भारतात आकाशातून पडला होता एके 47 रायफल, ग्रेनेड्सचा पाऊस; देशाला हादरवणारं हे प्रकरण नेमकं काय होतं?

या रशियन अँटोनोव एएन 26 विमानातून पुरुलियामध्ये शस्त्रास्त्रं टाकण्यात आली होती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या रशियन अँटोनोव एएन 26 विमानातून पुरुलियामध्ये शस्त्रास्त्रं टाकण्यात आली होती
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तो 17 डिसेंबर 1995 चा दिवस होता. त्या रात्री जवळपास चार टन धोकादायक शस्त्रास्त्रं घेऊन अँटोनोव एएन 26 हे रशियन विमान कराचीहून ढाक्यासाठी निघालं.

त्या विमानात 8 प्रवासी होते. किम पीटर डेवी हा डॅनिश नागरिक, पीटर ब्लीच हा शस्त्रास्त्रांची विक्री करणारा ब्रिटिश व्यक्ती, सिंगापूरचा रहिवासी असणारा भारतीय वंशाचा दीपक मणिकान आणि चालक दलाचे पाच सदस्य हे सर्व त्या विमानात होते.

हे पाच कर्मचारी रशियन भाषेत बोलत होते आणि ते लॅटव्हियाचे नागरिक होते. या विमानात वाराणसीच्या बाबतपूर विमानतळावर इंधन भरण्यात आलं. तिथेच विमानातील शस्त्रास्त्रांना तीन पॅराशूट जोडण्यात आले.

पीटर ब्लीचनं सीबीआयला दिलेल्या जबाबात या गोष्टी कबूल केल्या होत्या. तसंच त्यानं हे देखील कबूल केलं होतं की, हे विमान कराचीहून येण्यापूर्वी बल्गेरियातील बर्गासमध्ये त्यात ही सर्व शस्त्रास्त्रं चढवण्यात आली होती.

वरिष्ठ पत्रकार चंदन नंदी यांचं प्रसिद्ध पुस्तक 'द नाईट इट रेन्ड गन्स'

फोटो स्रोत, Rupa

फोटो कॅप्शन, वरिष्ठ पत्रकार चंदन नंदी यांचं प्रसिद्ध पुस्तक 'द नाईट इट रेन्ड गन्स'

वरिष्ठ पत्रकार चंदन नंदी यांनी 'द नाईट इट रेन्ड गन्स' हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलं आहे.

त्यात त्यांनी लिहिलं आहे, "वाराणसीतून टेक ऑफ केल्यानंतर गयाच्या वर असताना विमानानं मार्ग बदलला. विमान पश्चिम बंगालमधील पुरुलिया या खूपच मागासलेल्या भागात पोहोचताच, ते खूपच कमी उंचीवरुन उडू लागलं."

"तिथेच पॅराशूटला जोडलेले लाकडाचे तीन खोके खाली जमिनीवर सोडण्यात आले. या लाकडी खोक्यांमध्ये शेकडो एके 47 रायफल होत्या."

"ही शस्त्रास्त्रं झालदा गावाजवळ खाली टाकण्यात आली होती. हे गाव आनंदमार्ग मुख्यालयाच्या खूपच जवळ होतं. सामान खाली टाकताच विमान पुन्हा त्याच्या ठरलेल्या मार्गावरून उडू लागलं."

"मग विमान कोलकात्यात उतरलं, तिथे विमानात इंधन भरण्यात आलं. त्यानंतर विमान थायलंडमधील फुकेतच्या दिशेनं निघून गेलं."

पीटर ब्लीचला वाटणारी शंका

चंदन नंदी आणि ब्रिटिश पत्रकार पीटर पॉफेम यांच्या मते, विमानात असलेला पीटर ब्लीच हा एक शस्त्रास्त्रांचा व्यापारी होता आणि त्याचा संबंध एमआय 6 या ब्रिटिश गुप्तहेर संस्थेशी होता. कधीकधी पीटर एमआय 6 च्या गुप्तहेर मोहिमेमध्ये मदत करायचा.

विमानानं वाराणसीतून उड्डाण केल्यावर, पीटरला भीती वाटत होती की, त्याचं विमान पाडण्यात येईल.

