या आईने ब्लॅक मार्केटमध्ये 7000 रुपयांना का विकलं पोटच्या लेकराला?

गरोदर, बाळंतपण, केनिया

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जोएल गंटर
    • Role, बीबीसी आफ्रिका आय

गेल्याच महिन्यात 'बीबीसी आफ्रिका आय'ने केनियाची राजधानी नैरोबीमधील लहान मुलांच्या विक्रीच्या व्यवसयाचा भांडाफोड केला होता. बीबीसी आफ्रिका आयच्या वृत्तानंतर पोलिसांनी मानवी तस्करीप्रकरणी सात जणांना अटक सुद्धा केली. पण त्या महिलांचं काय, ज्या अवैधपणे हे व्यवहार करतात? अशा कोणत्या गोष्टीमुळे इथल्या महिलांना पोटच्या लेकराला सात हजार रुपयांत विकावं लागतंय?

अदामा सांगते की, तिचे आई-वडील असताना आयुष्य बरं चाललं होतं. पैसे फार नव्हते आणि तिच्यासमोरील पर्यायही कमी होते, पण काही गोष्टी अर्थपूर्ण होत्या. तिने शालेय शिक्षण घेतलं. ती 12 वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचं निधन झालं आणि नंतर काही वर्षांनी मातृछत्रंही हरपलं.

आई-वडील गेल्यानंतर आयुष्य बिकट झाल्याचं अदामा सांगते. शाळाही सोडावी लागली आणि स्वत:च्या जगण्यासाठी मेहनत करणं तिला भाग होतं. पश्चिम केनियातल्या ग्रामीण भागात तिचं गाव आहे.

22 वर्षं वयाची असताना अदामा एका व्यक्तीला भेटली आणि त्याच्यापासून ती गरोदरही राहिली. मात्र, बाळ झाल्यानंतर तीन दिवसांनीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. यामुळे अदामाचा एकटेपणा कमालीचा वाढला.

बाळाचं 18 महिन्यांपर्यंत तिने पालनपोषण केलं. काळजी घेतली. मात्र, त्यानंतर स्थिर उत्पन्नाची आवश्यकात तिला भासू लागली. मग तिने बाळाला आजीकडे सोपवलं आणि कामाच्या शोधात नैरोबी गाठलं. तिला निघताना तिच्या आजीने सांगितलं की, तू तुझ्या बाळाच्या आयुष्यासाठी काम करायला जात आहेस.

अदामा नैरोबीत पोहोचली आणि रस्त्याशेजारी बसून कलिंगड विकण्यास सुरुवात केली. मात्र, त्यातून तिला फारसे पैसे मिळत नव्हते, त्यात जिच्यासोबत ती नैरोबीत राहत होती, ती अदामाचे रुमवर ठेवलेले पैसे चोरत असे. शहरातील आयुष्यही तिच्यासाठी प्रचंड कठीण होऊन बसलं होतं.

अदामाच्या कपाळावर स्वत:चा बचाव करतानाचं एक व्रण आहे. काही लोकांशी झटापटीदरम्यानचं ते व्रण होतं.

नंतर तिने एका बांधकाम साईटवर काम करण्यास सुरुवात केली. मात्र, तिला तिथे पगार मिळाला नाही. तिथून ती नाईटक्लबमध्ये काम करू लागली. तिने मालकाला सांगितलं की, तिचा पगार थेट गावी आजीला पाठवावा. मग तिने पगारातील काही रक्कम स्वत:ला घेतली, जेणेकरून नैरोबीत राहण्याची चांगली व्यवस्था करता येईल. नंतर तिला दुसऱ्या एका बांधकाम साईटवर थोड्या आणखी चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. तिथे ती एका व्यक्तीला भेटली. दोघांचं नातं वाढत गेलं. एक दिवस त्याने तिच्याकडे बाळाची मागणी केली.

अदामाने त्याला एक ऑफर दिली. जर माझ्या मुलीला इकडे आपल्यासोबत राहण्यासाठी घेऊन येण्यास परवानगी दिली, तर नव्या बाळाला जन्म देण्यास तयार होईन, अशी ती ऑफर होती. ती व्यक्तीही तयार झाली आणि अदामाच्या पुढच्या पाच महिन्यांच्या गरोदरपणाच्या काळाता त्या व्यक्तीनेच घरभाडंही भरलं, बिलं भरली, फळं आणली. यादरम्यान अदामा तिच्या गोंडस मुलीला शहरात आणण्याची वाट पाहत होती. मात्र, एकेदिवशी ती व्यक्ती निघून गेली आणि पुन्हा कधीच परतली नाही.

