ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजा करायला कोर्टाची परवानगी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनंत झणाणें आणि उत्पल पाठक
- Role, बीबीसी प्रतिनिधी, वाराणसीहून
वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणात न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिला आहे. वाराणसीच्या स्थानिक न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात जाऊन पूजा करण्याची परवानगी हिंदू पक्षाला दिलेली आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशात असं लिहिलंय की, "वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना वाराणसी जिल्ह्यातल्या ठाणे चौकात असणाऱ्या सेटलमेंट प्लॉट क्र. 9130वर इमारतीच्या दक्षिण बाजूला असलेलं वादग्रस्त तळघर फिर्यादी आणि काशी विश्वनाथ ट्रस्ट यांना सुपूर्द करण्याचे निर्देश दिले आहेत. या ट्रस्टने नियुक्त केलेल्या पुजाऱ्यांकडून तळघरात असलेल्या मूर्तींची पूजा, राग-भोग, करून घ्यावे आणि त्यासाठी लोखंडी कुंपण लावून 7 दिवसांच्या आत योग्य व्यवस्था करावी."

हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, "जिल्हा प्रशासनाला सात दिवसांत पूजा करण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आलं आहे. प्रशासनाने ही व्यवस्था केली की लगेच पूजा सुरू होईल."
मशिदीच्या आवारात पूजा करण्याच्या नियमांबाबतही जैन म्हणाले की, "ही पूजा कशी केली जाईल हे काशी विश्वनाथ ट्रस्ट ठरवेल. त्यांना याची अधिक चांगली माहिती आहे.
आम्ही आमचं कायदेशीर काम पूर्ण केलं आहे. आता पूजा सुरु करण्याची जबाबदारी ट्रस्टची आहे. या पूजेसाठी पुजारी आणि भक्तांना जाण्याची परवानगी असेल."
"मला इथे हेच म्हणायचं आहे की न्यायमूर्ती के. एम. पांडे यांनी 1 फेब्रुवारी 1986 रोजी राम मंदिराचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले होते.
आज न्यायालयाने दिलेला आदेश हा त्याच आदेशासारखा दिसतो. हा या प्रकरणाचा टर्निंग पॉइंट म्हणून या आदेशाकडे पाहता येईल. एका सरकारने आपल्या अधिकाराचा गैरवापर करून हिंदू समाजाची पूजा बंद केली होती, आज न्यायालयाने आपल्या लेखणीने ती दुरुस्त केली आहे."
'ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर आधी हिंदू मंदिर होतं': पुरातत्त्व विभाग
वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद संकुलाचं सर्वेक्षण करणाऱ्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) असं म्हटलं होतं की, सध्याची वास्तू बांधण्यापूर्वी तेथे हिंदू मंदिर होते.
गेल्या वर्षी जुलैमध्ये वाराणसी जिल्हा न्यायालयाने एएसआयला मशीद परिसराचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर आता एएसआयचा अहवाल, प्रकाशित करण्यात आला आहे. एएसआयने चार महिन्यांच्या दीर्घ सर्वेक्षणानंतर असं सांगितलं आहे की ज्ञानवापी मशीद संकुलाच्या परिसराचा वैज्ञानिक अभ्यास, तिथल्या स्थापत्य अवशेषांचा अभ्यास, वैशिष्ट्ये, कलावस्तू, शिलालेख, कला आणि शिल्प यांच्या आधारावर असं म्हणता येईल की सध्या असलेल्या मशिदीच्या आधी याच जागेवर एक हिंदू मंदिर होतं.
या प्रकरणातल्या मुस्लिम पक्षाचं असं म्हणणं आहे की त्यांना एएसआयच्या अहवालाची प्रत रात्री उशिरा मिळाली होती आणि आता हा अहवाल वकिलांकडे आहे.
ज्ञानवापी मशिदीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एन जुमान इंतेजामिया मशिदीचे सहसचिव एसएम यासीन म्हणाले की, "हा अहवाल आहे, अंतिम निर्णय नाही. हा अहवाल सुमारे 839 पानांचा आहे. त्याचा अभ्यास आणि विश्लेषण करण्यास वेळ लागेल. त्यानंतर तज्ज्ञांकडून याविषयीचं मत जाणून घेतलं जाईल."
