दोन विद्यार्थ्यांचा कॉलेजमधील प्रकल्प, ज्यानं जग बदललं; 'गूगल'चा थरारक प्रवास जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images
'पप्पा, मेल्यानंतर आपलं काय होतं?'
'मला माहित नाही, बाळा. याचं उत्तर कोणालाच ठोसपणे सांगता येणार नाही.'
'त्यापेक्षा तू सरळ गूगलला का विचारत नाहीस?'
सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही गूगलवर सापडतील, असा समज घेऊन आजची पिढी लहानाची मोठी झालेली आहे. हे सहाजिकच म्हणावं लागेल.
'पप्पा, चंद्र आपल्या पृथ्वीपासून किती लांब आहे?'
'जगातला सर्वात मोठा मासा कोणता?'
'विज्ञान कथेत दाखवले जाणारे जेटपॅक्स खरंच अस्तित्वात आहेत का?'
माझ्या लहान मुलाला सतत असे नवनवे प्रश्न पडत असतात. त्याचं वय पाहता ही जिज्ञासू वृत्ती चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल. आणि त्याची ही जिज्ञासा आज एका क्लिकवर, टचवर भागली जाते, हे एक माझ्यासाठी वरदानच आहे. नाहीतर आमच्या काळी असा काही प्रश्न पडला की त्याचं उत्तर शोधायला सरळ ग्रंथालयाची वाट धरावी लागायची. मग ग्रंथालयात संबंधित पुस्तक शोधून त्यातील पुन्हा आपल्याला हवी असलेली माहिती मिळवणं हे मोठं जिकिरीचं काम असायचं.
गूगलवर वाढलेल्या आजच्या तरूण पिढीला तर गूगलशिवाय चालत असलेल्या या जगाची कल्पनाही करता येणार नाही. गूगल हा जणू आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. काहीही प्रश्न पडला की पुढच्या सेकंदाला त्याचं उत्तर घेऊन गूगल आपल्या सेवेला हजर असतो.
मृत्यूनंतर जीवन असतं का? असा किचकट आणि गूढ प्रश्नांचं उत्तर कदाचित गूगलकडे नसेल. पण 'जीवन' व 'मृत्यू' इत्यादी शब्द आपल्या संवादामध्ये येत नसतील त्यापेक्षा जास्त वेळा 'गूगल' हा शब्द आपल्या संवादात येतो. तो आज आपल्या संवादात सर्वात जास्त वेळा उच्चारला जाणारा शब्द आहे, असा दावा ब्रिटनमधील लॅनकॅस्टर विद्यापीठातील संशोधक करतात.
लोकांच्या दैनंदिन आयुष्यात इतकं अढळ स्थान गूगलनं फक्त 20 वर्षात कमावलंय. स्टॅनफर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेला हा एक संशोधन प्रकल्प आज जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी माहितीचा प्रमुख स्त्रोत बनलेला आहे. गूगल वापरत नसेल अशी कोणती व्यक्ती आज जगात शोधूनही सापडणार नाही.
गूगलच्या आधी देखील सर्च इंजिन तंत्रज्ञान अस्तित्वात होतं. पण त्याबद्दल आपण कधी ऐकलंही नाही ही गोष्टच गूगलचं यश अधोरेखित करते. गूगलच्या आधीचे सर्च इंजिन्स हे अतिशय प्राथमिक स्वरूपाचे होते. त्यात अनेक मर्यादा आणि त्रुटी होत्या. उदाहरणार्थ 1998 साली तुम्ही तेव्हाच्या लायकोस या सर्च इंजिनमध्ये कार हा शब्द टाईप करुन शोध घेतला असता तर परिणाम म्हणून तुमच्यासमोर कार ऐवजी पॉर्न वेबसाईट्सचे पेजेस आले असते.
कारण? त्यावेळी पॉर्न वेबसाईट चालवणाऱ्या मालकांनी लायकोसची मर्यादा हेरून नेहमी सर्च केलेले जाणारे कारसारखे लोकप्रिय शब्द आपल्या वेबसाईटवर आधीच टाकलेले होते. आता लायकोसचं अल्गोरिदम फारच प्राथमिक स्वरूपाचं होतं. त्यामुळे कार म्हटल्यावर ज्या वेबसाईट्सवर कारचा उल्लेख जास्त वेळा आलेला आहे अशा वेबसाईट्स ते यूजरला दाखवत असे. थोडक्यात लायकोसला गंडवून यूजरला नको असलेल्या गोष्टी दाखवणं फार सोप्पं होतं. त्यामुळे कार बघायला गेल्यानंतर कार ऐवजी पॉर्न यूजर्ससमोर येण्याच्या घटना हमखास घडत असतं. आज हे हास्यास्पद वाटत असलं तरी गूगलच्या आधी अस्तित्वात असलेले सर्च इंजिन्स किती मागास होते, याची कल्पना आपल्याला यावरून येऊ शकते.
लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे गूगलचे संस्थापक खरंतर आधी अधिक चांगल्या दर्जाचं नवीन सर्ज इंजिन विकसित करण्यासाठी अजिबात इच्छुक नव्हते. स्टॅनफर्ड विद्यापीठात शिकत असताना या दोन विद्यार्थ्यांनी सुरू केलेला हा एक संशोधन प्रकल्प होता. खरंतर विद्यापीठातील संशोधन प्रकल्पासाठी सर्च इंजिन विकसित करण्याचा प्रयत्न तसा अवघडच होता.
कारण या विषय अकादमिक वर्तुळात फारसा नावाजलेला नव्हता. एकतर कुठलंही नवीन संशोधन करताना त्याआधी या विषयावर जे काही जुने संशोधन झालेले आहेत, ते बरेच कामी येतात. त्यांचा उल्लेख आपल्या संशोधनात संदर्भ देण्यासाठीही कामी येतो. सर्च इंजिन या विषयावर जुनं अकादमीक लिखाण लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांना संदर्भासाठी मिळणं अवघड होतं. कारण अकादमीक वर्तुळात हा विषय तसा फारसा गंभीरपणे घेतला जायचा नाही.
शिवाय तुम्ही केलेल्या संशोधनाचाही संदर्भ म्हणून उल्लेख इतर संशोधनात होत असेल तर तुमच्या संशोधनाला आणखी वजन प्राप्त होतं. हा विषयच इतका नवखा असल्यामुळे आपण करत असलेल्या विषयावर आणखी कोणी संशोधन करेल आणि आपल्या संशोधनाचा त्यात दाखला दिला जाईल, ही आशाही लॅरी पेज आणि सर्जी ब्रिनसाठी अगदीच शून्य होती. त्यामुळे सुरुवातीला सर्च इंजिन हा विषय संशोधन प्रकल्पासाठी निवडावा की नाही, याबाबत त्यांना संकोच होता. मात्र हा संकोच मागे टाकून त्यांनी शेवटी नवं सर्च इंजिन विकसित करायचं ठरवलं.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, यात अनेक अडचणी होत्या. आपल्या संशोधनाला विश्वासार्हता प्राप्त व्हावी म्हणून संदर्भ गोळा करायला लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन वर्ल्ड वाईड वेब वर गेले असता तिथे हे संदर्भ मिळवणं फारच अवघड होतं. त्यासाठी आधी लॅरी पेज आणि सर्जी ब्रिनला संपूर्ण इंटरनेट डाऊनलोड करावं लागलं.
यामुळे हे दोघे वेगळ्याच अडचणीत सापडले. तेव्हा तर इंटरनेटही अजून प्राथमिक स्तरावर होतं. त्यामुळे इतक्या प्रमाणात मजकूर डाऊनलोड करायला घेतल्याचा सहाजिकच परिणाम स्टॅनफर्डमधील इंटरनेट सुविधेवर झाला. या दोघांनीच त्यावेळी स्टॅनफर्डची अर्धी बॅन्डविड्थ वापरली.
एकाच ठिकाणावरून इतक्या मोठ्या प्रमाणावर डाऊनलोडिंग सुरू झाल्यावर स्टॅनफर्डला इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या इराटे वेबमास्टर्स या कंपनीनं देखील या दोघांची तक्रार विद्यापीठाकडे केली. गूगल बनवायला घेतलेल्या लॅरी पेज आणि सर्जी ब्रिनमुळे त्यांच्या सर्व्हवर अतिरिक्त ताण पडत होता.
पण जसजसं पेज आणि ब्रिन यांनी त्यांच्या सर्च इंजिनचा अल्गोरिदम अधिकाधिक विकसित केला तसतसे त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आणि या सगळ्या तक्रारी कौतुकाच्या सुरात बदलत गेल्या. इंटरनेट वापरकर्त्यांना वेबवर काहीही शोधण्याची नवी उपयुक्त पद्धत त्यांनी शोधून काढल्याचा उलगडा जगाला होऊ लागला होता.