अदामा

पुरेशा पैशांअभावी एका माणसाचं पोट भरण्याची मारामार असताना एक मूल जन्माला घालून, दोघांचं पोट भरण्याची चिंता आणि घालमेल अनेक स्त्रियांना सतावते. साधरणत: पोटचं लेकरू कुणीही विकण्याचा विचार करत नाही. मात्र, केनियातल्या काही गरोदर स्त्रियांसाठी जगण्याच्या संघर्षातील हा शेवटचा पर्याय असतो की, पोटच्या गोळ्याची तस्करांना विक्री करणं.

तस्कर फार कमी किंमत देतात. सारा 17 वर्षांची होती, जेव्हा ती दुसऱ्यांदा गरोदर होती. मात्र, दुसऱ्या मुलाला सांभाळण्यासाठीचा खर्च करण्याची तिची ऐपत नव्हती. म्हणून तिनं ते मूल एका महिलेला 3000 केनियन शिलिंग्समध्ये विकलं. म्हणजे, भारतीय रुपयात ही किंमत होते फक्त 2,000 रुपये.

"त्यावेळी मी तरुण होते, मी करतेय ते चूक आहे असं मला तेव्हा वाटलं नव्हतं. मात्र, पाच वर्षांनी मला जाणीव झाली आणि मला तिचे पैसे परत करून माझं बाळ मला हवं होतं," असं सारा म्हणते.

सारा सांगते, अशा कितीतरी महिलांना मी ओळखते, ज्या याच किंमतीत आपल्या पोटच्या लेकरांना विकतात.

"आयुष्यातील आव्हानांमुळे काही मुली त्यांचं बाळ विकतात. कधीकधी घरातूनच यासाठी पाठपुरावा केला जातो किंवा शाळेत असतानाच गरोदर राहिलेली असते. 15-16 वर्षांच्या मुलींच्या बाबतीत बऱ्याच अडचणी आहेत.

"आपलं मूल गमावल्यानंतर सर्वस्व गमावल्याच्या हताश भावनेतल्या अनेक मुली तुम्हाला दिसतील. कारण त्यांना मदतीचा हात पुढे करायला कुणीच त्यांच्यासोबत नसतं."

अदामा

अल्पवयातच गरोदर राहण्याचे प्रमाण आफ्रिकेतील देशांमध्ये केनियात सर्वाधिक आहे. आरोग्यतज्ज्ञ सांगतात, "कोरोनाच्या काळात ही समस्या अधिकच बिकट झालीय. काही महिलांना तर वेश्याव्यवसायात ढकललं गेलं, तर दुसरीकडे मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था पार मोडकळीस आली."

"अशा स्थितीत असलेल्या बऱ्याच मुली आणि महिलांच्या घटना मी ऐकल्यात. तरुण मुली कामाच्या शोधात शहरात येतात, कुठल्यातरी नात्यात पडतात, गरोदर राहतात आणि मग नवरा सोडून पळून जातो," असं केनियन मानवाधिकार हक्कांच्या वकील आणि बालसंरक्षण कार्यकर्त्या प्रुडेन्स म्युतिसो सांगतात.

"जर वडील सांभाळ करत नसतील तर या मुलींना उत्पन्नसाठी दुसरा मार्ग शोधावा लागतो. याचमुळे त्या मुलांच्या विक्रीपर्यंत पोहोचतात. कारण त्यातून त्यांना जगण्यासाठी काही पैसा मिळतो, त्यातून स्वत:चा उदनिर्वाह करता येतो, तसंच घरात असलेल्या बाळाचाही सांभाळ करता येतो. लोक याबद्दल उघडपणे बोलत नाहीत, मात्र हे तिथलं वास्तव आहे."

अदामाने तर बांधकाम साईटवर काम करत असताना तर तिचं गरोदरपण लपवूनच ठेवलं होतं. जोपर्यंत सिमेंटच्या पिशव्या उचलताना त्रास होत नाही, तोपर्यंत तिने याबद्दल सांगितलंच नव्हतं. कारण तेव्हा तिच्याकडे घरभाडं देण्यासाठी उत्पन्नाचा दुसरा मार्ग नव्हता. तीन महिन्यांसाठी तिच्या घरमालकाने घरात ठेवून घेतलं. मात्र, नंतर घर सोडण्यास सांगितलं.

आठ महिन्यांची गरोदर असतानाही अदामा रात्री उशिरा झोपायला घरी येत असे. ती सांगते, कधीतरी मला नशिबाने जेवायला अन्न मिळायचं. अन्यथा बऱ्याचदा पाणी, प्रार्थना आणि झोपूनच दिवस घालवायचे.

