निकोलस पूरन : प्रदीर्घकाळाची व्हीलचेअर सुटली आणि मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला

निकोलस पूरन, लखनौस सुपरजायंट्स, वेस्ट इंडिज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, निकोलस पूरन विकेटकीपिंगही करतो

कोची शहरात 23 डिसेंबर रोजी आयोजित आयपीएल लिलावानंतर लखनऊ सुपरजायंट्स संघाचे

मेन्टॉर गौतम गंभीर यांना हा प्रश्न विचारण्यात आला. लिलावात लखनऊनं तब्बल 16 कोटी रुपये खर्चून निकोलस पूरनला का ताफ्यात सामील केलं.

लिलावासाठी लखनऊकडे 23.35 कोटी रुपये उपलब्ध होते. यापैकी 16 कोटी म्हणजे जवळपास 70 टक्के रक्कम एका खेळाडूसाठी त्यांनी खर्च केली.

गंभीर यांचं उत्तर सूचक होतं. ते म्हणाले, गेल्या आयपीएल हंगामात त्याची कामगिरी कशी झाली हे आम्ही पाहिलंही नाही. त्याची क्षमता आम्ही जाणतो. त्याच्यासारखा खेळाडू आपल्या ताफ्यात असायला हवा असं आम्हाला वाटलं.

पूरन 26-27 वर्षांचा आहे. इथून त्याच्या खऱ्या कारकीर्दीला सुरुवात होईल. तुम्ही किती धावा करता, किती विकेट्स पटकावता हे महत्त्वाचं नाही. त्याचा परिणाम काय झाला ते महत्त्वाचं असतं. तो मॅचविनर आहे.

त्याने 3-4 सामने जिंकून दिले तर ते महत्त्वाचं. पहिल्या 4मध्ये तसंच फिनिशर म्हणून खेळण्याची क्षमता असलेले किती खेळाडू आहेत? पूरनकडे ती क्षमता आहे.

निकोलस पूरन, लखनौस सुपरजायंट्स, वेस्ट इंडिज

फोटो स्रोत, BCCI- TATA/IPL

फोटो कॅप्शन, निकोलस पूरनने बंगळुरुविरुद्ध अविश्वसनीय खेळी केली.

निकोलस पूरनने सोमवारी या क्षमतेची झलक सादर केली. बंगळुरूत झालेल्या या लढतीत पूरन फलंदाजीला आला तेव्हा 56 चेंडूत 114 धावा हव्या होत्या.

पूरनने अर्ध्या तासाच्या आत चित्र पालटवलं. पूरन बाद झाला तेव्हा लखनऊला 18 चेंडूत 24 धावांची आवश्यकता उरली होती. पूरनने 19 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांसह 69 धावांची थरारक खेळी केली.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लिलावात पूरनचं नाव आलं तेव्हा चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स त्याला संघात घेण्यासाठी उत्सुक होते. त्यांनी स्वारस्य दाखवलं.

थोड्या वेळात दिल्ली कॅपिटल्सनेही शर्यतीत उडी मारली. लखनऊने मागून सहभागी होत पूरनला थेट संघातच घेतलं. पूरनसाठी लखनऊने तब्बल 16 कोटी रुपये खर्च केले. लिलावात पूरनने बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली होती.

लिलावात लखनऊनं जयदेव उनाडकत (50 लाख), विदर्भाचा शिलेदार यश ठाकूर (45 लाख), अष्टपैलू खेळाडू रोमारिओ शेफर्ड (50 लाख), डॅनियल सॅम्स (75 लाख), अमित मिश्रा (50 लाख), प्रेरक मंकड (1 कोटी 80 लाख), स्वप्नील सिंग (20 लाख), नवीन उल हक (50 लाख), युधवीर सिंग (20 लाख) या खेळाडूंना संघात समाविष्ट केलं.

या सगळ्या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी लखनऊनं जेवढे पैसे खर्च केले त्याच्यापेक्षा काही पट रक्कम एकट्या पूरनसाठी ओतली.

या हंगामातील पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना पूरनने 18 चेंडूत 36 धावांची खेळी केली.

चेन्नईविरुद्ध त्याने 18 चेंडूत 32 धावा केल्या. हैदराबादविरुद्ध नाबाद 11 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बंगळुरूत अविश्वसनीय खेळी करत संघाला थरारक विजय मिळवून दिला.

आयपीएलमधली रोलरकोस्टर राईड

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

2017 हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघाने पूरनला 30 लाख रुपये मानधन देत संघात सामील केलं. पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

2018 हंगामासाठी लिलाव झाला त्यात पूरन अनसोल्ड ठरला. कोणत्याही संघाने त्याला घेण्यात स्वारस्य दाखवलं नाही.

त्याच वर्षी डिसेंबरमध्ये पुढचा लिलाव झाला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 4.2 कोटी रुपये खर्चून पूरनला ताफ्यात घेतलं. पूरन पंजाबसाठी तीन हंगाम खेळला. यापैकी 2020 हंगाम त्याच्यासाठी सर्वोत्तम ठरला. 2021 मध्ये त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.

