कीव्हमधील भारतीय कंपनीच्या गोदामावर रशियानं क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा युक्रेनचा दावा, कोणती आहे ही कंपनी?

फोटो स्रोत, X/@MartinHarrisOBE
युक्रेननं शनिवारी राजधानी कीव्हमधील एका भारतीय औषध कंपनीवर रशियानं क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला. भारतात युक्रेनच्या दुतावासानं याबाबत माहिती दिली.
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दुतावासानं पोस्ट केलं की, "आज (12 एप्रिल) रशियाच्या क्षेपणास्त्रानं युक्रेनमधील भारतीय औषध कंपनी कुसुमच्या गोदामावर हल्ला केला आहे."
त्याशिवाय रशियानं मुद्दाम भारतीय कंपनीला लक्ष्य केलं असल्याचा आरोपही युक्रेनच्या दुतावासानं लावला आहे.
"भारताबरोबर 'खास मैत्री' चा दावा करणाऱ्या रशियानं मुद्दाम भारतीय व्यावसायिकांना लक्ष्य करणं सुरू केलं आहे. ते लहान मुलं आण ज्येष्ठांसाठी तयार करण्यात आलेली औषधं नष्ट करत आहेत."
युक्रेननं ब्रिटनच्या एका राजदुतांच्या एक्स पोस्टच्या हवाल्यानं रशियावर हा आरोप केला आहे.
युक्रेनमध्ये ब्रिटनचे राजदूत मार्टिन हॅरिस यांनी दावा केला आहे की, शनिवारी सकाळी रशियाच्या ड्रोन हल्ल्यात एका मोठ्या औषध कंपनीचं गोदाम नष्ट झालं आहे.
मात्र, ब्रिटिश राजदुतांनी कोणत्याही भारतीय कंपनीचं नाव घेतलं नव्हतं.
मार्टिन हॅरिस यांनी हल्ल्याचा एक फोटो जाहीर करत लिहिलं की, "आज (शनिवार) सकाळी रशियाच्या ड्रोननं कीव्हमधील एका प्रमुख औषध कंपनीचं गोदाम पूर्णपणे उध्वस्त केलं."
ते म्हणाले, "या हल्ल्यात लहान मुलं आणि ज्येष्ठांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा साठा जळून खाक झाला. युक्रेनच्या नागरिकांच्या विरोधातील रशियाची दहशतवादी मोहीम सुरुच आहे."
रशियाने आतापर्यंत या आरोपांवर काहीही वक्तव्य केलेलं नाही. तर कुसुम फार्मा कंपनीनंही अद्याप काहीही म्हटलेलं नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचीही अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, युक्रेनमधील युद्ध बंद करण्यासाठी अमेरिका आणि रशिया यांच्यात चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे विशेष दूत स्टिव्ह विटकॉफ यांनी शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली.
कुसुम फार्मा कंपनी युक्रेनमध्ये काय काम करते?
कुसुम फार्माच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, ही एक मध्यम आकाराची कंपनी आहे.
या कंपनीचा प्लांट युक्रेनच्या सुमीमध्ये आहे. तर कंपनीचा कंपनीचा पत्ता कीव्हचा आहे. ही कंपनी टॅब्लेट, कॅप्सुल, पावडर, पॅलेट अशी औषधं तयार करते.
कुसुम फार्माने वेबसाईवर ते तयार करत असलेल्या 21 औषधांचा उल्लेख केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कंपनीच्या दुसऱ्या एका वेबसाईटनुसार, कुसुम फार्मास्युटिकल अनेक कंपन्यांचा एक समूह आहे. त्यांचं मुख्यालय दिल्लीत आहे.
या कंपनीचे चार प्लांट असून तिथं औषध निर्मिती केली जाते. त्यापैकी तीन भारतात तर एक प्लांट युक्रेनच्या सुमीमध्ये आहे.
रशिया-युक्रेनमधील युद्धाची स्थिती?
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेननं 24 तासांत रशियाच्या विविध ऊर्जा केंद्रांवर पाच हल्ले केल्याचा आरोप शुक्रवारी रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केला.
