इंडियन एअर फोर्सचा ब्रिटिश काळापासून आतापर्यंत असा झाला विस्तार; जेट विमानं वापरणारं आशियातील पहिलं हवाई दल

भारतीय वैमानिक दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस स्कॉटलँडमधील एका रॉयल एअर फोर्स तळावर प्रशिक्षण घेताना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीय वैमानिक दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस स्कॉटलँडमधील एका रॉयल एअर फोर्स तळावर प्रशिक्षण घेताना
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

8 ऑक्टोबर, 1932 या दिवशी इंडियन एअर फोर्स म्हणजे भारतीय हवाई दल अधिकृतपणे अस्तित्वात आलं.

त्या दिवशी 6 भारतीय कॅडेटनी रॉयल एअर फोर्स कॉलेज क्रॉमवेलमधून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर त्यांना 'किंग्ज कमिशन' म्हणजे अधिकृतपणे हवाई दलात नियुक्त करण्यात आलं होतं.

यातील 5 कॅडेट, वैमानिक झाले होते, तर सहाव्या कॅडेटला ग्राऊंड ड्युटी ऑफिसरची जबाबदारी देण्यात आली होती.

याच 5 वैमानिकांपैकी एक होते सुब्रतो मुखर्जी. ते नंतर भारतीय हवाई दलाचे प्रमुख झाले.

यातील एकमेव मुस्लीम वैमानिक होते ए. बी. अवान. देशाची फाळणी झाल्यानंतर ते पाकिस्तानात गेले.

1 एप्रिल 1933 ला कराचीतील ड्रिग रोडवर भारतीय हवाई दलाचं पहिलं स्क्वॉड्रन म्हणजे तुकडी उभारण्यात आली होती. या स्क्वॉड्रनमध्ये फक्त 4 वेस्टलँड विमानं होती.

हवाई दलाचा पहिला वापर

3 वर्षांच्या प्रशिक्षणानंतर या स्क्वॉड्रनला रॉयल एअर फोर्सची मदत करण्याची आणि सीमेवरील प्रांतातील टोळीवाल्या बंडखोरांच्या विरोधात ब्रिटिश सैन्याच्या लष्करी मोहिमेत मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली.

'एक्सरसाईज गरुड VII' या संयुक्त लष्करी सरावात हवेत इंधन भरण्याचा सराव करताना भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं

फोटो स्रोत, Emmanuel DUNAND / AFP

फोटो कॅप्शन, 'एक्सरसाईज गरुड VII' या संयुक्त लष्करी सरावात हवेत इंधन भरण्याचा सराव करताना भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं

पी. व्ही. एस. जगनमोहन आणि समीर चोपडा यांनी 'द इंडिया-पाकिस्तान एअर वॉर ऑफ 1965' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात त्यांनी लिहिलं, "या स्क्वॉड्रनला मीरनशाहमध्ये ठेवण्यात आलं होतं. फोर्स लँडिंग करावी लागल्यामुळे अनेक वैमानिकांचा मृत्यू झाला होता. त्यातील एक होते शीख वैमानिक, अर्जन सिंह."

"त्यांना मीरनशाहहून रजमाकदरम्यान उड्डाण करताना एका टोळीवाल्याच्या रायफलची गोळी लागली. त्यामुळे त्यांना विमान जमिनीवर उतरावं लागलं होतं."

परवानाधारकांचा हवाई दलात समावेश करण्याचा प्रस्ताव

दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर रिसालपूरमध्ये तैनात असलेल्या रॉयल एअर फोर्सच्या स्क्वॉड्रनला भारतीय हवाई दलाच्या एअर क्रूला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देण्यात आली.

व्यावसायिक वैमानिकांचा परवाना असणाऱ्या लोकांची भारतीय हवाई दलात भरती करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. अशाप्रकारे जवळपास 100 वैमानिक भारतीय हवाई दलाच्या वॉलंटरी रिझर्व्ह म्हणजे स्वेच्छनं दाखल झालेल्या राखीव तुकडीत सहभागी झाले.

यात पी. सी. लाल आणि रामास्वामी राजाराम देखील होते. ते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय हवाई दलात उच्च पदांवर पोहोचले.

