ग्राउंड रिपोर्ट : 'गुंगीचं औषध देऊन' ते बालिका गृहातल्या मुलींचं लैंगिक शोषण करायचे

अल्पावधीसाठीच या बालिका गृहात असताना या लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या ऐकल्या तर अंगावर काटा येतो. (प्रातिनिधिक छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अल्पावधीसाठीच या बालिका गृहात असताना या लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या ऐकल्या तर अंगावर काटा येतो. (प्रातिनिधिक छायाचित्र)
    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी मुजफ्फपूरहून

बिहारमधल्या मुजफ्फरपूरमध्ये एका बालिका संरक्षण गृहातील मुलींचं सातत्याने लैंगिक शोषण झाल्याचं एक अहवालातून उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. बीबीसीच्या टीमनं या केंद्राला भेट दिली तेव्हा जे ऐकलं, त्यावरून या 'बालिका संरक्षण गृहा'ला 'यातना गृह' म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

या इमारतीच्या भिंतीवर लिहिलं आहे - 'बालिका गृह, देखरेख एवं संरक्षण की आवश्यकता वाले बच्चियों के हेतु', अर्थात 'देखभाल आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलींचं गृह'.

जिन्यावर एक कुत्रा झोपला होता. जिना चढताना माझा पाय त्याच्या शेपटीवर पडला, पण त्यानं डोळाही उघडला नाही.

लहान मुलींच्या या 'संरक्षण गृहा'तल्या मुलींनी कोर्टातही हेच सांगितलं की, त्यांच्यावरही असे अनेकांचे 'पाय पडले'. पण औषधांमधून दिलेल्या गुंगीमुळे त्यांना त्यांच्याबरोबर काय झालंय, हे कळायला वेळ लागला, त्या झोपूनच राहिल्या.

या मुलींच्या खोल्यांमध्ये लक्ष्मी आणि दुर्गेचं चित्रं असलेले कॅलेंडर लटकवलेले होते. ते पाहून असं वाटत होतं की एखादा कैदखाना काही तासांपूर्वीच रिकामा करण्यात आलाय आणि हे फोटो मुद्दामहून इथे सोडून देण्यात आले आहेत.

लहान मुलींच्या खोलीत लावलेले देवींचे कॅलेंडर
फोटो कॅप्शन, लहान मुलींच्या खोलीत लावलेले देवींचे कॅलेंडर

30 मेपर्यंत इथे 6 ते 18 वर्षं वयोगटातल्या 46 मुली होत्या. पण शेजाऱ्यांनी कधी त्यांचं हसणंसुद्धा ऐकलं नाही. "आणि आता जे काही ऐकतोय, ते ऐकलं नसतंच तरच बरं झालं असतं, असं वाटतं," ते सांगतात.

अल्पावधीसाठीच या बालिका गृहात असताना या बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या ऐकल्या तर अंगावर काटा येतो.

नेमकं काय झालं?

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS)च्या 'कोशिश' टीमनं बिहारच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालिका गृहांचं फेब्रुवारी महिन्यात 'सोशल ऑडिट' केलं होतं.

सोशल ऑडिटचा हा अहवाल त्यानंतर बिहारच्या समाज कल्याण विभागाला सोपवण्यात आला. या 100 पानी अहवालात राज्यभरातील लहान मुलींचे सध्याचे हाल आणि त्यांच्यासोबत झालेल्या दुष्कृत्यांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

मात्र सध्या सर्वांत जास्त चर्चा ही मुजफ्फरपूरच्या बालिका गृहामध्ये झालेल्या प्रकारांबद्दल होत आहे.

हे गृह शहरातल्या साहू पोखर भागात आहे, जिथून काही अंतरावरच इथला रेड लाइट एरिया सुरू होतो. याच बदनाम वस्तींतून काही मुलींना या गृहात आणण्यात आलं होतं. तर काही आपल्या कुटुंबीयांना गमावल्यानंतर इथे आल्या होत्या.

