लक्ष्मी विलास पॅलेस : मराठी राजानं गुजरातमध्ये बांधलेल्या राजवाड्याची गोष्ट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जय शुक्ल
- Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
लक्ष्मी विलास पॅलेस हा बडोद्यामधला एक भव्य राजवाडा आहे. सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या या राजवाड्यात पंतप्रधान मोदींनी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांची भेट घेतली आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.
28 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी आणि सांचेझ यांची ही भेट झाली आणि तिथे महत्त्वाकांक्षी एअरबस प्रकल्पाचं उद्घाटन झालं.
सी-295 या वाहतूक सेवेच्या उद्घाटनाबरोबरच दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. हा राजवाडा ब्रिटनच्या बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चार पट मोठा असल्याचं सांगितलं जातं.
या महालाच्या दरबार हॉलमध्ये दोन देशांच्या प्रमुखांची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. लक्ष्मी निवास पॅलेस हे जगातील सर्वात मोठ्या खासगी निवासस्थानांपैकी एक आहे.
हे ऐतिहासिक आणि आकर्षक राजवाडा त्याच्या ऐश्वर्यासाठी, अद्वितीय वास्तूरचनेसाठी आणि गुंतागुंतीच्या परंपरांसाठी ओळखला जातो.
ही भेट जरी गुजरातमध्ये झाली असली तरी एका मराठी महाराजांच्या राजवाड्यात ही भेट झाली त्यामुळे या भेटीला वेगळं महत्त्व आहे. या भव्यदिव्य राजवाड्याविषयी या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ या.
पंतप्रधान मोदींचं बडोदा आणि लक्ष्मी विलास पॅलेसशी नातं
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बडोद्याशी जुनं नातं आहे. त्यांनी पहिली लोकसभा निवडणूक वाराणसी आणि बडोद्याहून लढली होती.
दोन्ही जागांवर त्यांनी विजय मिळवला होता. त्यांनी वाराणसीची जागा ठेवली आणि बडोदा लोकसभा मतदारसंघातून राजीनामा दिला होता.
पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान सांचेझ यांचं स्वागत केलं तो राजवाडा महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी बांधला होता.

फोटो स्रोत, Getty Images
महाराणी राधिकाराजे गायकवाड या राजघराण्याच्या सदस्य आहेत. त्यांनी या भेटीपूर्वी आपल्या भावना बीबीसी गुजरातीकडे व्यक्त केल्या होत्या. त्या म्हणाल्या, “हा आमच्यासाठी आणि बडोद्यासाठी एक मोठा सन्मान आहे. पंतप्रधान मोदी आणि सांचेझ यांचा एकत्रित पाहुणचार करणं हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा क्षण आहे.”
त्या म्हणाल्या, “ पंतप्रधान मोदींची सुद्धा या पॅलेसला पहिलीच भेट आहे. माझे सासरे रणजितसिंह गायकवाड यांचं निधन झालं तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी या पॅलेसला भेट दिली होती.”
हा राजवाडा बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चारपट मोठा असण्याची कारणं
हा राजवाडा 1890 मध्ये बांधण्यात आला होता आणि हा भारतातील सर्वांत मोठ्या खासगी निवासस्थानांपैकी एक आहे.
हा राजवाडा 262916 चौ.फुट इतक्या भागात पसरला आहे आणि बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चारपट मोठा आहे. बकिंगहॅम पॅलेसचा परिसर 77,000 चौ.मी आहे.

फोटो स्रोत, X/@narendramodi
जितेंद्र सिंह गायकवाड हे महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांचे पणतू आहेत. ते भारतातील राजवाडे, कला, संस्कृतीचं संवर्धन करण्याचं काम करतात.
ते म्हणाले, “हे जगातलं फक्त सर्वांत मोठं निवासस्थान नाही तर, बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चौपट मोठं आहे. याच्या खोल्या अतिशय विस्तीर्ण असून त्याची रचना आणि आकार यांची तर तुलनाच होऊ शकत नाही.”
“मात्र बकिंगहॅम पॅलेसमध्ये खोल्यांची संख्या जास्त आहे. तिथे 775 खोल्या आहेत तर लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये 303 खोल्या आहेत. त्यात अनेक दालनं आणि हॉल्स आहेत.
