जातीभेदामुळे भारतात आफ्रिकेपेक्षाही जास्त कुपोषण, नवा अभ्यास काय सांगतो?

भारतातील पाच वर्षांखालील 13.7 कोटी मुलांपैकी 35 टक्के मुलांचे कुपोषण झाल्याचं आकडेवारी सांगते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतातील पाच वर्षांखालील 13.7 कोटी मुलांपैकी 35 टक्के मुलांचे कुपोषण झाल्याचं आकडेवारी सांगते.
    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी न्यूज

भारतात अनेक दशकांच्या जातीभेदामुळे मुलांचं कुपोषण वाढलं आहे. कुपोषणाचं हे प्रमाण अगदी सबसहारा आफ्रिकेच्या (सहारा वाळवंटाच्या दक्षिणेस असलेल्या प्रदेशाला सबसहारा असं म्हणतात) तुलनेतही अधिक आहे, असं नवीन संशोधनातून समोर आलं आहे.

सबसहारा आणि आफ्रिकेत जगातील पाच वर्षाखालील मुलांपैकी 44 टक्के मुलं कुपोषित आहेत. जगभरातील एकूण कुपोषित मुलांपैकी 70 टक्के मुलं या दोन भागात आढळतात.

असं असलं तरी सबसहारा प्रदेशाने आणि आफ्रिकेतील इतर प्रदेशांनी अलिकडच्या काही वर्षामध्ये लक्षणीय प्रगती केली. आता या भागातील 49 देशांमधील कुपोषणाचं प्रमाण सरासरी 33.6 टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. दुसरीकडे भारताचा कुपोषणाचा दर 35.7 टक्के झाला आहे.

जेव्हा एखाद्या मुलाची वयाच्या तुलनेत अपेक्षित उंची वाढत नाही तेव्हा त्याचं कुपोषण झालं, असं मानलं जातं. वयाच्या तुलनेत उंची न वाढणं हे पोषण न झाल्याचं स्पष्ट गंभीर लक्षण आहे.

अशोका विद्यापीठातील अश्विनी देशपांडे आणि मलेशियातील मोनाश विद्यापीठाचे राजेश रामचंद्रन यांच्या अभ्यासानुसार, केवळ उंची असण्यावर लक्ष केंद्रित करणं किंवा भारतीय मुले सबसहारा आफ्रिकेतील मुलांपेक्षा लहान का आहेत? याकडे लक्ष केंद्रित केल्याने एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होते. हा मुद्दा म्हणजे भारतातील मुलांच्या कुपोषणामध्ये त्यांच्या सामाजिक ओळखीची, विशेषतः जातीची भूमिकाही आहे.

बाळाच्या आयुष्यातील पहिले 1,000 दिवस फार महत्त्वाचे असतात. त्याला बाळाच्या विकासासाठी सुवर्ण कालावधी म्हटले जाते आणि हा काळ निर्णायक असतो. वयाच्या दोन वर्षापर्यंत बाळाच्या मेंदूचा जवळपास 80 टक्के विकास होतो.

हा मेंदू विकास त्याच्या आयुष्यभराचा पाया तयार करतो. म्हणूनच या सुरुवातीच्या वर्षांमध्ये बाळाला चांगली आरोग्यसेवा, चांगले पोषण, सुरुवातीच्या विकासाच्या संधी आणि सुरक्षित वातावरण मिळणं मुलाच्या भविष्याला सखोलपणे आकार देतं.

भारत आणि उप-सहारा आफ्रिका दोन्ही ठिकाणी वेगाने मध्यमवर्ग, तरुणांची संख्या आणि कार्यशक्ती क्षमता वाढत आहे.

2021 मध्ये जागतिक बँकेच्या अहवालानुसार, सब-सहारा आफ्रिका आणि भारतासह दक्षिण आशियात जगातील एकूण गरीबांपैकी 85 टक्क्याहून जास्त गरीब आहेत. त्यामुळे दोन्ही भागात गरिबी आणि विकासाबाबतची सारखीच आव्हानं अधोरेखित होतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

संशोधनकर्त्यांनी अधिकृत आकडेवारीचा उपयोग करून भारत आणि उप-सहारा आफ्रिकेतील 19 देशांमधील कुपोषणाबाबत ही महत्त्वाची निरिक्षणे नोंदवली आहेत.

अधिकृत आकडेवारीनुसार, भारतातील पाच वर्षाखालील 13.7 कोटी मुलांपैकी 35 टक्क्यांहून अधिक मुलांचं वजन कमी आहे. हेच प्रमाण जागतिक स्तरावर 22 टक्के आहे.

संशोधनकर्त्यांनी भारतातील 6 सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांचाही अभ्यास केला. यात दुर्गम भागात राहणारे आदिवासी आणि अस्पृश्य मानल्या गेलेल्या दलित समाजाचा समावेश आहे. या दोन समाजांमध्येच एकूण कुपोषितांपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त मुलांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे भारतातील कथित उच्च जातींमध्ये कुपोषित मुलांचं प्रमाण 27 टक्के आहे. हे प्रमाण सबसहारातील आफ्रिकन देशांच्या तुलनेत कमी आहे, असंही या संशोधनातून समोर आलं आहे.

