You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माझ्या डोळ्यासमोर माशानं बोटीतून माझ्या भावाला समुद्रात ओढलं', मच्छिमाराच्या भावाचा धक्कादायक अनुभव
- Author, लक्कोजु श्रीनिवास
- Role, बीबीसी तेलुगूसाठी
मासे पकडण्यासाठी जाळं टाकणाऱ्या मच्छिमारालाच माशांनी समुद्रात ओढल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. आंध्र प्रदेशातील अनाकपल्ले जिल्ह्यातील ही घटना आहे.
"जाळ्यात अडकलेल्या माशाला ओढत असताना माशानं जोरात समुद्रात ओढलं," असं येल्लाजी या प्रत्यक्षदर्शीनं बीबीसीला सांगितलं. ते बेपत्ता झालेल्या मच्छिमाराबरोबर मासे पकडण्यासाठी गेले होते.
2 जुलैच्या सकाळी चोडुपिल्ली यारैया मासेमारीसाठी गेले होते. पुडिमडका किनाऱ्यापासून 25 किलोमीटर अंतरावरून ते बेपत्ता झाले. त्यांना शोधण्यासाठी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं पुडिमडाका किनाऱ्यावर शोध मोहीम सुरू आहे.
वासुपल्ली येल्लाजी यांनी बीबीसीला सांगितलं, "बुधवारी (2 जुलै) सकाळी 9 वाजता, मासे पकडून झाल्यानंतर किनाऱ्याकडे परतत असताना, कोनम प्रकाराचा मासा जाळ्यात अडकला. मात्र त्या माशाला ओढण्याइतकं ते जाळं मजबूत नव्हतं."
त्यामुळे यारैयानं लगेच दुसरं जाळ पाण्यात टाकलं आणि या शिंग असलेल्या कोनम माशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र कोनम माशानं यारैयालाच पाण्यात जोरात ओढलं. त्यानंतर अजूनपर्यंत यारैया सापडलेला नाही, असंही वासुपल्ली यांनी नमूद केलं.
नेमकं काय घडलं?
चोडुपल्ली यारैया, चोडुपल्ली कोरलय्या, वासुपल्ली येल्लाजी आणि गनागल्ला अप्पालाराजू हे सर्व अच्युतापुरम मंडलमधील पुडिमडाका गावातील आहेत. ते 2 जुलैला पहाटे 2 वाजता मासेमारीसाठी निघाले. यारैया आणि कोरलय्या हे दोघेही भाऊ आहेत.
ते किनाऱ्यापासून 25 किलोमीटर अंतरावर मासेमारी करत होते. सकाळी 9 वाजता ते पहाटे लावलेलं जाळं काढण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं की, जाळ्यात काहीतरी अडकलं आहे.
वासुपल्ली यल्लाजी यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही परत येईपर्यंत, आमच्या जाळ्यात जवळपास 200 किलो वजनाचा कोनम मासा अडकला होता. या एवढ्या मोठ्या माशाला पकडण्यासाठी ते जाळं पुरेसं मजबूत नव्हतं."
"त्यामुळे यारैयानं लगेचच दोरीचा दुसरा तुकडा आधारासाठी वापरला आणि तो त्या माशाला ओढू लागला. मात्र त्या माशानंच यारैयाला जोरात पाण्यात ओढलं. आमच्या डोळ्यादेखत यारैया पाण्यात पडला."
"आम्ही अर्ध्या तासाहून अधिक वेळ त्याला शोधलं. मात्र तो कुठेही सापडला नाही."
यारैया यांचे भाऊ कोरलय्या म्हणाले, "माझा भाऊ माझ्या डोळ्यादेखत पाण्यात पडला. नेमकं काय झालं हे मला माहीत नाही."
यल्लाजी म्हणाले, "कोरलय्या हा यारैया यांचा धाकटा भाऊ आहे. आपल्या डोळ्यादेखत मोठा भाऊ गायब झाल्याचं पाहून कोरलय्या यांना धक्का बसला. शिवाय काहीवेळा कोनम मासा बोटीत असलेल्या लोकांनाही धोका निर्माण करू शकतो. त्यामुळेच आम्ही तिथून निघालो."
"आम्ही परतल्यावर गावकऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर इतरही लोक तिथे आले. आम्ही संध्याकाळपर्यंत यारैयाचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत."
यारैय्या यांच्यासाठी मोठी शोध मोहीम
पुडीमडका किनाऱ्यावरील मच्छिमार यारैया यांचा शोध घेतला जात आहे. काहीजण किनाऱ्याजवळ बोटीतून शोधत घेत आहेत, तर काहीजण जिथे यारैया बेपत्ता झाले होते, तिथे शोध घेत आहेत.
आसपासच्या गावातील मच्छिमार देखील यारैया यांच्या घरी पोहोचले आहेत. तेदेखील यारैया यांना शोधण्यासाठी मदत करत आहेत.
"माझा मुलगा हाच माझ्या कुटुंबाचा आधार आहे. कोरलय्या हा सर्वात लहान आहे. दोन मुलीदेखील आहेत. आता मी त्यांचा सांभाळ कसा करू?" असं कोरलय्या यांच्या आई कोडनडम्मा रडत म्हणाल्या.
