हेडगेवारः कर्नाटकचं सरकार शालेय पाठ्यपुस्तकात हेडगेवारांचं भाषण का समाविष्ट करतंय?

फोटो स्रोत, Rss
- Author, इमरान कुरेशी
- Role, बंगळुरू, बीबीसी हिंदीसाठी
कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवारांचं भाषण शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यामुळे वाद उद्भवला आहे. हेडगेवारांचं भाषण कन्नड माध्यमातल्या एका शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलं जाणार आहे.
काही शिक्षणतज्ज्ञांच्या मते कर्नाटक सरकारने भगतसिंगांवरील एक धडा हटवण्याचा निर्णय रद्द करून एक मोठा संघर्ष टाळलाय.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भगतसिंग यांच्यावरचा धडा अभ्यासक्रमातून काढून टाकण्याच्या निर्णयावर टीका केली होती.
प्रचंड विरोध आणि गदारोळ झाल्यानंतर सरकारने भगतसिंगांवरचा धडा काढून टाकण्याचा निर्णय रद्द केला.
पण त्याचवेळी हेडगेवारांवरचा धडा अभ्यासक्रमात न देता त्यांचं भाषण देणारं कर्नाटक हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय.
नवीन शालेय वर्षात दहावीच्या विद्यार्थ्यांना हेडगेवारांचं 'आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं' या शीर्षकाचं भाषण अभ्यासासाठी देण्यात आलंय.
देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपा मागच्या कित्येक वर्षांपासून सत्तेत आहे. पण एकाही राज्याने आजपर्यंत हेडगेवारांचं भाषण शालेय अभ्यासक्रमात दिलं नव्हतं.
राज्य सरकार काय सांगतं?
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नागेश बीबीसीशी बोलताना म्हणाले की, ''हेडगेवारांचं एकही भाषण आतापर्यंत कधीच अभ्यासक्रमात धड्याच्या स्वरूपात आलं नव्हतं. अर्थात, त्याच्या आशयावर कोणी वाद निर्माण केला तर मी नक्कीच विचार करेन. भगतसिंगांच्या धड्याबद्दल बोलायचं झाल्यास असं कधी होईल असं वाटलंही नव्हतं. तो तर पुन्हा आणायचाच आहे.''

फोटो स्रोत, Getty Images
भगतसिंगांचा धडा काढून न टाकण्याच्या निर्णयामुळे सरकारचं मनोबल वाढलं असावं असं दिसतं. याच कारणामुळे अत्यंत शांत स्वभावाचे मंत्री टीव्हीवरच्या चर्चांमध्ये तावातावाने बोलताना दिसतात. ''होऊ द्या ना विरोध. पण सरकार हेडगेवारांचं भाषण शालेय अभ्यासक्रमातून हटवणार नाही,'' असं ते म्हणतात.
हेडगेवारांच्या भाषणाचा हा धडा कन्नड माध्यमातून शिकणाऱ्या (पहिली भाषा कन्नड असलेल्या) मुलांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेलाय. यात इतर अनेक मुद्द्यांवरचेही धडे आहेत. ते 'डावे आणि उदार विचारसरणीचे' नसल्यामुळे बाजूला ठेवण्यात आले होते.
टेक्स्ट बुक रिव्ह्यू कमिटीचे अध्यक्ष रोहित चक्रतीर्थ यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं, ''आम्ही अभ्यासक्रमामध्ये भगतसिंग यांच्या तारूण्यातला काळ आणि त्यांच्या क्रांतीकारी चळवळींबद्दल काही गोष्टी नव्याने समाविष्ट केल्यात. आधीच्या धड्यात त्यांच्या बालपणातल्या गोष्टींचा उल्लेख आहे.''
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कर्नाटक सरकार हेडगेवारांच्या ज्या भाषणावरून अडून बसलंय त्या भाषणात नक्की आहे तरी काय?
''हे भाषण त्यांच्या अनेक भाषणांपैकी एक आहे. पण या भाषणाबाबत फारशी माहिती लोकांना नाही. हे भाषण त्यांनी संघ चळवळीच्या शेवटच्या पंधरा वर्षांच्या कालावधीत दिलेलं आहे. (हेडगेवारांचं निधन 1940 साली झालं.) हे भाषण इतर लोकांनी लिहून घेतलं होतं,'' असं चक्रतीर्थ सांगतात.
