इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनंतर इराणमध्ये अन्नधान्याचा तुटवडा; सध्या इराणी नागरिकांची काय आहे अवस्था?

    • Author, कसरा नाजी
    • Role, विशेष प्रतिनिधी
    • Reporting from, बीबीसी पर्शियन, लंडन

तेहरानमधील माझ्या बहिणीच्या आवाजात भीती आणि तणाव स्पष्टपणे जाणवतो. व्हॉट्सॲप कनेक्शन मधून-मधून खंडित होत असलं, तरी आश्चर्यकारकरीत्या ते अजूनही कधीकधी काम करतं.

मी लंडनमध्ये बीबीसीसाठी काम करणारा पत्रकार आहे, हे माहीत असल्यामुळे, तिला माझ्याकडून हवी असते ती फक्त स्पष्ट माहिती.

"काय होणार आहे? आपण काय करावं?" असं ती विचारते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानमधील लोकांनी शहर रिकामं करावं असं म्हटलं आहे. "ते खरंच याबाबत गंभीर आहेत का?"

गुरुवारी (19 जून) मध्यरात्रीपासून तेहरानवर इस्रायली विमानांकडून सातत्याने बॉम्बफेक होत आहे आणि ती विमाने राजधानीच्या आकाशात मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. त्यांना प्रत्युत्तर म्हणून अँटी-एअरक्राफ्ट फायर केलं जातं, पण ते बहुतांश वेळा निष्फळ ठरत आहेत.

'वीज, पाणी उपलब्ध, पण अन्नाचा तुटवडा'

उंच इमारतीच्या वरच्या मजल्यावरील तिच्या खिडकीतून माझी बहीण हे सगळं स्पष्टपणे पाहू शकते आणि हे दृश्य तिच्या मनातील भीती अजिबात कमी करत नाही.

तिच्या परिसरातील लोकांना इस्रायली लष्कराने तात्काळ स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तिने तिथेच राहणं पसंत केलं आहे.

तिने मला सांगितलं की, तिच्या माहितीप्रमाणे तिच्या अपार्टमेंटच्या जवळपास कोणत्याही प्रकारचे लष्करी लक्ष्य नाहीत.

असं असलं तरी तिची चिंता एका जवळच्या व्यावसायिक युनिटबाबत होती, जे तिच्या मते, रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या मालकीचं आहे. त्यामुळे ते कदाचित लक्ष्य असू शकतं. मात्र, ती कंपनी नेमकं काय काम करते, याची तिला काहीच कल्पना नव्हती.

अनेक लोकांना त्यांच्या शेजाऱ्यांविषयी किंवा जवळपास लष्करी लक्ष्य आहेत का नाही, याची माहिती नसते. कारण रिव्होल्युशनरी गार्ड्सचं बरचसं कार्य गुप्तपणे आणि लपलेल्या ठिकाणाहून चालवलं जातं.

राजधानीच्या अनेक भागांमध्ये वीज आणि पाणी अद्याप उपलब्ध आहे. मात्र, अन्नधान्याचा पुरवठा कमी आहे.

अनेक दुकानं बंद झाली आहेत आणि आणखी काही बंद होत आहेत. अगदी बेकरीदेखील बंद होत आहेत. काही बेकरी पिठाच्या कमतरतेमुळे, तर काही मालकच पळून गेल्यामुळे बंद असण्याची शक्यता आहे.

माझ्या बहिणीनं शहर सोडण्यास नकार दिला आहे, जसं की शेकडो-हजारो, कदाचित लाखो लोक आधीच गेले आहेत. त्यामागे मुख्य कारण म्हणजे तिला कुठे जाण्याचं ठिकाण किंवा जागाच नाही.

रस्ते गर्दीने भरले असले आणि पेट्रोलचा तुटवडा असूनही अनेक रहिवासी मागील काही दिवसांत स्थलांतरित झाले आहेत.

'रस्त्यावरील गर्दी झाली कमी'

तेहरानचे रस्ते, जे पूर्वी वाहनेने भरलेली, रहदारीने ठप्प असायची, आता ते अतिशय शांत आहेत.

ज्या लोकांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे, ते फारच कमी बाहेर पडतात, कारण त्यांना हल्ल्याचा धोका जाणवतो.

अलीकडे आलेल्या वृत्तांनुसार, पेट्रोल पंपांवरील लांब रांगा आता कमी होऊ लागल्या आहेत आणि राजधानी बाहेर जाणारे रस्ते तुलनेने कमी गर्दीचे झाले आहेत.

देशातील अणुऊर्जा केंद्राजवळ राहणाऱ्या रहिवाशांना आणखी एक भीती ही आहे की, या ठिकाणी इस्रायली हल्ल्यांमुळे किरणोत्सर्गी प्रदूषण पसरू शकते, कारण अलीकडील दिवसांत हे केंद्र वारंवार लक्ष्य केले गेले आहेत.

जागतिक अणुऊर्जा देखरेख संस्थेनं आतापर्यंत सांगितलं आहे की, शुक्रवारी हल्ला झालेल्या आणि नुकसान झालेल्या दोन ठिकाणांच्या बाहेर किरणोत्सर्गी पातळी अजूनही अपरिवर्तित आहे.

माहितीसाठी नागरिकांचा 'बीबीसी'वर भर

लोक सतत हे विचारत आहेत की, हे सर्व कुठल्या दिशेला जाईल, आणि हे आणखी किती काळ चालेल.

अनेक लोक आता विदेशातील पर्शियन भाषेतील टीव्ही चॅनेल्सवरील बातम्यांवर अवलंबून आहेत.

बीबीसी पर्शियनची टीव्ही सेवा आणि त्याची वेबसाइट मुख्य बातम्यांचे स्रोत बनले आहेत. इंटरनेट बहुतेक वेळा खूपच मंद असतानाही, इराणमधून वेब ट्रॅफिक जवळपास एका रात्रीत दुप्पट झाले आहे.

ट्रम्प यांनी इराणला आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केले आहे, परंतु इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनींनी इराण कधीही शरण जाणार नाही, असं जाहीर केलं आहे.

काही इराणी लोकांना शासनाबद्दल सहानुभूती आहे, पण अनेकांना भीती वाटते की जर सत्तेत मोठ्या प्रमाणात अस्थिरता आली तर गोंधळ, कायदा-सुव्यवस्थेचा अभाव आणि अराजकता माजू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)