ऑर्कने : एक असं ठिकाण जिथे उघडतो 5 हजार वर्षांपूर्वीच्या जगाचा दरवाजा

दरवाजा

फोटो स्रोत, Historic Environment Scotland - HES Archives

    • Author, जोन मॅकफॅडेन
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

हजारो वर्षांपासून आपल्या पूर्वजांना हिवाळ्यातील सूर्याच्या संक्रमणातून एक प्रकारचं समाधान किंवा शांतता मिळाली आहे. आजही ऑर्कनेतील मेशोवेच्या मकबऱ्यात सूर्यास्ताच्या वेळी दिसणाऱ्या आश्चर्यकारक दृश्यामध्ये तोच विश्वास झळकत असल्याचं पाहायला मिळतं.

स्कॉटलंडच्या ईशान्य किनारपट्टीपासून 10 मैल अंतरावर असलेली ऑर्कनेची बेटं हा मोठा ऐतिहासिक खजिना आहे.

क्रारा ब्रे या प्रसिद्ध निओलिथिक काळातील (अश्मयुगाचा अखेरचा टप्पा) गावापासून ते प्रचंड सुंदर अशा दगडी वर्तुळापर्यंत (रिंग ऑफ ब्रॉगर) हे ठिकाण विविध विधी आणि परंपरांचं स्थान राहिलेलं आहे.

मी जेव्हा ऑर्कनेमधील आणखी एक प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू मेशावेच्या मकबऱ्याला भेट दिली तेव्हा, प्रथमदर्शनी मला ते फक्त खंदकानं घेरलेल्या एखाद्या हिरव्यागार टेकडीसारखं वाटलं.

पण साधं वाटत असलं तरी हे 5000 वर्षे जुनं दफन स्थळ किंवा कब्रस्तान प्रत्यक्षात प्राचीन डिझाईन आणि अभियांत्रिकीचा एक उत्तम नुमना आहे. तसंच ऑर्कनेमधील प्राचीन रहिवाशांच्या कौशल्याचंही ते उदाहरण आहे.

त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या हिवाळी संक्रमणाच्या (दरवर्षी 21 किंवा 22 डिसेंबरदरम्यान) आधी आणि नंतर अंदाजे तीन आठवड्यांपर्यंत पर्यटकांना याठिकाणी काहीतरी चमत्कारिक वाटाव्या अशा घटनेचा अनुभव घेण्याची संधी मिळत असते.

वर्षाच्या या कालखंडात या मकबऱ्याचं अरुंद प्रवेशद्वारं हे फक्त प्रवेशद्वार न राहता अधिक काहीतरी बनतं. याचं डिझाईन ठरवून या काळातील सूर्याच्या स्थितीचा अंदाज घेऊन त्यानुसार करण्यात आलेलं आहे.

अखेरची किरणं जेव्हा अदृश्य होऊ लागतात तेव्हा म्हणजे अंदाजे 15:10 दरम्यान या गदड काळोखात प्रकाशाचे किरण याठिकाणी तयार केलेला मार्ग कापत पुढं सरकतात आणि मकबऱ्याच्या पृष्ठभागावरून वर जात मागच्या भिंतीला सुवर्णप्रकाशात न्हाऊन टाकतात, तेव्हा तो दुसऱ्या जगात प्रवेश करण्यासाठीचा चमकता दरवाजा भासू लागतो.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या वास्तूचे व्यवस्थापक फिक हॉपकिन्स यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "हिवाळी संक्रमणाचा हा काळ वर्षातील सर्वात महत्त्वाचा काळ आहे.

मेशावेच्या हजारो तासांच्या कठोर परिश्रमांचं प्रतिनिधित्व हा काळ करतो. जेव्हा हे होत असतं तेव्हा तुम्ही योग्यवेळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी त्याठिकाणी असाल तर तो अत्यंत चमत्कारिक असा अनुभव असतो. त्याठिकाणी अगदी शांत वातावरण असतं. अगदी चर्चमध्ये असतं तसं."

हजारो वर्षांपूर्वी मेशावेनं स्थानिकांना प्रचंड थंडीचा सामना करण्यासाठी मदत केली असावी. याठिकाणी दिवसातील 18 तास अंधार असल्यामुळं, गडद मकबऱ्यातील होणाऱ्या बदलांच्या आश्चर्यकारक घटनेमुळं त्यांना पुन्हा हळू हळू दिवस मोठा होत जाणार असल्याचं आश्वासन मिळत असावं.