कुणाही महिलेची अदामासारखी स्थिती होण्यामागे अनेक कारणं आहेत. जोपर्यंत आई किंवा बाळाच्या जीवाला धोका नाही, तोवर गर्भपातास परवानगी नाही. अशावेळी या महिलांसमोर एकच पर्याय उरतो.

अदामा
फोटो कॅप्शन, अदामा

दुसरीकडे, केनियात तरुण मुलींना सेक्स आणि रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ याबाबतचं शिक्षण दिलं जात नाही. विशेषत: ग्रामीण भागात तर कायदेशीररित्या मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेची जागृती नाही.

"महिला किंवा मुलींना नको असलेल्या गरोदरपणात सरकारकडून कुठलीच मदत दिली जात नाही," असं केनियातील चॅरिटी हेल्थ पॉव्हर्टी अॅक्शनचे संघटक इब्राहिम अली सांगतात.

"बऱ्याचदा या मुलींना तर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं, मग बदनामीच्या भीतीने या मुली पळून जातात आणि यामुळे त्या शहरात येऊन भयंकर स्थितीत ओढल्या जातात."

अदामाला तिच्यासाठी कुठला कायदेशीर मार्ग असल्याची साधी कल्पनाही नव्हती. शिवाय, बाळ दत्तक देण्याची प्रक्रियाही तिला ठाऊक नव्हती. "मला यातलं काहीच माहिती नव्हतं. किंबहुना, मी हे काही ऐकलंही नव्हतं," असं अदामा सांगते.

अदामाने बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या गर्भपाताचा विचार केला होता. पण ती तसं करू शकली नाही. मग तिने स्वत:चाच जीव घेण्याचाही विचार केला.

"मी तणावात होते. मी आत्महत्याच करण्याचा विचार करू लागले. म्हणजे, लोक मला विसरून जातील, असे विचार मनात येत होते."

मात्र, बाळंतपणाच्या तारखेच्या काही दिवस आधी कुणीतरी अदामाची ओळख मॅरी ऑमा या महिलेशी करून दिली. तिने अदामाला आयुष्य संपवण्यापासून रोखलं. नैरोबीच्या कायोल या झोपडपट्टीच्या भागात मॅरी ऑमा एक अवैध क्लिनिक चालवतात. तिने अदामाला 100 शिलिंग्स दिले आणि सांगतिलं की, अमूक अमूक दिवशी क्लिनिकला ये.

गरोदर, बाळंतपण, केनिया

मॅरी ओमा यांचं खरंतर ते क्लिनिक कसलं, दोन खोल्यांची रुमच होती. कायोल मार्गावर एका दुकानाच्या मागे कुणाच्याही पटकन नजरेस न येणाऱ्या जागेत ते कथित क्लिनिक होतं.

या क्लिनिकसदृश रुममध्ये औषधं ठेवण्याचे स्टँड होते. त्यावर जुनी औषधं विस्कळीतपणे पडलेली होती. आतमध्ये एक रुम होतं, जिथं महिलांचं बाळंतपण करणं शक्य होतं. ऑमा तिथेच आत सहकाऱ्यासोबत बसायची आणि मुलांची नफा-तोटा पाहून खरेदी-विक्री करायची. एखादं बाळ समोरची व्यक्ती का खरेदी करतेय, कशासाठी करतेय, कोण करतेय, हे न पाहताच ऑमा बाळाची विक्री करत असे.

तिने अदामाला सांगितलं, तिच्या बाळाला खरेदी करणारे पालक अत्यंत प्रेमळ आहेत, त्यांना मूल होऊ शकत नाहीय आणि त्यामुळे ते तुझ्या बाळाचे सर्व हट्ट पुरवतील. मात्र, वास्तवात ऑमा कुणाही व्यक्तीला जो चांगले पैसे देईल, त्याला ते बाळ विकणार होती.

गरोदर महिलांना ऑमा सांगत असे की, ती आधी नर्स होती. पण प्रत्यक्षा तिच्याकडे अशी कोणतीच उपकरणं किंवा औषधं नव्हती, ज्यामुळे बाळंतपणादरम्यान काही गंभीर स्थिती उद्भवल्यास मदतीला येऊ शकतील.

"तिचं ते कथित क्लिनिक अत्यंत घाणेरडं होतं. रक्तासाठी छोटसं भांडं वापरत असे. तिच्याकडे बेसिनही नव्हतं. बेड स्वच्छ नव्हते. मात्र, मी हताश झाले होते आणि माझ्याकडे दुसरा कोणता मार्गच नव्हता," असं अदामा सांगते.