शस्त्रास्त्र विक्रेता पीटर ब्लीच

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शस्त्रास्त्र विक्रेता पीटर ब्लीच

'द इंडिपेंडंट' या प्रसिद्ध ब्रिटिश वृत्तपत्राच्या 6 मार्च 2011 च्या अंकात पीटर पॉफेम यांनी 'अप इन आर्म्स: द बिझार केस ऑफ द ब्रिटिश गन रनर, द इंडियन रेबेल्स अँड द मिसिंग डेन' हा लेख लिहिला होता.

त्यात पीटर पॉफेम यांनी लिहिलं होतं, "पीटर ब्लीचनं मला सांगितलं होतं की, विमान निघण्याच्या 3 महिने आधी एका डॅनिश ग्राहकाला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं पुरवण्यासाठी त्याला संपर्क करण्यात आला होता."

"ही शस्त्रास्त्रं एखाद्या देशाला नाहीत, तर एका कट्टरतावादी संघटनेला पुरवायची आहेत, हे माहीत झाल्यावर पीटरनं या गोष्टीची माहिती ब्रिटिश गुप्तहेर संस्थेला दिली होती."

"ब्रिटिश गुप्तहेर विभागानं पीटरला सल्ला दिला होता की, त्यानं त्याचं काम सुरू ठेवावं. तो एका कट्टरतावादी संघटनेच्या विरोधातील स्टिंग ऑपरेशनमध्ये भाग घेत आहे आणि शस्त्रास्त्रं टाकण्याआधीच भारतीय गुप्तहेर संस्था ती अडवतील आणि तो यातून बाहेर पडेल. या विश्वासानं पीटर ब्लीच या मोहिमेत सहभागी झाला होता."

पुरुलियामध्ये टाकण्यात आली शस्त्रास्त्रं

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मात्र ही मोहीम सुरू होण्याच्या आधी, भारतीय प्रशासन हे रोखण्याचा प्रयत्न करत असल्याची कोणतीही चिन्हं दिसली नव्हती.

पीटर पॉफेम लिहितात, "पीटर ब्लीचनं सांगितलं होतं की, ज्यावेळेस विमानानं वाराणसीतून उड्डाण केलं, त्यावेळेस तो चिंताग्रस्त झाला. त्याला वाटलं की, भारतीयांनी विमान पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला भीती वाटत होती की, त्याचा शेवट जवळ आला आहे."

मात्र रात्रीच्या अंधारात विमानानं शस्त्रास्त्रं खाली टाकली आणि काहीही झालं नाही. पीटर ब्लीचच्या दृष्टीनं त्याच्यावरचं संकट टळलं होतं. मात्र खरंतर इथूनच त्याच्यासमोरील समस्या सुरू झाल्या होत्या.

जमिनीवर शेकडोंच्या संख्येनं एके 47 रायफल आणि शस्त्रं विखुरलेल्या स्थितीत सापडली.

18 डिसेंबरच्या सकाळी पुरुलिया जिल्ह्यातील गनुडीह गावचे रहिवासी असलेले सुभाष तंतुबाई त्यांच्या जनावरांना चरण्यासाठी नेण्यासाठी बाहेर पडले.

अचानक त्यांचं लक्ष एका टेकडीच्या समोर असणाऱ्या गवताळ मैदानावर गेलं. तिथे एक वस्तू चमकत होती.

झालदा पोलीस स्टेशनच्या केस डायरीत लिहिण्यात आलं होतं की, जेव्हा सुभाष तिथे गेले, तेव्हा त्यांचं लक्ष एका बंदुकीवर गेलं. तशी बंदूक त्यांनी त्यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. तिथे चारी बाजूला जवळपास 35 बंदुका पडलेल्या होत्या. ते पाहताच सुभाष यांनी झालदा पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.

पुरुलियामध्ये टाकण्यात आलेली शस्त्रास्त्रं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पुरुलियामध्ये टाकण्यात आलेली शस्त्रास्त्रं

झालदा पोलीस ठाण्याचे प्रमुख प्रणव कुमार मित्र यांनी चंदन नंदी यांना सांगितलं, "ती बातमी मिळताच मी युनिफॉर्म घालून चितमू गावाकडे निघालो. मी तिथे पोहोचलो, तेव्हा मला दिसलं की तिथे जमिनीवर पडलेले हिरव्या रंगाचे लाकडी खोके फुटलेल्या अवस्थेत होते. त्या खोक्यांमधील शस्त्रं गायब झाली होती."

