून कर्नाटकात वातावरण तापलं आहे आणि त्यात सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत अनेकजण उतरल्याचं दिसतंय.

सोशल मीडियावर सेव्ह नंदिनी, अमूल गोबॅक असे हॅशटॅग्ज ट्रेंड होतायत आणि कन्नड रक्षण वेदिकेसारख्या काही संस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केलंय.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादाला राजकीय रंगही पेटला आहे. तर काहीजण या आंदोलनाची महाराष्ट्रातल्या सहकारी दुग्ध संस्थांच्या परिस्थितीशी तुलना करतायत.

अमूल विरुद्ध नंदिनी, हा वाद का पेटला?

दुधाच्या पेल्यातला हा वाद सुरू झाला अमूलच्या एका ट्वीटपासून.

अमूलचं ताजं दूध आणि दही आता बंगळुरूतही उपलब्ध होणार असल्याचं या कंपनीनं 5 एप्रिलला जाहीर केलं. ही विक्री ऑनलाईन डिलिव्हरीद्वारा होणार आहे..

माध्यमांनी आणि समाजमाध्यमांनी मात्र अमूलची नंदिनी दुधाच्या क्षेत्रात घुसखोरी म्हणून पाहिलं.

नंदिनी हा कर्नाटक मिल्क फेडरेशनचा अर्थात KMF या सहकारी संस्थेचा ब्रँड आहे आणि कर्नाटकात गावोगाव पोहोचला आहे. तर अमूल ही गुजरातची सहकारी दुग्धसंस्था आहे.

त्यामुळे राजकीय दृष्ट्या हा प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा बनला. इतका की कर्नाटकातल्या हॉटेल व्यावसायिकांनी अमूलवर बहिष्कार टाकून केवळ नंदिनीची उत्पादनं वापरणार असल्याचं जाहीर केलं.

काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी म्हटलंय की 'गुजरातच्या बडोदा बँकेत विजया बँक विलीन करण्यात आली, बंदरं आणि विमानतळ अडानींकडे देण्यात आले आणि आता गुजरातचं अमूल केएमएफच्या नंदिनीला गिळंकृत करतंय.'

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

त्यावर उत्तर देताना एकानं लिहिलंय की कर्नाटकात हेरिटेज, मिल्कमिस्ट असे आंध्रप्रदेश, तामिळनाडूमधले दुधाचे ब्रँड्सही आहेत, मग केवळ अमूलवर टीका कशासाठी?

आता हे सगळं राजकारण का सुरू आहे, तर कर्नाटकात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत.

त्यामुळे काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांना केएमएफ सहकारी संघाचे सदस्य असलेल्या शेतकऱ्यांची मतं मिळवायची आहेत. कर्नाटकात असे 26 लाख शेतकरी आहेत, जे केएमएफ संघाला दूध पुरवतात.

अमूल आणि नंदिनी ब्रॅण्ड प्रतिस्पर्धी आहेत का?

इथे एक लक्षात घ्यायला हवं की अमूलचं टेट्रापॅक दूध, लस्सी, आईसक्रीम आणि चॉकलेटसारखी अनेक उत्पादनं बंगळुरूसह संपूर्ण कर्नाटकात आधीपासून विकली जातात. उत्तर कर्नाटकात हुबळी-धारवाडमध्ये अमूलचं दहा हजार लीटर दूध विकलं जातं, जिथे नंदिनीचं 1.3 लाख दूध विकलं जातं.

milk brand compariosn
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पण आता ताजं दूध आणि दह्याची विक्री बंगळुरूत सुरू करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय आणि त्यावरूनच वाद सुरू झालाय.

अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "नंदिनी ब्रॅण्डचं नुकसान व्हावं म्हणून आम्ही आमच्या दुधाच्या किंमती कमी केलेल्या नाहीत. आमच्या नजरेत नंदिनी हा अतिशय मजबूत ब्रँड आहे.

