‘द केरला स्टोरी’ ची अभिनेत्री अदा शर्माला का मिळत आहे जीवे मारण्याच्या धमक्या?

    • Author, मधु पाल
    • Role, बीबीसीसाठी
    • Reporting from, मुंबई

5 मे ला रिलीज झालेला चित्रपट ‘द केरला स्टोरी’ त्याचा ट्रेलर आला तेव्हापासूनच चर्चेत होती. हा चित्रपट त्यातल्या कथेमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकला.

दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांच्या या चित्रपटात त्या हिंदू महिलांची कहाणी दाखवली आहे ज्यांना धर्मांतर करून सीरियात नेण्यात आलं.

चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांचा दावा आहे का हा चित्रपट सत्यघटनांवर आधारित आहे.

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा उल्लेख निवडणूक प्रचारात व्हायला लागला तसा त्याबद्दलचा वाद अधिकच वाढला.

उत्तर प्रदेश, हरियाणासारख्या राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला तर पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली.

तामिळनाडूच्या अनेक थिएटर्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही, केरळातही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी झाली पण हायकोर्टाने याला नकार दिला.

कोण आहे अदा शर्मा

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्माही सध्या चर्चेत आहे.

या चित्रपटाची कथा तीन मुलींच्या अवतीभोवती फिरते. यातली मुख्य भूमिका अदा शर्माने केली आहे.

अदा शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय करतेय पण तिला पहिल्यांदाच इतकी लोकप्रियता लाभली आहे.

31-वर्षीय अदा मुंबईत लहानाची मोठी झाली आणि एका तामिळ ब्राह्मण कुटुंबातली आहे. 12 झाल्यानंतर अदाने मॉडलिंग करायला सुरुवात केली तसंच जिमनॅस्ट बनण्याचंही प्रशिक्षण घेतलं.

फिल्मी करियर

अदा कथ्थकसह सालसा नृत्यही करते. तिचा चित्रपटांमधला प्रवास इतका सोपा नव्हता. बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळण्याआधी तिने तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं.

निर्माता-दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या 2008 साली आलेल्या ‘1920’ या चित्रपटाने तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली.

अदाने ‘कमांडो 2’, ‘कमांडो 3’, ‘हसी तो फसी’ अशा चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका केली आहे.

दक्षिणेतल्या चित्रपटांमध्ये तिला जितकी लोकप्रियता मिळाली तितकी हिंदी चित्रपटांमध्ये मिळाली नाही.

अदाने ‘पुकार’, ‘द हॉलिडे’, ‘पति पत्नी और पंगा’, ‘ऐसा वैसा प्यार’ अशा वेबसीरिजमध्येही काम केलेलं आहे.

तिने आपलं नाव का बदललं?

अदा गेल्या 15 वर्षांपासून बॉलिवूडशी संबंधित आहे. तिने नुकतंच म्हटलं की तिचं खरं नाव अदा शर्मा नाहीये, तर तिचं पडद्यावरचं नाव आहे.

एका युट्यूबरला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिने म्हटलंय की तिचं खरं चामुंडेश्वरी अय्यर आहे.

तिने म्हटलं की बोलीभाषेत हे नाव उच्चारायला थोडं कठीण जाऊ शकतं म्हणून तिने आपलं नाव बदलण्याचा निर्णय घेतला.

15 वर्षांच्या करियरमध्ये पहिल्यांदा वादात

अदाला इंस्टाग्रामवर 73 लाख लोक फॉलो करतात.

ती अनेकदा सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते. त्या व्हीडिओमध्ये ते शास्त्रीय नृत्य आणि जिमनॅस्टिक्सचं नैपुण्य दाखवते.

अदा इंस्टाग्रावर सोलो ट्रॅव्हलिंगचा उल्लेख करते आणि आपल्या आजीबरोबर रंजक व्हीडिओ बनवते.

याआधीही अदा कधी तिच्या खाजगी आयुष्यावरून किंवा तिच्या चित्रपटांवरून चर्चेत आलेली आहे पण कधी वादात अडकली नव्हती.

पण ‘केरला स्टोरी’ चित्रपटामुळे तिच्या आयुष्याला नवं वळण मिळालं आहे.

नुकताच झाला होता अपघात

अदा शर्मा सध्या ‘केरला स्टोरी’ चित्रपटाच्या प्रमोशनात व्यग्र आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा अनेक ठिकाणी जाऊन आपल्या चित्रपटाचा प्रचार करत आहेत.

ते नुकतेच तेलंगणातल्या करीमनगर जात होते तर रस्त्यात त्यांचा अपघात झाला. यामुळे करीमनगर इथला कार्यक्रम रद्द झाला.

या घटनेची माहिती देताना सुदीप्तो सेन यांनी ट्विटरवर लिहिलं, “आम्ही चित्रपटाबद्दल बोलायला एका कार्यक्रमाला जात होतो, पण दुर्दैवाने एका तातडीच्या आरोग्यविषयक अडचणीमुळे आम्ही तिथे पोचू शकतो नाही. मी मनापासून करीमनगरच्या लोकांची माफी मागतो. हा चित्रपट आम्ही आपल्या मुलींना वाचवण्यासाठी बनवला आहे, प्लीज आम्हाला पाठिंबा द्या.”