फोटो स्रोत, Getty Images
आधीच्या सर्च इंजिनमध्ये कारचा शोध घेतल्यावर ढिगाने कारचा उल्लेख असलेल्या पॉर्न वेबसाईट्स उघडायच्या. पण कार हा शब्द आता गूगल सर्च इंजिनमध्ये टाईप केल्यावर चक्क कारच दिसू लागल्या. गूगल हे सर्च इंजिन अधिक अचूक आणि गंडवायला अधिक अवघड होतं.
त्यामुळे लवकरच लॅरी पेज आणि सर्जी ब्रिनला गुंतवणूकदार मिळाले. बक्कळ भांडवल पाठीशी आल्यानंतर स्टॅनफर्डमधील या विद्यार्थी संशोधन प्रकल्पाचं रुपांतर एका खासगी कंपनीत झालं. आज ही जगातील सर्वात बलाढ्य कंपनी आहे. गूगलचा फक्त नफाच अब्जावधींच्या घरात आहे.
पण सुरुवातीच्या या काही वर्षांत पेज आणि सर्जीला या गुंतवणूकीवर परतावा मिळवून देता आला नाही. सुरुवातीला गूगल ही तोट्यात गेलेली कंपनी होती. याचं कारण म्हणजे त्यावेळी आलेलं डॉट कॅम बबल हे वित्तीय अरिष्ट. डॉट कॉम बबलमुळे या काळात बहुतांश इंटरनेट कंपन्यांची हीच अवस्था झाली होती. पण गूगलनं यातून मार्ग काढत स्वतःला सावरलं आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील सर्वात आघाडीची कंपनी म्हणून स्वतःला सिद्ध केलं.
कार्यक्षमता आणि पारदर्शकता
गूगल सर्च इंजिनची सुरूवात 2001 साली झाली. गूगलच्या नफ्याचा प्रमुख स्त्रोत होता तो म्हणजे जाहिराती. इंटरनेट वापरकर्त्यानं एखादी वस्तू गूगल सर्च इंजिनमधून शोधली आणि गूगलनं दाखवलेल्या परिणामांवर क्लिक करुन तो एखाद्या वेबसाईटवर आला तर ती वेबसाइट त्याबदल्यात गूगलला पैसे देत असे. या मॉडेलला पे - पर - क्लिक ॲडव्हर्टायझिंग असं म्हटलं गेलं. गूगलवर आपण काहीही सर्च केलं की जो नैसर्गिक परिणाम येतो त्यात मग जाहिरातदाराने दिलेल्या पैशांनुसार प्राधान्यक्रमाने ठराविक परिणाम आपल्यासमोर येतात.
जाहिरातदारांसाठी सुद्धा गूगल ही एक आकर्षण संधी आहे. कारण आपलं उत्पादन घेण्यात ज्यांना रस आहे फक्त अशाच ग्राहकांना लक्ष्य करत जाहिरातीसाठी खर्च झालेला पैसा पुरेपूर वापरला जाईल, याची इथे खात्री असते. ज्यांना आपल्या उत्पादनाची गरजच नाही अशा लोकांना जाहिराती दाखवण्याचा वायफळ खर्च गूगलमुळे टाळला जातो. त्यामुळे वृत्तपत्रात जाहिराती छापण्यापेक्षा गूगलवर जाहिरात करणं अधिक सोप्पं आणि प्रभावी ठरतं.
वृत्तपत्रात जाहिरात छापल्यानंतर ती लाखो लोकांपर्यंत पोहचत जरी असली तरी त्यातले बहुतांश लोकांना ते उत्पादन घेण्यात रसच नसल्यामुळे अशी जाहिरातबाजी फार फायद्याची ठरत नाही. त्यापेक्षा गूगलवर तो आपला ग्राहक बनू शकतो अशाच लोकांना आपली जाहिरात दाखवणयाची सोय असते. त्यामुळे जाहिरातदार पारंपरिक वृत्तपत्राकडून गूगलकडे वळताना दिसतात. त्यामुळे मागच्या काही काळात वृत्तपत्र जाहिरातीतून कमवत असलेल्या नफ्यात लक्षणीय घट झालेली पाहायला मिळते. पैसे कमावण्यासाठी या पारंपरिक माध्यमांना जाहिरातींशिवाय इतर मार्गांना अवलंब करावा लागला तो गूगलमुळेच.