“आमचं दूध मुंबई पासून दिल्ली, चंदिगड पर्यंत सगळ्याच शहरात विकलं जातं. त्याचा दुधाचा दर 54 रुपये प्रति लीटर इतका आहे आणि आम्ही बंगळुरूमध्ये त्याच दराने विक्री करू. नंदिनी ब्रॅण्डचं दूध 39 रुपये प्रति लिटर दराने विकलं जातं."

अमूल आणि नंदिनीमध्ये कोणतीही स्पर्धा नसल्याचं जयेन मेहता नमूद करतात.

मेहता सांगतात, "तसं बघायला गेलं तर बंगळूरू, हासन आणि बेल्लारी येथील केएमएफच्या तीन प्लांटमध्येच अमूलचं आईस्क्रीम तयार होतं. बंगळुरू आणि दक्षिण भारतातील आमच्या ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही नंदिनी ब्रॅण्ड कडून दररोज तीस ते पस्तीस हजार लिटर्स आईस्क्रीमची खरेदी करतो. आणि नंदिनीशी आमचे चांगले संबंध आहेत कारण आमचं ध्येय एकच आहे."

Nandini Coop

फोटो स्रोत, nandini.coop

याविषयीच केएमएफचे व्यवस्थापकीय संचालक बी सी सतीश बीबीसीला प्रतिक्रिया देताना सांगतात, "जेव्हा जेव्हा आमच्याकडे अतिरिक्त दूध असतं, तेव्हा तेव्हा आम्ही इतर सहकारी उत्पादकांना मदत करतो. याला को-पॅकिंग असं म्हणतात आणि आम्ही अमूलच नाही तर इतर व्यावसायिक समूहांनाही अशी मदत करतो. आमच्याकडे अतिरिक्त दूध असतं तेव्हा अमूल संघ आमच्याकडून पनीर, चीज अशी उत्पादने खरेदी करतो."

दूध उत्पादक संघटनांमध्ये एक अलिखित नियम आहे, की एक सहकारी दूध संघ दुसऱ्या सहकारी संघाच्या हद्दीत ढवळाढवळ करणार नाही.

म्हणजे एखाद्या बाजारात उत्पादनांची कमतरता येत नाही, तोवर दुसरा सहकारी संघ तिथे दुधाची विक्री करणार नाही.

पण कधी अतिरिक्त दूध असेल तर एखादा संघ ते दुसऱ्याला दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाटी विकतानाही दिसतो, अशी माहिती केएमएफशी निगडीत एका माजी अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितली आहे.

उदाहरणार्थ, ओणमच्या दिवसांत केरळच्या सहकारी संघाच्या मागणीनुसार केएमएफ त्या राज्याला दररोज चार लाख लीटर दूध पुरवतं.

कन्नड रक्षण वेदिके

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, कन्नड रक्षण वेदिके या संघटनेनं अमूलविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं.

मेहताही मान्य करतात, की सहकारी संघांमध्ये असा अलिखित नियम असतो. त्यांचं म्हणणं आहे, की आमूल संघ त्यांची उत्पादने बनवण्यासाठी नंदिनीचे दूधही विकत घेणार आहेत.

अमूल सध्या केवळ ई कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बंगळुरूत ताजं दूध विकणार आहे. मेहता सांगतात की "आम्ही ई कॉमर्स डेटाचं विश्लेषण केलं, तेव्हा ज्या शहरांमध्ये दूध विकत नव्हतो, तिथेही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच आम्ही बंगळुरूमध्ये पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. आमची उत्पादने तयार करण्यासाठी आम्ही नंदिनीच्या दुधाचा वापर आणखी वाढवू."

तर सतीश यांच्या म्हणण्यानुसार, पण बंगळूरमध्ये एकूण 33 लाख लीटर दूध विकलं जातं, त्यातील केएमएफचा वाटा 26 लाख लीटरचा आहे. म्हणजे दुधाची मागणी पूर्ण करण्यासाठी बाकीचे ब्रँड्सही बाजारात आहेत.

karnataka

फोटो स्रोत, Nandini.Coop

फोटो कॅप्शन, कर्नाटकातील 26 लाख शेतकरी नंदिनी दूध ब्रँडचे सदस्य आहेत.

केएमएफचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रेमानंद एस ए यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "अमूलला इथल्या बाजारात उतरायचं असेल तर त्यांना विरोध नसावा. आम्ही सर्वजण डॉ. वर्गीस कुरियन यांच्याच सहकारी तत्त्वांचं पालन करतो.

"पण मग प्रश्न असाही आहे, की जर नंदिनीकडे मागणीपेक्षा जास्त दूध आहे तर मग अमूलला मार्केटमध्ये का उतरायचं आहे? मुंबई आणि गोव्यात पुरवठा कमी असतानाच केएमएफ बाजारात उतरलं. जोपर्यंत केएमएफला बोलावलं जात नाही, तोपर्यंत केएमएफ कुठेही जात नाही. पण या मुद्द्याकडे कुणाचं लक्ष नाही. "

दुधाचं राजकारण

भारतातील तेरा राज्यांमध्ये अमूलच्या पाऊच मधील दुधाची विक्री होते. यात गुजरात, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. तर केएमएफ आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, गोवा आणि महाराष्ट्रात दूधाची विक्री करतो.

Milk

इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक चेंजचे संचालक आणि दूध सहकारी संस्था आणि महिला दूध उत्पादकांच्या सक्षमीकरणावर डी. राजशेखर सांगतात की, "ग्राहकांचा विचार करता कर्नाटकात दुधाचा वापर कमी आहे. इथे फक्त मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकच दुध घेऊ शकतात. ग्रामीण भागात दुधाची खरेदी फारच कमी आहे.

“त्यात अमूलने 54 रुपये लीटर किंमतीला दूध विकलं, तर बहुसंख्य ग्राहकांना ते परवडणार नाही आणि केएमएफच्या बाजारपेठेवर परिणाम होणार नाही. तरीही सध्या या मुद्द्यावरून राजकारण होताना दिसतंय. खरंतर अमूलने कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून थेट दूध खरेदी केलं तर त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होईल."

महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना काय वाटतं?

अमूल विरुद्ध नंदिनी या वादात कर्नाटकात लोक स्थानिक शेतकऱ्यांसाठी म्हणून नंदिनी ब्रँडचं समर्थन करतयात. याकडे महाराष्ट्रातले दूध उत्पादक शेतकरी कसं पाहतायत, हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला.

स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणारे प्रा. जालंदर पाटील सांगतात की ब्रँड्समधल्या स्पर्धेपेक्षा मुळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी, ते सोडवण्याकडे लक्ष द्यायला हवं.

“दुधाचा जो मूळ उत्पादक आहे, शेतकरी त्याच्या दुःखावरती वाद व्हायला पाहिजे. कर्नाटक, गुजरात असो वा महाराष्ट्र, इथले बहुतांश दूध उत्पादक शेतकरी साधारण दोन-चार जनावरंच पाळू शकतात. त्यांच्यासाठी दूध देणाऱ्या जनावराला द्यावं लागणारं खाद्य, त्याचे दर आणि दुधाचे मिळणारे दर याचं गणितच कुठे बसत नाही. कुठलाच सहकारी संघ किंवा राज्यातले नेते दूध उत्पादकाला केंद्रस्थानी ठेवून विचार करताना दिसत नाही. त्यांचे जे वाद आहेत ते व्यावसायिक स्पर्धेचे वाद आहेत. त्यात शेतकरी कुठे आहेत?”

महाराष्ट्रात आज स्थानिक पातळीवर अनेक दूध उत्पादक संघ आहेत, पण संपूर्ण राज्याचा अमूल किंवा नंदिनीसारखा ब्रँड रुजू शकलेला नाही, याकडेही जालंदर पाटील लक्ष वेधतात.

“आमची मागणी हीच आहे की तुम्हा राज्याचा एक ब्रँड करा. त्यानं खूप खर्चही कमी होईल आणि राज्याचा एक ब्रँड झाल्यानं आम्ही राज्याकडे काही मागण्याही करू शकू. कर्नाटकात नंदिनी ब्रँड आहे, तसा महाराष्ट्रात महानंदचा प्रयोग करण्यात आला होता, तो फसला आहे. “

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)