"माझ्या सहकाऱ्यानं भारतीय सैन्यातील एका सैनिकाला बोलावून आणलं होतं. माझ्या सांगण्यावरून त्यानं जवळच्या तलावात डुबकी मारली. तो जेव्हा बाहेर आला, तेव्हा त्याच्या हातात एक रणागाडाविरोधी ग्रेनेड होता. त्यावेळेस पहिल्यांदा मला अंदाज आला की हे गंभीर प्रकरण आहे."

त्यानंतर तिथे लाउड स्पीकरद्वारे जाहीर करण्यात आलं की, ज्यांच्याकडे शस्त्रं असतील, त्यांनी ती पोलिसांना परत करावीत.

नंतर जवळच्याच खटंगा, बेलामू, मारामू, पागडो आणि बेराडीह गावांमध्ये अनेक एके 47 रायफल सापडल्या.

एका व्यक्तीनं येऊन सांगितलं की, शेतात एक नायलॉनचं मोठं पॅराशूट पडलेलं आहे. त्याच्या खाली अनेक रायफल पडल्या आहेत.

कोलकात्याच्या न्यायालयाकडून ब्रिटन, बल्गेरिया, लातविया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठवलेल्या विनंती पत्रात म्हटलं होतं, "पुरुलिया आणि त्याच्या आसपासच्या भागात एकूण 300 एके-47 रायफल, पंचवीस 9 एमएम पिस्तुलं, दोन 7.62 स्नायपर रायफल, 2 नाईट व्हिजन दुर्बीण, 100 ग्रेनेड्स आणि 16,000 गोळ्या जप्त करण्यात आल्या. या सर्वांचं एकूण वजन 4,375 किलो होतं."

विमान जबरदस्तीनं मुंबईत उतरवण्यात आलं

शस्त्रास्त्रं टाकणाऱ्यांना जेव्हा हे माहीत झालं की, त्यांनी टाकलेली शस्त्रास्त्रं भारतीय सुरक्षा दलांच्या हाती लागली आहेत, तेव्हा त्यांच्यासमोरील अडचणी वाढण्यास सुरुवात झाली.

मात्र तरीदेखील त्यांनी कराचीला परत जाण्यासाठी उड्डाण केलं. फुकेतहून परतताना त्यांनी कोलकात्याऐवजी चेन्नईमध्ये विमानात इंधन भरलं आणि तिथून पुढे निघाले.

त्यांचं विमान मुंबईहून 15-20 मिनिटांच्या अंतरावर होतं. तेव्हाच कॉकपिटच्या रेडिओवर एक आवाज आला. भारतीय हवाई दलाच्या मिग 21 विमानानं रशियन विमानाला मुंबई विमानतळावर उतरण्याचा आदेश दिला होता.

पुरुलिया शस्त्रास्त्र कटाचा सूत्रधार किम डेवी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पुरुलिया शस्त्रास्त्र कटाचा सूत्रधार किम डेवी

चंदन नंदी लिहितात, "विमान उतरत असताना, किमच्या चेहऱ्यावर चिंता दाटून आली. त्यानं त्याच्या ब्रीफकेसमधील काही कागद काढून त्याचे छोटे-छोटे तुकडे करून ते जाळून टाकले. त्यानंतर त्यानं ते टॉयलेटमध्ये नेऊन फ्लश करून टाकलं."

"मग त्यानं त्याच्या ब्रीफकेसमधून चार फ्लॉपी डिस्क बाहेर काढल्या आणि त्यांचे देखील तुकडे केले. त्यानंतर त्यानं पीटर ब्लीचचं लायटर घेतलं आणि त्या फ्लॉपी डिस्कच्या तुकड्यांना आग लावली. त्याचं हे काम संपेपर्यंत विमान मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत होतं."

किम डेवी पळून जाण्यात यशस्वी

विमान सहार आंतरराष्ट्रीय विमान तळावर (मुंबई) उतरलं. त्यावेळेस रात्रीचे एक वाजून 40 मिनिटं झाली होती. मात्र तिथे विमानासाठी एकही व्यक्ती उपस्थित नव्हती.

पीटर ब्लीचनं सीबीआयला दिलेल्या जबाबात सांगितलं होतं की, 10 मिनिटांनी विमानतळाची एक जीप विमानाजवळ आली. त्यात दोन जण होते.