अदा शर्मानेही सोशल मीडियावर याबद्दल लिहिताना म्हटलं की, “काळजी करण्यासारखं काही नाही, मी ठीक आहे.”

तिने लिहिलं, “मित्रांनो, आमच्या अपघाताची बातमी व्हायरल झाल्यानंतर खूप साऱ्या लोकांचे मेसेज आम्हाला येत आहेत. आमची टीम आणि आम्ही एकदम बरे आहोत. कोणताही मोठा अपघात झालेला नाही. तुम्हा सगळ्यांचे आभार.”

अदा शर्माला का मिळत आहेत धमक्या?

‘द केरला स्टोरी’ बदद्ल लोकांची वेगवेगळी मतं आहेत. एका बाजूला लोक या चित्रपटाला सत्य म्हणत आहेत तर दुसरीकडे या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोधही होत आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांचं म्हणणं आहे की त्यांना धमक्या मिळत आहेत.

अदा शर्मालाही धमक्या मिळत आहेत. तिने एका मुलाखतीत बोलताना म्हटलं की, जसं आम्हाला लोकांचं प्रेम मिळतंय, तसंच आम्हाला धमक्याही मिळत आहेत.

अदा शर्मालाही धमक्या मिळत आहेत. तिने एका मुलाखतीत बोलताना म्हटलं की जसं आम्हाला लोकांचं प्रेम मिळतंय तसंच आम्हाला धमक्याही मिळत आहेत.

“आमच्या निर्मात्यांना याला तोंड द्यावं लागतंय. जीवे मारण्याची धमकी मिळणं हा घाबरवून टाकणारा अनुभव आहे. मला पूर्ण जगातून लोकांचं प्रेम मिळतंय. लोकांचं प्रेम पाहून असं वाटतंय की माझ्या आजूबाजूला अदृश्य चादर आहे जी माझं संरक्षण करतेय. त्यामुळे मला सुरक्षित वाटतंय.”

‘द केरला स्टोरी’ 5 मेला चित्रपटगृहांमध्ये रिलिज झालेला आहे. अदा शर्माशिवाय यात योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या चित्रपटाचे निर्माते विपुल शाह आहेत.

चित्रपटावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर अदाचं उत्तर

17 मेला मुंबईत झालेल्या एक पत्रकार परिषदेत विपुल शाह, सुदीप्तो सेन, चित्रपटातल्या चारी अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी तसंच केरळमधल्या त्या 26 मुली, ज्यांच्या बाबतीत धर्मपरिवर्तनाचा दावा केला जातोय, त्या उपस्थित होत्या.

या पत्रकार परिषदेत अदा शर्माने त्या मुलींचं दुःख सांगताना म्हटलं, “मला दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी एक व्हीडिओ दाखवला होता. त्यात महिलांना मुलांना टँकरमध्ये असं भरलं जात होतं जसे वॉशिंगमशीनमध्ये कपडे भरले जातात.”

“त्या 16 तास टँकरमधून अशाच प्रकारे प्रवास करत असतात. त्यांना श्वासही घेता येत नाही. त्यांना जेव्हा टँकरमधून बाहेर काढलं जातं तेव्हा त्या अर्धमेल्या झालेल्या असतात. तुम्ही ज्या रेकॉर्डच्या गोष्टी करता, ते नसतं. त्यांचं कोणतंही रेकॉर्ड नव्हतं.”

“ज्या मुलांना पुढे अतिरेकी बनवता येऊ शकतं, त्या ठेवतात. ज्या महिलांना सेक्स गुलाम बनवलं जाऊ शकतं, त्यांनाही ठेवतात. जे नको आहेत त्यांना वाळवंटाच सोडून दिलं जातं.”

अदा शर्माने म्हटलं की ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून तिला गर्व आहे. या सिनेमात तीन मुली दाखवल्या आहेत ज्यांचं आधी ब्रेनवॉश करून धर्मांतर केलं जातं.

यानंतर या मुलींना कट्टरतावादी संघटना आयसीसमध्ये सहभागी होण्यासाठी भाग पाडलं जातं.

या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आधी म्हटलं होतं की 32 हजार मुलींचं धर्मांतर करून त्यांना कथितरित्या इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी केलं.

पण नंतर निर्माता आणि दिग्दर्शक यांनी 32 हजार हा आकडा हटवून ‘तीन मुलींची खरी कहाणी’ असं लिहिलं.

बॉक्स ऑफिसची कमाई

‘द केरला स्टोरी’ ने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसची चांगली पकड घेतली आहे. एका बाजूला चित्रपटाबद्दल वाद होत असतानाच चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढत होते.

प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या 11 दिवसाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत.

त्यांच्यानुसार ‘द केरला स्टोरी’ ची एकूण कमाई आतापर्यंत 147.04 कोटी रूपये इतकी आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)