मशिदीच्या बाजूने असणाऱ्यांचं असं मत आहे की, "ज्ञानवापी मशिदीत बादशाह अकबरच्याही आधी सुमारे 150 वर्षांपासून मुस्लिम बांधव नमाज पठण करत आले आहेत." एसएम यासीन म्हणतात की, "आता यापुढे अल्लाहची मर्जी जी असेल तर होईल. मशीद अबाधित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. यात निराशेला स्थान नाही, आम्हाला संयम बाळगावा लागेल. वाद टाळावा असं आवाहन आम्ही करतो."
या खटल्यातील मुख्य फिर्यादी राखी सिंग यांचे वकील अनुपम द्विवेदी यांच्याकडून 800 हून अधिक पानांच्या अहवालात नोंदवलेल्या निष्कर्षांची प्रत बीबीसीला मिळाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एएसआयच्या अहवालानुसार, "या मशिदीच्या खोलीत अरबी-पर्शियन भाषेत लिहिलेला एक शिलालेख सापडला.
त्यानुसार औरंगजेबच्या कारकिर्दीच्या 20 व्या वर्षी (1676-77)मध्ये ही मशीद बांधण्यात आल्याचा उल्लेख आहे. यावरूनच हे स्पष्ट होतं की याठिकाणी आधीपासून असलेलं बांधकाम 17व्या शतकात औरंगजेबाच्या काळात नष्ट करण्यात आलं होतं.
जुन्या संरचनेतील काही भाग बदलून सध्या उभ्या असलेल्या बांधकामात त्याचा वापर करण्यात आला होता."
सध्याच्या या एएसआय सर्वेक्षणात ज्ञानवापी मशिदीतील सीलबंद पाण्याच्या टाकीचं शास्त्रोक्त सर्वेक्षण अजूनही झालेलं नाही.
हिंदू पक्षाने असा दावा केला आहे की मशिदीच्या वजुखान्यात एक शिवलिंग आहे, याच रचनेला मशीद पक्षाचे लोक पाण्याचे कारंजे असल्याचं म्हणतात.
फिर्यादी राखी सिंगचे वकील अनुपम द्विवेदी यांनी हा अहवाल महत्त्वाचा असल्याचं सांगितलं आणि ते म्हणाले की, "औरंगजेबाने मशीद बांधण्यापूर्वी या परिसरात हिंदू पद्धतीने केलेलं बांधकाम आणि मंदिर होतं. एएसआयच्या अहवालामुळे आमचा खटला आणखीन मजबूत होईल. या प्रकरणात एक पुरावा म्हणून हा अहवाल महत्त्वाची भूमिका बजावेल."
कोणकोणत्या गोष्टींचं सर्वेक्षण करण्यात आलं?
- सध्या उभ्या असलेल्या संरचनेतला मध्यवर्ती कक्ष आणि मुख्य प्रवेशद्वार
- पश्चिमेकडील कक्ष आणि भिंत
- सध्याच्या संरचनेतील स्तंभ आणि भिंतीवरील खांबांचा पुन्हा वापर झाल्याबाबत सर्वेक्षण करण्यात आलं
- सापडलेल्या दगडांवर असलेल्या अरबी आणि पर्शियन भाषेतले शिलालेख
- तळघरातल्या शिल्पांचे अवशेष
या संरचनेचं स्वरूप एखाद्या हिंदू मंदिरासारखं आहे
एएसआयच्या अहवालात ज्ञानवापी मशीद संकुलात असणाऱ्या सध्याच्या बांधकामाचं वय आणि स्वरूप याविषयी म्हटलं आले की, "सध्याच्या संरचनेत पश्चिमेकडे असणाऱ्या भिंतीवरून हे एखाद्या हिंदू मंदिराचे अवशेष असल्याची कल्पना येते.
