सौदी अरेबियात उमरासाठी गेलेल्या 45 भारतीयांचा बस दुर्घटनेत मृत्यू, तेलंगणा सरकारचं पथक सौदीला जाणार

सौदी अरेबियामध्ये भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. त्यात 45 भारतीयांचा मृत्यू झाला आहे.

मृत भाविकांपैकी एकाचे नातेवाईक असलेले मोहम्मद मंसूफ यांनी सांगितलं की, तिथं जे घडलं ते सांगण्यासाठी त्यांना कोणीतरी तिथून फोन केला होता.

त्यांच्या कुटुंबातील चार सदस्य उमराहसाठी गेले होते. मोहम्मद मंसूफ यांनी सांगितले की, "माझा मोठा भाऊ मोहम्मद मंजूर, आई शोहरत बेगम, माझी वहिनी फरहीन बेगम आणि माझी भाची शाहीन तिथं गेले होते."

त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की, त्यांना लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती देण्यात यावी तसेच मोहम्मद मंसूफ यांची तिकडे जाण्याची व्यवस्था करावी.

दरम्यान, तेलंगणा सरकारनं मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

तेलंगणाचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री मोहम्मद मोहम्मद अझहरुद्दीन यांच्या नेतृत्वात एक सरकारी पथक सौदी अरेबियाला पाठविण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे.

बस तेलाच्या टँकरला धडकल्यानं अपघात

भारतीय वेळेनुसार पहाटे 3 च्या दरम्यान तेलाच्या टँकरबरोबर भारतीय प्रवासी असलेल्या बसची टक्कर झाली.

हैदराबाद पोलिसांनी सांगितलं की, बसमध्ये तेलंगणाचे लोक होते. हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार म्हणाले की, अपघातात 45 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सज्जनार म्हणाले की, 9 ते 23 नोव्हेंबर या कालावधीसाठी हज यात्रेसाठी हे यात्रेकरू तिकडे गेले होते.

त्यांनी पुढे सांगितले की, 9 नोव्हेंबर रोजी एकूण 54 जण हैदराबादहून जेद्दाहला निघाले होते. त्यापैकी 4 जण मक्केतच राहिले, इतर 4 जण रविवारी (16 नोव्हेंबर) कारने मदीना इथे पोहोचले आणि इतर 46 जण बसमध्ये प्रवास करत होते.

सज्जनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती बस तेलाच्या टँकरला धडकल्याने हा अपघात झाला.

पुढे सज्जनार यांनी सांगितलं की, घटना मक्केहून मदीनाला जात असताना मदीनापासून 25 किमी अंतरावर घडली. 46 लोकांपैकी फक्त मोहम्मद अब्दुल शोएब नावाचा एकच व्यक्ती वाचला आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणि मृतांना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

तर, इतर लोकांची माहिती गोळा केली जात असल्याचे सज्जनार यांनी सांगितले.

व्हीसी सज्जनार म्हणाले की, या सर्वांनी या महिन्याच्या 23 तारखेला जेद्दाहवरून हैदराबादला येण्यासाठी तिकिटं बुक केली होती.

पुढे त्यांनी सांगितले की, राज्य सरकार आणि हैदराबाद पोलीस मृत कोण आहेत आणि ते कुठून आले होते याची माहिती गोळा करत आहेत.

उमरा करण्यासाठी गेले होते भारतीय नागरिक

तेलंगानाच्या मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलं होतं की, हैदराबादचे नागरिकही या बसमध्ये चढले होते. ते सर्व उमरा करण्यासाठी गेले होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

"मदीना येथे भारतीय नागरिकांचा समावेश असलेला अपघाताने मला दु:ख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना."

"रियाधमधील दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास सर्वोतोपरी मदत करत आहेत. आमचे अधिकारी सौदी अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत," असे ते म्हणाले.

मदीना येथे झालेल्या या बस अपघाताबद्दल भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही दुःख व्यक्त केले आहे. या बसमध्ये उमरा करण्यासाठी जाणारे भारतीय होते.

एस. जयशंकर म्हणाले, "सौदी अरेबियातील मदीना येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या दुर्घटनेने मला खूप दुःख झाले. रियाधमधील भारतीय दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास या अपघातात जखमी झालेल्या भारतीय नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पूर्ण मदत करत आहे."

सौदी अरेबियातील जेद्दाह या ठिकाणी असलेल्या भारतीय दूतावासाने देखील या घटनेबाबत दुजोरा दिला आहे. पण या व्यतिरिक्त या दुर्घटनेबाबत कोणतीही अधिकृत आणि विस्तृत माहिती मिळालेली नाही.

भारताच्या कॉन्सुलेट जनरलने यासाठी जेद्दाहमध्ये एक कंट्रोल रूमदेखील बनवले आहे. कॉन्सुलेट जनरलने म्हटले की सौदी अरेबियातील मदीनाजवळ भारतीय यात्रेकरुंसोबत झालेल्या बस दुर्घटनेनंतर जेद्दाह या ठिकाणी भारतीय कॉन्सुलेटने कंट्रोल रूम बनवली आहे.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना (डीजीपी) घटनेशी संबंधित सर्व माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत आणि अधिकाऱ्यांना भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि सौदी अरेबियाच्या दूतावासाच्या संपर्कात राहण्यास सांगितलं आहे.

हेल्पलाइन नंबर: 8002440003

ही बातमी सातत्यानं अपडेट होत आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.