बर्ड फ्लूमुळे लाखो पक्ष्यांचा बळी; 48% मृत्यूदरासह माणसालाही धोका, भारतीय संशोधकांचं मॉडेल काय सांगतं?

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ऑगस्टच्या अखेरीपासून अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे 20 लाखांहून अधिक टर्की पक्षी मारले गेले आहेत.

अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ असा इशारा देत आहेत की, 'H5N1' या नावाने ओळखला जाणारा बर्ड फ्लू हा विषाणू कधीतरी पक्ष्यांकडून मानवांमध्ये प्रवेश करून जागतिक आरोग्याचे संकट निर्माण करू शकतो.

एव्हियन फ्लू (बर्ड फ्लू) हा इन्फ्लूएंझाचा एक प्रकार असून तो दक्षिण आशिया आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात चीनमध्ये उगम पावल्यापासून या विषाणूची मानवांना अधूनमधून लागण होत आहे.

2003 ते ऑगस्ट 2025 या काळात जागतिक आरोग्य संघटनेने 25 देशांमध्ये H5N1 च्या 990 मानवी संसर्गाची नोंद केली आहे, त्यामध्ये 475 मृत्यू झाले आहेत म्हणजेच मृत्यूचे प्रमाण 48 टक्के इतके जास्त आहे.

एकट्या अमेरिकेत या विषाणूचा फटका 18 कोटींहून अधिक पक्ष्यांना बसला आहे. 18 राज्यांमधील 1000 हून अधिक दुभत्या जनावरांच्या कळपांमध्ये तो पसरला आहे आणि किमान 70 लोकांना (बहुतेक शेतमजूर) याची लागण झाली आहे.

नागपूर शहरातील वन्यजीव बचाव केंद्रात जानेवारी महिन्यात तीन वाघ आणि एका बिबट्याचा या विषाणूमुळे मृत्यू झाला.

मानवांमध्ये याची लक्षणे तीव्र फ्लूसारखी असतात. खूप ताप, खोकला, घसा खवखवणे, स्नायू दुखणे आणि कधीकधी डोळे येणे यांचा त्यात समावेश असतो. काही लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

सध्या मानवांसाठी याचा धोका कमी असला तरी, हा विषाणू अधिक सहजपणे पसरू शकेल असा बदल त्यात होतोय का, यावर यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

याच काळजीपोटी अशोका विद्यापीठाचे भारतीय संशोधक फिलिप चेरियन आणि गौतम मेनन यांनी एक नवीन मॉडेल तयार केले आहे.

H5N1 चा उद्रेक मानवांमध्ये कसा होऊ शकतो आणि तो पसरण्यापूर्वी कोणत्या उपाययोजनांद्वारे थांबवता येईल, याचे विश्लेषण यामध्ये करण्यात आले आहे.

सोप्या भाषेत सांगायचे तर, 'बीएमसी पब्लिक हेल्थ' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या मॉडेलमध्ये प्रत्यक्ष जगातील माहिती आणि संगणक सिम्युलेशनचा वापर करून हा आजार प्रत्यक्ष आयुष्यात कसा पसरू शकतो, हे पाहिले गेले आहे.

प्रोफेसर मेनन यांनी बीबीसीला सांगितले की, "मानवांमध्ये H5N1 महामारीचा धोका खरा आहे, परंतु चांगल्या देखरेखीमुळे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या तत्परतेमुळे आपण ती रोखू शकतो."

संशोधकांचे म्हणणे आहे की, बर्ड फ्लूची महामारी शांतपणे सुरू होईल. एक संक्रमित पक्षी मानवाला (शेतकरी, बाजारातील कामगार किंवा कुक्कुटपालन हाताळणारी व्यक्ती) विषाणू देईल.

खरा धोका त्या पहिल्या संसर्गात नसून त्यानंतर काय होते यात आहे: म्हणजेच विषाणूचा मानवाकडून मानवाकडे होणारा सततचा प्रसार.

वास्तविक उद्रेक सुरू होतो तेव्हा माहिती अपूर्ण असते, म्हणून संशोधकांनी 'भारतसिम' (BharatSim) या ओपन-सोर्स सिम्युलेशन प्लॅटफॉर्मचा वापर केला. हे प्लॅटफॉर्म मूळतः कोव्हिड-19 साठी बनवले होते, पण ते इतर रोगांच्या अभ्यासासाठीही उपयुक्त आहे.