बीबीसीने या TISSच्या या अहवालाचा काही भाग पाहिला. त्यात म्हटलं आहे की, "'सेवा संकल्प' आणि विकास समितीच्या या बालिका गृहात राहणाऱ्या मुलींची परिस्थिती चिंताजनक आहे. इथे राहणाऱ्या अनेक मुलींनी आपल्यासोबत झालेल्या हिंसेबद्दल आम्हाला सांगितलं. त्यांचं लैंगिक शोषण झाल्याचं त्या सांगतात. ही गंभीर बाब असून याची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या मुली इथे कैदींप्रमाणे राहत आहेत. हे खूप दु:खद आहे."

महिला आणि पोलीस

TISSच हा अहवाल अजूनही सार्वजनिक झालेला नाही. 'कोशिश'चे प्रमुख तारीक मोहंमद यांनी बीबीसीला सांगितलं की, "हा अहवाल आता सरकारी मालमत्ता असून सरकार तो प्रकाशित करू शकतं. आम्हाला जे काम करायचं होतं ते आम्ही केलं. आता सरकारचं काम आहे की, त्यांनी या सगळ्याचा तपास करावा."

अहवालाचं पुढे काय झालं?

15 मार्च - बिहारच्या समाज कल्याण विभागात हा अहवाल सादर करण्यात आला, पण या खात्याच्या कार्यालयात तो दोन महिने पडून राहिला.

26 मे - संबंधित जिल्ह्यांच्या बाल संरक्षण विभागांना हा अहवाल पाठवण्यात आला. याच दिवशी मुजफ्फरपूरच्या बाल संरक्षण विभागाचे सहाय्यक संचालक दिवेश शर्मा यांनी समाज कल्याण विभागाच्या संचालकांना एक पत्र पाठवलं.

28 मे - त्या पत्राला उत्तर आलं की, 'सेवा संकल्प' आणि विकास समितीच्या या बालिका गृहात राहणाऱ्या मुलींना हलवलं जावं आणि संबंधितांविरोधात FIR दाखल करण्यात यावा.

30 मे - या सगळ्या 46 मुलींना मोकामा, पाटणा आणि मधुबनी इथे हलवण्यात आलं. या मुलींपैकी 42 मुलींची वैद्यकीय तपासणी झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यातल्या 29 जणींचं लैंगिक शोषण झाल्याचं सिद्ध झालं. पोलिसांनी केस डायरीसुद्धा तयार आहे.

अखेर 31 मे रोजी FIR दाखल करण्यात आला आणि त्यानंतर 3 जूनला 10 जणांना अटक करण्यात आली. यात हे गृह चालवणाऱ्या 'सेवा संकल्प' संस्थेचे प्रमुख ब्रजेश ठाकूर आणि विकास समितीशी निगडित सात अन्य महिलांचा समावेश आहे - किरण कुमारी (चकना, सरैया), चंदा कुमारी (छोटी कल्याणी), मंजू देवी (रामबाग), इंदू कुमारी (संजय सिनेमा रोड, ब्रह्मपुरा), हेमा मसीह (पुरानी गुदरी नगर), मीनू देवी (रामपूर, एकमा) आणि नेहा (मालीघाट, मिठनपुरा) सहभागी आहेत.

बिहारच्या मुजफ्फरपूरमधलं बालिका संरक्षण गृह
फोटो कॅप्शन, बिहारच्या मुजफ्फरपूरमधलं बालिका संरक्षण गृह

मुजफ्फरपूरच्या या गृहातील घटनांचा तपास करण्यासाठी बिहारच्या नीतीश कुमार सरकारने प्रथम CBI चौकशीला नकार दिला. पण नंतर त्यांना CBI चौकशीचे आदेश द्यावे लागले.

या सगळ्यांचा जामीन कनिष्ठ कोर्टाने फेटाळल्याने काहींनी जामीन मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे.

