तुम्हालाही वाटतं का की राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला? मग हे वाचा!

फोटो स्रोत, BBC/Getty Images
विमानाचा शोध कोणी लावला? हा एक साधा आणि सोपा प्रश्न वाटू शकतो.
पण तसं नाही. खरं तर हा 100 वर्षांहून जुना वादाचा विषय आहे.
बर्याच अमेरिकन लोकांना वाटतं की, ऑर्व्हिल आणि विल्बर राईट हेच विमान उड्डाणाचे जनक आहेत. हे दोघं सायकल दुरुस्ती करणारे (सायकल मेकॅनिक्स) आणि अभियंते होते. त्यांनी 1903 मध्ये पहिले उड्डाण केलं.
तर दुसरीकडे, अनेक ब्राझिलच्या लोकांना वाटतं की, हा मान अल्बर्टो सँटोस ड्यूमाँट यांना जातो. ड्यूमाँट एका श्रीमंत कॉफी उत्पादक कुटुंबाचे वारस होते आणि त्यांनी 1906 मध्ये पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय एरोनॉटिकल फेडरेशननं प्रमाणित केलेलं पहिलं उड्डाण केलं.
मग, राईट कोण आहेत?
20 व्या शतकाच्या सुरुवातीला अनेक संशोधक अशा इंजिनावर चालणाऱ्या यंत्राची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत होते, ज्यामुळे माणसाचं उड्डाणाचं जुनं स्वप्न पूर्ण होऊ शकेल.
त्याकाळी पॅरिस हे कार्यक्षम विमान तयार करण्यासाठी एक उत्तम केंद्र मानलं जात होतं, त्यामुळे अनेक लोक तिकडे गेले. या शहरात चांगल्या अभियांत्रिकी शाळा होत्या आणि धातूशास्त्र, यांत्रिकी, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अशा क्षेत्रांतील संशोधनासाठी तिथं भांडवलही उपलब्ध होत असत.
"तेव्हा असं वाटायचं की हे लवकरच होणार आहे," असं फ्रेंच इतिहासतज्ज्ञ प्रा. जाँ-पियेर ब्ले सांगतात.
त्याकाळी विमान उड्डाणाची आवड असलेल्या लोकांनी 'इतिहासातील पहिलं उड्डाण' ठरवण्यासाठी काही अटी आणि नियम निश्चित केले होते. जसं की,
- विमानानं बाहेरुन कोणतीही मदत न घेता (जसं कॅटापल्टशिवाय) स्वतःहून उड्डाण घेणं
- असं उड्डाण जे काही वेळ टिकेल
- आणि ते उड्डाण प्रत्यक्ष पाहिलं आणि नोंदवलं जावं.
दि, 12 नोव्हेंबर 1906 रोजी सँटोस ड्यूमाँट यांनी पॅरिसमध्ये गर्दीसमोर '14-बिस' नावाच्या विमानात 220 मीटरचं उड्डाण करून सर्व अटी पूर्ण केल्या.
त्यानंतरच्या वर्षी, ड्यूमाँट यांनी 'डेमोयझेल' नावाचं नवीन मॉडेल तयार केलं, जे जगातील पहिलं अतिशय हलकं आणि मोठ्या प्रमाणावर बनवलं गेलेलं विमान होतं.
अनेकांचे प्रयत्न आणि राईट बंधूंचा युक्तिवाद
राईट बंधूंनी 1908 मध्येच पहिल्यांदा असा दावा केला की, त्यांनी यापूर्वीच, म्हणजे पाच वर्षांपूर्वी उड्डाण केलं होतं.
फ्रेंच लोकांना याचं मोठं आश्चर्य वाटलं. अमेरिका आणि युरोपमधील फ्लाइंग क्लब्समधील सातत्याने होत असलेल्या पत्रव्यवहारामुळे त्यांना माहीत होतं की जमिनीपासून उड्डाण घेऊन काही काळ हवेत टिकू शकणारं विमान बनवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे.
पण युरोपियन लोकांना राईट बंधूंची काहीच बातमी अनेक वर्षांपासून मिळाली नव्हती.
राईट बंधूंनी युक्तिवाद केला की, ते त्यांच्या शोधाचं पेटंट मंजूर होण्याची वाट पाहत होते आणि त्यांना भीती होती की, त्यांच्या कल्पना चोरल्या जातील.
पण वास्तव हे आहे की, 17 डिसेंबर 1903 रोजी नॉर्थ कॅरोलिनातील किटी हॉक येथे त्यांच्या फ्लायरचं उड्डाण फक्त पाच लोकांनी पाहिलं होतं, अशी नोंद आहे.