फोटो स्रोत, Getty Images
गूगलच्या शोधामुळे अर्थव्यवस्थेलाही लाभ झाल्याचं दिसून येतं. मॅकेन्झी या मार्केट रिसर्च कंपनीनं गूगलच्या आगमानामुळे अर्थव्यवस्थेच्या उत्पादकतेत कशी वाढ झाली, याबाबत एक संशोधनही केलं होतं.
गूगलचा सर्वात मोठा लाभ म्हणजे लोकांचा वाचणारा वेळ. कुठल्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल तर आधी ग्रंथालय गाठून लोकांना तिथे शोधाशोध करावी लागायची. आता गूगलवर सर्च करून झटक्यात हवी ती माहिती लोकांना बरोबर मिळते. ग्रंथालयात जाऊन माहिती शोधण्यात गूगलच्या तुलनेत किमान तिप्पट जास्त वेळ वाया जायचा, असं हे संशोधन सांगतं. हा वाचलेला वेळ लोक मग इतर उत्पादक कामात गुंतवू शकतात. याने अर्थव्यवस्थेची एकूण उत्पादकता वाढते.
त्याप्रमाणेच ग्राहकांना त्यांना हवी असलेली सेवा अथवा उत्पादन शोधण्यासाठी आधी छापील डिरेक्टरीचा आधार घ्यावा लागायचा. या मोठ्या यादीतून मग आपल्याला हवा असणारा दुकानदार शोधणं ग्राहकांसाठी मोठं जिकिरीचं काम होतं. गूगलमुळे हा मनस्ताप कमी झाला आणि एका क्लिक वर आपल्याला हवी ती सेवा / सुविधा / उत्पादन कोणाकडे मिळेल हे ग्राहकांना कळू लागलं. हे ग्राहक आणि दुकानदार दोघांसाठीही फायद्याचं ठरलं. यातून अर्थव्यवस्थेची उलाढाल सोप्पी झाली. या उलाढालीत वाढ होऊन अर्थव्यवस्थेची उत्पादकता कित्येक पटीनं वाढल्याचं मॅकेन्झीचा अहवाल सांगतो.

फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय गूगलचा झालेला आणखी एक फायदा म्हणजे रोजच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारातील वाढलेली पारदर्शकता. तुम्ही एखादी वस्तू विकत घेण्यासाठी दुकानात गेला तेव्हा ती वस्तू विकत घेण्याआधी मोबाईल फोनवरून गूगलच्या आधारे इंटरनेटवर तिची किंमत तुम्ही पाहता. दुसरीकडे कुठे ही वस्तू आणखी स्वस्तात मिळते का, याची तपासणी करता. हा दुकानदार आपल्याला महागात तर ही वस्तू विकत नाही ना, याची पडताळणी करता येते. त्यामुळे ग्राहक म्हणून तुम्हाला फसवलं जाण्याची शक्यता कमी होते. विक्रेत्यांसाठी ही डोकेदुखी असली तरी व्यवहारात यामुळे आलेली पारदर्शकता एकूण अर्थव्यवस्थेच्या आणि ग्राहकांच्या हिताची ठरते.
याशिवाय गूगलचे आणखीही काही सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर पडलेले दिसतात. उदाहरणार्थ दुकानदार आपल्या दुकानात जागेची कमतरता आणि विकली न जाण्याच्या शक्यतेमुळे सगळ्या वस्तू ठेवू शकत नाही. पण गूगलमुळे दुर्मिळ वस्तू देखील कुठे मिळू शकतील हे ग्राहकांना कळतं आणि दुकानदारालाही आपली कोणती वस्तू कुठल्या ग्राहकाला हवी आहे, याचा नीट ठावठिकाणा मिळतो. मागणी आणि पुरवठ्याचं अवघड गणित अशा पद्धतीनं सोप्पं होतं आणि ऐरवी अशक्यप्राय ठरणारा खरेदी विक्रीचा व्यवहार पार पडून उलाढाल वाढल्यानं अर्थव्यवस्था सुदृढ होते.