महिला आयोगाचे सदस्य दिलीप वर्मा यांना पोलिसांनी अजून अटक केलेली नाही. वर्मा यांच्यावरही मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे.

'बड्या व्यक्ती'च्या हाती लहान मुलींचं गृह

या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे एक व्यक्ती - ब्रजेश ठाकूर. ठाकूर हे शहरातल्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये गणले जातात. त्यांच्याच घराशेजारी हे बालिका गृह सुरू होतं. 'सेवा संकल्प' ही संस्थादेखील त्यांचीच आहे.

हे ब्रजेश ठाकूर आमच्यावर अत्याचार करायचे, असा आरोप या मुलींनी केला आहे. याच आधारावर पोलिसांनी त्यांनाही अटक केली.

पांढऱ्या शर्टात ब्रजेश ठाकूर
फोटो कॅप्शन, पांढऱ्या शर्टात ब्रजेश ठाकूर

ठाकूर यांना अटक झाली तेव्हा ते स्वतःच्याच गाडीनं पोलीस ठाण्यात पोहोचले. यावरून त्यांच्या दांडगाईचा अंदाज येऊ शकतो, असं स्थानिक पत्रकार सांगतात.

ठाकूर यांच्या 17 NGO असल्याचं सांगितलं जातं. सगळ्या NGO त्यांच्या नावानं नसल्या तरी त्यांच्यावर ठाकुरांचाच अंमल आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

पोलिसांनी आपल्या टिपण्णीमध्ये सांगितलं की, ठाकुरांची राजकारणी, पोलीस, गुंड आणि माध्यमांमध्ये चांगलीच उठबस आहे. ते 'प्रातः कमल' आणि 'न्यूज नेक्स्ट' नावाची वृत्तपत्रंही काढतात. या दोन्ही वृत्तपत्रांची कार्यालयंदेखील याच मुलींच्या गृहाजवळ आहे.

संस्थेचा फलक

ठाकूर यांचे वडीलसुद्धा वृत्तपत्राच्या व्यवसायात होते. त्यांच्यावर वृत्तपत्राच्या सबसिडीचे कागद बाजारात विकल्याचा आरोप होता आणि त्याप्रकरणात त्यांच्या घरावर CBIची धाडही पडली होती.

मुलींचं दुःख

या सगळ्या मुलींचा कोर्टात CrPC सेक्शन-164 अंतर्गत जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. यात या मुलींनी सांगितलं की बाहेरील लोकांना बोलवून ब्रजेश ठाकूर त्यांचं लैंगिक शोषण करायचे.

या जबाबानंतर पाटणाच्या PMCHमध्ये या मुलींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि यात त्यांचं लैंगिक शोषण झाल्याचं सिद्ध झालं.

कोर्टात त्यांच्यातल्या 10 वर्षांच्या एका मुलीनं सांगितलं की, "ब्रजेश ठाकूर बाहेरून मुलांना घेऊन यायचे आणि त्यांच्याकडून आमच्यावर अत्याचार करायचे. त्यानंतर आम्हाला मारहाणही व्हायची."

या लैंगिक शोषणात याबालिका गृहातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता, असं या मुलींना सांगितलं.

कोर्टात देण्यात आलेल्या जबाबात आणखी एका मुलीनं सांगितलं की त्यांना जेवणातून झोपेचं औषध दिलं जायचं. त्यानंतर सगळ्या मुली बेशुद्ध व्हायच्या.

दुसऱ्या एका मुलीनं आपल्या जबाबात सांगितलं की, "मला इथल्या बाई ब्रजेश यांच्या खोलीत झोपण्यासाठी सांगायच्या."

लहान मुलींच्या गृहातली एक खोली
फोटो कॅप्शन, लहान मुलींच्या गृहातली एक खोली

या मुलींनी असंही सांगितलं की, जेव्हा त्या सकाळी उठायच्या तेव्हा त्यांना त्यांची पँट खाली पडलेली दिसायची. आणखी एका मुलीच्या जबाबानुसार, या मुलींबरोबर राहणारी किरण ही महिला त्यांना ही अशी कामं करण्यास भाग पाडायची.