भारतातील एकूण कुपोषित मुलांपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त मुले आदिवासी आणि दलित समाजातील आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतातील एकूण कुपोषित मुलांपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त मुले आदिवासी आणि दलित समाजातील आहेत.

भारतातील जातीय उतरंडीत खालच्या श्रेणीत येणाऱ्या जातीतील मुलांपेक्षा उच्च श्रेणीत येणाऱ्या जातींमधील मुलांमध्ये कुपोषण होण्याची शक्यता 20 टक्के कमी आहे.

अपत्याचा जन्म क्रमांक, स्वच्छतेच्या सवयी, आईची उंची, भावंडांची संख्या, शिक्षण, अशक्तपणा आणि घरची सामाजिक-आर्थिक स्थिती यासारख्या घटकांचा विचार केल्यानंतरही जातीचा आणि कुपोषणाचा संबंध महत्त्वपूर्ण असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भारतातील जातीव्यवस्था हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर आधारीत असून ती खोलवर रुजलेली आहे. स्वातंत्र्यानंतर सात दशके जातीनिर्मूलनाचे प्रयत्न होऊनही जातीचा प्रभाव कायम असल्याचे दिसते.

संशोधक सांगतात, “भारतातील चांगल्या सामाजिक-आर्थिक स्तरातील मुलांना जास्त कॅलरीज मिळतात आणि त्यांना आरोग्यासाठी चांगलं वातावरण मिळतं हे पाहता हे निष्कर्ष आश्चर्यकारक नाहीत.”

जगातील सर्वाधिक कुपोषणाचं प्रमाण डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोसारख्या युद्धप्रवण उपसहारा आफ्रिकन देशांमध्ये आढळतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जगातील सर्वाधिक कुपोषणाचं प्रमाण डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोसारख्या युद्धप्रवण उपसहारा आफ्रिकन देशांमध्ये आढळतं.

मागील अनेक वर्षांपासून भारतातील वाढत्या कुपोषणामागील कारणांवर चर्चा होत आल्या आहेत.

काही अर्थशास्त्रज्ञांनी असाही युक्तिवाद केला की, कुपोषणातील हा फरक अनुवांशिक आहे. भारतीय मुले अनुवांशिकदृष्ट्या कमी उंचीची आहेत.

मात्र, पिढ्यानपिढ्या चांगलं पोषण मिळाल्याने आनुवंशिक मानल्या जाणाऱ्या उंचीतील अंतर ऐतिहासिकदृष्ट्या कमी झालं आहे, असंही इतर जाणकार सांगतात.

वेगवेगळ्या जागतिक निकषांचा वापर केला, तर मुलींची स्थिती मुलांपेक्षा वाईट आहे, असंही काही अभ्यासांमध्ये आढळून आलं आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

2022 च्या एका अभ्यासानुसार, आरोग्य आणि पौष्टिक आहाराचा पुरवठा, घरातील राहणीमान आणि मातृत्वाच्या टप्प्यातील घटक यांच्यातील सुधारणांमुळे भारतातील चार राज्यांमध्ये कुपोषणाचं प्रमाण कमी झालं आहे. 1992-93 च्या केंद्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार भारतातील पाच वर्षांखालील अर्ध्याहून अधिक मुलांची वाढ खुंटली होती.

आदिवासींसारख्या वंचित घटकांमधील मुलांमध्ये अधिक कुपोषणाची शक्यता दिसते.

आफ्रिकेत एकूण कुपोषित मुलांची संख्या वाढली असली, तरी 2010 पासून एकूण मुलांच्या तुलनेत कुपोषित मुलांचं प्रमाण कमी झालं आहे.

लाल रेष
लाल रेष

गरीब कुटुंबातील मुले, कमी शिकलेल्या माता किंवा उपेक्षित गटातील मुलांना कुपोषणाचा अधिक धोका असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

"भारतीय आणि सहारा वाळवंटाच्या दक्षिणेस असलेल्या आफ्रिकेतील (सबसहारा) मुलांमधील उंचीतील फरकाच्या वादामुळे कुपोषणातील जातीच्या भूमिकेकडे दुर्लक्ष झाले आहे," असंही संशोधक अधोरेखित करतात.

"भारतातील मुलांच्या कुपोषणाचा मुद्दा समजून घेताना जात हा महत्त्वाचा निकष आहे."

भारतात रेशन दुकानांबाहेर लागलेली महिलांची रांग. मुलांच्या कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यात आईच्या आरोग्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतात रेशन दुकानांबाहेर लागलेली महिलांची रांग. मुलांच्या कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यात आईच्या आरोग्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

या अभ्यासासाठी संशोधकांनी लोकसंख्याशास्त्रीय आणि आरोग्य सर्वेक्षणातील माहितीचा वापर केला आहे. भारतातील अभ्यासासाठी 2019-21 मधील आकडेवारीचा वापर केला आहे. सबसहारा आफ्रिकेसाठी 2015 पासून पुढे झालेल्या 19 देशांमधील सर्वेक्षणाचा उपयोग करण्यात आला. या अभ्यासात भारतातील पाच वर्षाखालील 1 लाख 95 हजार 24 मुलांचा आणि सबसहारा आफ्रिकेतील पाच वर्षाखालील 2 लाख 2 हजार 557 मुलांच्या मानवी शरीराचे परिमाण आणि संरचनेशी संबंधित मोजमापाचाही समावेश आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)