पीएचडीच्या विद्यार्थ्यानं 'गुगल सर्च' केलं आणि सापडलं जंगलात लपलेलं अख्खं शहर

शहराची रचना
फोटो कॅप्शन, शोध लागलेलं व्हलेरिआना हे माया संस्कृतीतील शहर कदाचित असं दिसत असेल
    • Author, जॉर्जिना रेनॉर्ड
    • Role, विज्ञान प्रतिनिधी

माया संस्कृतीतील एका प्राचीन विशाल नगराचा शोध लागला आहे. मेक्सिकोच्या जंगलांमध्ये अनेक शतकांपूर्वी हे शहर गायब झालं होतं. घनदाट वृक्षराजीत, जंगलाखाली ते दडून गेलं होतं.

मेक्सिकोच्या आग्नेय भागातील कॅम्पेचे राज्यात पुरातत्व शास्त्रज्ञांना पिरॅमिड, खेळाची मैदानं, अॅम्फी थिएटर आणि जिल्ह्यांना जोडणारे मार्ग सापडले आहेत.

पुरातत्वशास्त्रज्ञांनी लायडार तंत्रज्ञानाचा वापर करून जंगलाखाली दडलेल्या शहराचा हा सर्व परिसर समोर आणला आहे. लायडार हा एक प्रकारचा लेझर सर्व्हे असतो.

त्यात झाडी, जंगलं, वृक्षराजीखाली गाडल्या गेलेल्या वास्तू, इमारती, बांधकामं यांचा छडा लावला जातो. या परिसराला त्यांनी व्हॅलेरिआना असं नाव दिलं आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पुरातत्वशास्त्रज्ञाना वाटतं की कलाकमूलनंतर इतक्या घनतेचं हे दुसऱ्या क्रमांकाचं पुरातन स्थळ आहे.

कालाकमूल हे प्राचीन लॅटिन अमेरिकेतील माया संस्कृतीचं सर्वात मोठं ठिकाण असल्याचं मानलं जातं.

पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमनं एकूण तीन ठिकाणांचा शोध लावला आहे. या सर्वांचं एकत्रित क्षेत्रफळ स्कॉटलंडची राजधानी असलेल्या एडिनबराएवढं आहे.

लायडार तंत्रज्ञानामुळे सापडलं प्राचीन शहर

विशेष महत्त्वाची बाब म्हणजे, या ठिकाणाचा शोध अपघातानंच लागला आहे. एक पुरातत्वशास्त्रज्ञ इंटरनेटवर काही माहिती शोधत असताना या ठिकाणाचा उलगडा झाला आहे.

"मी गुगल सर्चच्या साधारण 16 व्या पानावर होतो. तिथे मला एका मेक्सिकन संस्थेनं पर्यावरणीय देखरेखीसाठी केलेला लेझर सर्व्हे सापडला," असं ल्युक ऑल्ड-थॉमस सांगतात. ते अमेरिकेतील ट्युलेन विद्यापीठात पीएचडीचे विद्यार्थी आहेत.

ऑल्ड-थॉमस यांनी पाहिलं की तो एक लायडार सर्व्हे होता. लायडार सर्व्हे म्हणजे एक रिमोट सेन्सिंग टेक्निक असते ज्यात विमानातून हजारो लेझर पल्सेस टाकले जातात.

मग जमिनीवर पडलेल्या या लेझर किरण किंवा सिग्नलला परत येण्यासाठी लागणाऱ्या कालावधीचं मोजमाप करून त्या आधारे खाली असलेल्या वास्तू, इमारती, बांधकाम यांचे नकाशे बनवले जातात.

माया संस्कृतीतील शहर

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यातून जंगलांखाली, जमिनीखाली असलेल्या वास्तू, नगररचना किंवा बांधकामं यांचं प्रत्यक्ष खोदकाम न करता आकलन होतं. मग या मॅपिंगचा उपयोग करून पुढील उत्खनन करणं सोपं जातं.

मात्र, जेव्हा ऑल्ड-थॉमस यांनी त्या माहितीचं विश्लेषण पुरातत्वशास्त्रज्ञ वापर असलेल्या पद्धतींच्या आधारे केलं, तेव्हा त्यांना अशी गोष्ट लक्षात आली जी इतरांच्या नजरेतून सुटली होती.