त्यांनी विमानातील लोकांना विचारलं की, ते तिथे काय करत आहेत आणि विमान परवानगी शिवाय तिथं का उतरलं आहे?

भारतानं किम डेवीच्या प्रत्यार्पणासाठी बरेच प्रयत्न केले होते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतानं किम डेवीच्या प्रत्यार्पणासाठी बरेच प्रयत्न केले होते

चंदन नंदी लिहितात, "डेवी आणि ब्लीच त्या दोन अधिकाऱ्यांशी बोलत होते. भारतीय अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता आणि मूर्खपणा शिगेला पोहोचला होता. डेवीनं त्यांना विचारलं की, त्यांना विमान उतरण्याचं शुल्क भरावं लागेल का, त्यावर अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं, हो."

"विमान उतरल्यानंतर जवळपास 45 मिनिटांनी आणखी एक जीप तिथे आली. त्यात साध्या कपड्यांमधील सहा-सात जण होते. त्यांनी ते कस्टम अधिकारी असल्याचं सांगितलं आणि म्हणाले की, त्यांना विमानाची झडती घ्यायची आहे."

"कस्टम अधिकारी विमानात शिरल्यानंतर डेवी विमानात आला. त्यानं कागदपत्रांचं एक फोल्डर उचललं आणि तो गपचूप विमानातून खाली उतरला. त्यानंतर किम डेवी कोणालाही दिसला नाही. थोड्या वेळानं 50 ते 70 सुरक्षा रक्षकांनी विमानाला घेराव घातला."

विमानाच्या कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा

पीटर ब्लीच आणि विमानातील पाच कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्या सर्वांवर भारताविरोधात युद्ध पुकारण्याचा खटला चालवण्यात आला.

हा खटला दोन वर्षे चालला. या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

किम डेवीनं 'रॉ' बाबत दावे केले होते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किम डेवीनं 'रॉ' बाबत दावे केले होते

जवळपास 10 वर्षांनी किम डेवी पुन्हा दिसला. डेवी त्याच्या कामाचं कौतुक करत संपूर्ण डेन्मार्कमध्ये फिरला.

डेवीच्या प्रत्यार्पणासाठी भारतानं भरपूर प्रयत्न केले. मात्र त्यात भारताला यश मिळालं नाही.

डेवीचा खळबळजनक दावा

27 एप्रिल 2011 ला किम डेवीनं टीव्हीवर एक मुलाखत दिली. त्यात त्यानं दावा केला, "या संपूर्ण प्रकरणात रॉ या भारतीय गुप्तहेर संस्थेची भूमिका होती. शस्त्रास्त्रं टाकले जाण्याबद्दल भारत सरकारला आधीपासूनच माहिती होती. हे ऑपरेशन रॉ आणि एमआय 6 ही ब्रिटिश गुप्तहेर संस्था, यांचं संयुक्त ऑपरेशन होतं."

भारत सरकारनं ही गोष्ट फेटाळली. सीबीआयनं स्पष्ट केलं की, या घटनेमध्ये कोणत्याही सरकारी यंत्रणेचा सहभाग नाही. नंतर किम डेवीनं पुस्तक लिहिलं. त्याचं नाव होतं, 'दे कॉल्ड मी टेररिस्ट'.

या पुस्तकात किम डेवीनं दावा केला, "भारतातून पळण्यासाठी त्याला बिहारमधील एका राजकारण्यानं मदत केली होती. त्या राजकारण्याच्या मदतीमुळेच हवाई दलाचे रडार काही वेळासाठी बंद करण्यात आले होते. जेणेकरून शस्त्रास्त्रांना कोणत्याही अडथळ्याशिवाय खाली टाकता यावं."

"या शस्त्रास्त्रांच्या मदतीनं पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार करण्याचं आनंद मार्गींचं उद्दिष्टं होतं. त्यानंतर या हिंसाचाराचं कारण पुढे करून ज्योती बसू यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकार पाडण्याची योजना होती."

किम डेवीचं पुस्तक, 'दे कॉल्ड मी टेररिस्ट'

फोटो स्रोत, People’s Press

फोटो कॅप्शन, किम डेवीचं पुस्तक, 'दे कॉल्ड मी टेररिस्ट'

किम डेवीनं दावा करण्याआधी आणि दावा केल्यानंतर देखील आनंद मार्गनं सर्व आरोप फेटाळले होते.

