You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्हेल माणसाला पूर्णपणे गिळू शकत नाही, 'हे' आहे वैज्ञानिक कारण
"मी माझे डोळे बंद केले आणि मी पुन्हा जेव्हा डोळे उघडले, तेव्हा मला जाणवलं की मी व्हेल माशाच्या तोंडात होतो."
एड्रियन सिमांकास सांगत होता. एड्रियन सिमांकास या 23 वर्षीय तरुणाला बोट-सफारीचा आनंद घेताना व्हेलनं गिळलं होतं.
एड्रियन हा एक कयाकर (Kayaker) आहे. कयाक म्हणजे एक छोटी, अरुंद होडी. तर कयाक चालवणाऱ्याला कयाकर म्हणतात.
बीबीसीशी बोलताना एड्रियननं सांगितलं होतं की, "मी कोणत्यातरी भल्या मोठ्या प्राण्याच्या तोंडात आहे हे मला एका सेकंदानं जाणवलं. मला वाटलं की कदाचित त्यानं मला खाल्लं असेल.
"त्याच्या तोंडात असताना आता आपलं काय होणार? असा विचार मनात असतानाच व्हेलनं मला तोंडातून बाहेर फेकलं."
'व्हेल मासा माणसाला गिळू शकत नाही'
हंपबॅक व्हेलने एड्रियनला तोंडात पकडलं आणि काही वेळानं माशानं उलटी केली. तेव्हा एड्रियन त्याच्या पोटातून बोटीसह बाहेर आला.
यात एड्रियनला कुठलीही दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एक चर्चाही सुरू झाली.
व्हेलच्या जबड्यातून एड्रियन इतक्या चटकन कसा काय निसटू शकला, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी व्हेल माशांच्या प्रजातीविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. ते थोडक्यात पाहूया.
व्हेल हा 'मासा' या प्रकारात गणला जात असला तरी तो मूलतः एक मासा नसून सस्तन प्राणी आहे. त्याचे बाह्यरूप हे माश्याप्रमाणे असून पाण्यात राहू शकतो म्हणून तो जलचर सस्तन प्राणी म्हणून ओळखला जातो. सस्तन प्राणी हे हवेचा श्वास घेतात.
व्हेलच्या प्रामुख्याने दोन प्रजाती आहेत- बॅलीन व्हेल आणि टूथेड व्हेल.
बॅलीन व्हेलच्या 14 प्रजाती आहेत ज्यामध्ये ब्लू व्हेल, हंपबॅक व्हेल यांचा समावेश होतो. दातांऐवजी या व्हेल माशांमध्ये बॅलीन असते. ती त्यांच्या तोंडातील फिल्टर-फीडिंग प्रणाली असते.
बॅलीन हे केराटिनपासून बनलेले आहे. हे तेच प्रथिन आहे ज्यापासून माणसाचे केस आणि नखं बनतात. बॅलीन व्हेल या प्रणालीचा वापर लहान शिकार जसं की लहान मासे पकडण्यासाठी करतात.
टूथेड व्हेल म्हणजे असे व्हेल मासे ज्यांना दात असतात. या व्हेल माशांच्या 70 पेक्षा जास्त प्रजाती आहेत ज्यामध्ये स्पर्म व्हेल, किलर व्हेल आणि डॉल्फिन यांचा समावेश होतो.
व्हेल सायंटिस्ट या संकेतस्थळाने म्हटले आहे की टूथेड व्हेल हे दातांचा वापर अन्न चघळण्यासाठी नव्हे, तर शिकार पकडण्यासाठी आणि शिकारीला गिळण्यासाठी करतात.
या संकेतस्थळाच्या संस्थापिका अनाइस रेमिली आहेत आणि त्या व्हेल माशावर संशोधन करतात.
व्हेल सायंटिस्टमध्ये म्हटले आहे की व्हेल मासे कधीच मानवांविरोधात आक्रमण करत नाहीत. व्हेलमधील बऱ्याच प्रजाती आक्रमण म्हणून नाही तर जिज्ञासा म्हणूनच मानव आणि बोटींकडे आकर्षित होतात. मोकळ्या समुद्रात व्हेल माशांनी मानवाला ठार केल्याची नोंद नाही, पण ऑरका व्हेलला पकडून ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तेव्हा मात्र ट्रेनरचा मृत्यू झाला होता.