वेळ महत्त्वाचा

संशोधकांचं म्हणणे आहे की, धोरणकर्त्यांसाठी सर्वात महत्त्वाचा धडा हा आहे की, उद्रेक नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी कारवाई करण्यासाठी खूपच कमी वेळ मिळतो.

या संशोधनात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की, रुग्णसंख्या साधारण दोन ते दहा इतकी झाली. आजाराचा प्रसार केवळ थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींपुरता (प्राथमिक व दुय्यम संपर्क) मर्यादित न राहता त्यापलीकडेही वेगाने पसरू लागण्याची शक्यता वाढते.

'प्राथमिक संपर्क' म्हणजे संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेले लोक (उदा. घरातील सदस्य किंवा काळजीवाहू). 'दुय्यम संपर्क' म्हणजे असे लोक जे रुग्णाला भेटले नाहीत, परंतु प्राथमिक संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या जवळ आले आहेत.

अभ्यासात असे दिसून आले की, फक्त दोन रुग्ण आढळल्यावरच प्राथमिक संपर्कांच्या कुटुंबांना क्वारंटाईन केले, तर हा उद्रेक नक्कीच रोखला जाऊ शकतो. पण 10 रुग्ण सापडेपर्यंत संसर्ग मोठ्या लोकसंख्येत पसरलेला असतो, त्यानंतर तो रोखणे कठीण होते.

तामिळनाडूतील गावाचा अभ्यास

हा अभ्यास वास्तवाशी सुसंगत ठेवण्यासाठी, संशोधकांनी तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यातील एका गावाचे मॉडेल निवडले, जो भारताचा कुक्कुटपालनाचा मुख्य भाग आहे. नामक्कलमध्ये 1,600 हून अधिक पोल्ट्री फार्म्स आणि सुमारे 7 कोटी कोंबड्या आहेत; येथे दररोज 6 कोटींहून अधिक अंडी तयार होतात.

9,667 रहिवाशांचे एक 'सिंथेटिक' (कृत्रिम) गाव संगणकावर तयार करण्यात आले आणि त्यात संक्रमित पक्षी सोडले गेले.

या सिम्युलेशनमध्ये विषाणू एका कामाच्या ठिकाणाहून (फार्म किंवा मार्केट) सुरू होतो, तिथे काम करणाऱ्या लोकांमध्ये पसरतो आणि नंतर त्यांच्या घर, शाळा आणि कामाच्या ठिकाणांद्वारे इतरांपर्यंत पोहोचतो.

संशोधनातून स्पष्ट होतं की आजाराचा प्रसार केवळ एका ठिकाणापुरता मर्यादित न राहता, दैनंदिन मानवी व्यवहारांच्या साखळीमधून तो किती वेगाने विस्तारू शकतो, याचे हे एक ठोस चित्र आहे.

यामध्ये बाधित पक्ष्यांचा नायनाट करणे, संक्रमित व्यक्तींच्या जवळच्या संपर्कांना क्वारंटाइन करणे, तसेच ठराविक भागांमध्ये लसीकरण करणे असे उपाय कधी आणि कसे लागू केले तर त्याचा प्रसारावर काय परिणाम होतो, याची चाचणी घेण्यात आली.

या अभ्यासातून योग्य वेळी आणि अचूक उपाययोजना केल्यास संभाव्य साथ नियंत्रणात ठेवता येऊ शकते, हे अधोरेखित होते.

काय उपाययोजना काम करतात?

संशोधकांनी पक्षी मारणे (culling), जवळच्या संपर्कांना क्वारंटाईन करणे आणि लसीकरण अशा विविध उपायांची चाचणी केली. त्याचे निष्कर्ष स्पष्ट होते.

पक्षी मारणे (Culling) हे तेव्हाच फायदेशीर ठरते जेव्हा विषाणू मानवापर्यंत पोहोचण्यापूर्वी केले जाते.

क्वारंटाईन जर संसर्ग मानवात पसरला, तर रुग्णांना विलग करणे आणि कुटुंबांना क्वारंटाईन करणे यामुळे दुसऱ्या टप्प्यावर विषाणू थांबवता येतो.

पण जर संसर्ग तिसऱ्या टप्प्यावर (मित्रांचे मित्र) पोहोचला, तर लॉकडाऊनसारख्या कडक उपायांशिवाय तो नियंत्रणाबाहेर जातो.

