दक्षिण आफ्रिकेतल्या 'त्या' शहरात होतो पतीसमोरच बलात्कार

दक्षिण अफ्रिकेतल्या डीपस्लूट शहरांतली महिला

दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्गमधला डीपस्लूट हा परिसर सर्वांधिक धोकादायक आहे. या भागात बलात्कार होणं ही फारच सामान्य बाब आहे. या शहरात प्रत्येक तिसरा पुरुष आहे बलात्कारी

या डीपस्लूट शहरात राहणाऱ्या दोन युवकांनी बीबीसीसोबत बोलताना सांगितलं की, त्यांनी आजपर्यंत अनेक महिलांवर बलात्कार केले आहेत. कॅमेऱ्यासमोर ही गोष्ट बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर तसूभरही पश्चातापाची भावना नव्हती.

आपण काही चुकीचं करत आहोत, असं आपल्याला वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी कधी बलात्कार पीडितांच्या जागी राहून या सगळ्याचा काय परिणाम होत असेल याचा विचारही केलेला नाही.

ते कॅमेऱ्यावर आपला चेहरा दाखवण्यास तयार होते, मात्र त्यांना त्यांचं नाव गुप्त ठेवायचं होतं. त्यांना अगदी सहजपणे आपल्या गुन्ह्यांची यादी मांडली.

ते युवक सांगतात, "जशा महिला दरवाजा उघडायच्या, तसे आम्ही त्यांच्या घरात घुसायचो आणि त्यांच्यावर चाकू उगारायचो. त्या आरडा-ओरडा करत असत. आम्ही त्यांना शांत व्हायला सांगायचो. मग, आम्ही त्यांना त्यांच्या बेडरुममध्ये नेऊन त्यांच्यावर बलात्कार करायचो."

डीपस्लूट शहरातली ही परिस्थिती धक्कादायक आहे. मात्र, डीपस्लूटमध्ये हे सगळं सामान्य आहे.

प्रत्येक तिसरा पुरुष बलात्कारी

या शहरांतल्या तीन पैकी एका पुरुषानं मान्य केलं आहे की, त्यांनी कमीत-कमी एकदा बलात्कार केला आहे. ही संख्या इथल्या लोकसंख्येच्या 38 टक्के आहे.

ही गोष्ट 2016मध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेमधून समोर आली आहे. या सर्व्हेसाठी युनिव्हर्सिटी ऑफ विटवॉटर्सरंड यांनी 2600 हून अधिक पुरुषांशी याबाबत बातचीत केली.

मारिया यांचा त्यांच्या घरातच बलात्कार करण्यात आला होता. जेव्हा त्यांचा बलात्कार करण्यात आला तेव्हा शेजारच्याच खोलीत त्यांची मुलगी झोपली होती.

डीपस्लूट शहर

फोटो स्रोत, Getty Images

मारिया सांगतात, "माझी मुलगी उठू नये म्हणून मी प्रार्थना करत होते. मला भीती होती की, ती जर उठली तर या लोकांनी तिलाही काही केलं असतं."

मारिया यांच्यावर बलात्कार करणाऱ्यानं सांगितलं की, मी कोणाला मारणार नाही, फक्त मला जे करायचं आहे ते करू देत.

मारियांनी त्याला सांगितलं की, "माझ्यासोबत जे करायचं ते करून घे. त्यानंतर त्यानं माझ्यावर बलात्कार केला. तो दुसऱ्यांदा माझा बलात्कार करत होता."

फारच कमी महिला आपल्यावर बलात्कार करणाऱ्याला विरोध करू शकतात. डीपस्लूटमधल्या लोकांच्या मनात ही धारणा आहे की, बलात्कार हा गुन्हा नाही.

बलात्काराला कोणतीही शिक्षा नाही

गेल्या तीन वर्षांत डीपस्लूटमध्ये बलात्कराच्या 500 तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. पण, कोणत्याही प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.

केवळ बलात्काराच्या कायद्याच्या बाबतीतच नव्हे तर दुसऱ्या गुन्ह्यांच्या प्रकरणांत इथला कायदा अपूर्ण दिसून येतो.

डीपस्लूट शहरांतील पत्रकार एमाटिका

इथले स्थानिक पत्रकार गोल्डन एमटिका क्राईम रिपोर्टिंग करतात. ते सांगतात, "रात्री डीपस्लूटच्या रस्त्यांवरून चालणं खूपच धोकादायक आहे. काही वाईट प्रसंग ओढवला तर मदत मिळणं अवघड आहे. रात्री 10 किंवा 11 वाजता एखाद्याची हत्या झाली तर दुसऱ्या दिवसापर्यंत पोलीस त्यांचा मृतदेहही उचलत नाही."

लोकांनी कायदा हातात घेतलाय

एमटिका सांगतात की, "डीपस्लूटमध्ये कायदा नावाची गोष्टच नाही. अशात अनेकदा मोठे गुन्हे इथे सहज घडतात."

गुन्ह्यांबद्दल प्रशासनाची अशी भूमिका असल्यानं इथल्या नागरिकांना त्याची खूप चीड येते.

प्रशासनानं कारवाई न केल्यामुळे लोक कायदा आपल्या हातात घेऊ लागले आहेत. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी लोक त्यांना मारहाण करुन मारुन टाकतात.

डीपस्लूट शहरांत महिला आंदोलन करताना

फोटो स्रोत, Getty Images

एमाटिका यांच्या मते, अशा घटना इथे दर आठवड्याला होतात.

त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या एका घटनेबाबत सांगतिलं की, "एका जमावाने तीन लोकांवर पेट्रोल टाकून आग लावून टाकली. एखाद्याला आपल्या डोळ्यांसमोर जळताना पाहणं हे खूपच वाईट असतं. पण, मी त्या माणसाला मदत करू शकत नाही. जर, मी असं केलं असतं तर मला त्या जमावाच्या रागाच्या बळी पडावं लागलं असतं."

'आमच्या पतीसमोरच बलात्कार करतात'

इथल्या पोलिसांसमोर या घटना घडत असूनही ते या घटनांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. इथले लोक लिंचिंगला म्हणजेच जमावानं एखाद्याची हत्या करण्याच्या गोष्टीला योग्य मानतात. एखाद्या बलात्कारी माणसाच्या अशा हत्येला इथे योग्यच समजलं जातं.

डीपस्लूट मधल्या एक महिला सांगतात, "त्यांचा मृत्यू चांगलाच आहे. ते आमच्या घरात घुसतात आणि आमच्या पतीसमोरच आमच्यावर बलात्कार करतात. पुढे नवऱ्याला म्हणतात की, बघ मी कसा तुझ्या बायकोवर बलात्कार करतो आहे."

पण, लिंचिंगसारख्या घटना घडूनही हे गुन्हे थांबलेले नाहीत.

पीडित महिलेच संकल्पित चित्र

डीपस्लूट शहराला 'डीप डिच' म्हणजे खोल दरी म्हटलं जातं आणि इथल्या लोकांना वाटतं की ते या दरीत अडकले आहेत.

हे शहर गरिबी आणि बेरोजगारी या समस्यांशी झगडत आहे. पण, महिलांविरोधी गुन्हे आणि या संस्कृतीनं इथली आर्थिक स्थिती अधिक डबघाईला आली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)