"आम्ही पुडीमडका पोलिसांना याची माहिती दिली. आम्ही तटरक्षक दलाला कळवलं आहे. 3 वर्षांपूर्वी, पुडीमडका गावाजवळच्या मुथ्यालाम्मपालेम गावातील एका मच्छिमाराचा कोमुकोनम माशानं केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता," असं बाबू नायडू यांनी बीबीसीला सांगितलं. ते पुडिमडका गावाचे माजी सरपंच आहेत आणि मच्छिमारांच्या संघटनेचे नेते आहेत.
"तटरक्षक दल यारैय्यासाठी शोध मोहीम राबवतं आहे. अजूनपर्यंत यारैया सापडलेला नाही," असं जी. पैदिराजू म्हणाले. ते पुडिमडका मरीन पोलीस स्टेशनचे सब-इन्स्पेक्टर (एसआय) आहेत.
तीन वर्षांपूर्वी कोणती घटना घडली होती?
फेब्रुवारी 2022 मध्ये, मुथ्यालम्मापालेनी गावातील जोगन्ना यांचा कोम्मुकोनम माशानं केलेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता.
गंगन्ना त्या दिवशी जोगन्नाबरोबर मासेमारी करायला गेले होते. गंगन्ना यांनी सांगितलं, "जाळ्यात अडकलेला कोनम मासा खूप जड होता. त्यामुळे त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बाहेर आला नाही. मग आम्ही खाली जाऊन त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला."
"जोगन्ना सर्वात आधी खाली पडला. त्यामुळे जोगन्ना हादरला. त्यानंतर माशानं त्याला जोरात धडक दिली. त्यामुळे जोगन्ना खाली पडला आणि आम्ही आमच्या हातातील जाळ्याची दोरी सोडली. आम्ही लगेच खाली गेलो आणि जोगन्नाला वर आणलं. मात्र तोपर्यंत जोगन्नाचा मृत्यू झालेला होता,"
बीबीसीनं तीन वर्षांपूर्वी या घटनेची बातमी दिली होती.
कोम्मू कोनम मासा धोकादायक असतो का?
अनेक मच्छिमार म्हणतात की शिंग, असलेला कोनम मासा हल्ला करतो. या माशाला धारदार, चाकूसारखं शिंग असतं.
"आम्ही जेव्हा कोनम मासा पकडतो, तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. कारण तो खूप जड असतो. मात्र जेव्हा हा मासा हल्ला करतो, तेव्हा आमचा जीव जातो. कोम्मुकोनम हा एक जीवघेणा मासा आहे," असं रामन्ना बाबू म्हणतात. ते मच्छिमार आहेत.
रामन्ना यांनी बीबीसीला सांगितलं, "हम्पबॅक व्हेल मासे जाळ्यात सहजपणे सापडत नाहीत. त्यांना पकडण्यात आलं, तरी कधीकधी ते जाळं तोडून पळून जातात. हे मासे खूप जड असतात. त्यामुळे आम्ही त्यांना जाळ्यातून वर खेचू शकत नाही."
"आम्ही जेव्हा त्यांना वर ओढण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते जोरात खाली खेचतात. त्यावेळेस त्यांना हाताळण्यास आमची ताकद पुरेशी नसते आणि आम्ही समुद्रात पडतो."
समुद्रात 15 किलोमीटर आत सापडतो कोम्मु कोनम मासा
मंजुलता एयू प्राणीशात्र विभागाच्या प्राध्यापक आहेत. त्या म्हणतात की, या माशाला मोठी मागणी आहे. मात्र तो पकडण्याची जोखीम देखील तितकीच जास्त आहे.
त्यांनी बीबीसीला सांगितलं, "या माशाचं वजन 20 ते 250 किलोपर्यंत असू शकतं. हे मासे एकट्यानं न फिरता, गटानं फिरतात. त्यामुळे एकाचवेळी मोठ्या संख्येनं हे मासे पकडले जाऊ शकतात."
"मात्र जेव्हा या माशांना धोक्याची जाणीव होते, तेव्हा ते त्यांच्या धारदार शिंगांनी इतर माशांवर किंवा माणसांवर हल्ला करतात."
दानय्या हे विशाखापट्टणममधील बोट मालक आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं, "बाजारात कोनम माशांना मोठी मागणी आहे. त्यानंतर शिंग असलेल्या कोनम माशांची बाजारपेठ सर्वात मोठी आहे. या माशाची मोठ्या प्रमाणात निर्यातदेखील केली जाते."
"काहीवेळा हे मासे मोठ्या संख्येनं जाळ्यात अडकतात. त्यानंतर या माशांची निर्यात करणाऱ्यांना आम्ही ते विकतो. ते जाळ्यातून न काढता माशाच्या आकारानुसार त्यांची खरेदी करतात. इतकी या माशांना प्रचंड मागणी आहे."
"किनाऱ्यापासून जवळपास 15 किलोमीटर आत गेल्यानंतर हा शिंगं असलेला कोनम मासा सापडतो," असं प्राध्यापक मंजुलता म्हणाल्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)