आणखी एका मुलीनं कोर्टात सांगितलं की, "जेव्हा रात्री मी शौचासाठी उठायचे तेव्हा किरण ही मुलींचे कपडे काढून त्यांच्यासोबत झोपलेली दिसायची."

अशा अनेक धक्कादायक गोष्टी या मुलींनी कोर्टात सांगितल्या आहेत.

'मजा घे'

बिहार महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत दिलमणी मिश्रा. बीबीसीशी बोलताना मिश्रा यांनी सांगितलं, "मी पाटण्यात जाऊन या मुलींना भेटले. या मुलींना रात्री गुंगीची औषधं दिली जायची आणि सकाळी उठल्यावर त्यांचं शरीर खूप दुखायचं. ही औषधं घेतल्यावर त्यांच्यासोबत काय व्हायचं, हे त्यांना कळायचं नाही."

ब्रजेश ठाकूर यांचा ड्रायव्हर फरार आहे. त्याने आपल्या एका ड्रायव्हर मित्राला या मुलींसोबत 'मजा घेण्यासाठी ये', असंही सांगितलं होतं. त्या मित्राने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, "मी असं करण्यास नकार दिला. हे प्रकरण उघडकीस आल्यावर ठाकूर यांचा ड्रायव्हर नेपाळला पळून गेला."

25 जुलैच्या दुपारी ही जागा पाहण्यासाठी तेजस्वी यादव पोहोचले.

प्रकरणाचा तपास करणारे पोलीस
फोटो कॅप्शन, प्रकरणाचा तपास करणारे पोलीस

या गृहामागेच सरफराज अली यांचं घर आहे. हा सगळा प्रकार ऐकून ते हैराण आहेत. सरफराज सांगतात की, या मुली त्यांना विचारायच्या की, 'भैय्या, रमझान कधीपासून सुरू होणार आहे?'

सरफराज आमच्याशी बोलत असताना त्यांच्याशेजारी एक महिला उभी होती. त्यांना याबाबत विचारलं असता त्या सांगतात, "हे सगळे मोठे लोक आहेत. आम्ही त्यांच्याबद्दल काय सांगणार? तसंही आम्ही मुसलमान आहोत. यांच्याशी फार संबंध ठेवत नाहीत."

ठाकूर यांच्या राजकीय संबंधांमुळे बिहार सरकारला घेरण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे. या मुलींवर बलात्काराच्या आरोपींना राजकीय नेत्यांची साथ आहे, असा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपींबरोबर सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे फोटोसुद्धा बिहारच्या विधानसभेत झळकले आहेत.

विधानसभेतले विरोधी पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांचं म्हणणं आहे की, "ब्रजेश ठाकूर यांच्या घरी मुख्यमंत्री नीतीशकुमार येऊन गेले आहेत." तसंच, शहरातल्या लोकांच्या माहितीनुसार ठाकुरांच्या घरी राज्यसभेचे खासदार रामनाथ ठाकूर आणि विधानसभा अध्यक्ष विजयकुमार चौधरी नेहमीच येत-जात असतात."

पण या आरोपांवर ठाकूर यांची मुलगी निकिता आनंद यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. "आमच्या घरी मोठे लोक येत असल्याने माझे वडील गुन्हेगार ठरतील का?"

स्थानिक पत्रकार निकिता यांच्या तर्काशी सहमत आहेत, पण त्यांचं म्हणणं आहे की, अशा राजकीय संबंधांमुळेच त्यांच्यासाठी सरकारचं टेंडर मिळणं सोपं होतं.

सरकारचं अभय?