प्रकाशामुळं त्यांना पृथ्वीवर वसंत ऋतूमध्ये पुन्हा एकदा जीवन बहरल्याची आठवण होत असेल. तसंच कदाचित दुसऱ्या जगात शाश्वत जीवनाचे लोभस आश्वासनही मिळत असेल.

हॉपकिन्स म्हणाले की, "हा एक अत्यंत खास अनुभव आहे. पण त्यासाठी तुम्हाला विश्वास गमावण्याची गरज पडत नाही. इतर काही नाही तर, किमान तुम्ही बदलत जाणाऱ्या जगात असल्याची जाणीव तुम्हाला होते."

एलि शील यांनी 17 वर्षांपूर्वी व्यवस्थापक म्हणून याठिकाणी तात्पुरती नोकरी सुरू केली होती. पण त्या अजूनही तिथंच आहेत. त्यांच्या भोवताली असलेल्या ऐतिहासिक गोष्टींमुळं त्या प्रचंड रोमांचित असतात. "मी या दरम्यान फक्त दोन वेळा हिवाळी संक्रमणाचा चमत्कार पाहू शकले नाही.

कारण त्यावेळी कोव्हिडमुळं सर्व बंद होतं. हा अनुभव खरंच चमत्कारिक आहे. मी कितीही वेळा ते पाहिलं अनुभवलं तरी प्रत्येकवेळी वेगळा अनुभव येतो. कारण प्रत्येकवेळी सूर्यकिरणं भींतीवर वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या शक्तीनं धडकत असतात," असं त्या म्हणाल्या.

दरवाजा

फोटो स्रोत, Historic Environment Scotland - HES Archives

याठिकाणी 21 डिसेंबरच्या टूरसाठी आधीपासून पूर्णपणे बुकींग झालेलं असलं तरी, तुम्ही डिसेंबरच्या सुरुवातीला किंवा शेवटी आणि कधीकधी जानेवारीतही हे अनुभवू शकता, हेच याचं वैशिष्ट आहे, असंही त्या म्हणाल्या.

मेशावे ही ईशान्य युरोपात जगण्यासाठी गरजेची एक उत्तम अशी नवाश्मयुगातील इमारत असली तरी, तिचं बांधकाम हे कायम रहस्यच राहिलं आहे.

10 मीटर लांबीच्या अरुंद प्रवेशकक्षाला मोठ्या दगडांचं छत असून मध्यवर्ती सभागृह हे चौकोनी आणि भव्य आहे. ते जवळपास 5 मीटरचे असून चारही कोपऱ्यांत भव्य असे खांबांसारखे उभे दगड आहेत. त्याकडं लगेचच लक्ष वेधलं जातं.

त्यापैकी काहींचं वजन तर तीन टनांपेक्षा अधिक आहे. ते आत ठेवण्यासाठी किती परिश्रम करावे लागले असतील याची कल्पनाही करणं अशक्य आहे. विशेषतः अवजारं ही शिंगापासून तयार केलेली असतील तेव्हा.

"हे सुंदर पण भव्य दगड याठिकाणी आणणं हे किती मेहनीचं काम असेल. कारण अंदाजे तीन मैल अंतरावरून ते आणलेले असतील," असं हॉपकिन्स यांनी म्हटलं.

एवढंच काय पण 7.3 मीटर उंच आणि 35 मीटर व्यासाच्या या टेकडीच्या बाजुनं खंदक खोदण्याचं कामही अशक्य असं भासणारं आहे.

"हे खंदक 4 मीटर खोल असून तेव्हाच्या काळातील कारागिरांनी कोणत्याही धातूच्या अवजाराविना कठोर दगड कोरून ते तयार केलेलं आहे.

पण त्यांना एवढे परिश्रम करण्यासाठी नेमकी प्रेरणा कशातून मिळाली असेल, यामागं नेमकं काय कारण राहिलं असेल?" असं हॉपकिन्स म्हणतात.

