भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये भारताची लढाऊ विमाने पाडण्यात आली? CDS जनरल अनिल चौहान यांनी अखेर दिलं उत्तर

फोटो स्रोत, Getty Images
काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये लष्करी संघर्ष पहायला मिळाला. या लष्करी संघर्षादरम्यान भारताच्या लढाऊ विमानांना नुकसान पोहोचवण्यात आल्याचाही दावा करण्यात आला होता. आता याच दाव्यांबाबत भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी उत्तर दिलं आहे.
सीडीएस जनरल चौहान यांनी आज शनिवारी (31 मे) ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत वक्तव्य केलं आहे.
"किती विमानांचं नुकसान झालं हे जाणून घेण्यापेक्षा ते नुकसान का झालं, हे जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे," या मुद्द्यावर त्यांनी अधिक भर दिला. मात्र, त्यांनी पाकिस्तानकडून सहा विमानांना नुकसान पोहोचवण्यात आल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला.
सीडीएस अनिल चौहान यांनी म्हटलं की, "जेट पाडण्यात आले, हे जास्त महत्त्वाचं नसून ते का पाडण्यात आले, हे महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं."
मात्र, सीडीएस चौहान यांनी विमानांच्या संख्येबाबत कोणतंही उत्तर दिलेलं नाही.
सीडीएस अनिल चौहान हे सध्या 'शांगरी-ला डायलॉग'मध्ये सहभागी होण्यासाठी सिंगापूरला गेले आहेत. तिथेच त्यांनी 'ब्लूमबर्ग'ला ही मुलाखत दिली आहे.
याआधी याच महिन्याच्या सुरुवातीला तिन्ही सैन्यदलांच्या प्रतिनिधींनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये एअर मार्शल ए. के. भारती यांनी म्हटलं होतं की, "आपण युद्धात आहोत आणि नुकसान होणं, हा त्याचाच एक भाग आहे."
पाकिस्तानने वारंवार हा दावा केला आहे की, त्यांनी या संघर्षादरम्यान भारताची एकापेक्षा अधिक लढाऊ विमाने पाडलेली आहेत. मात्र, भारताने हे दावे नेहमीच फेटाळून लावलेले आहेत.
जनरल अनिल चौहान यांनी आणखी काय म्हटलं?
या महिन्यात पाकिस्तानबरोबर चार दिवस चाललेल्या लष्करी संघर्षामध्ये भारताचं एखादं लढाऊ विमान पाडण्यात आलं होतं का, असा प्रश्न सीडीएस अनिल चौहान यांना याच मुलाखतीमध्ये विचारण्यात आला.
'ब्लूमबर्ग टीव्ही'ने याच मुलाखतीतील एक मिनीट पाच सेकंदांचा एक व्हीडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
'पाकिस्तानचा असा दावा आहे की, त्यांनी एकापेक्षा अधिक भारतीय विमाने पाडलेली आहेत. तुम्ही याबाबत पुष्टी करु शकता का,' असा सवाल 'ब्लूमबर्ग टीव्ही'च्या पत्रकाराने जनरल अनिल चौहान यांना केल्याचं या व्हीडिओमध्ये दिसून येतंय.
या प्रश्नाचं उत्तर देताना जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं की, "जेट पाडण्यात आलं, हे महत्त्वाचं नाही, तर ते का पाडलं हे महत्त्वाचं आहे."

फोटो स्रोत, ANI
या उत्तरावर पत्रकाराने त्यांना पुन्हा एकदा विचारलं की, "किमान एक जेट पाडण्यात आलं. हे खरंच असं घडलंय का?"
जनरल अनिल चौहान यांनी यावर म्हटलं की, "हो, का पाडण्यात आलं? चांगली गोष्ट अशी आहे की, आम्ही आमच्या रणनीतिक चुका ओळखू शकलो, आम्ही त्या सुधारल्या आणि त्यानंतर आम्ही त्या दोन दिवसांनंतर अंमलात आणल्या. त्यानंतर आम्ही आमची सगळी विमाने उडवली आणि दूरवरच्या ठिकाणांना लक्ष्य केलं."
'ब्लूमबर्ग टीव्ही'च्या पत्रकाराने पुन्हा एकदा म्हटलं की, "पाकिस्तानचा असा दावा आहे की, भारताची सहा लढाऊ विमाने पाडण्यात त्यांना यश आलं. त्यांचं हे म्हणणं बरोबर आहे का?"
यावर प्रत्युत्तर देताना जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं की, "ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. मात्र, जसं आधी मी म्हटलं की, ही माहिती बिलकूल महत्त्वाची नाहीये. महत्त्वाचं हे आहे की, हे जेट का पाडण्यात आले आणि त्यानंतर आम्ही काय केलं. हे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे."
याआधी सैन्यानं काय म्हटलं होतं?
7 मे रोजी पाकिस्तानी सैन्यानेही असा दावा केला होता की, त्यांनी भारताच्या हल्ल्याचा बदला घेत भारताची पाच लढाऊ विमाने पाडलेली आहेत.
त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी असा दावा केला की, पाकिस्तानच्या हवाई दलाने सहा भारतीय विमानांना पाडलं आहे. यामध्ये, काही फ्रान्सनिर्मित राफेल विमानेदेखील सामील आहेत.
वृत्तसंस्था रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमध्ये पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी म्हटलं की, "आतापर्यंत, मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की पाच भारतीय विमाने पाडण्यात आली आहेत. ज्यामध्ये, तीन राफेल, एक एसयू-30 आणि एक मिग-29 यांचा समावेश आहे - आणि एक हेरॉन ड्रोनदेखील पाडण्यात आलंय."