सध्या तिथे असणाऱ्या वास्तुशिल्पांचे अवशेष, मध्यवर्ती कक्षात असणारे कर्ण रथ आणि प्रति रथ, भिंतींवरच्या सुशोभित मोल्डिंग्ज, पश्चिमेकडील भिंतीवर तोरण बांधण्यात आलेलं एक मोठं प्रवेशद्वार, तिथे असणारं एक छोटं प्रवेशद्वार आणि पक्षी आणि प्राण्यांचं कोरीव काम या सगळ्या गोष्टींवरून हे हिंदू पद्धतीचं बांधकाम असल्याचं दिसतंय"
"कला आणि स्थापत्यशास्त्राच्या आधारावर, सध्या असलेलं ही बांधकाम एखादं हिंदू मंदिर म्हणून ओळखलं जाऊ शकतं."

फोटो स्रोत, Getty Images
वैज्ञानिक अभ्यास आणि निरीक्षणानंतर असं सांगण्यात आलं आहे की सध्याची इमारत तयार होण्यापूर्वी तिथे एक मोठं हिंदू मंदिर होतं.
'दगडावर मशिदीच्या बांधकामाची तारीख नोंदवण्यात आली होती'
एएसआयने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे त्या मशिदीतल्या एका शिलालेखाचा उल्लेख आहे. याच शिलालेखावर मुघल सम्राट औरंगजेबाच्या (1676-77) काळात ही मशीद बांधण्यात आली होती असं लिहिलं होतं.
या अहवालात हेही सांगितलं होतं की सदरील शिलालेखावर मशिदीच्या सहान (अंगण)ची डागडुजी झाल्याचाही उल्लेख करण्यात आला होता. या शिलालेखाचा फोटो 1965-66 एएसआयच्या रेकॉर्डमध्ये आहे.
पण एएसआयचं असं म्हणणं आहे की, "या सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या एका खोलीतून हा दगड सापडला होता पण या शिलालेखावरील मशिदीच्या बांधकाम आणि विस्ताराची माहिती खोडण्यात आली होती."
एएसआयचं असं म्हणणं आहे की मासीर-ए-आलमगिरी नावाच्या औरंगजेबाच्या चरित्रात असं लिहिलं आहे की औरंगजेबाने त्याच्या सर्व प्रांतातील सरदारांना काफिरांच्या शाळा आणि मंदिरं पाडण्याचे आदेश दिले होते.
एएसआयच्या म्हणण्यानुसार, 1947 मध्ये जदुनाथ सरकार यांनी केलेल्या मसिर-ए-आलमगिरीच्या इंग्रजी अनुवादातही याचा उल्लेख आहे.
जदुनाथ सरकार यांच्या पुस्तकाचा संदर्भ एएसआयच्या अहवालात डोळेला आहे. त्यानुसार, "2 सप्टेंबर 1669 रोजी बादशाह औरंगजेबच्या आदेशानुसार, त्याच्या अधिकाऱ्यांनी काशीतील विश्वनाथाचे मंदिर पाडल्याची नोंद आहे."
ज्ञानवापी मशिदीतले शिलालेख
या अहवालात अशी माहिती देण्यात आली आहे की सध्याच्या मशिदीच्या संरचनेत एकूण 34 शिलालेख आणि 32 स्टंपिंग सापडले आहेत आणि त्यांची नोंद करण्यात आली आहे.
मशिदीच्या बांधकाम आणि दुरुस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या हिंदू मंदिराच्या दगडांवर हे शिलालेख आधीच अस्तित्वात असल्याचं एएसआयने सांगितलं.
हे शिलालेख देवनागरी, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये आहेत.
यामुळे एएसआयने हा निष्कर्ष काढला की आधीपासून अस्तित्वात असलेल्या संरचनेचे काही भाग पाडले गेले आणि विद्यमान संरचनेच्या बांधकाम आणि दुरुस्तीसाठी तेच अवशेष वापरण्यात आले.
एएसआयने सांगितलं आहे की या शिलालेखांमध्ये जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर या तीन देवांची नावं देखील सापडली आहेत.
एएसआयने 'महामुक्तिमंडप'च्या तीन शिलालेखांचा शोध अतिशय महत्वाचा असल्याचं या अहवालात सांगितलं आहे.
तळघरात काय सापडलं?

फोटो स्रोत, Getty Images
एएसआयच्या म्हणण्यानुसार, मशिदीमध्ये नमाजासाठी त्याच्या पूर्वेकडील भागात एक तळघर बनवण्यात आलं होतं आणि मशिदीमध्ये प्लॅटफॉर्म आणि अधिक जागाही बनवण्यात आली होती जेणेकरून अधिकाधिक लोक तिथे नमाज अदा करू शकतील.
