You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आईच्या पोटात असताना भावंडांना खाऊन टाकणारे शार्क
- Author, मिशेल मार्शल
- Role, बीबीसी फ्युचर
नामशेष झालेले मेगालोडॉन शार्क यांचं एकेकाळी महासागरावर अधिराज्य होतं. ते त्यांच्या काळातील सर्वोच्च सागरी शिकारी होते. हा मासा हॉलीवूडनेही स्वप्नात पाहिला नसेल इतका भयावह होता.
पाच वर्षांपूर्वी याच शार्कवर 'मेग' नामक हॉलिवूडपट प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल आला आहे.
'मेग' आणि 'मेग2' या हॉलिवूडपटात दाखवलेले हे शार्क मासे एकेकाळी अस्तित्वात होते.
दोन कोटी वर्ष महासागरात दहशत निर्माण करणारा हा विशाल प्राणी 35 लाख वर्षांपूर्वी नामशेष झाला.
नवीन संशोधनातून या महाकाय माशांविषयी मनोरंजक माहिती समोर आली आहे.
मेगालोडॉनची माहिती नेमकी कधी समोर आली?
1840 मध्ये शास्त्रज्ञांना एका त्रिकोणी आकाराच्या दातांचे जीवाश्म अवशेष सापडले होते. आणि तेव्हाच पहिल्यांदा या माशाविषयीची माहिती उघड झाली.
प्राचीन ग्रीक भाषेत मेगालोडॉन म्हणजे मोठा दात.
त्या दातांची लांबी जवळपास 16.8 सेमी इतकी होती.
ग्रेट व्हाईट शार्कचे दात 7.5 सेंटीमीटर आहेत. यावरून तुम्ही समजू शकता की या महाकाय शार्कचे दात किती मोठे असतील.
मेगालोडॉन शार्कचा संपूर्ण आकार समजून घेण्यासाठी, त्याचा संपूर्ण सांगाडा शोधणे आवश्यक आहे. पण तो अजूनही सापडलेला नाही.
मेगालोडॉन शार्क हा कार्टिलागिनस माशांच्या कुटुंबातील आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर त्याला कार्टिलागिनस फिश म्हणतात.
म्हणजेच या माशाचे शरीर कठीण हाडांपेक्षा लवचीक अस्थिकूर्चेने बनलेलं असतं. त्यामुळे त्याचं जीवाश्मात रूपांतर होऊ शकत नाही.
परिणामी, महाकाय शार्कच्या जीवाश्मांमध्ये प्रामुख्याने त्यांचे दात आणि काही प्रमाणात त्यांच्या कशेरुका अस्तित्वात आहेत.
कॅलिफोर्निया विद्यापीठात इकोजिओकेमिस्ट म्हणून काम करणाऱ्या सोरा किम सांगतात की, हे शार्क नेमके कसे दिसायचे याची कल्पना करणं कठीण आहे.
सोरा किम यांनी मेगालोडॉन शार्कचा दातांचा अभ्यास केला आहे.
अनेक प्राणीशास्त्रज्ञ, मेगालोडॉन शार्कच्या दातांची तुलना इतर शार्क माशांशी करतात. यावरून मेगालोडॉन किती मोठे असतील याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
पण यातून नेमका परिणाम मिळेल असंही नाही. कारण एकाच प्रजातीच्या लहान प्राण्यांवरून मोठ्या प्राण्यांच्या आकाराचा अंदाज लावता येत नाही. प्राण्यांच्या शरीराचा क्रम एकाच पॅटर्नला अनुरूप नसतो.
म्हणूनच मेगालोडॉनच्या आकाराबद्दल वेगवेगळे तर्क लावले जातात.
लांबीबद्दल वेगवेगळे तर्क
काही अभ्यासानुसार मेगालोडॉन शार्क 18 ते 20 मीटर लांब होते.