फोटो स्रोत, Getty Images
या दाव्याबद्दल भारताकडून कोणतंही प्रत्युत्तर देण्यात आलेलं नव्हतं. मात्र, 11 मे रोजी पाकिस्तानबरोबर झालेल्या संघर्षाबाबत तिन्ही सैन्य दलांच्या प्रतिनिधींनी एक पत्रकार परिषद घेऊन 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माहिती दिली होती. यामध्ये, हवाई दलाकडून डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, डीजीएओ (एअर ऑपरेशन्स) एअर मार्शल ए.के. भारती आणि नौदलाकडून डीजीएनओ (नौदल ऑपरेशन्स) व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद आणि मेजर जनरल एस.एस. शारदा उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेदरम्यान, राफेल पाडण्यात आल्याच्या पाकिस्तानचा दाव्याबाबत एअर मार्शल ए. के. भारती यांनी म्हटलं की, "आपण युद्धाच्या परिस्थितीत आहोत आणि नुकसान होणं त्याचाच एक भाग आहे. तुम्ही जो प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, तो हा आहे की, काय आपण आपली उद्दिष्ट्यं पूर्ण करु शकलो आहोत? दहशतवादी छावण्या नष्ट करण्याचं आपलं उद्दिष्ट आपण साध्य केलं आहे का? आणि त्याचं उत्तर 'हो' असं आहे."
"मी फक्त एवढंच सांगू शकतो की, आम्ही आमचं ठरवलेलं उद्दिष्ट साध्य केलं आहे आणि आमचे सर्व वैमानिक घरी परतले आहेत," असंही त्यांनी म्हटलं होतं.
भारतातही उपस्थित झाले होते प्रश्न
पाकिस्तानसोबत झालेल्या लष्करी संघर्षामध्ये भारताच्या लढाऊ विमानांना झालेल्या नुकसानाबाबत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही सरकारला प्रश्न विचारुन धारेवर धरलं होतं.
भारत-पाकिस्तान संघर्षाचा आढावा घेण्यासाठी सरकारने एक पुनरावलोकन समिती स्थापन करावी, जी या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करेल, असं काँग्रेसचं म्हणणं होतं.
'भारताने आपली किती विमाने या संघर्षात गमावली आहेत?' असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विचारला होता.

फोटो स्रोत, Getty Images
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये कट्टरतावादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला होता. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलं होतं. भारताने केलेल्या या आरोपांना पाकिस्तानने फेटाळून लावलं होतं.
या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सहा आणि सात मे दरम्यानच्या रात्रीमध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील एकूण नऊ ठिकाणांवर हल्ले केले होते. सात मे रोजी सायंकाळी एका पत्रकार परिषदेमध्ये भारतीय लष्कराने याबाबतची माहिती दिली होती.
भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितलं की, भारताच्या सशस्त्र दलांनी 6-7 मे 2025 च्या रात्री 1 वाजून 5 मिनिटे झाल्यापासून ते दीड वाजेपर्यंतच्या दरम्यान 'ऑपरेशन सिंदूर' पार पाडलं. यामध्ये, नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं आणि त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आलं.
विरोधकांची मागणी
सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी 'ब्लूमबर्ग टीव्ही'ला दिलेली ही मुलाखत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.
हा व्हीडिओ शेअर करत असतानाच त्यांनी लिहिलं आहे की, 29 जुलै 1999 रोजी तत्कालीन वाजपेयी सरकारने विद्यमान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे वडिल आणि धोरणात्मक बाबींमधील तज्ज्ञ के. सुब्रह्मण्यम यांच्या अध्यक्षतेखाली 'कारगील पुनरावलोकन समिती'ची स्थापना केली होती.
कारगील युद्ध समाप्त झाल्याच्या तीन दिवसांनंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती आणि या समितीने पाच महिन्यांमध्ये आपला सविस्तर अहवाल सादर केला होता.

फोटो स्रोत, ANI
आवश्यक सुधारणांनंतर, 'फ्रॉम सरप्राइज टू रेकनिंग' हा अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला.
त्यानंतर, जयराम रमेश यांनी असा प्रश्न केला की, सिंगापूरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनी दिलेल्या माहितीनंतर, मोदी सरकार आता असं एखादं पाऊल उचलणार आहे का?
दुसऱ्या बाजूला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिलंय की, सरकारने या प्रकरणी चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष सत्र बोलवावं.
मोदी सरकारने देशाची दिशाभूल केली होती, मात्र आता धुकं बाजूला सरलेलं आहे, असंही त्यांनी लिहिलं आहे.
यासोबतच, काँग्रेस अध्यक्षांनी असंही लिहिलं आहे की, कारगील पुनरावलोकन समितीच्या धर्तीवर, देशाच्या संरक्षण तयारीचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र तज्ञ समितीच्या स्थापनेची मागणी काँग्रेस करत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