ब्रजेश ठाकूर त्यांच्या घराशेजारी 31 ऑक्टोबर 2013 पासून हे बालिका गृह चालवत होते. त्यासाठी त्यांना सरकारचाही पुरेशी मदत होती, अशी माहिती पुढे आली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून ठाकूर यांनाच हे गृह चालवण्याचं टेंडर मिळत आहे. बाल संरक्षण विभागाच्या लोकांचं म्हणणं आहे की, ठाकूर यांच्या प्रभावामुळे कोणत्याही ठोस चौकशीशिवाय समाज कल्याण विभाग त्यांना टेंडर देत राहिलं.

नियमांनुसार तीन वर्षांनंतर NGOची संपूर्ण चौकशी केली जाते. त्यानंतरच पुढचं टेंडर दिलं जातं. पण या प्रकरणात असंही झालं नाही.

'सेवा संकल्प'च्या या गृहात राहणाऱ्या मुलींच्या देखभालीसाठी आणि त्यांच्या खाण्यापिण्यासाठी दर तीन महिन्यांनी लाखांची रक्कम मिळायची. पण इथल्या मुलींची अवस्था पाहता ही रक्कम नक्की त्यांच्यासाठी खर्च झाली का, असा प्रश्नही उपस्थित होतो. त्यामुळे वर्षानुवर्षं सरकारी पैशीची चोरीही स्पष्ट होते.

दरम्यान, ब्रजेश ठाकूर यांची मुलगी निकिता आनंद यांचं म्हणणं आहे की, आपल्या वडिलांना फसवलं जात आहे. आता तर निकिता हे गृह आपल्या घरात असल्याचाही नकार देत आहे.

एवढ्यावरच न थांबता त्या पुढे म्हणतात, "या मुली या आधीपासूनच सेक्शुअली अॅक्टिव्ह असतील. त्यामुळे वैद्यकीय तपासणीत असं सांगितलं जाऊ शकत नाही की त्यांचं नेमकं लैंगिक शोषणच झालं होतं की नाही?"