लसीकरणामुळं विषाणूचा प्रसार होण्याचा वेग कमी होण्यास मदत होते.

काही मर्यादा आणि भविष्यातील आव्हाने

या सिम्युलेशनमधून एक अवघड तडजोडही समोर आली आहे. क्वारंटाइन जर फारच लवकर लागू केले, तर कुटुंबातील सदस्य दीर्घकाळ एकत्र राहतात.

त्यामुळं घरातच संसर्ग पसरायची शक्यता वाढते. उलट, क्वारंटाइन उशिरा लागू केल्यास त्याचा साथीचा वेग कमी करण्यावर जवळजवळ काहीच परिणाम होत नाही.

संशोधकांनी स्पष्ट केले आहे की या पद्धतीला काही मर्यादा आहेत. हे मॉडेल एका कृत्रिम (सिंथेटिक) गावावर आधारित आहे, जिथे घरांची संख्या, कुटुंबाचा आकार, कार्यस्थळे आणि दैनंदिन हालचाली ठराविक स्वरूपाच्या मानल्या आहेत.

प्रत्यक्ष परिस्थितीत स्थलांतरित पक्ष्यांमुळे किंवा कुक्कुटपालनाच्या विस्तृत जाळ्यांमधून एकाच वेळी अनेक ठिकाणी उद्रेक होण्याची शक्यता असते, ती या अभ्यासात गृहीत धरलेली नाही.

तसेच, लोकांना पक्ष्यांमध्ये मृत्यू होत असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांचे वर्तन बदलू शकते जसे की मास्क वापरणे किंवा संपर्क टाळणे.

अशा मानवी प्रतिक्रिया या मॉडेलमध्ये समाविष्ट केलेल्या नाहीत. त्यामुळे हे निष्कर्ष दिशा दाखवणारे असले, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना वास्तवातील गुंतागुंत लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे ठरते.

इमोरी युनिव्हर्सिटीच्या विषाणूशास्त्रज्ञ सीमा लकडावाला म्हणतात की, फ्लूचा प्रत्येक प्रकार सारख्याच वेगाने पसरत नाही. काही लोक 'सुपर-स्प्रेडर' असू शकतात, तर काही लोकांमुळे प्रसार कमी होतो.

विषाणूचा प्रसार ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. प्रत्येक इन्फ्लुएन्झा स्ट्रेनचा प्रसार करण्याचा वेग आणि क्षमता समान नसते," असे त्या सांगतात.

शिवाय, हंगामी फ्लूच्या बाबतीतही सर्व संक्रमित व्यक्ती समान प्रमाणात विषाणू पसरवतातच असे नाही, हे आता संशोधनातून स्पष्ट होत आहे.

नवीन अभ्यासांनुसार, फ्लूची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या लोकांपैकी केवळ काही मोजकेच लोक प्रत्यक्षात हवेत संसर्गजन्य इन्फ्लुएन्झा विषाणू सोडतात.

म्हणजेच, संसर्ग असला तरी प्रत्येक व्यक्ती तितकीच धोकादायक ठरत नाही. ही बाब लक्षात घेतली, तर अशा सिम्युलेशन मॉडेलचे निष्कर्ष समजून घेताना वास्तवातील जैविक आणि मानवी फरक लक्षात घेणे अत्यावश्यक ठरते.

H5N1 मानवांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला तर?

डॉ. लकडावाला यांच्या मते, ही परिस्थिती कोव्हिड-19 पेक्षा 2009 च्या स्वाइन फ्लू महामारीसारखी असू शकते. याचे कारण म्हणजे आपण फ्लूच्या महामारीसाठी अधिक सज्ज आहोत. आपल्याकडे यावर प्रभावी औषधे आणि लसींचा साठा उपलब्ध आहे.

पण गाफील राहणे चुकीचे ठरेल. जर हा विषाणू मानवांमध्ये स्थिरावला, तर तो अस्तित्वात असलेल्या इतर फ्लूच्या विषाणूंशी मिसळून अधिक घातक रूप घेऊ शकतो.

संशोधकांचे म्हणणे आहे की, ही मॉडेल्स रिअल-टाइममध्ये वापरली जाऊ शकतात. यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांना आजाराच्या सुरुवातीच्या काळात कोणते पाऊल उचलणे सर्वात महत्त्वाचे आहे, हे समजण्यास मदत होईल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.