61 वर्षांच्या आजीने आपल्याच नातीला दिला जन्म, पण हे घडलं कसं?

फोटो स्रोत, ARIEL PANOWICZ / WWW.ARIELPANOWICZ.COM
अमेरिकेतील नेब्रास्का प्रांतात एका 61 वर्षीय महिलेने आपल्याच नातीला जन्म दिला आहे. या बाळाच्या जन्मानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
हे सगळं ऐकायला वेगळंच वाटत आहे ना, पण होय, हे खरं आहे.
सेलिस एलेग असं या महिलेचं नाव आहे. सेसिल यांनी आपल्या समलैंगिक मुलासाठी आणि त्याच्या नवऱ्यासाठी सरोगेट मदर बनण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सेसिल या स्वतः जन्म दिलेल्या बाळाच्या आजी बनल्या आहेत.
सेसिस यांच्या मुलाचं नाव मॅथ्यू एलेग असून त्याने एलिएट डफर्टी यांच्याशी विवाह केला होता. दोघांच्या नात्यात एलिएट हे नवऱ्याची भूमिका बजावतात.
सरोगेट पद्धतीने जन्माला आलेल्या बाळाचं नाव उमा लुईस असं ठेवण्यात आलं आहे.
सेसिल सांगतात, "मॅथ्यू आणि एलिएट यांनी संसार करण्याचा निर्णय घेतल्यानंतरच मी त्यांच्यासाठी सरोगेट मदर बनण्याचा प्रस्ताव समोर ठेवला होता. त्यावेळी दोघेही आश्चर्याने हसत होते."
त्यावेळी सेसिल यांचं वय 59 वर्षे होतं. त्यामुळे कुटुंबाने त्यांचा प्रस्ताव गांभीर्याने न घेता हसण्यावारी नेला.

फोटो स्रोत, ARIEL PANOWICZ / WWW.ARIELPANOWICZ.COM
सेसिल त्यांच्या मुलाचे पती एलिएट म्हणतात, "त्या एक निस्वार्थी महिला आहेत. त्यांच्याकडून आलेला हा प्रस्ताव अतिशय सुंदर भावनेतून आला होता."
पुढे मॅथ्यू आणि एलिएट यांनी मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यासाठी सरोगेट मदरचा शोध सुरू केला. त्यावेळी सेसिल यांचा पर्याय चांगला ठरू शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं.
डॉक्टरांनी सेसिल यांच्याशी बातचीत केली. त्यांच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. यानंतरच सरोगसीसाठी त्या योग्य असल्याचं डॉक्टरांनी कळवलं.
सेसिल याबाबत सांगतात, "मी आरोग्याची खूप काळजी घेते. मी आणखी एक बाळ जन्माला घालू शकते, याबाबत मला काहीच संशय नव्हता."
सरोगसीच्या प्रक्रियेसाठी मॅथ्यू यांनी आपलं स्पर्म दिलं, तर एलिएट यांची बहीण एग-डोनर बनली.

फोटो स्रोत, ARIEL PANOWICZ / WWW.ARIELPANOWICZ.COM
हेअर ड्रेसर म्हणून काम करणारे एलिएट सांगतात, विरुद्धलिंगी जोडपी IVF उपचार पद्धती हा अंतिम पर्याय मानतात. पण आमचा विषय वेगळा होता. आमच्यासाठी मूल जन्माला घालण्यासाठी हाच एकमेव पर्याय होता."
मॅथ्यू हे एका शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. ते सांगतात, "आम्हाला सर्वांपेक्षा वेगळं काहीतरी करावं लागेल, वेगळा विचार करावा लागेल, हे आम्हाला माहीत होतं."
सेसिल सांगतात, "मला तीन मुलं झाली. पण यावेळी जाणवणारी लक्षणं थोडी जास्तच होती. पण असं असूनही गरोदरपणात जास्त त्रास झाला नाही."
सेसिल यांच्या गर्भाशयात भ्रूण रोपण करण्यात आलं. पण काही दिवसांतच त्यांना आपल्या वयामुळे त्रास जाणवू लागला.