एएसआयने सांगितलं की, मंदिराच्या खांबांचा वापर पूर्वेकडील भागात तळघर बांधण्यासाठी करण्यात आला होता.
एन2 (N2) नावाच्या तळघरात घंटा, दीपस्तंभ आणि शिलालेख असलेले स्तंभ आहेत.
एस2 (S-2) नावाच्या तळघरात मातीखाली गाडलेल्या हिंदू देवी-देवतांच्या मूर्तीही सापडल्या.
खांब आणि भित्तीस्तंभ
एएसआयच्या अहवालानुसार, मशिदीचा आकार मोठा करण्यासाठी आणि मशिदीतलं अंगण तयार करण्यासाठी, आधीपासून अस्तित्वात असलेल्या मंदिराच्या खांबांमध्ये किंचित बदल करण्यात आले.
मशिदीच्या कॉरिडॉरमधील खांबांची सखोल तपासणी केल्यावर असं दिसून आलं आहे की ते मूळत: पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या हिंदू मंदिराचा भाग होते, हेही एएसआयने या अहवालात सांगितलं आहे.
मशीद बांधताना या खांबांचा वापर करण्यासाठी, त्यांच्यामध्ये असलेल्या कमळाच्या पदकापुढील आकृत्या काढून टाकण्यात आल्या आणि फुलांची रचना तयार केली गेली.
पश्चिमेकडील कक्ष आणि भिंत
एएसआयने सांगितलं की सध्या असलेल्या मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीचा उर्वरित भाग हे पूर्वीपासून अस्तित्वात असलेलं एक हिंदू मंदिर आहे.
पश्चिमेकडील ही भिंत, "दगडाने बांधलेली आहे. पूर्वीच्या संरचनेतील भिंतींचा आणि इतर अवशेषांचा वापर करून ही भिंत उभारण्यात आलेली आहे. या भिंतीसोबत असणारा केंद्रीय कक्ष अजूनही तसाच आहे आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या दोन कक्षांमध्ये बदल करण्यात आला आहे."
मंदिराच्या उत्तर आणि दक्षिण प्रवेशद्वाराचे पायऱ्यांमध्ये रूपांतर करण्यात आले आणि उत्तरेकडील सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्या आजही वापरात आहेत.

फोटो स्रोत, ROBERT NICKELSBERG/GETTY IMAGES
मध्यवर्ती सभागृह आणि मुख्य प्रवेशद्वार
एएसआयच्या अहवालात असं म्हटलं आहे की मंदिरात उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेला एक मोठा मध्य कक्ष आणि प्रत्येकी एक खोली होती.
पूर्वीच्या संरचनेचा (मंदिर) मध्यवर्ती कक्ष आता सध्याच्या संरचनेचा (मशीद) म्हणजेच मशिदीचा मध्यवर्ती कक्ष आहे.
एएसआयचा असा विश्वास आहे की मंदिराच्या मध्यवर्ती खोलीचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडून होते जे दगडी दगडी बांधकामाने अडवलं होतं.
ज्ञानवापीचं सर्वेक्षण आव्हानात्मक होतं : एएसआय
गेल्या वर्षी 4 ऑगस्टला एएसआयने कडेकोट बंदोबस्तात सर्वेक्षण सुरू केलं होतं.
एएसआयच्या टीममध्ये प्राध्यापक आलोक त्रिपाठी, डॉ. गौतमी भट्टाचार्य, डॉ. शुभा मजुमदार, डॉ. राज कुमार पटेल, विनय कुमार रॉय , डॉ. अविनाश मोहंती, डॉ. इझार आलम हाश्मी, डॉ. आफताब हुसैन, डॉ. नीरज कुमार मिश्रा आणि डॉ. तज्ज्ञांचा समावेश आहे.
सर्वेक्षणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन न्यायालयाने सर्वेक्षणादरम्यान प्रसारमाध्यमांचे वार्तांकन करण्यास बंदी घातली होती.
