'सूर्य'कुमार तळपला; मुंबईचा कोलकातावर दणदणीत विजय

फोटो स्रोत, Getty Images
कर्णधारपदाच्या जबाबदारीला न्याय देतानाच सूर्यकुमार यादवने खणखणीत खेळीसह फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. वानखेडे मैदानावर चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादात मुंबई इंडियन्स संघाने कोलकातावर 5 विकेट्स राखून विजय मिळवला. कोलकाताने दिलेले 186 धावांचं लक्ष्य मुंबईने 14 चेंडू शिल्लक राखून गाठलं. इशान किशनने 25 चेंडूत 58 धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला. यंदाच्या हंगामात धावांसाठी झगडणाऱ्या सूर्यकुमारने 25 चेंडूत 43 धावांची खेळी करत विजय सुकर केला.
इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या रोहित शर्माने इशान किशनच्या बरोबरीने 5व्या षटकातच 65 धावा फलकावर नोंदवल्या. उमेश यादवने अफलातून झेल घेत रोहितला बाद केलं. त्याने 13 चेंडूत 20 धावांची खेळी केली. वरुण चक्रवर्तीने इशानला त्रिफळाचीत केलं पण तत्पूर्वी त्याने 5 चौकार आणि 5 षटकारांसह वादळी खेळी साकारली होती. सूर्यकुमार आणि तिलक वर्मा जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 38 चेंडूत 60 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर टीम डेव्हिडने कोलकाताला कोणताही चमत्कार करण्याची संधी न देता विजयावर शिक्कामोर्तब केलं. कोलकातातर्फे सुयश शर्माने 2 विकेट्स पटकावल्या.

फोटो स्रोत, Getty Images
ब्रेंडन मॅक्युलमने आयपीएलच्या पहिल्याच लढतीत म्हणजे 18 एप्रिल 2008 रोजी 158 धावांची अद्भुत तडाखेबंद खेळी केली होती. त्यानंतर तब्बल 15 वर्षानंतर वेंकटेश अय्यरने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी शतक झळकावण्याचा मान पटकावला. ड्युआन यान्सनच्या चेंडूवर एक धाव घेत वेंकटेशने शतकाला गवसणी घातली. शतकानंतर लगेचच वेंकटेश तंबूत परतला. त्याने 6 चौकार आणि 9 षटकारांसह 104 धावांची दिमाखदार खेळी केली. वेंकटेशच्या या खेळीच्या बळावर कोलकाताने 185 धावांची मजल मारली होती. बाकी फलंदाज मोठी खेळी करुन वेंकटेशला साथ देऊ शकले नाहीत. मुंबईकडून ऋतिक शोकीनने 2 विकेट्स घेतल्या. अर्जुन तेंडुलकरने 2 ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या. त्याला विकेट मिळू शकली नाही.
अर्जुन तेंडुलकरची आयपीएल पदार्पणाची प्रतीक्षा संपली आहे. मुंबई इंडियन्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीसाठी पदार्पणाची संधी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुनला संघात घेत का नाहीत यावरुन अनेक मीम्स सोशल मीडियावर शेअर झाले होते. यानिमित्ताने वडील आणि मुलगा आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा विक्रम होणार आहे.
या लढतीसाठी कर्णधार रोहित शर्मा उपलब्ध नाहीये. पोट बिघडल्यामुळे रोहित या सामन्यात खेळू शकणार नाहीये. रोहितच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. दरम्यान रोहित कर्णधार म्हणून खेळत नसला तरी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1