त्या प्रसंगाचे फारसे पुरावे नव्हते. फक्त एक टेलिग्राम, काही फोटो आणि ऑर्व्हिलचे जर्नल होते.

फोटो स्रोत, Getty Images
हेन्रिक लिन्स दि बॅरोस यांसारखे शास्त्रज्ञ, जे ब्राझीलमधील 'अॅस्ट्रॉनॉमी अँड रिलेटेड सायन्सेस म्युझियम'चे माजी संचालक आहेत.
ते असं म्हणतात की, "ऑर्व्हिलने स्वतः आपल्या डायरीत लिहिलं होतं की, त्या दिवशी सुमारे 40 किमी प्रतितास वेगाने वारा वाहत होता, आणि एवढ्या वेगाचा वारा इंजिनाशिवायच विमानाला हवेत उचलण्यासाठी पुरेसा होता."
अर्थातच, राईट बंधूंच्या वकिलांचं मत वेगळं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, 1904 आणि 1905 दरम्यान फ्लायरच्या सुधारित आवृत्त्या तयार करण्यात आल्या होत्या. त्या काळात, 14-बिसने पॅरिसच्या आकाशात उड्डाण केलं नव्हतं.
"त्या सकाळी (17 डिसेंबर 1903) पहिल्यांदाच राईट बंधूनी इतकं चांगलं उड्डाण केलं की, त्यांनीच हा प्रश्न सोडवला आहे, अशी त्यांना खात्री पटली," असं इतिहासतज्ज्ञ टॉम क्राउच म्हणतात.
टॉम क्राऊच हे स्मिथसोनियनच्या नॅशनल एअर अॅण्ड स्पेस म्युझियमचे माजी क्युरेटर असून राईट बंधूंवरील अनेक पुस्तकांचे ते लेखक आहेत.
"त्यांना त्यात अजून बऱ्याच सुधारणा करायच्या होत्या, पण त्यांनी एक विमान तयार केलं होतं आणि ते उडालं होतं," असं ते स्पष्टपणे सांगतात.
पण ही सगळी सुधारणा त्यांनी गुप्तपणेचच केल्यासारखं वाटतं, कारण 1908 मध्येच त्यांनी पहिलं उड्डाण आमचं होतं, असा दावा करायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, Getty Images
राईट बंधूंनी युरोपभर दौरा केला आणि फ्रान्स, इटलीसारख्या देशांमध्ये 200 हून अधिक प्रात्यक्षिक उड्डाणं केली, ज्यामध्ये एका उड्डाणात त्यांनी तब्बल 124 किलोमीटरचं अंतरही कापलं होतं.
"युरोपमधील राजघराण्यांचे सदस्य विल्बरसोबत विमानात बसण्यासाठी विनंती करत होते. हा एक मोठा सन्मान समजला जात होता," असं प्रा. ब्ले सांगतात.
आणि तेव्हाच फ्रेंच विमानउड्डाण क्षेत्रातील अग्रेसर फर्डिनांड फेर्बर यांच्यासारख्या लोकांनी राइट बंधूंचा 'प्रथम उड्डाण' करण्याचा दावा स्वीकारला. त्यांचं म्हणणं होतं की, एका रात्रीत चालवता येणारं (मॅन्युव्हर करण्यास सक्षम) विमान तयार होणं शक्यच नाही.
विमानाचा शोध कोणी लावला? हा 'वादच निरर्थक'
युरोपमध्ये दाखवल्या गेलेल्या सुधारित फ्लायर विमानांमध्ये चाकं नव्हती आणि त्यांना हवेत सोडण्यासाठी कॅटापल्टची (उड्डाणासाठी वापरलेलं यंत्र) गरज पडत होती. हा मुद्दा मोठ्या वादाचा विषय ठरला.
टीका करणाऱ्यांचं म्हणणं आहे की, 'विमानाचं इंजिन पुरेसं मजबूत नव्हतं, आणि ते केवळ कॅटापल्टमुळेच उडू शकलं. तर काहीजण असं म्हणतात की, राईट बंधूंनी कॅटापल्टचा वापर केला. कारण त्यांना कोणत्याही प्रकारच्या जमिनीवरून उड्डाण घेता यावं असं वाटत होतं.'
पण खरी गंमत तर अशी आहे की, सँटोस ड्यूमाँट आणि राईट बंधू हेच फक्त 'फ्लाइट पायोनियर' असल्याचा दावा करणारे नव्हते.