त्यांचं म्हणणं होतं की, काहीजण त्यांच्या संस्थेची बदनामी करू इच्छितात. शस्त्रास्त्रं टाकण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास केला होता. आनंद मार्गचा दावा होता की, पोलिसांना तिथे कोणतीही शस्त्रास्त्रं सापडली नव्हती.

या प्रकरणासंदर्भात संसदेनं पुरुलिया आर्म्स ड्रॉपिंग समिती बनवली होती. या समितीतील काही खासदारांनी प्रश्न विचारला की, भारतीय हवाई दलाचे रडार 24 तास कार्यरत असतात का?

त्यावर भारतीय हवाई दलाचे प्रतिनिधी एअर व्हाईस मार्शल एम मॅकमोहन यांनी उत्तर दिलं होतं, "24 तास रडार सुरू ठेवणं शक्य नाही. कारण त्यामध्ये रडार जळण्याचा धोका असतो."

(पुरुलिया आर्म्स ड्रॉपिंग कमिटीचा तिसरा अहवाल, पान क्रं. 7)

ब्रिटनचे गृहमंत्री म्हणाले - भारताला याची पूर्वकल्पना होती

किम डेवीनं असाही दावा केला की, भारत सरकारला त्याच्या विमान उड्डाणाची आधीपासूनच कल्पना होती. सरकारला हे देखील माहीत होतं की, विमानात किती प्रवासी आहेत, विमानात किती शस्त्रास्त्रं आहेत आणि ती कुठे टाकली जाणार आहेत.

किम डेवीनं प्रश्न विचारला की, कोणतीही समजूतदार व्यक्ती सरकारला माहीत असल्याशिवाय शत्रू राष्ट्रामधून शस्त्रास्त्रांनी भरलेलं विमान भारताच्या सीमेमध्ये का आणेल?

रॉ चे माजी अधिकारी आर के यादव यांचं पुस्तक, 'मिशन रॉ'

फोटो स्रोत, Manas Publication

फोटो कॅप्शन, रॉ चे माजी अधिकारी आर के यादव यांचं पुस्तक, 'मिशन रॉ'

आर के यादव, रॉ चे माजी अधिकारी आहेत. त्यांनी 'मिशन रॉ' हे पुस्तक लिहिलं आहे.

यादव यांनी त्यात लिहिलं, "भारताच्या दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे गृहमंत्री मायकल हावर्ड यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं होतं की, शस्त्रास्त्रं टाकण्यात येणार असल्याची माहिती ब्रिटिश सरकारनं भारत सरकारला आधीच दिली होती. त्यानंतर डेवीनं केलेल्या या दाव्यांना दुजोरा मिळाला."

"असं असतानाही नागरी उड्डाण महासंचालनालयानं (डीजीसीए) विमानाला कोलकात्यात उतरण्याची परवानगी का दिली? जर रॉकडे याबाबत आधीपासून माहिती होती, तर इंटेलिजन्स ब्युरो, स्थानिक पोलीस किंवा कस्टम विभागानं वाराणसीत विमानाची झडती का घेतली नाही?"

पीटर ब्लीच आणि विमानातील कर्मचाऱ्यांची सुटका

आर के यादव यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं, "रशियन विमानाला मुद्दाम विमानतळाच्या इमारतीपासून 6 किलोमीटर अंतरावर उभं करण्यात आलं. सुरक्षा रक्षक आणि गुप्तहेर संस्थांचे लोक तिथे पोहोचले, तेव्हा विमानाचा दरवाजा उघडा होता."

"किम डेवीला विमानतळाच्या सरकारी वाहनातून तिथून नेण्यात आलं. कस्टम विभाग आणि इमिग्रेशनच्या तपासणीशिवाय त्याला तिथून पळू जाऊ देण्यात आलं."

एक परदेशी विमान भारताच्या हवाई हद्दीत शिरतं आणि पॅराशूटच्या मदतीनं भारताच्या एका भागात शस्त्रास्त्रं टाकतं, ही गोष्ट कल्पनेपलीकडची आहे.

चंदन नंदी लिहितात, "विमानाला जबरदस्ती विमानतळावर उतरण्यात येऊन देखील या सर्व मोहिमेचा सर्वेसर्वा असलेल्या किम डेवी उर्फ नील नील्सन, भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन गूढरित्या मुंबईच्या सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पळून गेला, ही गोष्ट आकलनापलीकडची आहे."


ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर

किम डेवीचा साथीदार असलेला पीटर ब्लीच याला अटक झाल्यानंतर, त्याला माफ करण्यात येईल या आशेनं त्यानं हे सर्व कारस्थान उघड केलं.

मात्र त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षादेखील सुनावण्यात आली.

2004 मध्ये टोनी ब्लेअर यांच्या लेबर सरकारनं विनंती केल्यानंतर भारताचे तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी पीटर ब्लीचची शिक्षा माफ केली. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते.

त्याच्या 4 वर्षे आधी, म्हणजे 22 जुलै 2000 ला रशियन सरकारनं विनंती केल्यानंतर विमानाच्या सर्व कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली होती. त्यावर्षी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या आधी सद्भावना म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं होतं. त्यावेळेस देखील अटल बिहारी वाजपेयीच पंतप्रधान होते.

डेन्मार्कनं डेवीचं भारताकडे प्रत्यार्पण करण्यास दिला नकार

सीबीआयनं या प्रकरणाचा तपास केला. पहिल्या 5 वर्षांनंतर सीबीआयचा तपासाचा वेग मंदावला. एक वेळ तर अशी आली की, तपास पूर्णपणे ठप्प झाला. चंदन नंदी यांना वाटतं की 'हा तपास ठप्प होऊ देण्यात आला.'

डेन्मार्कनं किम डेवीचं भारताकडे प्रत्यार्पण करण्यास नकार दिला होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डेन्मार्कनं किम डेवीचं भारताकडे प्रत्यार्पण करण्यास नकार दिला होता

ते म्हणतात, "पी सी शर्मा सीबीआयच्या संचालकपदावरून गेल्यानंतर कोणत्याही सीबीआय प्रमुखानं या प्रकरणात रस घेतला नाही. 2001 ते 2011 दरम्यानचा संपूर्ण कालावधी वाया घालवण्यात आला."

"अर्थात, एप्रिल 2011 मध्ये डेवीला कोपेनहेगनमध्ये एक दिवसासाठी अटक करण्यात आली होती. मात्र एक दिवसानंतर डॅनिश पोलिसांनी त्याला सोडून दिलं."

"इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस असूनदेखील डेन्मार्कच्या पोलिसांनी त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही."

डेवीचा भारतात छळ केला जाईल आणि त्याच्या मानवाधिकारांचं इथे उल्लंघन होईल, या आधारे डेन्मार्कच्या न्यायालयानं डेवीचं भारतात प्रत्यार्पण करण्यास नकार दिला होता.

अनेक प्रश्न आहेत अनुत्तरीत

चंदन नंदी लिहितात, "या प्रकरणाचा संपूर्ण तपास झाल्यानंतर ही गोष्ट देखील समोर आली की, या कटाची योजना किमान 3 वर्षे आधी तयार करण्यात आली होती."

"किमकडे दोन बनावट पासपोर्ट होते. एका पासपोर्टवर त्याचं नाव होतं, किम पालग्रेव डेवी आणि दुसऱ्या पासपोर्टवर नाव होतं, किम पीटर डेवी."

हे दोन्ही पासपोर्ट, 1991 आणि 1992 मध्ये न्यूझीलंडची राजधानी असलेल्या वेलिंग्टनमधून जारी झाले होते.

या घटनेला जवळपास 30 वर्षे झाल्यानंतर देखील काही प्रश्नांची स्पष्ट उत्तर अद्याप मिळालेली नाहीत. उदाहरणार्थ, ही शस्त्रास्त्रं कोणासाठी खाली टाकण्यात आली होती? शस्त्रास्त्रं कोणी टाकली होती आणि शस्त्रास्त्रांसाठी पैसे कोणी दिले होते?

ते विमान भारताच्या हवाई हद्दीत शिरताच त्याला अडवण्यात का आलं नाही? ही शस्त्रास्त्रं नेण्यात येणार असण्याबद्दल रॉकडे आधीपासूनच माहिती होती का? आणि जर रॉला तशी माहिती आधीच होती, तर रॉनं इतर यंत्रणांना याची माहिती का दिली नाही?

मुंबई विमानतळावरून किम डेवीला बाहेर का पडू दिलं गेलं? तो डेन्मार्कला परत कसा पोहोचला?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)