फोटो स्रोत, Getty Images
23वर्षीय अर्जुन डावखुरा फास्ट बॉलर आहे. उंचपुरा अर्जुन स्विंग बॉलिंगसाठी प्रसिद्ध आहे. अर्जुन उपयुक्त बॅटिंगही करतो.
अर्जुनचे वडील आणि सार्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचे मेन्टॉर आहेत. अर्जुनची आई अंजली तेंडुलकर आणि बहीण सारा तेंडुलकर पदार्पणाचा सामना पाहण्यासाठी वानखेडे मैदानात उपस्थित आहेत.
आयपीएल स्पर्धेत वडील आणि मुलगा दोघेही खेळण्याचा दुर्मीळ विक्रम यानिमित्ताने प्रस्थापित झाला आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात 2008 मध्ये सचिन तेंडुलकर दुखापतीमुळे काही सामने खेळू शकले नव्हते. 14 मे 2008 रोजी चेन्नईविरुद्ध वानखेडे मैदानावरच सचिनने आयपीएल पदार्पण केलं होतं. 15 वर्षानंतर सचिनच्या मुलाने त्याच मैदानावर आयपीएल पदार्पण केलं आहे.
अर्जुनने पुणेस्थित कोच आणि बायोमेकॅनिक्स तज्ज्ञ अतुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. दोन स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे अर्जुनला अॅक्शनमध्ये काही बदल करावे लागले. अतुल नॅशनल क्रिकेट अकादमीबरोबरही काम करतात.
भारताचे माजी फास्ट बॉलर आणि कोच सुब्रतो बॅनर्जी यांचं मार्गदर्शनही अर्जुनला लाभलं आहे. देशातल्या अव्वल प्रशिक्षकांमध्ये सुब्रतो यांचं नाव घेतलं जातं. रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघाचं प्रशिक्षकपद त्यांनी सांभाळलं आहे.
मुंबई U19 संघातर्फे खेळताना 2017-18 हंगामात कूचबिहार करंडक स्पर्धेत 19 विकेट्स पटकावल्या होत्या.
2017 मध्ये बडोदा इथे झालेल्या जयंत लेले निमंत्रितांच्या स्पर्धेत अर्जुनने चांगली कामगिरी केली होती.
अर्जुनने भारतीय U19 आणि मुंबई U19 संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. काही दिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धेत मुंबईच्या वरिष्ठ संघात अर्जुनचं पदार्पण झालं.
हरयाणाविरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुनने एक विकेट मिळवली. त्याच्या तीन ओव्हर्समध्ये 34 रन्स कुटण्यात आल्या.
पुद्दुचेरीविरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुनने 33 रन्सच्या मोबदल्यात एक विकेट पटकावली.
गेल्या हंगामापासून अर्जुनने मुंबईऐवजी गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
अर्जुन तेंडुलकरच्या यॉर्करने जेव्हा इंग्लंडच्या बॅट्समनमनला जेरीस आणलं होतं...
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या इनडोअर अकादमीत सरावाची संधी अर्जुनला मिळाली आहे. इंग्लंड संघ सराव करत असताना अर्जुनने बॉलिंग केली आहे.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचे बॅट्समन सराव करत होते. अर्जुनच्या बुंध्यात पडलेल्या यॉर्करवर इंग्लंडचा बॅट्समन आणि विकेटकीपर जॉनी बेअरस्टो दुखापतग्रस्त होता होता वाचला.
अर्जुनच्या वेगाने आणि अचूकतेने बेअरस्टोसह इंग्लंड संघातील खेळाडू प्रभावित झाले होते.
गेल्या वर्षी लॉर्ड्स इथे भारतीय महिला क्रिकेट संघ सराव करत असताना अर्जुनने बॉलिंग केली होती.
भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामन्यानिमित्ताने मुंबईत असतो तेव्हा अर्जुन नेट बॉलर म्हणून सरावादरम्यान दिसतो.
अर्जुनची वाटचाल
2018मध्ये अडलेड इथे झालेल्या सामन्यात अर्जुन, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया संघातर्फे हाँगकाँगच्या एका संघाविरुद्ध खेळला. त्या सामन्यात अर्जुनने 27 बॉलमध्ये 48 रन्सची खेळी केली होती.
2017 मध्ये अर्जुन मेरलीबोन क्रिकेट संघाचा भाग होता. मेरलीबोन क्रिकेट संघाने नामिबियाच्या U19संघाविरुद्ध काही सामने खेळले होते.
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी नेट बॉलर म्हणून बॉलिंग केली आहे. काही महिन्यांपूर्वी दुबईत झालेल्या आयपीएलच्या 13व्या हंगामादरम्यान अर्जुन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसला होता.
दोन वर्षांपूर्वी मुंबईतील ट्वेन्टी-20 लीगच्या लिलावात अर्जुनला आकाश टायगर्स संघाने 5 लाख खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं होतं.
मुंबईला आयपीएल स्पर्धेची 5 जेतेपदं जिंकून देणारा रोहित शर्मा या सामन्यात खेळत नाहीये. कर्णधार आणि मुख्य फलंदाज म्हणून रोहितचं संघातलं योगदान मोलाचं आहे. रोहितच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. सूर्यकुमार मुंबई इंडियन्सचा आठवा कर्णधार आहे. याआधी सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, रिकी पॉन्टिंग, कायरेन पोलार्ड, शॉन पोलॉक, ड्वेन ब्राव्हो, रोहित शर्मा यांनी मुंबईचं नेतृत्व केलं आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाने आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स महिला संघाची जर्सी परिधान केली आहे. मुंबई इंडियन्स संघाने पहिल्यावहिल्या वूमन्स प्रीमिअर लीगचं जेतेपद पटकावलं होतं. भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर नाणेफेकीवेळी उपस्थित होती. मुंबई इंडियन्स संघाला पाठिंबा देण्यासाठी 19000हून अधिक मुली स्टेडियममध्ये सामना पाहायला आल्या आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