दरवाजा

फोटो स्रोत, Historic Environment Scotland - HES Archives

बहुतांश पुरातत्व अभ्यासक आणि इतिहासकारांच्या मते हे ठिकाण एकतर धार्मिक विधी परंपरांचं ठिकाणं राहिलं असेल किंवा अवकाशाचा अभ्यास करण्यासाठीचं खगोलशास्त्रीय केंद्र राहिलं असेल. यावरून अनेक सिद्धांतही समोर आले आहेत.

प्रवास करताना मार्गदर्शनासाठी किंवा काळाचा टप्पा चिन्हांकित करताना विविध प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मानव नेहमीच आकाशातील ताऱ्यांकडं पाहतो. धर्म आणि विधी हे जगभरातील संस्कृतींना विश्वासाची सुरक्षितता प्रदान करत असतात. तसंच ऑर्कनेमधील लोकही वेगळे नसतील, तेही कदाचित स्वर्गातील त्यांच्या देवतांकडं पाहत असतील.

सिद्धांत हे काळानुसार बदलत जातात आणि हाच गमतीचा भाग आहे. मेशावेच्या संदर्भातील सत्य हे कदाचित कुणाचा तरी अंदाज असू शकतं. त्यामुळं आपल्याला काही सत्य समजू शकेल हे कठिणच आहे.

म्हणून जोपर्यंत टाईम मशीनचा शोध लागत नाही, कदाचित तोपर्यंत आपल्याला नेमकं काहीही समजू शकणार नाही, असं हॉपकिन्स म्हणाले.

"आपण फक्त असा अंदाज बांधू शकतो की, केर्न्स आणि मोठे दगड हे कदाचित जीवन आणि मृत्यू याबाबतच्या अंतहीन प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी उभारलेली असावीत आणि मेशावे हे कदाचित या दोन जगांच्यामधलं स्थान असेल."

दरवाजा

फोटो स्रोत, Historic Environment Scotland - HES Archives

शील या मेशावेच्या संबंधातील अध्यात्मिक पैलू आणि विश्वासाचं कौतुक करतात. त्यांच्या मते, समुदायाच्या संवर्धनासाठी हे तयार करण्यात आलं असावं. आणखी एका तथ्यावरून एक सिद्धांत समोर आला आहे. तो म्हणजे, रिंग ऑफ ब्रॉगर तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले विविध प्रकारचे दगड हे फक्त दोन मैल अंतरावरून आणण्यात आले होते.

शील म्हणाल्या की, "त्यावेळी जीवन कठीण होतं आणि यामुळं लोकांना चांगली नाती तयार करण्यासाठी किंवा एकमेकांना मदत करण्यासाठी फायदा झाला," असं शील म्हणाल्या.

"तेव्हा जीवन हे अशाप्रकारे अधिक स्थिर आणि सुरक्षित असेल. प्रत्येक संस्कृतीतून धर्म तयार झाल्यानं, त्यांना यापेक्षा अधिक काहीतरी गरजेचं असावं. नातं, मैत्री तसंच सर्व जमातींची वार्षिक सभा असेल, ज्याठिकाणी तुम्ही व्यापार करू शकता किंवा पार्टनर शोधू शकता.

साहजिकच हे हिवाळ्यात होत असेल. तुम्ही वर्षातील सर्वात वाईट काळाचा सामना केला आता एकत्र येऊन एकत्र भोजन करून एकत्रितपणे वसंत ऋतूची वाट पाहत असतील," असंही शील म्हणाल्या.

मेशावेबाबत त्यांचं जे आकर्षण आहे त्याचा एक कारण म्हणजे ते कालातीत असणं. मेशावेच्या उभारणीमागं काहीतरी मोठी प्रेरणा असणार. आजही अगणित पर्यटक याठिकाणी या अंधाऱ्या मकबऱ्यात येणारा सूर्यकिरणांचं रुप पाहून स्तब्ध होतात.

वर्षाचा शेवट या आणि कदाचित पुढच्या अशा दोन्ही जीवनांत भविष्य प्रतिबिंबित करणं आणि विचार करण्याचा पारंपरिक काळ असतो. हिवाळी संक्रमणातून आपल्याला आजही तोच अनुभव मिळतो जो आपल्या पूर्वजांना 5000 वर्षांपूर्वी मिळत होता. तो म्हणजे सगळीकडं अंधकार पसरलेला असताना प्रकाशमान होण्याचा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)