काही दिवसांच्या प्रशिक्षणानंतरच या वैमानिकांना त्या वेळेस तयार करण्यात आलेल्या कोस्टल डिफेंस फ्लाईटमध्ये तैनात करण्यात आलं. त्यांना वापिती, हार्ट आणि ऑडेक्ससारखी नागरी विमानं उडवण्यास सांगण्यात आलं.

त्यांना समुद्र किनाऱ्यावर देखरेख करण्याची आणि सागरी व्यापारी मार्गांवरील जहाजांच्या समूहांना एअर कव्हर म्हणजे आकाशातून संरक्षण देण्याची जबाबदारी देण्यात आली.

सैन्याच्या अधिकाऱ्यांचाही हवाई दलात करण्यात आला समावेश

असं असूनही वैमानिकांचा इतका तुटवडा होता की, सैन्याच्या अधिकाऱ्यांनादेखील सांगण्यात आलं की, जर त्यांना हवाई दलात थोडासाही रस असेल, तर त्यांना विमान चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं.

20 सप्टेंबर 1938 ला सैन्यातील 3 लेफ्टनंट्सनी हवाई दलात सहभागी होण्यात रस दाखवला.

8 ऑक्टोबर, 1940 ला भारतीय वैमानिकांची पहिली तुकडी ब्रिटनमध्ये पोहोचली होती, ते तिथे रॉयल एअर फोर्सबरोबर उड्डाणं करण्यासाठी गेले होते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 8 ऑक्टोबर 1940 ला भारतीय वैमानिकांची पहिली तुकडी ब्रिटनमध्ये पोहोचली होती, ते तिथे रॉयल एअर फोर्सबरोबर उड्डाणं करण्यासाठी गेले होते

अंचित गुप्ता यांनी 'सेकेंडेड टू द स्काईज, द आर्मी ऑफिसर्स हू हेल्प्ड बिड द इंडियन एअर फोर्स' हा लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी लिहिलं, "हे 3 अधिकारी होते, मोहम्मद खाँ जंजुआ, आत्माराम नंदा आणि बुरहानुद्दीन. त्यांची भूदलातील ज्येष्ठता कायम ठेवण्यात आली. मात्र ते भारतीय हवाई दलात पूर्णवेळ काम करू लागले."

"त्यावेळी भारतात कोणतंही फ्लाईंग स्कूल नव्हतं. त्यामुळे त्यांना प्रशिक्षणासाठी इजिप्तमध्ये पाठवण्यात आलं. भारतात परतल्यावर जंजुआ यांना स्क्वॉड्रन क्रमांक 1 मध्ये तैनात करण्यात आलं. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला."

"तिथे त्यांना पहिल्याच दिवशी ग्रुप कॅप्टन करण्यात आलं. काही दिवसांमध्येच बढती मिळून ते एअर कोमोडोअर झाले. नंतर त्यांनी पाकिस्तानाचे कार्यवाहक हवाई दल प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली."

भारतीय हवाई दलाचा विस्तार

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नंदा कानपूरमध्ये एअर रिपेअर डेपोचे प्रमुख झाले. 1958 मध्ये त्यांना भारतीय हवाई दलाचं उपप्रमुख करण्यात आलं.

काही कारणांमुळे 1941 मध्ये बुरहानुद्दीन भूदलात परत गेले. दुसऱ्या महायुद्धात युद्धकैदी झाल्यानंतर ते सुभाष चंद्र बोस यांच्या आवाहनानंतर 'आझाद हिंद फौजे'त सहभागी झाले होते.

1941 मध्ये जपान महायुद्धात उतरला. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या विस्ताराला वेग आला.

लाहोरजवळ वाल्टन आणि बालामध्ये फ्लाईंग स्कूल सुरू करण्यात आले. रिसालपूर आणि पेशावरमध्ये देखील 2 ट्रेनिंग स्कूल सुरू करण्यात आले.

त्यानंतर, भारतीय हवाई दलाच्या स्क्वॉड्रनची संख्या वाढून 2 वरून 10 वर पोहोचली.

एका स्क्वॉड्रनमध्ये साधारणपणे 12 विमानं असतात. मात्र ही संख्या कमी-अधिक असू शकते.