जेव्हा अदामा क्लिनिकमध्ये आली, तेव्हा मॅरी ऑमाने कुठल्याही सूचनांविना अदामाला वेदना कमी होण्यासाठी दोन गोळ्या दिल्या. अदामा सांगते, ऑमाला एक खरेदीदार सापडला होता आणि तो खरेदीसाठी प्रचंड उत्सुक होता. मात्र, जेव्हा अदामाने बाळाला जन्म दिला, तेव्हा बाळाच्या छातीत त्रास सुरू झाला आणि त्याला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज होती. तेव्हा ऑमाने अदामाला बाळाला हॉस्पिटलला न्यायला सांगितलं.

आठवड्याभरानंतर अदामाला आपल्या सुखरूप मुलासोबत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. अदामा गरोदर असातना ज्या घरमालकाने तिला बाहेर काढलं होतं, त्याने तिला पुन्हा घरात राहण्यास जागा दिली. काही दिवसांनंतर अदामा पुन्हा ऑमाच्या त्या क्लिनिकमध्ये गेली, तेव्हा ऑमाने तिला अधिकचे 100 शिलिंग्स दिले आणि दुसऱ्या दिवशी क्लिनिकमध्ये यायला सांगितलं.

"नवीन 'पॅकेज'नं जन्म घेतला आहे. 45 हजार शिलिंग्स." असा मेसेज ऑमाने तिच्या खरेदीदाराला केला.

अदामा
फोटो कॅप्शन, अदामा

मॅरी ऑमा अदामाला 45 हजार शिलिंग्सची (30 हजार रुपये) ऑफर देत नव्हती, हे पैसे ती खरेदीदाराकडून घेणार होती. अदामाला त्यातील केवळ 10 हजार शिलिंग्स (7 हजार रुपये) देण्याची ऑफर दिली होती. मात्र, मॅरी ऑमाला हे माहिती नव्हतं की, जो खरेदीदार आहे, तो बीबीसीच्या शोधमोहिमेचा अंडरकव्हर रिपोर्टर होता.

जेव्हा अदामा दुसऱ्या दिवशी ऑमाच्या क्लिनिकमध्ये गेली, ती आतल्या रूममध्ये बसली. तिथे अदामाचं मन बदललं. ती क्लिनिकमधून निघाली आणि सरकारी आश्रमाकडे गेली. तिथे कायदेशीर प्रक्रियेद्वारे दत्तक घेतलं जात नाही, तोपर्यंत मुलांचं पालनपोषण केलं जातं.

बीबीसीनं मॅरी ऑमाला तिची प्रतिक्रिया विचारली. मात्र, तिने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

अदामा आता 29 वर्षांची आहे. ती पुन्हा तिच्या गावी गेलीय आणि तिथेच राहतेय. अजूनही तिच्या खाण्या-पिण्याबाबत अडचणी सुरू आहेतच. तिचं जगणं अजूनही खडतरच आहे. जवळील हॉटेलमध्ये तिला कधीतरी काम मिळतं, मात्र ते काही पुरेसं नाही. नैरोबीतून चपला आणून गावातच स्वत:चं चपलांचं दुकान उघडण्याचं तिचं स्वप्न आहे. तिने आश्रमात सोडून आलेल्या मुलासोबत तिचा आता तसं संपर्क नाहीय, पण तिला त्याचं फारसं वाईट वाटत नाही.

"माझ्या मुलाला विकण्याबाबत मला अजिबात चांगलं वाटत नव्हतं. मला त्या पैशांना हात सुद्धा लावू वाटत नव्हता. तिथे पैशाचा काहीच प्रश्न नसता, तर मी मुलाला दिलं असतं," असं अदामा सांगते.

तिने मुलाला ज्या आश्रमात सोडंल आहे, तिथल्या शेजाऱ्यांना ती ओळखते. ती ज्या घरात भाड्यानं राहायची, त्या घराशेजारीच हे आश्रम आहे. तो परिसर सुरक्षित असल्याची अदामाला खात्री वाटते. शिवाय, तिच्या मुलाची काळजी घेणारे लोकही चांगले असल्याचा तिला विश्वास आहे.

(न्जेरी म्वांगी यांनीही या बातमीसाठी महत्त्वाची माहिती दिली. तसंच, टोनी ओमांडी यांनी बीबीसीसाठी फोटो उपलब्ध करून दिले.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)