या राजाच्या मृत्यूनंतर 3 कलावंतिणींना पुरण्यात आलं होतं, काय होती ही पद्धत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मायाकृष्णन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एकेकाळी भारताच्या विविध भागात पतीच्या मृत्यूनंतर पत्नीदेखील सती जात असे. दक्षिणेत चोल साम्राज्यात यासारखीच आणखी एक विचित्र प्रथा होती.
चोल शिलालेखांमध्ये असं लिहिलंय की, मृत्यूनंतरही त्या व्यक्तीसोबत राहाता यावं यासाठी असं केलं जाई. सदर लेखात या विचित्र प्रथेविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.
आम्ही तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई प्रदेशातील तामरीपक्कम गावाला भेट दिली, जिथे कुलोत्तुंगा चोल सम्राटाच्या काळात पृथ्वीगंगन नावाचा मांडलिक राजा प्रांताधिपती होता. त्याच्या मृत्यूनंतर तीन नृत्यांगनांना त्याच्यासोबत पुरण्यात आल्याचे पुरावे शिलालेखातून सापडल्याचे इतिहासकारांनी म्हटले आहे.
राजासोबत जिवंतपणीच पुरलेल्या स्त्रियांची कबर
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तिरुवन्नमलाई जिल्हा ऐतिहासिक सर्वेक्षण केंद्राचे सचिव बालमुरुगन यांनी बीबीसीला शिलालेखांची माहिती दिली.
ते म्हणतात की पृथ्वीगंगन नावाचा राजा मरण पावला तेव्हा तीन कलावंतीणींना जिवंत पुरण्यात आलं आणि तामरीपक्कम येथील अग्नेश्वरा मंदिरात या संदर्भात तीन शिलालेख आहेत.
तामरीपक्कम येथील अग्नेश्वरा मंदिराच्या दर्शनी सभामंडपाच्या पूर्वेकडील भिंतीच्या स्तंभावरील 14 ओळींचा हा सर्वांत पहिला शिलालेख असल्याचं म्हटलं जातं.

'श्री कुलोत्तुंगा चोल देव स्वस्ति श्री त्रिभुवन चक्रवर्ती 10 वी सोमणना पृथी. ‘मन कूटदुन देव पृथ्वीगणा पालीकोंडा गाणार'
याने सुरू होणाऱ्या शिलालेखाचं बालमुरुगन यांनी वाचन करून तो सविस्तरपणे समजावून सांगितला.
तामरीपक्कम शिलालेखाचा अर्थ काय आहे?
इ.स. 1188 मध्ये कुलोत्तुंगा तिसरा याच्या कारकिर्दीतील मांडलिक राजा पृथ्वीगंगनच्या मृत्यूनंतर हा शिलालेख कोरण्यात आल्याचं सांगितलं जातं.
बालमुरुगन यांनी शिलालेखाचा अर्थ स्पष्ट करताना सांगितलं की, “सदर जमीन मृत पृथ्वीगंगन तसेच जिवंतपणे समाधी गेलेल्या महिलांच्या नावे नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली होती."
दावेदारांचा वंश जोपर्यंत टिकेल तोपर्यंत त्यांचा जमिनीवर हक्क राहील, असं कायद्यात म्हटलंय. त्याशिवाय नंतरच्या काळात त्यांच्या वंशजांनी त्या जमिनीत हस्तक्षेप करू नये, असं सांगण्यात आलंय.

तमिळनाडू पुरातत्व विभागाने 'तामरीपक्कम शिलालेख' या पुस्तकात यासंबंधीचे शिलालेख प्रकाशित केले आहेत.
बालमुरुगन यांनी मंदिराच्या दर्शनी भागाच्या पूर्वेकडील भिंतीवर 4 ओळींचा शिलालेख दाखवला.
त्यामध्ये, "स्वस्थी... पल्लीकोंडा अदम आल्वरकुम....पृथ्वीकंगा" या ओळी वाचता येतात.