दुसऱ्या महायुद्धातील भारतीय हवाई दलाची भूमिका

म्यानमारच्या (तेव्हाचं बर्मा) आघाडीवर भारतीय हवाई दलाला जी लढाऊ विमानं देण्यात आली ती जपानच्या विमानांच्या तुलनेत कमी शक्तीची होती.

पी. व्ही. एस. जगनमोहन आणि समीर चोपडा यांनी लिहिलं, "संपूर्ण महायुद्धाच्या काळात भारतीय हवाई दलाला रॉयल एअर फोर्सनं नाकारलेली विमानं देण्यात आली होती. युद्ध संपण्याच्या काही काळ आधीच भारतीय हवाई दलाला आधुनिक स्पिटफायर विमानं देण्यात आली."

अमेरिका निर्मित वल्टी ए-31 बॉम्बर विमानाबरोबर पोझ देताना भारतीय हवाई दलाचे 2 वैमानिक, याच हवाई तळावरून या वैमानिकांनी म्यानमारमधील मोहिमेच्या वेळेस जपानच्या सैन्यावर हल्ले केले होते.

फोटो स्रोत, Universal Images Group via Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिका निर्मित वल्टी ए-31 बॉम्बर विमानाबरोबर पोझ देताना भारतीय हवाई दलाचे 2 वैमानिक, याच हवाई तळावरून या वैमानिकांनी म्यानमारमधील मोहिमेच्या वेळेस जपानच्या सैन्यावर हल्ले केले होते.

भारताचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल स्लिम यांनी भारतीय हवाई दलाचं कौतुक करत लिहिलं, "भारतीय हवाई दलाच्या कामगिरीनं मी खूप प्रभावित झालो. जोडीनं उडत भारतीय वैमानिकांनी जुन्या हरीकेन विमानांचा वापर करत त्यांच्यापेक्षा कितीतरी सरस असणाऱ्या जपानी विमानांचा सामना केला."

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर भारतीय वैमानिकांना 1 डीएसओ, 22 डीएफसी आणि इतर अनेक शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

संपूर्ण युद्धकाळात भारतीय हवाई दलाचे 60 वैमानिक मारले गेले.

हवाई दलानं श्रीनगरमध्ये उतरवले सैनिक

देशाची फाळणी झाल्यानंतर हवाई दलाचीदेखील विभागणी झाली. त्यात भारताच्या वाट्याला 7 लढाऊ स्क्वॉड्रन आणि 1 ट्रान्सपोर्ट स्क्वॉड्रन आले. दुसरकडे पाकिस्तानच्या वाट्याला 2 लढाऊ स्क्वॉड्रन आणि 1 ट्रान्सपोर्ट स्क्वॉड्रन आलं.

भारतीय हवाई दलाचे पहिले प्रमुख होते, एअर मार्शल सर टॉमस एमहर्स्ट. त्यानंतर एअर मार्शल एवलॉ चॅपमन आणि सर जेराल्ड गिब्स भारतीय हवाई दलाचे प्रमुख झाले.

भारतीय हवाई दलाच्या 21 व्या वर्धापन समारंभात, हवाईपट्टीवर सहभागी झालेले भारतीय सैनिक

फोटो स्रोत, Keystone/Hulton Archive/Getty Images)

फोटो कॅप्शन, भारतीय हवाई दलाच्या 21 व्या वर्धापन समारंभात, हवाईपट्टीवर सहभागी झालेले भारतीय सैनिक

स्वातंत्र्यानंतर भारतीय हवाई दलाची पहिली कारवाई 20 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीरमध्ये झाली. भारतीय हवाई दलानं राजा हरि सिंह यांच्या विनंतीवर श्रीनगरमध्ये भारतीय सैनिक उतरवले.

दिल्लीच्या पालम विमानतळावरून भारतीय सैन्याच्या एक तुकडीनं उड्डाण केलं आणि ती 27 ऑक्टोबरच्या सकाळी 9.30 वाजता श्रीनगर विमानतळावर उतरली.