गुस्ताव वाईस्कॉप्फ हे अमेरिकेत राहणारे एक जर्मन होते आणि असं मानलं जातं की, त्यांनी 1901 मध्ये उड्डाण केलं होतं. तर न्यूझीलंडचे रिचर्ड पिअर्स यांनी मार्च 1903 मध्ये विमान उडवलं होतं, असं सांगितलं जातं.
आणि काही पुरावे असेही आहेत की, जॉन गुडमॅन आणि त्यांच्या कुटुंबाने 1871 साली दक्षिण आफ्रिकेतील हॉविक या शहराजवळ जगातलं पहिलं मानवासह उड्डाण केलं होतं.
त्या विमानाला इंजिन नव्हतं. खरं तर, त्या प्रवासी ग्लायडरचं स्मारक आजही तिथे पाहायला मिळतं.
म्हणूनच काही विमानतज्ज्ञ 'विमान कोणी शोधलं' यावरचा सगळा वाद हा निरर्थक असल्याचे म्हणतात.
"असं झालं नाही की, एखादा माणूस एका सकाळी अचानक उठला, एक चित्र काढलं आणि म्हणाला, 'हेच ते विमान, जे उडणार आहे!'," असं पॉल जॅक्सन सांगतात. पॉल हे 25 वर्षे 'जेन्स ऑल द वर्ल्ड्स एअरक्राफ्ट'चे मुख्य संपादक होते.
"हे एकट्याचं काम नव्हतं, तर हे अनेक, अगदी कित्येक जणांच्या एकत्रित प्रयत्नांचं फलित होतं," असं ते पुढे सांगतात.
शोध एकाचा अन् श्रेय दुसऱ्याला
जॅक्सन यांना वाटतं की, सँटोस ड्यूमाँट, वाईस्कॉप्फ आणि इतर अनेक जणांनी विमान उड्डाणासाठी मोठं काम केलं आहे, पण त्यांचं योग्य ते कौतुक झालेलं नाही. त्यांना जास्त मान्यता मिळायला हवी.
"पण शेवटी श्रेय त्यांनाच मिळतं ज्यांची नावं मोठी असतात आणि ज्यांच्याकडे महागड्या वकिलांची फौज मदतीला असते," असं ब्रिटनचे विमानतज्ज्ञ म्हणतात.
"दु:खाची गोष्ट अशी आहे की, 19व्या आणि 20व्या शतकातल्या बहुतांश शोधांचं श्रेय बहुतांशी चुकीच्या लोकांना दिलं गेलं आहे," असं ते म्हणतात.
ते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा उल्लेख करतात, ज्यांना टेलिफोनचा शोध लावण्याचं श्रेय दिलं जातं. आता यावर वाद आहे.
खरं तर, 2002 मध्ये अमेरिकन काँग्रेसने मान्य केलं की जरी बेल यांनी त्या उपकरणाचं पेटंट घेतलं होतं, तरी टेलिफोनचा खरा शोध एक गरीब इटालियन संशोधक अँटोनियो म्युईच्ची यांनी लावला होता, ज्यांनी बेलसोबतच एकाच वर्कशॉपमध्ये काम केलं होतं.
मार्शिया कमिंग्स या अमेरिकन विमान उड्डाण क्षेत्रातील अग्रेसर ग्लेन हॅमंड कर्टिस यांच्या नातेवाईक आहेत. कर्टिस यांच्यावर राईट बंधूंनी 1909 पासून पेटंट उल्लंघन केल्याच्या आरोपावरून केस दाखल केली होती.
आज मार्शिया कमिंग्स अशा एका ब्लॉगवर काम करतात, जो राईट बंधूंनी सांगितलेल्या घटनांच्या कथनाची चौकशी करतो (त्यावर प्रश्न उपस्थित करतात).
कमिंग्स सांगतात की, राईट बंधूंनी मुद्दामहून कर्टिससारख्या लोकांना इतिहासातून हद्दपार करण्याचं काम केलं.
ऑर्व्हिल आणि विल्बर राईट यांच्या पणती (ग्रेट ग्रँड निस) अमांडा राईट लेन या त्यांच्या कार्याची आठवण जपण्यासाठी काम करतात. त्या हा आरोप नाकारतात.
त्या म्हणतात, "ऑर्व्हिल कसे होते हे मला माहीत आहे, आणि मला वाटत नाही की, (विल्बर यांचा मृत्यू 1912 मध्ये झाला होता) ऑर्व्हिल यांनी जाणूनबुजून काही वाईट केलं असेल."
"पण त्यांनी आणि विल्बर यांनी जे केलं त्याचं आणि त्या गोष्टींच्या सत्याचं त्यांनी नक्कीच समर्थन केलं असतं," असं त्या पुढे म्हणाल्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