परंतु शिकागोमधील डेपॉल विद्यापीठातील सागरी जीवाश्मशास्त्रज्ञ केन्शु शिमाडा यांनी 2019 मध्ये केलेल्या अभ्यासात असा युक्तिवाद केलाय की, मेगालोडॉन शार्क 18 ते 20 मीटर लांब नव्हते.
ते म्हणतात, शार्कचे दात मोजताना त्याच्या जबड्यातील वरचे दात मोजले पाहिजेत. हे दात 15.3 मीटरपेक्षा मोठे नाहीत.
त्यानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी एक नवा वाद समोर आला. गेनेसविले येथील फ्लोरिडा म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथील व्हिक्टर पेरेझच्या टीमने एक नवा अभ्यास केला होता.
त्यानुसार, त्यांनी मोठ्या दातांच्या लांबीसोबतच दातांच्या रुंदीचाही अभ्यास केला. यामुळे मेगालोडॉनने जबडा उघडल्यावर तो किती मोठा असू शकतो याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या अभ्यासात त्यांना असं आढळलं की, मेगालोडॉनची लांबी सुमारे 20 मीटर इतकी असू शकते.
सागरी जीवाश्मशास्त्रज्ञ कॅटलिन पिमिएन्टो यांनी सांगितलं की, त्यांचे विश्लेषण काहीसे पटण्यासारखे आहे. त्या स्वित्झर्लंडच्या झुरिच विद्यापीठात काम करतात.
त्यानंतर शिमडा यांनी देखील मेगालोडॉनची लांबी सुमारे 20 मीटर असण्याची शक्यता मान्य केली.
याचा अर्थ आधुनिक जगात महाकाय मानले जाणारे हे शार्क या महाकाय शार्कसमोर अगदीच लहान आहेत.
ग्रेट व्हाईट शार्क सध्या समुद्रातील सर्वांत मोठा मांसाहारी मासा आहे. त्याची लांबी 4.9 मीटर असल्याचं सांगितलं जातं.
याचा अर्थ मेगालोडॉन यापेक्षा तीन किंवा चार पट जास्त लांब होता.
मेगालोडॉनच्या लांबी एवढा एकच मासा आज अस्तित्वात आहे. हा मासा म्हणजे व्हेल मासा. तो आज जगातील सर्वांत मोठा जिवंत सागरी प्राणी आहे. पण व्हेल हा काही भक्षक नाही.
सर्वात मोठे निळे व्हेल देखील सुमारे 30 मीटर लांब आहेत.
याचा अर्थ असा नाही की मेगालोडॉन हा सर्वात मोठा मासा होता. कदाचित हा सर्वात मोठा शार्क मासा असू शकेल. आणि हा इतर मोठे प्राणी खाणारा सर्वात मोठा शार्क असण्याची शक्यता आहे.
सुपर प्रिडेटर
मेगालोडॉन शार्क हा त्याच्या दातांचा वापर करून इतर प्राण्यांना भक्ष्य बनवतो. पण तो कोणत्या प्रकारच्या प्राण्यांची शिकार करतो हे पाहण्यासाठी संशोधकांनी मेगालोडॉनच्या दातांवरील रसायनांचा अभ्यास केला.
त्यापैकी एक नायट्रोजनशी संबंधित आहे. प्राण्यामध्ये असलेला नायट्रोजन हा तो खात असलेल्या अन्नातील प्रथिनांपासून मिळतो.
यावरून जे प्राणी जास्त अन्न खातात त्यांच्या दातांमध्ये नायट्रोजन जास्त असतो.
2022 च्या अभ्यासात संशोधकांनी निष्कर्ष काढला की मेगालोडॉनच्या दातांमध्ये नायट्रोजनची टक्केवारी असण्यामागे ऑर्कास सारखे भक्षक व्हेल कारणीभूत असू शकतात.
याचा अर्थ असा की, मेगालोडॉन हा एक असा समुद्री प्राणी आहे जो मोठ्या आकाराचा व्हेल देखील खाऊ शकतो.