ती बाब म्हणजे, साधारण इसवीसन 750-850 च्या सुमारास शिखरावर असलेलं, भरभराटीस आलेलं एक प्राचीन शहर ज्याची लोकसंख्या त्यावेळेस 30,000 -50,000 दरम्यान होती.

विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आज या प्रदेशात जितके लोक राहतात, त्यापेक्षा ही संख्या अधिक होती, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

ऑल्ड-थॉमस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्राचीन शहराला व्हॅलेरिआना (Valeriana) असं नाव दिलं. तिथे जवळच असलेल्या एका सरोवराच्या नावावरून हे नाव देण्यात आलं.

या शोधामुळे, उष्णकटीबंधीय प्रदेश म्हणजे असा प्रदेश जिथे "संस्कृतींचा ऱ्हास झाला किंवा त्या नष्ट झाल्या" ही पाश्चात्य विचारसरणी बदलण्यास मदत होते, असं प्राध्यापक मार्सेलो कॅन्युटो म्हणतात. ते या संशोधनाचे सह-लेखक आहेत.

किंबहुना, त्याच्या विपरित जगाच्या याच भागात श्रीमंत आणि विकसित संस्कृती नांदत होत्या, असं ते म्हणतात.

ही संस्कृती नष्ट का झाली, हे शहर का नष्ट झालं आणि तिथले निवासी हे शहर सोडून का गेले, याबद्दल आम्हाला निश्चितपणे सांगता येणार नाही. मात्र पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणतात की यामागे हवामान बदल हे प्रमुख कारण होतं.

कुठे आणि कसं आहे हे प्राचीन विशाल शहर?

एखाद्या "राजधानीच्या शहरात असतात ती वैशिष्ट्ये" व्हॅलेरिआनामध्ये आहेत.

तर वैशिष्ट्यपूर्ण अशा कलाकमूल या प्राचीन शहरानंतर इमारती किंवा बांधकामांच्या घनतेच्या बाबतीत व्हॅलेरिआना हे शहर दुसऱ्या क्रमांकावर होतं. कलाकमूल साईटपासून ते जवळपास 100 किमी (62 मैल) अंतरावर होतं.

"नजरेसमोर असूनही हे शहर लपलेलं आहे", असं पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणतात. कारण स्पिजलजवळच्या मुख्य रस्त्यापासून ते अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. याच भागात बहुतांश माया लोक सध्या राहतात.

या हरवलेल्या शहराची कोणतीही ज्ञात चित्रे नाहीत. कारण जरी स्थानिक लोकांना तिथे जमिनीखाली ढिगाऱ्यामध्ये काही अवशेष असल्याची शंका आली असेल तरी "तिथे कोणीच राहत नव्हतं," असं संशोधक म्हणतात.

या शहराचं क्षेत्रफळ जवळपास 16.6 चौ. किमी होतं. या शहरात दोन प्रमुख केंद्रे होती. ज्यात जवळपास 2 किमी (1.2 मैल) अंतरावर मोठाल्या इमारती होत्या आणि ती दाट घरे आणि रस्त्यांनी जोडलेली होती.

त्यात दोन मोठे चौक होते आणि तिथे पिरॅमिडच्या आकाराची मंदिरं होती. जिथे माया लोक पूजा करत असतील, जिथे त्यांनी पवित्र मुखवडे (jade masks)आणि मृत व्यक्तींना दफन केलं असेल.

तिथे एक खेळाचं मैदान देखील होतं जिथे बहुधा ते लोक प्राचीन काळातील चेंडूचा एखादा खेळ खेळले असतील.

या प्राचीन शहरातील इमारतीचे डिजिटल प्रारूप
फोटो कॅप्शन, या शहराची कोणतीही चित्रे नाहीत मात्र जवळच असणाऱ्या कलाकमूल या प्राचीन शहराप्रमाणेच तिथे देखील पिरॅमिड सारखी मंदिरं होती

याशिवाय तिथे जलाशय देखील असल्याचा पुरावा होता. ज्यातून दिसतं की ते लोक त्या शहरातील मोठ्या लोकसंख्येला वास्तव्य करणं शक्य व्हावं यासाठी तिथल्या भूप्रदेशाचा वापर करत होते. तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करत होते.