असं करणं खूप जोखमीचं होतं. कारण भारतीय हवाई दलाला हे माहीत नव्हतं की श्रीनगर विमानतळ सुरक्षित आहे की नाही. त्यावर पाकिस्तानी टोळीवाल्यांनी कब्जा केला आहे की नाही याची हवाई दलाला काहीच माहिती नव्हती.

संध्याकाळ होता-होता भारतीय हवाई दल आणि नागरी डाकोटा विमानांनी श्रीनगर विमानतळावर शीख रेजिमेंटच्या पहिली बटालियनचे सैनिक उतरवले. त्यानंतर भारतीय सैनिकांनी विमानतळावर नियंत्रण मिळवलं.

काश्मीरमधील लष्करी कारवाईत हवाई दलाची भूमिका

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लेफ्टनंट जनरल एल. पी. सेन यांनी 'स्लेंडर वॉज द थ्रेड' हे पुस्तक लिहिलं. त्यात त्यांनी म्हटलं, "28 ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाच्या अंबाला हवाई तळावरून उड्डाण करून टेम्पेस्ट विमानांनी पाटनमधील घुसखोरांच्या तळांवर बॉम्बहल्ला केला."

"2 दिवसांनी स्पिटफायर विमानंदेखील श्रीनगरमध्ये पोहोचली होती. 7 नोव्हेंबरला शलातेगच्या लढाईत भूदल आणि हवाई दलानं एकत्रितपणे पाकिस्तानी हल्ले निष्फळ केले. टेम्पेस्ट विमानांनी केलेल्या हल्ल्यांमुळे घुसखोर उरीपर्यंत मागे रेटले गेले."

"श्रीनगर आणि बारामुल्लाहदरम्यान घुसखोरांचे 147 मृतदेह सापडले होते. हे सर्व भारतीय हवाई दलाच्या बॉम्बहल्ल्यात मारले गेले होते."

त्यावेळेस पूंछमध्ये कोणताही हवाई तळ नव्हता, तसंच धावपट्टीदेखील नव्हती. त्यामुळे सैनिकांना लागणारी शस्त्रं, अन्नधान्य आणि औषधं आकाशातून विमानांद्वारे टाकण्यात येत असे.

पी सी लाल यांनी 'माय ईयर्स विद द आयएएफ' हे आत्मचरित्र लिहिलं आहे.

त्यात त्यांनी लिहिलं आहे, "लेफ्टनंट कर्नल प्रीतम सिंह यांना पूंछमध्ये धावपट्टी बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तिथे डाकोटा विमानं उतरवता यावीत यासाठी धावपट्टीची आवश्यकता होती."

"भारतीय सैनिकांनी शरणार्थींच्या मदतीनं सहा दिवसांमध्येच परेड ग्राऊंडवर 600 यार्ड (साधारण 1800 फूट) लांबीची धावपट्टी तयार केली होती."

या बांधकामात जवळपासच्या भागातून शत्रूनं अडथळा निर्माण करू नये किंवा हल्ला करून नये यासाठी हवाई दलाच्या विमानांनी आकाशातून देखरेख केली होती.

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात धावपट्टी तयार झाल्यानंतर एअर कमोडोअर मेहर सिंह त्यांच्या डाकोटा विमानातून तिथे उतरले होते.

या विमानात त्यांच्यासोबत एअर व्हाईस मार्शल सुब्रतो मुखर्जीदेखील होते.

त्यावेळेस एका दिवसात जवळपास 12 वेळा डाकोटा विमानं रसद घेऊन तिथे उतरत असत. तर तिथून परतताना विमानं मृत, जखमी सैनिक आणि शरणार्थींना घेऊन येत असत.

रात्रीच्या वेळेस लँडिंग करत कामगिरी केली फत्ते

त्यावेळेस भारतीय सैन्याला दोन 25 पौंडी माऊंटेड गन म्हणजे तोफांची आवश्यकता होती. या तोफा घेऊन येणाऱ्या डाकोटा विमानांना तिथे दिवसा लँडिंग करणं खूप कठीण जात होतं.

कारण घुसखोर किंवा टोळीवाले धावपट्टीच्या अगदी जवळून त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे ते विमानांवर गोळीबार करू शकत होते.

पी सी लाल यांनी लिहिलं आहे, "एअर कोमोडोअर मेहर सिंह यांनी ठरवलं की ते रात्रीच्या वेळेस तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात तिथे विमानं उतरवतील."