बाजारपेठेवर गूगलची एकाधिकारशाही
जी वस्तू आपल्याला हवी आहे नेमकी तीच वस्तू मिळवणं आता ग्राहकाला यामुळे सोपं झालं आहे. नाहीतर आधी जवळच्या दुकानात मिळणाऱ्या वस्तूंपैकीच एक विकत घेणं ग्राहकाला भाग होतं. गूगल आणि इंटरनेटमुळे ग्राहकाचं निवडीचं स्वातंत्र्य विस्तारलं. दुकानदारही दुर्मिळ वस्तू दुकानात पडून राहणार नाही, त्याला ग्राहक मिळेलच याची शाश्वती आल्यामुळे निर्धास्त झाला आणि नवनव्या वस्तूंची विक्री करू लागला. म्हणजे यात ग्राहक आणि विक्रेते अशा दोघांचाही फायदा झाला. ऑनलाईन शॉपिंगच्या उदयानं तर हे गणित आणखी सोपं केलं.
पण यातून एक समस्या मात्र नव्याने उत्पन्न झाली.
इंटरनेट सर्चच्या बाजारपेठेवर गूगलची एकाधिकारशाही निर्माण झाली. सर्च इंजिन म्हटल्यावर आपसूकच गूगल हेच नाव तोंडावर येतं, इतकी गूगलनं या बाजारपेठेवर सद्दी तयार केली. जगभरात 90 टक्के इंटरनेट वापरकर्ते गूगल सर्च इंजिनचा वापर करतात. आपली वस्तू अथवा सेवा ही गूगलवरूनच विकली जाऊ शकते, हे जसं दुकानदारांना कळालं तसंच गूगललाही.
गूगल सर्च इंजिनमधून शोधल्यावर येणारे परिणाम विक्रेत्यांचं भविष्य ठरवू लागले. आणि हे परिणाम काय असतील कोणाचं उत्पादन अथवा वेबसाईट आधी दिसेल हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार गूगलकडे होता. हे सगळं अल्गोरिदमच्या आधारे होतं, असा दावा गूगल करत असला तरी हे अल्गोरिदम कसं चालवायचं हेसुद्धा गूगलच्या हातात आहे.
आपलं अल्गोरिदम नेमकं कसं काम करतं याची माहिती गूगल कधी सार्वजनिक करत नाही. त्यामुळे इथे पारदर्शकता राहत नाही. 'आम्ही अल्गोरिदमची कार्यपद्धती गुप्त ठेवतो कारण ती उघड केली तर काही लोक याचा गैरफायदा घेत अल्गोरिदममध्ये घोटाळा करतील. आणि मग जुन्या सर्च इंजिनप्रमाणे कार शोधायला गेल्यावर तुमच्यावर पॉर्न बघण्याची नामुष्की येऊ शकते,' असा यामागचा तर्क गूगलकडून दिला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे गूगलकडे सगळी सत्ता केंद्रीत झालेली पाहायला मिळते. आपलं उत्पादन विकलं जातं म्हणून विक्रेते गूगलवर स्वत:ची जाहिरात करतात. गूगलवर आपलं उत्पादन लोकांना अग्रक्रमानं दिसावं यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवतात. पण एकदा गूगलची वाकडी नजर पडली की त्याची वेबसाईट गूगलवर दिसणं बंद होऊ शकते. म्हणजेच थोडक्यात गूगलने ठरवलं तर त्याचा व्यवसाय क्षणात ठप्प पडू शकतो. गूगल कडे झालेलं हे सत्तेचं केंद्रीकरण अनेकांना मंजूर नाही.
इथे वकिल म्हणून खटला गूगल लढवतो. न्यायाधीश बनून खटल्याचा निकालही गूगलच देतो आणि निकालानुसार शिक्षेची अंमलबजावणी सुद्धा पुन्हा गूगलंच करतो. दुसऱ्या कोणाला यात साधा आवाज उठवण्याचाही वाव उरत नाही. इथे गूगलच्या मनमर्जी कारभारावर कोणतंही नियंत्रण नाही. आपला संपूर्ण व्यवसाय गूगलवर अवलंबून असल्यानं कोणता विक्रेता गूगलविरोधात आवाज उठवण्याची हिंमतही करत नाही. कारण गूगलची नाराजी ओढावून घेतल्यास त्याचा सगळा व्यवसायच बंद करून टाकण्याची ताकद गूगलकडे आहे.