मात्र एकूण परिसराचा विचार केल्यास लक्ष्मी विलास पॅलेस बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चौपट मोठा आहे. खोल्यांचा आकारही मोठा आहे. त्यामुळे बकिंगहॅम पॅलेसशी त्याची तुलना होऊ शकत नाही.”
लक्ष्मी विलास पॅलेसच्या बांधकामाचा इतिहास आणि रहस्य
लक्ष्मी विलास पॅलेसला गायकवाड घराण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. हा राजवाडा इंडो-इस्लामिक शैलीचं उदाहरण आहे. त्यात युरोपियन, इस्लामिक आणि हिंदू रचनांचा मिलाफ आहे.
राधिकाराजे गायकवाड म्हणतात, “ या राजवाड्यातील इंडो- इस्लामिक वास्तूरचनेवर हिंदू, राजपूत, इस्लामिक, ख्रिश्चन, तुर्की, रोमन, ग्रीक आणि मोरोक्कन सौंदर्यशास्त्राचा प्रभाव आहे.”,
मंदा हिंगुराव यांनी या राजवाड्याच्या बांधकामाबद्दल माहिती सांगितली. त्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या क्युरेटर आहेत. त्या म्हणाल्या, “हा राजवाडा बांधण्याच्या आधी गायकवाड राजघराणं बडोद्यातील सरकारवाडा भागात राहत असत. राजघराण्याचा खजिना नझरबाग पॅलेसमध्ये होता.
मकरबाग पॅलेस हा नझरबाग पासून दूर होता. त्यामुळे सयाजीरावांना एक मोठा राजवाडा बांधण्याची गरज भासू लागली.”

फोटो स्रोत, Getty Images
जितेंद्रसिंह गायकवाड म्हणाले, “ तेव्हाच्या महाराजांचे तत्कालीन दिवाण पी. माधवराव यांनी असा राजवाडा बांधण्याचा प्रस्ताव मांडला होता.”
या कामासाठी सयाजीराव गायकवाडांनी मेजर चार्ल्स मँट नावाच्या एका वास्तुविशारदाची निवड केली. ते एक प्रसिद्ध ब्रिटिश वास्तूविशारद होते.”
जितेंद्रसिंह म्हणतात, “महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या पूर्वसूरींची मुलगी अहल्याबाई यांचा विवाह कोल्हापूरच्या महाराजांशी 1850 मध्ये झाला होता.
त्यांनी त्यांच्या राजवाड्याच्या बांधकामाची जबाबदारी चार्ल्स मँट यांना दिली होती. सयाजीराव त्यांच्या कामाने प्रभावित झाले होते. त्यामुळे लक्ष्मी विलास पॅलेसच्या बांधकामाचं काम मँट यांना देण्यात आलं.”
मात्र राजवाड्याचं बांधकाम सुरू होण्याआधीच चार्ल्स मँटचा रहस्यमय मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Getty Images
या वास्तूविशारदाच्या मृत्यूबद्दल बोलताना मंदा हिंगुराव म्हणतात, “या वास्तूची रचना करताना, त्या भागाची मोजणी करताना काहीतरी राहिलंय असं त्यांना वाटलं असणार. हा राजवाडा फार काळ टिकून राहणार नाही असं त्यांना वाटलं असावं त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी.”
मँट यांच्या मृत्यूनंतर रॉबर्ट फेलो चिलसोम यांच्याकडे या राजवाड्याच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली.
12 वर्षानंतर आणि त्यानंतरच्या काळात हा राजवाडा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक होता.
या राजवाड्यात मोठमोठ्या स्वागत समारंभापासून ते शाही कार्यक्रमांपासून विविध उपक्रम राबवले जातात. या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये 1000 लोक एकत्र जमू शकतात.
हा हॉल कोणत्याही स्तंभाशिवाय उभा आहे. स्थापत्य अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आहे आणि काळाच्या कसोटीवर उभा आहे.
स्थानिक इतिहासकार चंद्रशेखर पाटील यांनी रचनेबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणतात, “इथल्या भिंतीवर रंगाच्या ऐवजी दगड लावले आहेत. कोरीव काम आणि वास्तूरचनेचा केलेला सुयोग्य वापर यामुळे या वास्तूवर जागतिक प्रभाव दिसतो.”
