नवाजुद्दीन सिद्दीकी : थिएटरमधला सफाईवाला ते अभिनेता

नवाजुद्दीन सिद्दीकीला स्वतःला अभिनेता म्हणवून घेण्यापेक्षा कलाकार म्हणवून घ्यायला जास्त आवडतं.

आपली ओळख कलाकार म्हणूनच व्हावी अशी त्याची इच्छा असते.

एका लहानशा खेड्यातून येऊन बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावणं नवाजुद्दीनसाठी सोपं नव्हतं. त्यात ही तो दिसायला यथातथाच असल्यामुळे त्याच्यासाठी गोष्टी आणखीन अवघड होत्या.

पण मुंबईत येण्याआधीच त्याच्या पुढ्यात आव्हानांचा डोंगर उभा राहिला होता.

तो सिनेसृष्टीत जाऊ शकतो, अभिनेता होऊ शकतो यावर त्याच्या आईशिवाय घरात कोणाचाही विश्वास नव्हता.

हा प्रवास कसा सुरू झाला

इतर अनेक अभिनेत्यांप्रमाणे सिनेविश्वात यायचं असं नवाजुद्दीनचं स्वप्न मुळीच नव्हतं. अगदी ग्रामीण, सामान्य कुटुंबातून आलेल्या नवाजला आपलं शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी करायची होती.

त्याच्या कॉलेजच्या दिवसांबद्दल नवाज सांगतो, "विज्ञान विषयात पदवी घेतल्यानंतर मी बराच काळ उनाडक्या करत फिरायचो. बऱ्याच कारखान्यांमध्ये काम केल्यानंतर मला नाटकांबद्दल समजलं.

कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात एक वेगळंच रसायन असल्याचं मला त्यावेळी जाणवलं. यापेक्षा दुसरं कोणतं क्षेत्र सुंदर असूच शकत नाही हे माझ्या मनात आलं. हे एक असं काम आहे ज्याला तुम्हीच जबाबदार असता त्यामुळेच मी थिएटर करायचा निर्णय घेतला."

थिएटरचे सुरुवातीचे दिवस

थिएटरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल नवाज सांगतो की, सुरुवातीला मी थिएटरमध्ये साफसफाईचं काम करायचो. लोकांना चहा द्यायचो, जवळपास सर्व प्रकारची कामं करायचो.

नवाज सांगतो, "बॅकस्टेजला काम करता करता, लोकांना चहा पाणी देता देता मला एक छोटीशी भूमिका मिळाली. पहिली भूमिका पहिला संवाद केवळ एका ओळीचा होता. त्यानंतर दोन ओळींची भूमिका मिळाली. हे सगळं मी वडोदऱ्यात असताना सुरू होतं आणि तिथूनच पुढे मी एनएसडीला गेलो."

"अभिनय म्हणजे काय हे मला एनएसडीला मध्ये गेल्यावर कळलं."

कुटुंबियांना सांगणं किती अवघड होतं?

नवाज सांगतो की, "मला अभिनेता व्हायचं आहे हे एकदा मी आईला सांगितलं होतं. तिथेच माझी एक नातेवाईक आली होती. ती आईला म्हणाली, 'हा असं वेड्यासारखं काय बोलतोय... याला कोणीतरी समजून सांगा. जगातल्या प्रत्येक आईला आपला मुलगा सुंदर वाटत असतो, पण तुमच्या मुलाचा चेहरा जरा बघा..."

या सर्व गोष्टी त्याने खिडकीच्या मागून ऐकल्याचं नवाज सांगतो.

तो म्हणतो, "हे ऐकून मला खूपच विचित्र वाटलं. मी विचार करू लागलो की माझ्या चेहऱ्यात नेमकं वाईट काय आहे. मी चांगला दिसत नाही हे मी मान्य केलं पण मी सुंदर नसतानाही अभिनेता बनून दाखवेन हे मनोमन ठरवलं."

स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीने मुंबईत आलो.

एनएसडी नंतर नवाजचं पुढचं स्टेशन होतं मुंबई.

नवाज सांगतो की मुंबईत राहणं त्याच्यासाठी सर्वांत कठीण होतं.

तो सांगतो, "तो काळ माझ्यासाठी इतका कठीण होता की मला आता त्याचा विचारही करायचा नाहीये. ती वेळ निघून गेली हेच बरं झालं. रात्रीचं जेवण मिळालं की सकाळच्या जेवणाची भ्रांत असायची. परिस्थिती अशी होती की गोरेगाव पासून वांद्र्याला जायचं असायचं तेव्हा माझ्याकडे रिक्षाचे पैसे नसायचे. मग पायी जायचो."