फोटो स्रोत, ARIEL PANOWICZ / WWW.ARIELPANOWICZ.COM
भ्रूण रोपण योग्य प्रकारे झालं किंवा नाही, हे तपासण्यासाठी प्रेग्नंसी किट मागवण्यात आलं.
लगेच चाचणी करू नका, अशी सूचना आम्हाला डॉक्टरांनी दिली होती. पण मॅथ्यू आणि एलिएट वाट पाहण्यास तयार नव्हते.
सेसिल यांनी चाचणी केली. पण ती चाचणी निगेटिव्ह आल्याचं त्यांनी पाहिलं. त्यामुळे त्या निराश झाल्या. पण नंतर मुलाने ते नीट पाहिलं, तेव्हा चाचणी पॉझिटिव्ह असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सर्वांना याचा अत्यानंद झाला.
पण यानंतर सर्वजण आश्यर्य व्यक्त करू लागले. तरी बहुतांश प्रतिक्रिया या सकारात्मकच होत्या.

फोटो स्रोत, ARIEL PANOWICZ / WWW.ARIELPANOWICZ.COM
पण या बाळंतपणाने LGBT कुटुंबांविरुद्ध होणारा भेदभाव जगासमोर आणला आहे.
अमेरिकेतील नेब्रास्का प्रांतात समलिंगी विवाहांना मान्यता आहे. 2015 मध्ये कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अशा प्रकारची लग्नं होतं आहेत. मात्र नेब्रास्कामध्ये लैंगिक आकर्षणाच्या मुद्द्यावर होणाऱ्या भेदभावाविरोधात कोणताच कायदा नाही.
गरोदरपणासाठी होणाऱ्या खर्चाबाबतही सेसिल यांना विमा कंपनीशी लढावं लागल्याचं त्या सांगतात. स्वतःच्या मुलाच्या जन्मावर त्यांना इन्शूरन्स कव्हर मिळाला असता. पण या प्रेग्नन्सीसाठी त्यांना विमा मिळवता आला नाही.
कारण, कायदा जन्म देणाऱ्या व्यक्तीला मुलाची आई मानतो, त्यामुळे उमाच्या जन्म प्रमाणपत्रावर सेसिल आणि त्यांच्या मुलाचं नाव आहे. एलिएट यांचं नाव नाही.
मॅथ्यू यांच्या मते, अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्यासमोर अडचणी निर्माण करतात. हे तर अत्यंत छोटं उदाहरण आहे.
मॅथ्यू हे एलिएटसोबत लग्न करण्याचा विचार करत असल्याचं शाळेला कळवल्यानंतर त्यांना चार वर्षांपूर्वी नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. या बातमीची चांगलीच चर्चा झाली होती.

फोटो स्रोत, ARIEL PANOWICZ / WWW.ARIELPANOWICZ.COM
मॅथ्यू यांच्यासोबत अशा वागणुकीने LGBT समुदाय संतप्त झाला. यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी, आजी-माजी विद्यार्थी यांनी मॅथ्यू यांच्यासाठी ऑनलाईन याचिका चालवली. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी हा भेदभाव नष्ट करण्याची मागणी लोकांनी केली. या याचिकेला 1 लाख 2 हजार 995 जणांचा पाठिंबा मिळाला.
आपल्या कुटुंबीयांविरुद्ध सध्या येत असलेल्या नकारात्मक प्रतिक्रियांबाबत बोलताना मॅथ्यू सांगतात, "ही टीका वैयक्तिकपणे घ्यायची नाही, हे मला कळालं आहे. आम्हाला पाठिंबा असलेला वर्गही मोठा आहे."
उमा हिच्या जन्मानंतर तिची तब्येत ठणठणीत बरी असल्याचं सेसिल यांनी कळवलं.
सेसिल पुढे सांगतात, "या मुलीला पाठिंबा देण्यासाठी आजूबाजूला अनेकजण उपस्थित आहेत. ही एका अत्यंत प्रेमळ कुटुंबात वाढणार आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