2022 हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादने पूरनकरता 10.75 कोटी रुपये मोजले. पूरनला नवा संघ मानवला नाही, त्याची कामगिरी यथातथाच राहिली.

त्यानंतरच्या लिलावात लखनऊ सुपरजायंट्सने तब्बल 16 कोटी रुपये खर्चून त्याला ताफ्यात घेतलं.

कॅरेबियन प्रीमिअर लीगचा बिनीचा शिलेदार

निकोलस पूरन, लखनौस सुपरजायंट्स, वेस्ट इंडिज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, निकोलस पूरन कॅरेबियन प्रीमिअर लीगदरम्यान खेळताना

पूरन जवळपास दहा वर्षं कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळतो आहे. बार्बाडोस ट्रायडंट्स, गयाना अमेझॉन वॉरियर्स, जमैका तलावालाज या तीन संघांचं त्याने प्रतिनिधित्व केलं आहे.

सीपीएलच्या 92 सामन्यांमध्ये पूरनने 147च्या स्ट्राईकरेटने 1652 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत पूरनच्या नावावर एक शतकही आहे.

स्पर्धेत 121 षटकार पूरनच्या नावावर आहेत. तडाखेबंद फलंदाजीच्या क्षमतेमुळे जगभरातील ट्वेन्टी20 संघांना पूरन हवा असतो.

ऑस्ट्रेलियात होणारी बिग बॅश, पाकिस्तान सुपर लीग, दुबईत होणारी इंटरनॅशनल ट्वेन्टी20 लीग, अबू धाबी ट्वेन्टी10, बांगलादेश प्रीमिअर लीग या स्पर्धांमध्ये पूरन नियमितपणे खेळतो.

संघाची खराब कामगिरी आणि कर्णधारपद सोडलं

निकोलस पूरन, लखनौस सुपरजायंट्स, वेस्ट इंडिज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, निकोलस पूरन

नोव्हेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी20 विश्वचषकात वेस्ट इंडिजला प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. वेस्ट इंडिजला आयर्लंड आणि स्कॉटलंडविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं.

संघात शेरास सव्वाशेर असे पॉवरहिटर असतानाही वेस्ट इंडिजची कामगिरी सर्वसाधारण राहिली. माजी खेळाडू तसंच सोशल मीडियावर संघाच्या कामगिरीवर जोरदार टीका झाली.

काही दिवसात कर्णधार निकोलस पूरनने एकदिवसीय आणि ट्वेन्टी20 संघाचं नेतृत्व सोडलं. पूरनच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजला केवळ एक विजय मिळवता आला होता. पूरनला स्वत:ला 6 सामन्यात केवळ 79 धावा करता आल्या.

तो अपघात

जानेवारी 2015 मध्ये त्रिनिदादमध्ये सराव करुन परतत असताना पूरनच्या गाडीला अपघात झाला. पूरनच्या पायाला गुडघ्यापासून पोटरीला जोडणाऱ्या हाडाला मार लागला.

त्याच्या उजव्या घोट्याला दुखापत झाली. त्यावेळी पूरनचा रुग्णालयातला फोटो सोशल मीडियावर आला होता.

पूरन पुन्हा क्रिकेट खेळू शकेल का? याविषयी चाहत्यांच्या मनातही साशंकता निर्माण झाली होती. पूरनला दोन शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागलं.

प्रदीर्घ काळ व्हीलचेअरवर राहावं लागलं. यानंतर रिहॅबची मोठी प्रक्रिया पार केल्यानंतर पूरन क्रिकेटच्या मैदानावर परतला.

सचिन तेंडुलकरने केलं होतं कौतुक

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

27 सप्टेंबर 2020 रोजी शारजा झालेल्या मुकाबल्यात संजू सॅमसनने लगावलेला फटका बाऊंड्रीपल्याड जाणार होता. प्रचंड अशी झेप घेत पूरन चेंडूपर्यंत पोहोचला. आपण बाऊंड्रीबाहेर जातोय असं लक्षात येताच त्याने त्वरेने चेंडू आत टाकला.

हमखास षटकार किंवा चौकार त्याने वाचवला. यानंतर अनेक दिवस सोशल मीडियावर या सेव्हची चर्चा होती.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने पूरनचं कौतुक केलं होतं. आयुष्यात पाहिलेली सर्वोत्तम सेव्ह, असं सचिनने त्याचं वर्णन केलं होतं.

निकोलस पूरन, लखनौस सुपरजायंट्स, वेस्ट इंडिज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, निकोलस पूरन

2014 U19 विश्वचषकाच्या माध्यमातून पूरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखल झाला. 2016 मध्ये पूरनने वेस्ट इंडिजसाठी ट्वेन्टी20 पदार्पण केलं.

डावखुरा शैलीदार फलंदाज पूरन संघाची आवश्यकता असेल तर विकेटकीपिंगची जबाबदारीही सांभाळतो.

नवीन फ्रँचाइज असूनही गेल्या वर्षी लखनऊनं पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये धडक मारली होती. पूरनची बॅट अशीच तळपत राहिली तर लखनऊचं जेतेपदाचं स्वप्न साकार होऊ शकतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)