ते पुढं सांगतात, ''हे भाषण लहान मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण या वयात मुलं समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आपले आदर्श मानतात. ते क्रिकेटपटू किंवा अभिनेत्यांना आपला आदर्श मानतात. या वयात मुलं खूप गोंधळलेली असतात. हे भाषण वाचून मुलांचा दृष्टीकोन स्पष्ट होईल. आपलं आयुष्य तर्कनिष्ठ पद्धतीने जगणाऱ्या व्यक्ती आदर्श म्हणून निवडणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे. ''

फोटो स्रोत, IMRAN QURESHI/BBC
या मुद्द्यावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाले की, ''भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हेडगेवार कधीही सहभागी झाले नव्हते. त्यामुळे एका सांप्रदायिक व्यक्तीचं भाषण मुलांना शिकवण्यात काय अर्थ आहे? सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यासाठी आम्ही कायदेतज्ज्ञांशी चर्चा करतोय. ''
दुसरे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनीदेखील एक ट्वीट मालिकाच तयार करून सरकारच्या या निर्णयाचा कडाडून विरोध केलाय. ''हिजाब, हलाल आणि व्यवसायाच्या मुद्द्यांवरून रान पेटवल्यानंतर भाजप आता शालेय अभ्यासक्रमांच्या मागे लागलाय. अजून किती तळ गाठणार आहेत?'' असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.
पण सरकारच्या या निर्णयाविरूद्ध माकपाशी संलग्न स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि इतर काही संघटना वगळता कोणत्याही मोठ्या राजनैतिक संघटना किंवा विद्यार्थी संघटनांनी नाराजीदेखील दर्शवलेली नाही.
हेडगेवार व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्यावर बंकिमचंद्र चॅटर्जी आणि सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येचा खूप प्रभाव होता. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घ्यायला सुरूवात केली होती. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेनंतर ते स्वातंत्र्यसंग्रामापासून लांब गेले. त्यांनी स्वतःला फक्त हिंदूराष्ट्राच्या उभारणीसाठी हिंदूंना संघटित करण्याच्या कार्याला बांधून घेतलं.
हेडगेवारांच्या या भाषणात असं काय आहे?
''आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं,'' हे त्यांच्या या भाषणाचं शीर्षक आहे.
भाषणाच्या प्रस्तावनेतच त्यांनी आदर्श म्हणून कोणतीही कमतरता नसलेली व्यक्ती शोधणं कठीण आहे असं म्हटलंय. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आदर्श मानण्याऐवजी कधीही न बदलणारी तत्वं अंगीकारावीत आणि आदर्श म्हणून तुम्ही या मूल्यांचं पालन केलं पाहिजे. पण ही मूल्यं प्रत्यक्ष आयुष्यात अंमलात आणणंही तितकंच कठीण आहे, असं ते म्हणतात.

फोटो स्रोत, IMRAN QURESHI/BBC
'' याच कारणामुळे समाजात मूर्तिपूजेला महत्त्व प्राप्त झालंय.''
'' मूर्तीपूजा हे विश्वशक्तीच्या अमूर्त स्वरूपाबाबत जागरूकता निर्माण करण्याचं एक माध्यम आहे. ''
ते या भाषणात म्हणतात, ''आपण ध्वजाला एक गुरू मानतो आणि गुरूपौर्णिमेला त्याचं पूजन करतो. आपण आपल्या ध्वजाकडे पाहतो तेव्हा आपल्या देशाचा संपूर्ण इतिहास, संस्कृती आणि परंपरा आपल्या नजरेसमोर येते. आपण ध्वजाकडे पाहतो तेव्हा आपलं हृदय भावनांनी उचंबळून येतं. त्यामुळे आपण आपल्या ध्वजाला गुरू मानतो.''
''कृष्णासारख्या स्वयंपूर्ण व्यक्तिमत्वाला देव किंवा अवतारांच्या समूहात ढकललं गेलंय. त्यामुळे त्यांच्यासारखं वर्तन करण्याची आपली क्षमता नाही अशी भावना निर्माण झालीय. श्रीराम आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते. रामायण, गीता, महाभारत हे महान ग्रंथ त्यांचे गुण अंगीकारण्यासाठी वाचले जात नाहीत. ते फक्त पुण्य मिळवण्यासाठी वाचले जातात. (सत्कर्मांचं फळ म्हणून.) ही किती संकुचित विचारसरणी आहे. ''
ते पुढे म्हणतात ''ही संकुचित विचारसरणी आपलं अधःपतन होण्याचं एक कारण आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळकांनादेखील अवतार मानलं जातंय.''