अदम अलवार, सतुरगदाई पेरुमल आणि निरैथवंजेतल या तीन देवरादियार महिलांना पृथ्वीगंगनसोबत जिवंत पुरण्यात आल्याचं यातून समजतं. यापैकी एकाही महिलेला मूलबाळ नसल्याचं बालमुरुगन यांनी सांगितलं.
या शिलालेखात जिवंत पुरण्यात आलेल्या महिलांची नावं स्पष्टपणे नोंदवण्यात आली आहेत.
ते पाच जण कोण आहेत?
तसंच दर्शनी मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवर पाच ओळींचा शिलालेख आहे.
"श्री कुलोत्तुंगा चोलदेव 10 वा अदम अलवरम स्वस्ति श्री त्रिभुवन चक्रवतीलू...” याने सुरू होणारा तिसरा शिलालेख बालमुरुगन यांनी वाचला आणि त्याचं स्पष्टीकरण दिलं.
देवरादियार कुळातील अलवार, सतूरगदाई पेरुमल आणि निरैथवंजेतल या तीन कलाकारांना राजा पृथ्वीगंगनसोबत पुरण्यात आलेलं, याचा अर्थ तिरुवंगेश्वरममधील मंदिराच्या पाच देवरदियारांना जमीन देण्यात आली होती आणि राजघराण्यातील कोणीही ती परत घेण्याची इच्छा बाळगत असेल तर ते पाप ठरेल, असं म्हटलं आहे.

तथापि, बालमुरुगन म्हणाले की तामरीपक्कम मंदिरातील शिलालेख थोडे विचित्र आहेत कारण त्यात फक्त तीन महिलांचीच नावं आहेत आणि ज्या पाच देवरदियारांना नुकसान भरपाई म्हणून जमीन देण्यात आली होती त्यांची नावं येथे नमूद करण्यात आलेली नाहीत.
त्या काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती आपण या पुरालेखांमधून समजून घेऊ शकतो. सर्व वयोगटातील महिला या त्रासातून जात असल्याचा हा पुरावा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
आंध्र प्रदेशातही अशाच प्रकारची प्रथा
विल्लुपुरम अण्णा कॉलेज ऑफ आर्ट्स हिस्ट्री विभागाचे प्राध्यापक रमेश सांगतात की, 'इतिहासात अशा अनेक प्रथा आणि परंपरा आहेत.'
"या घटनांशी संबंधित काही कायदे समोर आले आहेत. केवळ तामिळनाडूतच नाही, तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातही असे अध्यादेश आहेत," असं ते म्हणाले.
कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील हुंडी गावातील एका तलावात सापडलेल्या 24 ओळींच्या शिलालेखातही असाच संदर्भ सापडतो.
त्याचप्रमाणे बेल्लारी जिल्ह्यातील कलकोडे गावाच्या दक्षिणेला एका दगडावर कोरण्यात आलेल्या 25 ओळींच्या कन्नड शिलालेखात असं लिहिलेलं आढळतं की एका सैनिकाला राजासोबत पुरण्यात आलं होतं, असं प्रा. रमेश यांनी सांगितलं.
परदेशातही असे संदर्भ उपलब्ध आहेत. रमेश सांगतात की, त्या काळातील लोकांचा राजावर असलेला प्रचंड विश्वास किंवा राजाला असलेले सर्वाधिकार याला कारणीभूत असू शकतात.

शिवाय, "त्याकाळी राजाला देवासमान मानलं जायचं. याचं आणखीन एक कारण म्हणजे राजाचा शब्द हा देवाचा शब्द मानला जायचा," असं प्राध्यापक रमेश म्हणाले.
अशा प्रकारच्या घटनांना आत्माहुती म्हणजे स्वतःचे बलिदान देणे म्हटले जायचे. अशा प्रथा क्लेशकारक असल्याचं मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उदयकुमार यांनी नोंदवलं आहे.
संबंधित काळातील विचित्र घटना आणि प्रथांबद्दल प्रतिक्रिया देताना डॉ. उदयकुमार म्हणतात की अशा घटना मानसिक खच्चीकरण दर्शवतात.
यासारख्या घटना अंधश्रद्धेचा कळस असल्याचं सांगून ते म्हणाले की, 'अमूल्य जीवनाचा असा त्याग करणं हे अतिशय क्लेशकारक आहे.'
यामागचं कारण असंही असू शकतं की त्यांचा असा विश्वास आहे की मृत्यूनंतर दुसरं जग आहे जिथे ते त्यांच्या प्रियजनांसोबत राहू शकतात, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.
"ते आपल्या प्रियजनांना मृतदेहासोबत पुरतात ही अंधश्रद्धा नाही, तर दुसरं काय आहे," असं उदय कुमार म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