2022 मध्ये शिमाडा आणि किम या दोघांनी केलेल्या दुसऱ्या अभ्यासानुसार, मेगालोडॉन शार्क हे ग्रेट व्हाईट शार्कसारखे दिसत असल्याचं मानलं गेलं.
कॅटलिन पिमिएन्टो म्हणतात की, लहान आणि मोठ्या मेगालोडॉनमधील फरक अशा अनिश्चिततेचं कारण असू शकतं.
ग्रेट व्हाईट शार्क मधील लहान शार्क हे बहुतेक मासेच खातात. तर प्रौढ शार्क इतर सागरी प्राणी खातात. मेगालोडॉनच्या बाबतीतही असंच घडलं असावं.
आणि 2020 मध्ये केलेल्या अभ्यासात, महाकाय शार्क माशांच्या प्रजननाबद्दल काही गोष्टी जाणून घेता आल्या. यासंबंधीचं संशोधन हे शिमडा यांच्या टीमने केलं होतं.
त्यांनी जन्मानंतर दोन मीटर लांब असणाऱ्या नवजात मेगालोडॉन शार्कचाही अभ्यास केला. मोठ्या आकाराचा हा मासा इतर माशांप्रमाणे अंड्यातून बाहेर येण्याऐवजी आईच्या गर्भातच वाढतो. म्हणजे मेगालोडॉन मादीच्या पोटात पिल्लं असतात.
शास्त्रज्ञांच्या एका गटाचं म्हणणं आहे की हे शार्क आईच्या पोटात भ्रूण अवस्थेत असतानाच इतर पिल्लांना खातात आणि प्रचंड वाढतात. शास्त्रज्ञ म्हणतात की ही घटना धक्कादायक आणि जंगली असली तरी आधुनिक शार्कमध्ये ही घटना सामान्य आहे.
उष्ण रक्ताचे मासे
मेगालोडॉनमध्ये काही अद्वितीय शारीरिक क्षमता आहेत.
2022 मध्ये, कॅटलिन पिमिएन्टो यांच्या टीमने शार्कच्या दुर्मिळ पाठीचा कणा स्कॅन केला. त्यांनी या पाठीच्या कण्याच्या मदतीने संपूर्ण मेगालोडॉन आकाराची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला गेला.
या संरचनेच्या आधारे त्यांनी असा निष्कर्ष काढला की मेगालोडॉन पोहण्यात निपुण होते आणि लांब अंतर वेगाने कापू शकत होते. ते 1.4 मैल प्रति सेकंद या वेगाने प्रवास करत असतील असा अंदाज आहे. आणि आताच्या शार्कपेक्षा याचा वेग जास्त होता.
त्यांनी तयार केलेल्या आकारावरून टीमने पोटाच्या आकाराचाही अंदाज लावला. पिमिएन्टो सांगतात की मेगालोडॉनचा जबडा खूप मोठा असावा जेणेकरून त्यांना मोठे प्राणी खाता येणं शक्य होतं.
एक मोठा मेगालोडॉन ऑर्कास प्राणी सहजपणे चघळू शकतो. अशा आहारामुळे तो बरेच दिवस अन्नाशिवाय जगू शकतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की मेगालोडॉनने जरी एकदा शिकार केली तरी तो लांबचा प्रवास करू शकतो.
या सर्वांच्या आधारे, पिमिएन्टोच्या टीमने निष्कर्ष काढला की, मेगालोडॉन हा एक महाकाय जलचर प्राणी होता जो इतर प्राण्यांची शिकार करण्यासाठी समुद्रात फिरत होता.
त्यांच्या सक्रिय जीवनशैलीमुळे त्यांच्या शरीरातून वाहणारं रक्त उबदार होतं. मासे हे शीतरुधिर प्राणी असतात, मात्र मेगालोडॉन हा नियततापी म्हणजेच उष्ण रक्ताचा असल्याने त्याला थंड पाण्यातही जलद पोहता येत होते.
पण मेगालोडॉन लाखो वर्षांपूर्वीच नामशेष झाले.
हेही वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.