एकंदरीतच, ऑल्ड-थॉमस आणि प्राध्यापक कॅन्युटो यांनी या परिसरातील जंगलातील तीन ठिकाणांचं सर्व्हेक्षण केलं. त्यांना इथे वेगवेगळ्या आकाराच्या 6,764 इमारती सापडल्या.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या प्राध्यापक एलिझाबेथ ग्रॅहम या संशोधनात सहभागी नव्हत्या. त्या म्हणतात, माया लोक विखुरलेल्या गावांमध्ये नाहीतर विकसित शहरांमध्ये राहत होते या दाव्याला यातून बळ मिळतं.

"भूतकाळात या भूप्रदेशात लोकवस्ती हे नक्की. आज जसा उघड्या डोळ्यांनी तो निर्जन किंवा जंगली दिसतो तसा तो नव्हता," असं त्या म्हणतात.

या संशोधनातून दिसतं की इसवीसन 800 नंतर माया संस्कृतीचा ऱ्हास झाला, ती नष्ट झाली. त्यामागचं एक कारण म्हणजे माया लोकांच्या वस्त्या खूपच दाटीवाटीच्या होत्या आणि त्यामुळे हवामान बदलांमुळे निर्माण झालेल्या समस्यांना ते तोंड देऊ शकले नाहीत.

"यातून दिसतं की या भूप्रदेशात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना इथे मोठ्या संख्येनं लोक राहत होते आणि त्या शहरात फारसे बदल करण्यासाठी वाव नव्हता. त्यामुळेच कदाचित लोक इथून इतरत्र गेल्यामुळे बहुधा इथली सर्व व्यवस्था विस्कटत गेली," असं ऑल्ड-थॉमस म्हणतात.

16 व्या शतकात स्पॅनिश आक्रमकांशी झालेली युद्धं आणि त्यानंतर त्यांनी हा प्रदेश जिंकल्यामुळे देखील माया संस्कृतीची शहरं नष्ट होण्यास हातभार लागला.

आणखी अनेक शहरं सापडण्याची शक्यता

लायडार तंत्रज्ञानामुळे पुरातत्व क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाले आहेत.

पुरातत्व शास्त्रज्ञांद्वारे उष्णकटीबंधा सारख्या दाट जंगलानं, झाडीनं व्यापलेल्या प्रदेशात सर्व्हे करून, संशोधन करून हरवलेल्या संस्कृतींचं एक नवं जगच समोर आणण्याच्या प्रक्रियेत लायडार तंत्रज्ञानानं क्रांती घडवून आणली आहे, असं प्राध्यापक कॅन्युटो म्हणतात.

त्यांच्या करियरच्या सुरूवातीच्या काळात या प्रकारच्या सर्व्हेमध्ये पायी फिरून आणि हातानं साधी उपकरणं वापरून जमिनीचा एकेक इंच तपासला जायचा.

मात्र, मेसोअमेरिकन प्रदेशात लायडार तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यापासून दशकभरात पुरातत्व क्षेत्रानं प्रचंड मजल मारली आहे.

पुरातत्व शास्त्रज्ञांनी जवळपास एक शतकभराच्या कामातून जितक्या प्रदेशाचा सर्व्हे केला, अभ्यास केला, त्याच्या जवळपास 10 पट परिसराचं मॅपिंग लायडार तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आला आहे.

ऑल्ड-थॉमस म्हणतात की त्यांच्या कामातून असं दिसतं की पुरातत्व शास्त्रज्ञांना कोणतीही कल्पना नसलेली अनेक प्राचीन ठिकाणं तिथे आहेत.

किंबहुना, इतकी ठिकाणं सापडली आहेत की पुरातत्वशास्त्रज्ञ त्या सर्वांचं उत्खनन करू शकत नाहीत.

"मला कधीतरी व्हॅलेरिआना ला जायचं आहे. ते ठिकाण रस्त्यापासून इतकं जवळ आहे की तुम्ही तिथं जाणं कसं टाळू शकता? मात्र आम्ही तिथे उत्खननाशी निगडीत काही प्रकल्प सुरू असं मला म्हणता येणार नाही," असं ऑल्ड-थॉमस म्हणाले.

"लायडार तंत्रज्ञानाच्या युगात माया संस्कृतीशी निगडीत असंख्य नवीन शहरं शोधून काढण्याची एक नकारात्मक बाजू म्हणजे आपण अभ्यास करू शकतो त्यापेक्षा अशा ठिकाणांची, शहरांची संख्या अधिक आहे," असं ते पुढे म्हणतात.

हे नवं संशोधन अँटिक्विटी या मासिकात प्रकाशित झालं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)