line

प्रकरणाचा घटनाक्रम

  • फेब्रुवारी 2018 : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या (TISS) टीमनं बिहार राज्याच्या बालिका गृहांच्या सद्यस्थितीचा अहवाल तयार केला.
  • मार्च 2018 : TISSनं हा अहवाल समाज कल्याण विभागाला सोपवला. या अहवालात मुलींसोबत झालेल्या लैंगिक दुष्कृत्यांबद्दल माहिती होती.
  • 26 मे 2018 : हा अहवाल समाज कल्याण विभागाच्या संचालकांपर्यंत पोहोचला.
  • 1 जून 2018 : मुजफ्फरपूरचं बालिका गृह रिकामं करण्यात आलं. 44 मुलींना पाटणा, मोकामा आणि मधुबनी इथे पाठवण्यात आलं. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक दिवेश शर्मा यांच्या जबाबानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
  • 2 जून : पोलिसांनी ब्रजेश ठाकूर यांच्यासह 8 जणांची पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. हे बालिका गृह पोलिसांनी सील केलं आणि इथली कागदपत्रं जप्त केली.
  • 3 जून : या गृहाचे संचालक ब्रजेश ठाकूर यांच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्षा दिलमणी मिश्रा यांनी या बालिका गृहाची पाहणी केली. इथली अवस्था जेलपेक्षाही वाईट असल्याचं त्यांनी सांगितलं.
  • 4 जून : पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या मुलींनी काही जणांची नावं सांगितली.
  • 5 जून : बाल कल्याण समितीचे सदस्य विकास कुमार यांना अटक करण्यात आली. काही मुली गरदोर असल्याचंही स्पष्ट झालं.
  • 7 जून : ब्रजेश ठाकूर यांच्या जामिनावर कोर्टात सुनावणी झाली.
  • 9 जून : राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य सुषमा साहू यांनी या बालिका केंद्राचा दौरा केला. 15 मुलींसोबत दुष्कृत्य झाल्याचं त्यांनी सांगितलं. सिद्दिकी लेन इथलंही बालिका गृह रिकामं करण्यात आलं. या गृहाची जबाबदारीही सेवा संकल्प समितीकडे होती.
  • 11 जून : जेलमध्ये बंद असलेल्या 5 महिलांच्या जामिनावर पॉक्सो कोर्टात सुनावणी करण्यात आली. कोर्टानं केस डायरीची मागणी केली.
  • 13 जून : बालिका गृहात पोहोचलेल्या CID आणि FSLच्या टीमनं मुलींचे कपडे जप्त केले. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षाच्या शोधासाठी धाडी टाकण्यात आल्या.
  • 14 जून : ब्रजेश ठाकूर यांच्यासह सगळ्या आरोपींचा जामीन फेटाळण्यात आला.
  • 15 जून : मुजफ्फरपूरमध्ये नियुक्तीवर असलेले समाज कल्याण विभागाचे दोन अधिकारी राजकुमार आणि रोझी राणी यांना निलंबित करण्यात आलं.
  • 18 जून : लोकसभा सदस्य पप्पू यादव यांनीदेखील या बालिका गृहाला भेट दिली. या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची त्यांनी मागणी केली.
  • 20 जून : ब्रजेश ठाकूरसह 6 आरोपींना पोलीस रिमांडमध्ये घेण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला.
  • 21 जून : कोर्टानं आरोपींना पोलीस रिमांड देण्यासाठी नकार दिला. अटकेनंतर खूप उशिरानं अर्ज दाखल झाल्याचं कोर्टानं कारण दिलं.
  • 25 जून : बालिका गृहातील 22 मुलींचा जबाब कोर्टात दाखल करण्यात आला. गुंगी येणारी औषधं देऊन बलात्कार केल्याची त्यांनी माहिती दिली.
  • 27 जून : बाल संरक्षण अधिकारी रवी रोशन यांना अटक.
  • 29 जून : पोलिसांनी रवी रोशन यांना रिमांडमध्ये घेऊन चौकशी सुरू केली.
  • 3 जुलै : CBI तपासासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल.
  • 4 जुलै : सहाय्यक संचालक दिवेश शर्मा यांची चौकशी करण्यात आली.
  • 5 जुलै : बाल कल्याण समितीचे अध्यक्ष दिलीप वर्मा यांच्याविरोधात वॉरंट.
  • 9 जुलै : मुलींसोबत झालेल्या या दुष्कृत्याप्रकरणी पाटणा हायकोर्टानं सरकारकडे यावर उत्तर मागितलं.
  • 19 जुलै : या मुलींपैकी एका मुलीनं पाटणामध्ये आपला जबाब नोंदवला. लैंगिक अत्याचार झालेल्या एका मुलीची हत्या करण्यात आल्याचं तिनं सांगितलं.
  • 20 जुलै : पॉक्सो कोर्टानं बालिका गृहात मुलीचा मृतदेह शोधण्यासाठी जमीन खोदण्याचे आदेश दिले.
  • 21 जुलै : ब्रजेश ठाकूर यांच्या घराच्या परिसरांत खोदकाम करण्यासाठी शीला राणी यांना मॅजिस्ट्रेट बनवण्यात आलं.
  • 23 जुलै : या गृहाच्या परिसरातील जमिनीची जेसीबीनं खोदकाम करण्यात आलं. मृतदेहाचे अवशेष मिळाले नाहीत. लोकसभा आणि विधानसभेत याचे पडसाद उमटले.
  • 24 जुलै : लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी CBI तपासासाठी तयार असल्याचं सांगितलं. मात्र, पाटणामध्ये DGP म्हणाले की, तपासासाठी पोलीस सक्षम आहेत.
  • 25 जुलै : तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाचे नेते मुजफ्फरपूरमध्ये आले. CBI तपासाच्या त्यांनी मागणी केली. रवी रोशन यांच्या पत्नीनं समाज कल्याण मंत्री मंजू वर्मा यांच्या पतीवर गंभीर आरोप लावले.
line

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)