तो क्षण जेव्हा सर्वकाही संपल्यासारखं वाटायचं

नवाज सांगतो, "आयुष्यात संघर्ष सुरूच होता पण आयुष्यात त्यादिवशी असं काही घडलं की माझ्यातली हिंमतच संपली. 10-12 दिवस माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. मी माझ्या एका वरिष्ठाला 50 रुपये मागितले पण त्याच्याकडेही 100 रुपयेच होते. त्यांनी तरीही पैसे सुट्टे करून मला 50 रुपये दिले.

काही क्षणासाठी आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि मला रडू फुटलं. माझ्यात खचून गेल्याची भावना निर्माण झाली होती."

नवाज सांगतो की, क्षणभर त्याला वाटलं की आपण मुंबई सोडून जावं. पण अभिनयाशिवाय दुसरं काही येत नसल्यामुळे तो थांबला.

नवाज सांगतो की, सुरुवातीच्या काळात जेव्हा तो ऑडिशन्ससाठी जायचा तेव्हा कास्टिंग डायरेक्टर त्याला नकार द्यायचे. त्याला सांगायचे की तू, ॲक्टर-मटेरियल नाहीयेस. त्यामुळे बहुतांश फक्त नकारच मिळायचा.

चित्रपटांमध्ये संधी कशी मिळाली

नवाजने आपल्या करिअरची सुरुवात अगदी छोट्या भूमिकांनी केली होती. कुठल्यातरी चित्रपटातला एखादा सीन, एखादा छोटा संवाद...

नवाज त्याच्या सुरुवातीच्या भूमिकांबद्दल सांगतो की, "मी सरफरोश, शूल, एक चालीस की लास्ट लोकल, मुन्ना भाई की, देव डी हे चित्रपट केले. या सर्व चित्रपटांमध्ये माझी भूमिका अगदीच छोटी असायची. काही चित्रपटांसाठी पैसे मिळाले तर काहींसाठी नाही."

पण अशी एक वेळ आली की ज्या चित्रपटांमध्ये अगदी किरकोळ भूमिका असायची ते चित्रपट करायला नवाजने नकार दिला. त्याने ठरवलं की आता तो फक्त अशाच चित्रपटात काम करेल ज्यात त्याला दोन सीनची भूमिका मिळेल. पण तरीही त्याला भूमिका मिळाली नाही.

नवाज सांगतो, "त्यावेळी पीपली लाइव्ह, पतंग सारखे चित्रपट बनू लागले होते. मला चांगल्या आणि मोठ्या भूमिका मिळू लागल्या होत्या. चित्रपट महोत्सवांमध्ये हे चित्रपट दाखवले जात होते. मला लोक ओळखू लागले होते. यातूनच मला कामं मिळू लागली."

वैयक्तिक आयुष्यातील वादावर नवाजचं काय म्हणणं आहे?

अलीकडेच नवाज आणि त्याच्या पत्नीचा वाद बराच चर्चेत होता.

या वादावर आणि त्याने बाळगलेल्या मौनावर नवाज सांगतो, "मी गप्प राहिलोय याचा मला कोणताही पश्चाताप नाहीये. माझ्या मुलांनी शाळेत जावं एवढीच माझी इच्छा होती आणि आजही ते शाळेत जातात याचा मला आनंद आहे."

नवाज सांगतो, "मला त्या गोष्टींबद्दल बोलून पुन्हा चर्चा सुरू करायची नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्याचा माझ्या प्रोफेशनवर परिणाम होऊ न देण्याचा मी नेहमीच प्रयत्न केलाय."

नवाजला कोणत्या भूमिका करायच्या आहेत?

नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो, गाडी, बंगला हे त्याच्या यशाचं मोजमाप नाहीये. त्याला जे काम करायचं होतं ते तो आता करतोय आणि यातच तो आनंदी आहे.

नवाज सांगतो, "मी नशीबवान आहे की जे काम मला करायचं होतं ते मी करू शकलो. हे काम मी दुसऱ्याच्या मर्जीने करत नाहीये. मला एखाद्या शर्यतीत पळावं लागेल, असं कोणतंही दडपण माझ्यावर नाहीये. मी माझ्या आवडीचं काम करतोय आणि ते करायला मी सक्षम आहे. मला भविष्यातही असंच काम करायचं आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता..)