संरचनेचे कोणतेही नुकसान न करता सर्वेक्षण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पण माती आणि ढिगारा पाहता सर्व खबरदारी घेत सर्व पक्षांच्या सहमतीने हा मातीचा ढिगारा हटवण्यात आला.
ज्ञानवापीच्या आजूबाजूला केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचा घेरा असून त्यामुळे पुन्हा पुन्हा मशिदीच्या आत जाणं अवघड झालं आहे.
चार महिने चाललेल्या या सर्वेक्षणात एएसआय टीम आणि मजुरांनी उष्ण आणि दमट पावसाळ्याच्या दिवसात सतत काम केलं. काही तळघरांमध्ये वीज नसल्याने सुरुवातीच्या काळात टॉर्च व रिफ्लेक्टरच्या प्रकाशात सर्वेक्षण करण्यात आलं.

तळघरात काम करत असताना एएसआयच्या टीमलाही हवेची कमतरता जाणवली आणि नंतर दिवे आणि पंखे बसवून काम करण्यात आलं. पावसाळ्यात खोदलेल्या जागेवर ताडपत्री टाकून सर्वेक्षणाचे कॅम्प ऑफिस बांधण्यात आले होते.
एएसआय टीमला तिथे असणाऱ्या माकडांचाही त्रास झाला. त्यांनी अनेकदा ताडपत्री फाडून सर्वेक्षणाच्या परिसरात गोंधळ घातला.
सर्वेक्षणासाठी न्यायालयाचा आदेश
एएसआयला सर्वेक्षणाचे आदेश देताना, वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनी त्यांच्या आदेशात लिहिलं होतं की, "जर भूखंड आणि संरचनेचे सर्वेक्षण आणि वैज्ञानिक तपासणी केली गेली, न्यायालयासमोर खरी तथ्ये येऊ शकतील. जेणेकरून न्यायालय योग्य आणि न्याय्य पद्धतीने हा खटला निकाली काढू शकेल."
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशात एएसआयच्या सारनाथ सर्कलच्या अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञांना सेटलमेंट प्लॉट क्रमांक 9130 (सध्या मशीद संकुल जिथे आहे ती जमीन) जमीन आणि इमारतीचे (मशिदीची इमारत) सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.

फोटो स्रोत, Getty Images
सुप्रीम कोर्टाच्या आदेशात असं लिहिलं होतं की, "सदरील जमीन आणि इमारतीचे सर्वेक्षण एएसआयने केले तर तिथे कोणतीही मोडतोड केली जाऊ नये. या सर्वेक्षणादरम्यान ना उत्खनन केले जाईल आणि ना बांधकाम पाडले जाईल, असं आश्वासन केंद्र सरकारने दिलं आहे."
या सर्वेक्षण टीममध्ये: पुरातत्वशास्त्रज्ञ, पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ, एपिग्राफिस्ट, सर्वेक्षक, फोटोग्राफर आणि इतर तांत्रिक तज्ञ तपास आणि दस्तऐवजीकरणासाठी तैनात करण्यात आले होते. तज्ञांच्या पथकाने जीपीआर (ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार)चा वापर करूनही हे सर्वेक्षण केलं.
एएसआयच्या वैज्ञानिक तपासणीची व्याप्ती
सध्या अस्तित्वात असलेली मशिदीची इमारत ही मंदिराच्या वरची रचना आहे की नाही हे शोधण्यासाठी एएसआय हे सर्वेक्षण करणार होतं. ज्ञानवापीच्या पश्चिमेकडील भिंतीच्या बांधकामाचे वय आणि स्वरूप शोधण्यासाठी ही वैज्ञानिक तपासणी करणं गरजेचं होतं.
गरज पडल्यास या भिंतीच्या सर्वेक्षणासाठी ग्राउंड पेनिट्रेटिंग रडारचा वापर केला जाणार होता. एएसआयला ज्ञानवापीच्या तीन घुमटाखाली आणि ज्ञानवापीच्या सर्व तळघरांची तपासणी करायची होती.

फोटो स्रोत, Getty Images
या सर्वेक्षणात सापडलेल्या सर्व कलाकृतींची यादी ही संस्था तयार करणार होती आणि कोणत्या कलाकृती कुठे सापडल्या याची नोंद करायची होती आणि कार्बन डेटिंगचा वापर करून त्या कलाकृतींचं वय आणि स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार होता.