संकेतस्थळानुसार व्हेलची अन्ननलिका इतकी छोटी व्हेलला टेनिस बॉलच्या आकाराचे अन्न गिळता येते.
आता व्हेलच्या जबड्यातून एड्रियन बाहेर कसा पडला किंवा व्हेल मासा माणसाला गिळू शकतात का, या प्रश्नाकडे परत येऊया.
या प्रश्नाचं उत्तर देताना ब्राझीलमधील संवर्धनतज्ज्ञ रोचेड जेकबसन सेबा सांगतात, "हंपबॅक व्हेल जरी आकारानं महाकाय असला, तरी त्याचा घसा अतिशय अरुंद असतो. त्याच्या गळ्याची रचना ही छोटे मासे, कोळंबी यासारखे समुद्री जीव गिळण्यासाठी असते.
"त्यामुळे हंपबॅक व्हेलला कयाक, टायर किंवा अगदी ट्युना माशासारख्या मोठ्या वस्तू गिळणं प्रत्यक्षात शक्य नसतं."
बॅलीन व्हेल आणि टूथेड व्हेल या दोन्ही प्रजातींमधील व्हेल मासे माणसाला गिळू शकत नाहीत. कारण त्यांचे तोंड मोठे असले तरी त्यांचा अन्ननलिका खूपच लहान आहे. हंपबॅक व्हेलची अन्ननलिका तर साधारणपणे माणसाच्या मुठीएवढा असतो. टूथेड व्हेलमध्ये बॅलीन व्हेलपेक्षा मोठी अन्ननलिका असते. असं असलं तरी ते संपूर्ण माणसाला गिळण्यास असमर्थ आहेत.
'व्हेल अँड डॉल्फिन'चे संवाद प्रमुख डॅनी ग्रोव्हस सांगतात, "हंपबॅक व्हेलच्या मोठ्या तोंडात माणूस सहज बसू शकतो, पण तो एखाद्या व्यक्तीला गिळणं वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य आहे. कारण हंपबॅक व्हेलची अन्न साधारणपणे मानवी मुठीएवढा असतो."
"आपण माणसं व्हेलच्या मेनूमध्ये नसतो. या प्रकरणात पाहिलं तर, हंपबॅक व्हेल आपल्या दैनंदिन दिनचर्येला जात असताना त्याला हे माहीत नव्हतं की एका छोट्या बोटीत कोणीतरी माणूस आहे."
घाबरू नका, पण काळजी घ्या
स्पर्म व्हेल मात्र याला अपवाद आहेत. स्पर्म व्हेल मासे जगातील एकमेव आहेत, ज्यांचा गळा माणसाला गिळण्याइतका मोठा आहे. पण, नॅशनल जिओग्राफिकच्या एका अहवालानुसार, स्पर्म व्हेल माशानं माणसाला गिळणं ही अब्जात एखादी गोष्ट आहे.
एड्रियन यांच्यासोबत घडलेल्या या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. पण, यासारख्या घटनांमुळे लोकांनी घाबरून जाता कामा नये. तर लोकांनी नेहमी आपल्या सभोवतालच्या वन्यजीवांबद्दल जागरूक असलं पाहिजे, असं मत वन्यजीव अभ्यासक व्यक्त करत आहेत.
ही बाब लोकांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि प्राण्यांनाही त्रास होऊ नये यासाठी महत्त्वाची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
पाण्यामध्ये असताना प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखणं आणि माशांच्या खूप जवळ जाणं टाळणं गरजेचं असल्याचंही तज्ज्ञ सांगतात.
रोचेड जेकबसन सांगतात, "समुद्रात ज्या भागात व्हेल मासे वावरत असतात, त्या भागात ज्या होड्या शांतपणे चालतात (पॅडलबोर्ड, सर्फरबोर्ड किंवा इतर) त्यांचा वापर करणं टाळलं पाहिजे.
"व्हेल माशांचं निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्यावर संशोधन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींचं इंजिन नेहमी सुरू ठेवलं पाहिजे. कारण त्या बोटींच्या इंजिनाच्या आवाजामुळे व्हेल माशांना या बोटींचं अस्तित्व लक्षात येतं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)