एकहाती सत्ता असलेल्या गूगलला जाब विचारणारी एखादी यंत्रणा असली पाहिजे. त्याशिवाय या बाजारपेठेत लोकशाही येणार नाही, अशी मागणी अनेकजण करत असतात. इंटरनेट सर्च इंजिनच्या बाजारपेठेत सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं आणि ही बाजारपेठ अधिक सर्वसमावेशक पद्धतीने चालावी, ही मागणी न्याय्यच म्हणावी लागेल. पण सगळ्यांना गूगलच्या नियमांचं मूकपणे पालन करावं लागतं, हीच फक्त एकमेव अडचण नाही.
यातली मुख्य अडचण अशी की गूगलचे हे पाळले जाण्याचं बंधन असलेले नियम नेमके काय आहेत, हेच कोणाला माहिती नाही. आधी सांगितल्याप्रमाणे हॅकरचे हल्ले होऊ नयेत, हे कारण देत गूगलनं आपलं अल्गोरिदम नेमकं कसं काम करतं याविषयीची माहिती गोपनीय ठेवलेली आहे. त्यामुळे नियमांचं पालन करूनच आपली वेबसाईट चालवा, असा आदेश गूगलकडून येत असला तरी हे नियमच माहिती नसल्यानं एका प्रकारे आंधळा कारभार सुरू राहतो. गूगल म्हणेल तीच पूर्व दिशा मानत ही एकाधिकारशाही अशीच चालू राहते.

फोटो स्रोत, Getty Images
गूगलच्या या मनमानी कारभाराला उत्तर म्हणून अधिक लोकशाही पद्धतीनं चालणारं आणखी चांगलं सर्च इंजिन निर्माण केलं पाहिजे, असा प्रस्ताव आता काही जण देतील. यातून गूगलच्या वाढत्या मुजोरपणालाही लगाम घालता येईल. पण नवं सर्च इंजिन निर्माण करणं हे आता वाटतं तितकं सोपं नाही.
1990 च्या दशकात सर्च इंजिनच्या बाजारपेठेत चांगली स्पर्धा होती. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन व्यतिरिक्त अनेक जण आपापलं सर्च इंजिन विकसित करून या बाजारपेठेत उतरण्याचा प्रयत्न करत होते. थोडक्यात तेव्हा ही बाजारपेठ तुलनेनं मुक्त असल्यामुळे तिच्यात निकोप स्पर्धेला वाव होता. तेव्हा गूगलनं आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध करत या स्पर्धेत बाजी मारली.
आता मात्र सर्च इंजिनची बाजारपेठ इतकी निकोप राहिलेली नाही. इथे आता स्पर्धेला वावच उरलेला नाही. या बाजारपेठेत कोण्या नव्या स्पर्धकाला टिकाव धरणं तर दूरची गोष्ट प्रवेश करणंही अवघड होऊन बसलं आहे. गूगलनं सर्च इंजिनच्या बाजारपेठेत आता फक्त आपली एकाधिकाशाहीच नव्हे तर प्रवेशाचे सगळे दरवाजे बंद करून आपल्याला स्पर्धाच उत्पन्न होऊ नये, अशी तजवीज करून ठेवलेली आहे.
गूगलला पर्याय म्हणून नवं सर्च इंजिन बाजारपेठेत येऊच न शकण्यामागचं कारण काय? नवं सर्च इंजिन उभं करायचं म्हणजे त्यासाठी आधी भरपूर डाटा जवळ असला पाहिजे. लोक इंटरनेटवर नेमकं काय शोधतात, त्यांना काय हवं आहे आणि काय नको आहे याची माहिती नीट असेल तरच नवं सर्च इंजिन विकसित करता येईल.
पण ही माहिती आहे आजघडीला फक्त गूगलकडे आहे. इंटरनेटवरील लोकांच्या आवडीनिवडी काय आहेत, हे सांगणारा सगळा डाटा गूगलनं आपल्याकडे दडवून ठेवलेला आहे. हा डाटा नसेल तर चांगलं सर्च इंजिन निर्माण करताच येणार नाही. त्यामुळे कितीही मर्यादा, तक्रारी आणि टीका झाली तरी इंटरनेटवर काहीही शोधण्यासाठी गूगलशिवाय आपल्याकडे सध्या तरी दुसरा पर्याय नाही, हेच खरं. सर्च इंजिनच्या बाजारपेठेत गूगलची ही मक्तेदारी एका अर्थानं अनिवार्य बनली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