''आपल्या महापुरूषांना देव मानलं गेलंय ही फार विचित्र गोष्ट आहे. त्यामुळे कोणीही त्यांचे गुण अवलंबवण्याचा विचार ऐकत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण सर्वच ही काळजी आणि आपली जबाबदारी टाळण्याच्या कलेत पारंगत झालोय. ''
या लेखकांना अभ्यासक्रमातून काढलंय
शालेय अभ्यासक्रमातून साहित्य काढून टाकलेल्या लेखकांमध्ये पुरस्कारप्राप्त लेखक पी. लंकेश, सारा अबूबकर आणि ए. एन. मूर्ति राव यांचा समावेश आहे.
त्याऐवजी शिवानंद कलवे, एम. गोविंद राव, वैदिक शिक्षणतज्ज्ञ स्वर्गीय गोविंदाचार्य आणि सतवदनी आर. गणेश यांचं लेखन समाविष्ट केलं गेलंय.
या बदलाबद्दल सांगताना चक्रतीर्थ म्हणाले की, ''मुलांना लंकेश आणि मूर्ति राव यांच्या गोष्टी कंटाळवाण्या वाटत होत्या. त्यामुळे आम्ही नवीन नावं आणि नवीन कंटेंट आणायचा विचार केला.
तुम्हाला लंकेश यांच्या लेखनात काहीही तत्व दिसणार नाही. शिवाय पुस्तकात हे साहित्य खूप संक्षेपात आहे आणि त्यांचं साहित्यिक मूल्यही नाही. त्यामुळे आम्ही ते काढून टाकलं. ''
पुरोगामी शिक्षणतज्ज्ञ आणि 'नेवरहूड कॉमन स्कूल सिस्टम थ्रू स्टेट फंडेड पब्लिक एज्युकेशन' चे प्रमुख प्रवर्तक प्रोफेसर निरंजनराध्या वी. पी. यांना चक्रतीर्थांचं हे मत मान्य नाही.
''इतिहास शिकवण्याचा हेतूच मुळात लहान मुलांना स्वातंत्र्य संग्रामातल्या मूल्यांबद्दल जागरूक करण्याचा आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम जगभरात झालेल्या स्वातंत्र्यसंग्रामांच्या तुलनेत दीर्घकाळ चालला. त्यामुळे मुलांच्या मनामध्ये ही मूल्यं बिंबवणं खूप महत्त्वाचं आहे. पण हेडगेवार स्वातंत्र्यसंग्रामात कुठेही नव्हते,'' असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
''ते या तर्कावर मूर्ति राव यांचा धडा हटवतायत ही दुर्दैवाची बाब आहे. त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोनाबद्दल चर्चा केलीय. आपल्या संविधानातही त्यालाच महत्त्व दिलंय.''
''खरं सांगायचं तर सरकार महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करतंय. वर्गात सर्व प्रकारची मुलं येतात. त्यांची पार्श्वभूमी खूप वेगवेगळी असते. सगळ्या जाती आणि वर्गातली मुलं हे शिकतात. आपण त्यांना अशा गोष्टी वाचायला दिल्या तर त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होईल आणि त्यांच्यामध्ये दरी निर्माण होईल,'' ते पुढे म्हणाले.
''मागच्या दोन वर्षं किंवा त्या आधीपासूनच सरकारने आपली कार्यपद्धती बदललीय. आधी टिपू सुलतानाचा धडा काढून टाकला. पण आता टिपूला म्हैसूरचा टायगर म्हटलं जातंय तर त्यांना ते चालतंय. सत्य मोडून तोडून टाकण्याला झालेल्या विरोधानंतर हा दृष्टीकोन बदललाय. पूर्वी ते भगवीकरणाला थोडे बिचकत होते. पण आता खुलेआम भगवीकरण होऊ लागलंय.''
''ते पाठ्यपुस्तकांचं रूपांतर जाहीरनाम्यात करतायत, ही सगळ्यात काळजीची गोष्ट आहे. त्यांनी निवडणुकीच्या वर्षात याची सुरूवात केली. आता ते खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करतायत. राज्यात सहा हजार एक शिक्षकी शाळा आहेत. तिथे शालेय पाठ्यपुस्तकं पोहोचलेली नाहीयेत. अशा विषयांकडून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी अशा गोष्टींची चर्चा केली जातेय,'' असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