'ती' प्रेम कहाणी
लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये एक प्रेमकहाणीसुद्धा दडलेली आहे. या राजवाड्याला महाराजा सयाजीराव गायकवाड यांची पहिली बायको लक्ष्मीबाई यांचं नाव दिलं आहे. त्यांचं लग्नानंतरचं नाव चिमणाबाई होतं. गायकवाड राजघराण्यात लग्नानंतर मुलीचं नाव बदलण्याची पद्धत होती.
या कहाणीला 1880 मध्ये सुरुवात झाली होती. सयाजीराव आणि लक्ष्मीबाई यांचा विवाह त्यावर्षी झाला होता. त्यांना बाजूबाई आणि पुतळीबाई नावाच्या मुली होत्या. अगदी लहान वयात दोघींचंही निधन झालं. यामुळे सयाजीराव अत्यंत निराश झाले.
1885 मध्ये लक्ष्मीबाईनी एका फतेहसिंह नावाच्या मुलाला जन्म दिला. मात्र मुलाला जन्म देतानाच लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे सयाजीरावांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

फोटो स्रोत, LAXMI VILAS PALACE
राधिकाराजे गायकवाड यांच्या मते, “महाराजांचं त्यांच्या राणीवर प्रचंड प्रेम होतं. त्या गेल्यानंतर महाराजांच्या दु:खाला पारावर उरला नाही. त्यामुळे त्यांनी अनेक वर्ष पुनर्विवाह केला नाही.” नंतर त्यांनी गजराबाईंशी विवाह केला.
मात्र पहिल्या बायकोच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचंही नाव चिमणाबाई ठेवण्याचा आग्रह धरला. गजराबाई या चिमणाबाई दुसऱ्या आणि लक्ष्मीबाई या चिमणाबाई पहिल्या या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.
जेव्हा महाराजांनी इतका मोठा राजवाडा बांधला त्याला लक्ष्मीबाईंच्या सन्मानार्थ लक्ष्मी विलास असं नाव देण्यात आलं. जेव्हा या राजवाड्याची पायाभरणी झाली तेव्हा महाराणी चिमणाबाई-1 होत्या. मात्र हा राजवाडा बांधून पूर्ण होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या स्मरणार्थ महाराज सयाजीराव यांनी हॉस्पिटल, बाजार, तळं, आणि इमारती बांधल्या. तसंच प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांना लक्ष्मीबाईंचं पोट्रेट तयार करायला सांगितलं. आजही ते पोट्रेट या राजवाड्यात आहे.
कलात्मकतेचं सर्वोच्च उदाहरण
या राजवाड्यात एकूण 303 खोल्या आहेत. त्यात मोठे हॉल, दालनं आणि शस्त्रागारासदृश्य खोल्या आहेत.
जितेंद्रसिंह गायकवाड म्हणतात, “महालात हाथीखाना, दरबार हॉल, गाडी हॉल, आईना महल, सिल्व्हर रूम, गोल्डन रूम, वीणा रूम, शस्त्रागार यांसारख्या खोल्या आहेत. राजवाडा तीन मजल्याचा असला तरी त्याच्या बाजूला असलेलं टॉवर 11 मजल्यांचं आहे. याशिवाय, राजवाड्यात 50 व्हरांडे, 16 टेरेस आहेत.”
“राजवाड्यात एक लाल खोली सुद्धा आहे. राजघराण्यातील सदस्याचा मृत्यू झाल्यावर त्यांचा मृतदेह ठेवण्यासाठी ती तयार करण्यात आली होती.” ते पुढे सांगत होते.
जितेंद्रसिंह म्हणतात, “महालात जर्मन पद्धतीच्या खोल्या आहेत. तसंच राजवाड्याच्या आत नऊ छोट्या राजवाड्यासारख्या इमारती आहेत. त्यात एक फ्रेंच बंगला आहे, तिथे एकेकाळी राजघराण्यातील 26 कुत्री ठेवण्यात आली होती. याशिवाय घोड्यांचे तबेले आणि गाड्या ठेवण्यासाठी गॅरेज आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
चंद्रशेखर पाटील सांगतात, “ सुरुवातीच्या काळात राजवाड्याच्या टॉवरमध्ये घड्याळ लावण्याची कल्पना होती. पण नंतर तो विचार बदलण्यात आला. घड्याळाच्या आवाजाचा त्यांना त्रास होईल असं राजघराण्याला वाटत होतं. त्यामुळे टॉवर राहिलं पण घड्याळ ठेवलं नाही.”
