डीएनए तंत्रज्ञानामुळे असा लागला 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या अज्ञात व्यक्तीचा छडा

मायकल सिडनी हिल, जून कार्मायकल वेस्ट या चुलत बहिणीबरोबर

फोटो स्रोत, Handout

फोटो कॅप्शन, मायकल सिडनी हिल यांचा जून कार्मायकल वेस्ट या चुलत बहिणीबरोबराच फोटो, जून या दोन मुलांच्या आई असून हिल यांची ओळख पटवण्यास त्यांची मदत झाली.
    • Author, स्टीव्ह जोन्स
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अनेकदा बेवारस मृतदेह आढळतात. ती व्यक्ती कोण आहे याचा अनेक प्रकारे शोध घेऊनदेखील त्या व्यक्तींची ओळख पटत नाही.

मग वर्षानुवर्षे छडा न लागल्यानं ती प्रकरणं तशीच धूळ घात पडतात.

मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं यावर मात करता येणं शक्य झालं आहे.

अमेरिकेत सुमारे दशकभरापूर्वी एक ब्रिटिश व्यक्ती मृतावस्थेत आढळला होता. पण अखेर आधुनिक डीएनए तंत्रज्ञानाच्या मदतीने तो व्यक्ती कोण होता याची ओळख आता पटली आहे.

मायकल सिडनी हिल नावाची ही व्यक्ती 2013 मध्ये अ‍ॅरिझोनाच्या फिनिक्स भागात एका मित्राला भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांचा वयाच्या 75 व्या वर्षी मृत्यू झाला होता, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मायकल त्यांच्या मित्राच्या घरी गेले तेव्हा त्यांच्याकडे अंगावरच्या कपड्यांशिवाय इतर कोणतंही साहित्य नव्हतं. एवढंच काय त्यांच्याकडं ओळखपत्रंही नव्हतं, असं सांगितलं जात आहे.

त्यामुळं मृत्यूनंतर त्यांची ओळख पटवण्यात यश आलं नव्हतं. त्यामुळं त्यांना 'मारिकोपा काउंटी जॉन डो 2013' अशी ओळख देण्यात आली होती.

पण, शेफिल्ड हॅलम युनिव्हर्सिटी आणि न्यू जर्सीतील रामापो कॉलेज येथील संशोधकांनी इनव्हेस्टिगेटिव्ह जेनेटिक जिनियालॉजी (IGG) चा वापर करून या प्रकरणात महत्त्वाची माहिती शोधून काढली.

ओळख पटवणारं डीएनए तंत्रज्ञान

IGG या पद्धतीचा वापर करून डीएनए विश्लेषण आणि कौटुंबिक माहिती किंवा पार्श्वभूमीचा अभ्यास करून दूरच्या नातेवाईकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जातो.

"IGG चा वापर करून ओळख न पटल्यानं बेवारस राहिलेल्या मृत व्यक्तींना त्यांची ओळख आणि प्रतिष्ठा परत मिळू शकते.

तसंच जे हरवलेल्या नातेवाईकांचा शोध घेत असतात, त्यांनाही यामुळं मदत आणि दिलासा मिळू शकतो," असं शेफिल्डमधील संशोधक पथकाचे प्रमुख डॉ. क्रेग पॅटरसन म्हणाले.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, IGG या पद्धतीचा वापर करून डीएनए विश्लेषण आणि कौटुंबिक माहिती किंवा पार्श्वभूमीचा अभ्यास करून दूरच्या नातेवाईकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जातो.

अमेरिका आधीपासूनच या तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावीपणे वापर करत असल्याचं डॉ. पॅटरसन म्हणाले.

'गोल्डन स्टेट किलर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोसेफ डिअँजेलो याला शोधून काढण्यासाठी याचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.

आयजीजीबद्दल मोठी उत्सुकता

युकेमधील नागरिकाचा शोध घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे, असं ते पुढे म्हणाले.

"अमेरिकेतील डीएनए डेटाबेसमध्ये असणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. युरोप आणि युकेमध्ये तर याबद्दल त्याहीपेक्षा जास्त उत्साह आहे," असं डॉ. पॅटरसन म्हणाले.

"एकदा डीएनए डेटाबेसमध्ये तुम्ही आलात की, त्यामुळे तुम्हाला इतरांशी असलेला संबंध जुळवण्याची संधी मिळते. त्यातून तुम्ही तुमची काही नाती शोधण्याचा प्रयत्न करू शकता आणि ती व्यक्ती कोण आहे याची ओळख पटवू शकता," असं ते म्हणाले.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तंत्रज्ञानाचा वापर करून युकेमधील नागरिकाचा शोध घेण्यात आला.

गेल्या काही वर्षांमध्ये खऱ्या गुन्हेगारी साहित्य किंवा माहितीबद्दल मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण झालं आहे.

त्या पार्श्वभूमीवर, मायकल सिडनी हिल यांच्या मृत्यूबद्दल इंटरनेटवर माहिती शोधणाऱ्या किंवा तपास करणाऱ्या लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सार्वजनिक नोंदींमधून गायब झालेले हिल

हिल यांच्या फिनिक्समधील मित्रानं अधिकाऱ्यांना त्यांचं नाव सांगितलं. त्यामुळं त्यांची ओळख समोर आली.

मात्र हिल यांच्या कोणत्याही नातेवाईकाबद्दल माहिती नसल्यानं ते कोणशीही संपर्क साधू शकले नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख पटवता आली नाही.

संशोधनानुसार, हिल यांचा जन्म 1937 मध्ये लॅमबेथमध्ये झाला होता. मात्र 1950 च्या दशकापासून त्यांचं नाव सार्वजनिक नोंदीमधून गायब झालं होतं.

सरे इथं राहणाऱ्या दोन चुलत भावांशी हिल यांचे डीएनए जुळले होते. मात्र मृत्यू झाला, तेव्हा हिल कुठे राहत होते याची माहिती नाही.

मायकल सिडनी हिल

फोटो स्रोत, Office of the Medical Examiner Unidentified Persons Bureau

फोटो कॅप्शन, हिल यांच्या कुटुंबाचा संबंध लंडन आणि आसपासच्या परिसराशी असल्याचं मानलं जातं.

हिल यांच्या कुटुंबाचा लंडन आणि त्याच्या आसपासच्या भागाशी संबंध असल्याचं मानलं जातं.

"आपण जीवनात बऱ्याच ठिकाणी वावरतो. आपल्यापैकी बरेचजण तिथं काही खुणा सोडतात. मात्र हिल यांच्याबाबतीत तसं नाही," असं डॉ. पॅटरसन म्हणाले.

"हिल यांच्या बाबतीत असं वाटतं की जणू काही ते गायबच झाले," असं ते पुढे म्हणाले.

डॉ. पॅटरसन म्हणाले की युकेमध्ये प्रायव्हसी आणि डेटा प्रोटेक्शन कायद्याबद्दल नैतिक स्वरुपाची चिंता असूनही, हिल यांची ओळख पटवणं हा तिथे इनव्हेस्टिगेटिव्ह जेनेटिक जिनियालॉजी (आयजीजी)चा वापर केला जाऊ शकतो, याचा पुरावा आहे.

"युकेमध्ये अशी अनेक न सोडवलेली प्रकरणं आहेत, ज्यात आयजीजीचा वापर केला जाऊ शकतो.

या तंत्रज्ञानाचा फायदा शक्य तितक्या प्रकरणांना व्हावा, यासाठी आम्ही आमचे भागीदार आणि विद्यार्थी यांच्याबरोबर काम करत राहू," असं ते पुढे म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.