"मेहर सिंह यांनी असंही ठरवलं की पाच डाकोटा विमानांचा वापर बॉम्बर विमानं म्हणून करण्यात यावा. मेहर सिंह यांना या कामगिरीसाठी महावीर चक्रानं सन्मानित करण्यात आलं."

जेट विमानांचा वापर करणारं आशियातील पहिलं हवाई दल

त्याच काळात दक्षिण भारतात हैदराबादमध्ये निजामाच्या विरोधात पोलीस कारवाई सुरू होती. तिथेदेखील हवाई दलानं टेम्पेस्ट आणि डाकोटा विमानांद्वारे सैन्याला मदत केली होती. हवाई दलाच्या विमानांनी निजामाच्या सैनिकांवर बॉम्बहल्ले केले आणि जाहिरातीदेखील टाकल्या.

लढाईची परिस्थिती संपल्यानंतर भारतीय हवाई दलाचा विस्तार करण्यात आला. ब्रिटनकडून 100 स्पिटफायर आणि टेम्पेस्ट लढाऊ विमानं विकत घेण्यात आली.

नोव्हेंबर, 1948 मध्ये भारतानं ब्रिटनमधून व्हॅम्पायर विमानं आयात केली. त्यानंतर भारतीय हवाई दल जेट विमानांचा वापर करणार आशिया खंडातील पहिलं हवाई दल बनलं.

23 वर्षांनी, 1971 च्या युद्धापर्यंत ही विमानं हवाई दलाच्या सेवेत होती.

1 एप्रिल, 1954 ला एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी, भारतीय हवाई दलाचे पहिले भारतीय प्रमुख झाले.

त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हवाई दलात कॅनबरा आणि नेट लढाऊ विमानांचा समावेश झाला.

1961 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या मिशनखाली कांगोमध्ये पहिल्यांदाच सहा भारतीय विमानांचा वापर करण्यात आला. त्याच काळात गोवा मुक्तीसाठी ऑपरेशन विजयची सुरुवात झाली.

पोर्तुगालच्या सैन्याकडे लढाऊ विमानं नव्हती. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या कॅनबरा, हंटर्स आणि व्हॅम्पायर लढाऊ विमानांनी कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांची कामगिरी पूर्ण केली.

भारतीय हवाई दलानं डेबोलिम आणि दीव धावपट्टीवर बॉम्बहल्ले करून त्या निष्क्रीय करून टाकल्या.

या संपूर्ण कारवाईमध्ये पोर्तुगालच्या सैन्यानं एकदाही विमानविरोधी तोफांचा वापर केला नाही.

चीनबरोबरच्या युद्धात हवाई दलाची भूमिका

1962 च्या भारत-चीन युद्धामध्ये भारतीय हवाई दलानं हल्ले तर केले नाहीत. मात्र त्यांनी लडाख आणि नेफाच्या दुर्गम भागांमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना रसद पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली.

या संपूर्ण युद्धादरम्यान हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी जखमी सैनिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं. लडाखमध्ये, अक्साई चीनमध्ये सैनिकांना पोहोचवण्याची जबाबदारी देखील भारतीय हवाई दलाला देण्यात आली होती.

1954 मध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री चाऊ एन लाय भारताच्या दौऱ्यावर आले असताना, देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत भारतीय सैन्य आणि हवाई दलाकडून गार्ड ऑफ ऑनर घेताना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1954 मध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री चाऊ एन लाय भारताच्या दौऱ्यावर आले असताना, देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत भारतीय सैन्य आणि हवाई दलाकडून गार्ड ऑफ ऑनर घेताना

या युद्धाच्या काळात चुशुलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हवाई दलाची विमानं उतरली की तिथे स्टीलच्या प्लेटनं बनवण्यात आलेली धावपट्टी जवळपास तुटलीच होती.

अनेक लष्करी तज्ज्ञांनी हवाई दलाचा आक्रमकपणे, हवाई हल्ले करण्यासाठी वापर न करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या युद्धातून हवाई दलाला जो धडा मिळाला, त्याचा वापर त्यांनी 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी केला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.