लक्ष्मी विलास पॅलेसच्या आतल्या भागात अनेक कलात्मक वस्तू ठेवल्या आहेत. राजवाड्याच्या भिंतीवर अनेक कलाकुसरीच्या वस्तू लावल्या आहेत.
भारतातील सुप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांची अनेक चित्रं या राजवाड्यात लावलेली आहेत. त्यांच्यासाठी एक स्टुडिओ या राजवाड्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. तिथे 14 वर्षं काम करत त्यांनी गायकवाड घराण्यासाठी विविध चित्रं काढली होती.
राधिकाराजे गायकवाड सांगतात, “महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी राजा रवी वर्मा यांना अनेक चित्रं काढायला सांगितली होती. सरस्वती, महालक्ष्मीची चित्रं तसंच हिंदू पौराणिक कथांमधील अनेक प्रसंग त्यामध्ये चितारले आहेत.


राजा रवी वर्मा यांची अनेक चित्रं या राजवाड्यात आहेत. त्यात कंस, माया, कृष्णाची कैदैतून सुटका, सरस्वती, लक्ष्मी, सीता स्वयंवर, किचक वध, सीताचा भूमी प्रवेश इत्यादींचा समावेश आहे.”
“त्यांची चित्रं राजवाड्यात अनेक ठिकाणी दिसतात. त्यात भारतीय पौराणिक कथा आणि विविध थीम्सचा समावेश आहे. भारताच्या सांस्कृतिक परंपरेचा तो गौरवच आहे. त्यांची चित्र म्हणजे भारताच्या कलात्मक इतिहासाचे द्योतकच आहेत,” असं चंद्रकांत पाटील सांगतात.
राजवाड्यातील फर्निचर हे जगातील सर्वांत महागड्या फर्निचरशी स्पर्धा करणारं आहे. ते चीन, जपान, युरोपियन देश, अफ्रिका, अमेरिका आणि भारताच्या विविध भागातून आणण्यात आलं आहे.
जितेंदसिंह गायकवाड म्हणतात, “एकेकाळी राजवाड्यात वेगवेगळ्या चित्रकारांची 1000 चित्रं होती आणि 7000 वेगवेगळ्या कलाकृती होत्या.”

फोटो स्रोत, @DrSJaishankar
शस्त्रागाराचं नाव प्रताप शस्त्रागार असं होतं. त्यात फक्त मराठा काळातीलच नाही तर ऐतिहासिक महत्त्व असलेली अनेक शस्त्रं होती.
या शस्त्रागारात शिवाजीमहाराज, अकबर आणि गुरू गोबिंद सिंह यांच्या तलवारीसुद्धा आहे. “हे फक्त अवशेष नाही तर भारताच्या सार्वभौमत्वाचं चिन्ह आहे.,” जितेंद्रसिंह गायकवाड सांगतात. या वस्तू म्हणजे भारताच्या शक्ती आणि चिकाटीचे प्रतीक आहेत.
“इथे शिवाजी महाराजांची, औरंगजेबाची, अकबराची, जहांगिराची तलवार आहे. इतकंच काय इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज यांनी दिलेली तलवारसुद्धा आहे.” असं गायकवाड पुढे सांगतात.
राधिका राजे पुढे सांगतात, “तलवारीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. नागीण तलवार, सिरोही तलवार, पटनी तलवार, चंपानेरी तलवार, अशा अनेक तलवारींचा त्यात समावेश आहे. इंग्लंडमधून आयात केलेलं कुंभाराचं चाकसुद्धा आहे.”
त्यात एक नवदुर्गा नावाची एक तलवार आहे. त्याच्या पातीवर दुर्गेची नऊ रूपं दाखवली आहेत. त्याचबरोबर हस्तिदंती आणि सोन्याच्या नक्षीदार सजावटींनी मढवलेली इतर शस्त्रेही आहेत.
