जेव्हा पेटत्या विमानातून महाराष्ट्रातल्या आमदारानं उडी मारली होती

संभाजीनगर विमान अपघात: '15 फुटांवरुन उड्या मारल्या म्हणून वाचलो, पण 55 जणांचा जीव गेला'

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संभाजीनगर विमान अपघात: '15 फुटांवरुन उड्या मारल्या म्हणून वाचलो, पण 55 जणांचा जीव गेला'
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

अहमदाबादमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात विमानातील 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला.

अहमदाबादमधील या अपघातानंतर देशभरात याआधी घडलेल्या विमान अपघातांची चर्चा सुरू झाली आहे.

असाच एक अपघात 32 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच तत्कालीन औरंगाबादमध्ये घडला होता. या अपघातात 55 जणांचा मृत्यू झाला होता.

त्यावेळी विमानाचा अपघात नेमका कसा झाला होता? जाणून घेऊया.

विमानानं उंची गाठली नाही आणि...

26 एप्रिल 1993.

छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा विमानतळावर इंडियन एअरलाईन्सचं दिल्ली-जयपूर-उदयपूर-छत्रपती संभाजीनगर-मुंबई हे विमान उड्डाणासाठी सज्ज होतं.

विमानानं उड्डाण घेतलं, पण त्याला अपेक्षित उंची गाठता आली नाही.

यावेळी धावपट्टीला लागूनच बीड-संभाजीनगर जोडणारा महामार्ग होता. या महार्गावरून एक कापसाचा ट्रक चालला होता. विमानानं अपेक्षित उंची न गाठल्यामुळे विमानाची चाकं या ट्रकला चाटून गेली.

त्यानंतर हे विमान परिसरातील विद्युतवाहिनीवर आदळलं आणि पुढे भरकटत जाऊन एका शेतात पडलं. त्यानंतर विमानाचे तुकडे पडून आग लागली आणि यात 55 जणांचा मृत्यू झाला. या विमानाचे तीन तुकडे पडल्याचं सांगितलं जातं.

संभाजीनगर विमान अपघात: '15 फुटांवरुन उड्या मारल्या म्हणून वाचलो, पण 55 जणांचा जीव गेला'

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE

फोटो कॅप्शन, विमानतळाचा सध्याचा फोटो

तत्कालीन आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे या विमानात प्रवास करत होते.

बीबीसी मराठीशी बोलताना रामप्रसाद बोर्डीकर म्हणाले, "ज्यावेळेस हे विमान उडालं, त्यावेळेस त्याला अपेक्षित उंची गाठता आली नाही. धावपट्टीला लागूनच असलेल्या बीड बायपासवरून वाहनं जात होती. तिथं एका ट्रकमध्ये कापसाच्या गाठी होत्या. या ट्रकला विमानाचे टायर घासले आणि मग ते काही क्षणात भरकटत भरकटत शेतात जाऊन पडलं."

"दरम्यानच्या काळात विमानातील पोरींनी (एअर होस्टेस) आम्हाला सूचना केली आणि विमानाचे दरवाजे उघडले. विमान 10 ते 15 फूट उंचीवर होतं. मग आम्ही 10-15 फूट उंचीवरुन उड्या मारल्या. आम्ही काही जणांनी पटापट उड्या मारल्या म्हणून वाचलो."

रामप्रसाद बोर्डीकर

फोटो स्रोत, Meghana Bordikar/Facebook

फोटो कॅप्शन, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर

"आमच्यापैकी काही जण भाजले होते, तर काहींना मार लागला होता. पुढं ते विमान शेतात घासत घासत गेलं होतं. विमानाचे तुकडे पडले होते. नशीब चांगलं होतं म्हणून आम्ही वाचलो, पण या घटनेत 55 लोकांचा जीव गेला होता," बोर्डीकर पुढे सांगतात.

या दुर्घटनेत काही जणांचा जळून, तर काही जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता.

उद्योजक नंदलाल धूत, अरुण जोशी, राजेंद्र मोटार्सचे दीपक मुनोत अशा छत्रपती संभाजीनगरच्या (पूर्वीचं औरंगाबाद) जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या काही लोकांचाही या अपघातात मृत्यू झाला होता.

'मनावर खोलवर परिणाम करणारी घटना'

त्याकाळी नरेंद्र चपळगावकर हे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. घटना घडल्यानंतर ते त्यांच्या काही सहकाऱ्यांबरोबर चिकलठाणा विमानतळापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या त्या शेतावर पाहणी करायला गेले.

न्या. चपळगावकर यांच्या कन्या भक्ती चपळगावकर यांनी या प्रसंगाबद्दल फेसबुकवर लिहिले आहे. जेव्हा न्या. चपळगावकर पाहणीसाठी गेले होते, तेव्हा विमान आधी एका ट्रकला आणि नंतर विजेच्या तारांमध्ये अडकून पडल्याचं त्यांना दिसलं होतं.

भक्ती चपळगावकरांची मैत्रीण अनुजा यांचे वडील अरुण जोशी यांचंही अपघातात निधन झालं.

संभाजीनगर येथील अनेक जणांना या अपघाताची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झळ बसल्याचे येथील लोकांशी बोलल्यावर कळते.

संभाजीनगर विमान अपघात: '15 फुटांवरुन उड्या मारल्या म्हणून वाचलो, पण 55 जणांचा जीव गेला'

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE

फोटो कॅप्शन, विमानतळाचा सध्याचा फोटो

धावपट्टीच्या बाजूलाच रस्ता

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड यांनी 1993 मध्ये नुकतीच पत्रकारितेला सुरुवात केली होती.

विमान अपघाताच्या आठवणीविषयी विचारल्यावर ते सांगतात, "बीड-संभाजीनगर रोडवरून एक कापसाचा ट्रक चालला होता. इकडून विमानानं उड्डाण घेतलं, पण त्यानं अपेक्षित उंची गाठली नाही आणि मग विमानाची चाकं त्या ट्रकला धडकली."

"पुढे ते विमान आताच्या शेंद्रा-एमआयडीसी या भागात जाऊन पडलं. त्याकाळी आम्हा पत्रकारांकडे मोबाईल वगैरे नव्हते. अपघातस्थळी कसं पोहचायचं, हाही मोठा प्रश्न होता.

"काही जण पोलिसांच्या, तर काही जण फायर ब्रिगेडच्या गाड्यांमध्ये घटनास्थळी पोहचले. तिथं फार विदारक परिस्थिती होती. विमानाचे तुकडे पडले होते, लोक भाजले होते. त्याचा वास येत होता."

"काही भागात विमानाचे नुसतेच पत्रे दिसत होते. छत्रपती संभाजीनगरमधील कर्तबगार लोक या अपघातानं हिरावून घेतली."

छत्रपती संभाजीनगर विमानतळावरची धावपट्टी आता मोठी करण्यात आली आहे. त्यावेळी ती छोटी होती. 1993 मधील विमान अपघातानंतर धावपट्टीला लागून असलेला तो रस्ता जिथून कापसाचा ट्रक चालला होता, तो आता बंद करण्यात आलाय. मात्र, धावपट्टीच्या अगदी बाजूलाच तो रस्ता असायला नको होता, अशी भावना वरकड व्यक्त करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)