ज्ञानवापी मशिदीच्या संरचनेच्या बांधकामाचे वय आणि बांधकामाचे स्वरूप ओळखण्यासाठी डेटिंग, ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार आणि इतर वैज्ञानिक पद्धती वापरल्या गेल्या.
मशिदीची इमारत आणि परिसराचं काहीही नुकसान होऊ नये याची काळजी घेत हे सर्वेक्षण केलं गेलं.
सर्वेक्षणाला मशीद पक्षाचा विरोध
न्यायालयासमोर सादर केलेल्या लेखी आणि तोंडी पुराव्यांवरून न्यायालय जर कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलं नाही तरच सर्वेक्षण केलं जावं असं मशीद पक्षाचं म्हणणं होतं.
कोर्टात हिंदू पक्षाने असं म्हटलं होतं की, बांधकामाची शैली लक्षात घेता, संरचनेच्या कृत्रिम भिंतींच्या मागे काही वस्तू लपल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही.
परंतु मुस्लिम (मशीद)पक्षाचा असा विश्वास होता की कायदा एएसआय हिंदू बाजूच्या दाव्याशी संबंधित पुरावे गोळा करण्याची परवानगी देत नाही.
मशिदीच्या बाजूने असे म्हटले आहे की हे सर्वेक्षण 1991 च्या प्रार्थना स्थळ कायद्याचे उल्लंघन आहे. या कायद्यानुसार स्वातंत्र्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या धार्मिक स्थळांचं धार्मिक स्वरूप बदलण्याची परवानगी दिली जात नाही.

फोटो स्रोत, Getty Images
मशीद पक्षाने असंही म्हटलं आहे की अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापीच्या जमिनीच्या मालकीशी संबंधित प्रकरणात एएसआय सर्वेक्षणावर आधीच स्थगिती दिली आहे. मग इतर कोणत्याही प्रकरणात सर्वेक्षणाला परवानगी कशी देता येईल?
तर हिंदू पक्षाचा असा विश्वास होता की हे सर्वेक्षण न्यायालयात या वादावर तोडगा काढण्यास मदत करेल. ते म्हणतात की हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांना विरोध करण्याची आणि एएसआय सर्वेक्षणाच्या निकालांना न्यायालयात आव्हान देण्याची संधी मिळेल.
मंदिराच्या बाजूने 1991 च्या प्रार्थनास्थळ कायदा हा सर्वेक्षण करण्यात अडथळा वाटत नाही. त्यांनी असा दावा केला आहे की स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही हिंदू तेथे पूजा करत आहेत.
मंदिराच्या बाजूचा असा विश्वास आहे की एएसआयचे काम ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि संरक्षण करणे आहे. त्यामुळे सर्वेक्षणात मुस्लीम पक्षाने व्यक्त केलेली भीती निराधार आहे.
अयोध्येसारखेच ज्ञानवापीचे सर्वेक्षण करणं योग्य आहे का?
याबाबत मशीद पक्षाचे वकील एसएफए नकवी म्हणतात की, "प्रार्थनास्थळ कायदा 1991 सांगतो की, 15 ऑगस्ट 1947 रोजी बाबरी मशीद मालकीचा खटला प्रलंबित होता. प्रार्थनास्थळांच्या कायद्यात ज्ञानवापी किंवा इतर कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख नाही. आणि अयोध्येच्या जमिनीची मालकी प्रकरणात न्यायालयाने प्रार्थनास्थळ कायद्याची वैधता मान्य केली आहे."
नक्वी म्हणतात की, "अयोध्येतील एएसआय सर्वेक्षण वेगवेगळ्या परिस्थितीत करण्यात आलं होतं. अयोध्येतील सर्वेक्षण बाबरी मशिदीच्या पाडावानंतर करण्यात आलं होतं, त्याआधी हे सर्वेक्षण केलेलं नव्हतं."
हा अहवाल प्रकाशित होईपर्यंत एएसआयच्या या सर्वेक्षण अहवालाच्या निकालावर मशिद पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