ऐसपैस खोल्या आणि नयनरम्य सजावट
आजही या राजवाड्यात दसरा, नवरात्र आणि गणेशोत्सवासारखे सण साजरे केले जातात. गायकवाड कुटुंबीय ते समाजाबरोबर साजरे करतात.
या राजवाड्यात 303 खोल्या आहेत. प्रत्येक खोलीचं एक वेगळं महत्त्व आहे. इथे असलेल्या भव्य दरबार हॉलमध्ये मोदी आणि सांचेझ यांची भेट झाली. हा हॉल 5000 चौ. फुटाचा असून त्यात एकही पिलर नाही. तिथे 1000 लोक एकावेळी बसू शकतात. व्हेनिसहून आयात केलेले मोझॅकच्या फरशा, जर्मनीतून आणलेल्या रंगीत काचा, जगातल्या विविध भागातून आणलेले झुंबर अशा विविध गोष्टींनी हा हॉल सजला आहे.
त्याबद्दल माहिती देताना राधिकाराजे गायकवाड म्हणतात, “दरबार हॉल हा राजवाड्यातील सर्वात मोठा हॉल आहे. येथे भव्य समारंभ आयोजित केले गेले आहेत. त्यात देशाविदेशातील पाहुण्यांनीही हजेरी लावली आहे, गाण्याच्या मैफिलीही इथे भरवल्या गेल्या.
प्रसिद्ध संगीतकार फय्याज खान एकेकाळी या राजघराण्यासमोर आणि त्यांच्या पाहुण्यांसमोर आपली कला सादर करायचे. मौला बक्श, इनायत खान आणि अब्दुल करीम या संगीतकारांनीही आपली कला सादर केली आहे.”

फोटो स्रोत, JITENDRASINH GAIKWAD
या राजवाड्याला भव्य प्रवेशद्वार आहेत मात्र आतल्या भागात कोणतेही गेट नाही. एकेकाळी राजवाड्यावर लाल रंगाचा दिवा लागलेला असायचा. त्याचा अर्थ असायचा की महाराज राजवाड्यात आहेत. मग लोक त्यांना भेटायला यायचे.
चंद्रशेखर पाटील सांगतात, “राजवाड्यातील रंगीत काचा या जर्मनीहून मागवण्यात आल्या आहेत. त्या काचा तिथून तयार होऊन येत असत आणि मग खिडक्यांमध्ये बसवल्या जात असत. अशा प्रकारे 350 रंगीत काचा बसवल्या आहेत.”
ते म्हणतात की, या राजवाड्याच्या बांधकामावेळी आणि आतली सजावट करण्यासाठी विविध देशांमधून परदेशी कलाकारांना बोलावण्यात आलं होतं.
राधिका राजे गायकवाड सांगतात, “हा राजवाडा म्हणजे निसर्ग, वास्तूरचना आणि इतिहासाचं मिश्रण आहे. हा राजवाडा 130 वर्षं जुना आहे. तरी त्यात केलेली कलाकुसर आणि एकूण बांधकामाचा दर्जा पाहून आपले पूर्वज किती पुढच्या काळाचा विचार करायचे याची मला जाणीव होते.”
मोठी बाग आणि खासगी प्राणीसंग्रहालय
या राजवाड्यातील मैदान 700 एकरचं होतं. आता ते 500 एकरचं झालं आहे. तिथे एक खासगी गोल्फ कोर्स, प्राणीसंग्रहालय आणि बागकाम करणारा ब्रिटिश व्यक्ती विलियम गोल्डरिंगने त्याची रचना केली आहे.
ब्रिटिशांनी तिथे एक मिनी रेल्वे तयार केली होती. ही रेल्वे राजघराण्यातील मुलांना राजवाडा परिसरात असलेल्या शाळेत ने-आण करण्यासाठी होती. प्राणीसंग्रहालयात वेगवेगळ्या प्राणी आणि पक्षी होते. आता ते अस्तित्वात नाही. मात्र रेल्वेचे रूळ आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
जितेंद्रसिंह गायकवाड म्हणतात, “प्रतापसिंह गायकवाड यांच्या आग्रहाखातर त्यांचे पुत्र फतेहसिंह गायकवाड यांनी ती रेल्वे 1954-55 च्या काळात कामाटीबाग गार्डनला देण्याचा निर्णय घेतला.