गेल्या महिन्यातच अमेरिकेबरोबरच्या वेगवेगळ्या करारांमध्ये रशिया आणि युक्रेननं एकमेकांच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ला करणार नसल्याच्या मुद्द्यावर सहमती दर्शवली होती.
पण, या करारानंतर दोन्ही देशांनी अनेकदा एकमेकांवर कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेनमधील बीबीसीचे प्रतिनिधी जेम्स वाटरहाऊस यांच्या मते, युद्ध विरामासाठी अमेरिकेकडून रशियावर आणखी दबाव वाढेल, अशी युक्रेनला आशा आहे.
पण युद्धविराम लागू करण्याची नेमकी योजना कशाप्रकारे आखली जात आहे, याबाबत सध्या फार कमी माहिती आहे.
मात्र, युद्ध थांबवण्यासाठी चर्चा नक्कीच सुरू आहे. शुक्रवारी बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये एक बैठक झाली. त्यात युद्ध विरामाबाबत चर्चा झाली आहे.
अमेरिका आणि रशिया यांच्यातील चर्चा
युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत अमेरिका आणि रशिया यांच्यातही सातत्यानं चर्चा सुरू आहे.
याच आठवड्यात शुक्रवारी अमेरिकेचे विशेष दूत स्टिव्ह विटकॉफ यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली आहे.
तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पुतीन यांनी युद्ध विरामाच्या दिशेनं पावलं उचलण्याची विनंती केली आहे.

फोटो स्रोत, Reuters
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर रशियानं म्हटलं की, ही बैठक चार तासांपेक्षा जास्त वेळ चालली. त्यात युक्रेनच्या कराराच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
यावर्षी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबरोबरची विटकॉफ यांची ही तिसरी भेट होती.
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हटलं की, "रशियाला युद्ध संपवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. या युद्धात दर आठवड्याला अनेक लोकांचा मृत्यू होत आहे."
युक्रेनसाठी ब्रिटनची लष्करी मदत
युद्ध विरामासाठीच्या चर्चेदरम्यान, ब्रिटनने युक्रेनला साडेचार कोटी पाऊंडच्या अतिरिक्त लष्करी सहाय्याची घोषणा केली आहे.
ही घोषणा ब्रसेल्समध्ये झालेल्या बैठकीनंतर झाली.
ब्रिटनचे संरक्षणमंत्री जॉन हेली यांनी म्हटलं की, बैठकीत राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर युक्रेनवरील हल्ला थांबवण्यासाठी दबाव टाकण्याबाबत चर्चा झाली.
ते म्हणाले की, "आम्हाला युक्रेनची सुरक्षा अधिक मजबूत करत रशियाचे हल्ले थांबवण्यासाठी पावलं उचलायला हवी."
युक्रेनला दिलेल्या मदतीत ब्रिटिश लष्करानं लाखो ड्रोन, अँटि टँक माइन्स आणि लष्करी वाहनांच्या दुरुस्तीसाठी निधी दिला आहे.
या पॅकेजमधील जवळपास 350 दशलक्ष पाऊंड एवढा वाटा ब्रिटन देईल तर उर्वरित मदत आंतरराष्ट्रीय निधीच्या माध्यमातून नॉर्वे देईल.
भारत आणि युक्रेन संबंध
गेल्या 25 वर्षांमध्ये भारत आणि युक्रेनच्या व्यापारी संबंधांमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतानं युक्रेनला मानवी सहाय्य दिलं आहे.
पण, भारतानं युक्रेनवर रशियानं केलेल्या हल्ल्यांचा कधीही निषेध केलेला नाही किंवा संयुक्त राष्ट्रात रशियाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांना पाठिंबाही दिलेला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) तन्मय लाल यांच्या मते, गेल्या वर्षीपर्यंत मदत म्हणून सुमारे 135 टन साहित्य युक्रेनला पाठवण्यात आलं आहे.
त्यात औषधं, चादरी, तंबू, वैद्यकीय उपकरणांपासून जनरेटरसारख्या वस्तुंचा समावेश आहे.
गेल्यावर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचा दौराही केला होता.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा, त्याठिकाणी भारतीय विद्यार्थी अडकले होते. त्यांची संख्या सुमारे चार हजार होती.
या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात पोलंडनं महत्त्वाची भूमिका निभावली होती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