ही रेल्वे बागेत येणाऱ्या मुलांच्या करमणुकीसाठी वापरण्यात आली. हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठीही त्याचा वापर करण्यात आला होता.”
या राजवाड्याचा स्वत:चा एक गोल्फ कोर्स, क्रिकेटचं मैदान, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, आणि बँडमिंटन कोर्टसुद्धा आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनचं कार्यालयसुद्धा याच परिसरात आहे. तसंच एक पायऱ्यांची विहीर सुद्धा आहे.
राजवाड्यातील वाद, भांडणं
स्वातंत्र्यपूर्व भारतातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठ्या संस्थानांमध्ये गणल्या गेलेल्या गायकवाड घराण्याची ही मौल्यवान वास्तू इतर कोणत्याही संस्थानिक संपत्तीप्रमाणे वादातून सुटलेली नाही.
दोन्ही देशांमधील व्यावसायिक आणि राजकीय सहकार्याच्या ऐतिहासिक कराराची खूणा या राजवाड्यात असल्या तरी गायकवाड राजघराण्यातील वारसदार वाद आणि मालमत्तेच्या हक्कांवरून संघर्षसुद्धा या राजवाड्याने पाहिला आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांचा नातू प्रतापसिंह गायकवाड यांचे भारत सरकारबरोबर मतभेद झाले. त्यांचे वारसदार, समरजितसिंह, रणजीतसिंह, आणि संग्रामसिंह यांचा मालमत्तेवररून कायदेशीर संघर्ष झाला. या संघर्षात कुटुंबातील 23 लोकांचा समावेश होता आणि तो दोन दशके चालला. शेवटी 2012 मध्ये या वादावर पडदा पडला.

फोटो स्रोत, Getty Images
बऱ्याच संघर्षानंतर समरजित सिंह गायकवाड यांना लक्ष्मी विलास पॅलेस मिळाला. त्याचबरोबर त्यांना अमूल्य दागिने आणि खजिना मिळाला. त्यात अकबर शहाचा हिरा आणि स्टार ऑफ साऊथ मिळाला. त्यांच्या बहिणी आणि पुतण्यांना दुसऱ्या राजवाड्यांचा भाग देण्यात आला. संग्रामसिंह यांची भारतात बरीच मालमत्ता आहे.
ही अमर्याद मालमत्ता आणि 50 हजार कोटी रुपयांची यांचे वाटप अधिक वाद टाळण्यासाठी गुप्त ठेवण्यात आलं होतं.
या तडजोडीबाबकत गायकवाड राजघराणे काहीही बोलायला तयार नाही. पण जेव्हा हा वाद संपुष्टात आला तेव्हा समरजितसिंह गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, “हा निर्णय आमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी घेतला आहे. जेणेकरून भूतकाळातील कटुता विसरता येईल आणि पुन्हा नव्या उमेदीने कौटुंबिक सलोखा प्रस्थापित करता येईल.

फोटो स्रोत, JITENDRASINH GAEKWAD
कायदेशीर लढाईत बराच वेळ, पैसा आणि शक्ती वाया गेल्याने दोन्ही कुटुंबांना तडजोड करावी लागली असंही जितेंद्रसिंह गायकवाड सांगतात.
बडोदा येथील स्थानिक न्यायालयात दोन्ही कुटुंबांनी तडजोड केल्यावर अखेर हा वाद संपुष्टात आला. महत्त्वाचं म्हणजे ही इमारत त्यांच्या पूर्वजांनी बांधली होती आणि आता तीच बडोदा येथे न्यायालय म्हणून वापरली जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ बडोदा येथे व्यतित केला आहे. त्यामुळे सांचेझ यांची भेट या वास्तूत होणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. लक्ष्मी विलास पॅलेस अजूनही विकसित होत आहे. शाही राजवाडा ते मुत्सद्दी वाटाघाटींसाठी एक महत्त्वाची वास्तू असा त्याचा प्रवास आहे. हा राजवाडा म्हणजे भारताची भव्यता, जिद्द, चिकाटी आणि गायकवाड कुटुंबाच्या परंपरेचा महत्त्वाचा भाग म्हणून आजही उभा आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











